Sunday, December 16, 2007

स्वप्ना

" अवी ऽ !"
आईची हाक आली. ती मी ऐकलीही पण उत्तर द्यावंसं वाटलं नाही. कारण तिला काय म्हणायचं होतं ते मला चांगलंच माहिती होतं आणि तो विषय मला नको होता. तरीही मला ते ऐकावं लागणारच होतं. तिला फार काळ असं टांगणीला ठेवणं आता या पुढे जमणारं नव्हतं. आता मी तिला टाळण्याचा जराही प्रयत्न केला तर दुखावली जाणार होती. बाबा गेल्यापासून ती फारच हळवी झाली होती.

"अरे! ऐकतोयस ना." आई पदराला हात पुसत समोरच येऊन उभी ठाकली.
" हं, बोल "
" मी काय म्हणते.. करंबेळकरांचा काल पुन्हा फोन आला होता."
" बरं ! "
" अरे, बरं काय? मी काय म्हणते... एकदा मुलगी बघायला काय हरकत आहे?"
" हं !"
" कम्माऽल झाली बाई तुझी! तू लग्न करणारेस की नाही? ...ते काही नाही. येत्या रविवारी ते मुलगी आणताहेत, दाखवायला.
मी हो म्हणालेय त्यांना. मुलगी चांगली शिकलेली आहे. इंटीरीयर का कसलासा कोर्सही केलाय आणि खूप देखणी आहे म्हणे."

" देखणी! ....तशी असेल का गं!" मी तंद्रीतच बोललो. आईच्या बोलण्याकडे माझं लक्ष होतंही आणि नव्हतंही.

" तशी म्हणजे कशी? तू काय लावलं आहेस हे? तू काय दुसरी एखादी मुलगी बिलगी पाहिलीएस की काय? आणि मग सांगत का नाहीस तसं? "
" तसं काही नाही गं. ठीक आहे. बघू."
" बघू बिघू काही नाही. रविवारी घरीच राहा आपण. आणखी एक मेहेरबानी करा. कशात हरवू बिरवू नका."

आई मला हरवू नका म्हणाली पण मी आताही हरवलेलाच होतो. तिला पाहिल्या पासून या हरवलेलेपणाच्या धुक्यात मी गुरफटून गेलो होतो. या क्षणीही ती जणू माझ्या समोर उभी होती. मी आताही माझा उरलो नव्हतो. एखाद्या कळसूत्राने जणू माझा ताबा घेतल्यागत मी कपाटातून माझी रोजनिशी काढली आणि मागच्या कप्प्यातले तिचे छायाचित्र काढून त्यात हरवलो.

एक जुनाट वाडा. वाडा कसला जणू गढीच. वाड्याच्या मागे एक भलं मोठं परस. परसात एक भली मोठी बारव. परसात झाडझाडोराच माजलेला. वाड्याची तशी बारवेचीही पडझडच झालेली. पण बारव अजून बर्‍यापैकी तग धरून राहिलेली. वरल्या तोंडाला अष्टकोनी चिरेबंदी घेर. बारवेला एका बाजूने पाण्याच्या डोहापर्यंत उतरत जाणार्‍या पायर्‍या. पायर्‍या जिथे सुरू होतात त्याच्या जरा पुढे वरती ताशीव दगडांची डौलदार कमान. कमानीच्या आतील भितीवरून लटकणार्‍या हिरव्याकंच रानवेली. कमानी खाली भिंतीला अलगद टेकून, काहीशी ओठंगून पण अगदी ऐटीत उभी ती आणि सुंदर हा शब्दही अगदी क्षुद्र ठरावा अशी तिची लोभसवाणी छबी. आणि ते सारं काव्य शेवटच्या पायरीवरून कॅमेर्‍यात उतरवताना माझी झालेली तारांबळ.

" काय झालंऽ? निघतोय की नाही माझा फोटो?" जणू एक वीणाच झंकारली.
" हं झालं. रेडी?" मी कॅमेर्‍याची कळ दाबली फक्ककन्‌ फ्लॅश उडाला, आणि दुसर्‍याच क्षणी,
" आई गं! " एक किंकाळी उठली आणि तिचा तोल गेला. प्रतिक्षिप्त क्रिया व्हावी तसा मी तिला सावरायला झेपावलो. पण त्या आधीच ती सावरली होती.
" काय झालं? केवढ्याने किंचाळलीस. काय झालं इतकं घाबरायला."
" किंचाळू नको तर काय करू! केवढा मोठा प्रकाश! डोळे दिपून गेले अगदी. आम्हाला तर बाई भीती वाटली अगदी. वाटलं एखादा ताराच कोसळतोय की काय अंगावर."
तिचे ते निरागस विभ्रम पाहून मला हसायला आलं.
" आमचा इकडे जीव जातोय आणि तुम्हाला मात्र हसायला येतंय. जातोच आम्ही कशा ते. बसा तुम्ही हसत."
माझं हसू आवरून होऊन मी तिला काही म्हणेतो ती वार्‍याच्या झुळकीसारखी पसार झाली.

ती गेली त्या दिशेकडे काळ्यामिट्ट अंधारात पाहत राहिलो ते कसल्याशा आवाजाने. कदाचित एखादी पाकोळी डोक्यावरून फडफडत गेली असावी.भानावर आलो तसा आपसूक काळे वकिलांच्या घराकडे चालू लागलो. काळे वकील. माझ्या बाबांचे जुने मित्र. त्यांनीच मला या गावाकडे बोलावून घेतले होते. गाव कसला! एकही इमारत सरळ आणि धड उभी नाही. भले मोठे मातीच्या भिंतींनी बांधलेली घरं, वाडे. बहुदा सगळेच्या सगळे पडझड झालेले. जे जरा सुस्थितीत असावे असे दिसत होते, ते जुनेच डागडुजी केलेले नाही तर नव्यानेच बांधलेले. कधी काळी या गावात सुबत्ता नांदत होती या वदंतेवर जराही विश्वास बसणार नाही इतकी गावाची रया गेलेली. इंग्रज मायदेशी रवाना झाले त्याच्या नऊ दहा वर्षं आधी गावात जीवघेणा दुष्काळ शिरला आणि पुढेही वीस बावीस वर्षं मधून अधून थैमान घालीतच राहिला. त्याने कर्ती सवर्ती माणसं पोटापाण्यासाठी परागंदा झाली ती झालीच. जे जिथे गेले, तिथेच वसले. पुन्हा गावाकडे अभावानेच फिरकले. मी देखील अशातल्याच एकाचा वारस होतो. इतकाच काय तो माझा या गावाशी संबंध.
पण या संबंधालाही एक नाव होते. पेशकारांचा वाडा. पेशकार माझे आडनाव. पूर्ण नाव अविनाश जनार्दन पेशकार. जनार्दन विश्वास पेशकारांचा आणि पेशकार कुटुंबाचा एकुलता एक विद्यमान वारस. या गावात आमच्या वारसा हक्काचा एक जुनाट, बराचसा भग्नावशेष उरलेला वाडा. माझ्या वडिलांनाही त्यांच्या लहानपणी पाहिलेला. इतका जुना. वाड्याच्या एका बाजूला बर्‍यापैकी डागडुजी करून नानासाहेब काळे वकील राहत होते. माझ्या वडिलांचे ते मित्र आणि विश्वस्तही. वाड्यात दोन तीन भाडेकरू होते. पण त्यांच्या सगळ्याच्या वर्षाच्या भाड्याएवढ्या रकमेत या गावाकडे येण्याचे प्रवास भाडेही सुटत नसे. त्यामुळे भाडेवसूली, नगरपालिकेचे नैमित्तिक कर भरणे, आणि अशी बाकी सारी व्यवस्था वकील साहेबच बघत. तेही आता गाव सोडून त्यांच्या मुलाकडे जाऊ इच्छित होते. तेव्हा हा वाडा येईल त्या किमतीला विकून टाकावा हा त्यांचा प्रस्ताव होता. वाडा घ्यायला तालुक्यातील एक वखारवाला तयार झाला होता. आणि त्या साठी आवश्यक त्या कायदेशीर बाबींची पूर्तता करण्यासाठी मी या गावात आलेलो होतो. एखाद दोन दिवसात हे काम आटोपेल असे वाटले होते पण येऊन आठ दिवस उलटून गेले तरी फारशी प्रगती झालेली नव्हती.

सुरुवातीला गाव बघण्यात, गावाबाहेरील महादेवाचे पडके हेमाडपंथी मंदिर, चार दोन शेते बघण्यात वेळ गेला. पण पुढे वेळ जाई ना. वाड्याबद्दलचे कुतूहल मात्र स्वस्थ बसू देत नव्हते. मी त्या भल्या मोठ्या वाड्यातील अवशेषातून डोकावू लागलो. असाच एकदा वाड्यामागील भागाकडे गेलो तर एक बर्‍यापैकी सुस्थितीतील एक विहिरी दिसली. तिला बारव म्हणतात हेही असेच कोणीतरी सांगितलेले. बारवेच्या पायर्‍या उतरून पाण्यात पाय सोडून शेवटच्या पायरीवर बसलो. बरेचसे अंधारून आलेले होते. पण त्या थंड पाण्याचा स्पर्श इतका सुखावणारा होता की वेळेचे भान न गळाले असते तरच नवल. या गूढ रम्य वातावरणात तिची माझी पहिली भेट होईल असं स्वप्नंही मला कधी पडलं नसतं. पण पुढे जे घडत गेलं ते स्वप्नाहूनही अद्भुत होतं.

" काय हो! जीव द्यायचा विचार चाललाय की काय."

कुठुनश्या आलेल्या आवाजाने आणि पाठोपाठ भिरभिरत आलेल्या हास्याच्या खळखळाटाने मी दचकलोच. आवाजाच्या रोखाने मी वर पाहिले तर एक तरुण मुलगी दिसली. मी अभावितपणे उठून पायर्‍या चढू लागणार इतक्यात पुन्हा आवाज आला,

" थांबा तिथेच. मीच खाली येतेय."

तिथे त्या ओसाड स्थळी आणि त्या क्षणी कुणी येईल अशी जराही शक्यता नव्हती आणि त्यामुळे नाही म्हटले तरी मी काहीसा भांबावलो होतो. ती मुलगी कधी समोर येऊन उभी राहिली हे समजलंच नाही. पुन्हा एक लोभसवाणा हास्याचा खळखळाट आणि,

" बाई गं! किती घाबरलाहात हो तुम्ही. कोण आहात तुम्ही? आणि इथं काय करताय आता, यावेळी."
" मी ... मी.. काही नाही. इथं आलो होतो... सहजच... काही काम होतं... काळे वकिलांकडे आलोय."
" अच्छाऽऽ! तरीऽच!!"
" तरीच...? तरीच काय ?"
" तरीच म्हणजे, बाहेर गावचे दिसताहात. एरवी गावातला कुणी जीव गेला तरी इकडे या ठिकाणी फिरकायचं धाडस करणार नाही."
" का? हे अगदी ओसाड आहे म्हणून? पण मला तर ही जागा फार आवडली. किती शांत आणि छान वाटतंय नाही इथं "
" खरंच तुम्हाला आवडली ही जागा? द्या टाळी! माझीही ही खास जागा आहे."
" म्हणजे तू...आय्‌ मीन...तुम्ही नेहमी येता."
" काही हरकत नाही.. तुम्ही मला तू म्हणालात तरी चालेल. आणि माझं म्हणाल तर ही जागा माझा अगदी स्वर्गच आहे म्हणाना."
" छान! म्हणजे, तू इथे रोज येत असशीलच. आणि नसलीस तरी रोज येत जा, प्लीज! काही कामासाठी आलोय मी या गावात.
पण दोनच दिवसात जीव नकोसा व्हावा इतका कंटाळलोय.तू निदान चार शब्द बोलशील तरी."
" खरंय तुमचं. अगदी वेगळा आहे हा गाव. पण तुम्ही इथे कशासाठी आलाय?"
" सांगतो. पण मला आधी सांग, हे मी कोणाला सांगणार आहे?" मी किंचित गमतीने म्हणालो.
" इश्श्य! कोणाला म्हणजे काय? मला....आणखी कोणाला!"
"............." मी काहीच न बोलता मिस्किलपणे तसाच पाहत राहिलो.
" अच्छाऽ ऽ! म्हणजे फिरकी घेताय आमची. आलं लक्षात! सरळ नाव विचारा ना!" तिचे गोबरे गाल फुगवीत आणि टप्पोरे डोळे वटारीत ती म्हणाली.
" आलंय ना लक्षात! मग सांग ना!"
" आम्ही नाई जा! तुम्हीच ओळखा पाहू! काय नाव आहे आमचं!" ही अशी बाजू माझ्यावरच उलटवेल असं वाट नव्हतं. पण मलाही गंमत सुचली.
" ओळखू? अंऽ ऽ ऽ स्वप्ना! स्वप्ना नाव असणार तुझं."
" अय्या, ...काय जादुगार आहात की काय? कसं ओळखलंत नाव तुम्ही माझं? सांगा ना!" हर्षातिरेकाने ती नखशिखान्त थरथरत होती. थक्कच झालो मी. पण तरीही काही तरी सुचलंच.
" त्यात कसलीये जादू. ही जागा, ही बारव, ही मागची कमान, त्या वेली, हे पाणी हे सारं एक स्वप्नच आणि त्यात तू ! ही अशी अचानक अवतरलेली स्वप्नपरी! मग तुझं नाव स्वप्ना!! यापेक्षा आणखी काही वेगळं असू तरी शकेल का."

काहीच न बोलता तिने टाळी देण्यासाठी हात पुढे केला. ती तिची नि:शब्द प्रशंसा मला फार भावली. मग आम्ही दोघे काही वेळ तिथेच पाण्यात पाय सोडून बोलत बसलो. खरं तर बहुतेक सारं मीच बोललो. ती लक्ष देऊन ऐकत होती. मी त्या गावात का आलो हे मी तिला सांगितलं. पण तसाही तेव्हा बराच वेळ झाला होता. अशा लहानशा, शांत गावात सायंकाळची नीरवता लवकरच पसरते. नानासाहेब आणि वहिनी माझी वाट पाहत असतील याची जाणीव झाली. रंगलेल्या गप्पा संपूच नयेत असंच वाटत होतं. पण नाइलाज होता. तो तिलाही समजला आणि म्हणूनच तिने मला निरोप दिला. अर्थात पुन्हा भेटण्याचा शब्द देऊनच.

त्या नंतर ती भेटतच राहिली. न चुकता अगदी रोजच. संध्याकाळी अंधारून यायला लागलं की ती तिथे यायची. अन् मग रात्रीचा पहिला प्रहर सुरू होईतो माझ्याशी बोलत बसायची. मीही भारावल्यासारखा तिची वाट पाहत बसायचो. तिच्या सौंदर्याने मी वेडावलो होतो. तिच्या मधाळ स्वभावाला लोभावलो होतो. मी तिच्या प्रेमात पडलो होतो हे माझं मला जाणवत होतं. तिला तसं ते जाणवून द्यावं असं खूपदा मनांत आलं. पण धीर होत नव्हता. तिच्या मनाचा ठाव लागत नव्हता. तसंही ती स्वत:बद्दल काही बोलत नसे. त्यामुळे तिला तसं काही विचारण्याचा धीर होत नव्हता. ती कायमची माझी व्हावी असं मनोमनी वाटत होतं पण तिच्या बाजूने त्यासाठी हवा असलेला प्रतिसाद दिसत नव्हता.

अशात काही दिवस गेले आणि ज्या कामासाठी मी त्या गावात आलो होतो ते काम संपायला आलं.नानासाहेबांनी ते तडीला लावलं. कागदपत्रांची पूर्तता झाली. तालुक्याला जाऊन महसूल उप-निबंधकासमोर सही-शिक्कामोर्तब करणे इतकेच काय ते उरले. माझ्या जिवाची तगमग सुरू झाली. मी येताना बरोबर कॅमेरा आणला होता. एक आठवण म्हणून वाड्याची, गावातल्या काही ठिकाणाची छायाचित्रे घेतली होती. आज तिचेही एकादे छायाचित्र घ्यावे आणि मनातले काय ते बोलावे असे मनाने घेतले. नेहमीप्रमाणे ती संध्याकाळी आली तेव्हा तर ती खूपच छान दिसत होती. आधी छायाचित्र घ्यावे आणि मगच मनातले सांगावे असे ठरवले. कारण माझा प्रस्ताव, माझे बोलणे तिला आवडेलच, पटेलच याची खात्री वाटत नव्हती. पण माझा विचार तिला पसंत न पडता तर तिने मला छायाचित्र काढू दिले नसते हे मात्र नक्की. तिचा नकार घेऊन जावे लागले तरी तिचे एखादे छायाचित्र तिची आठवण म्हणून मला बरोबर नेता येणार होते. म्हणून मी तसा प्रयत्न केला. तो साधलाही. पण कॅमेर्‍याच्या फ्लॅशच्या झोताने घाबरून ती जी गेली ते गेलीच. पुढच्या दोन सायंकाळी मी तिची वाट पाहिली. पण त्या दोन्ही रात्री मी विरह आणि वैफल्याच्या गर्तेत जागून काढल्या. अखेर परत जाण्याचा दिवस उजाडला. तालुक्याच्या गावापर्यंत नानासाहेब माझ्याबरोबर येणार होते. महसूल कचेरीतील कार्यवाही पूर्ण झाली की ते माघारी गावाकडे परतणार होते आणि मी पुढे पुन्हा माझ्या घराकडे. घरातून निघताना एकदा बारवेकडे जाऊन आलो. काही मधुर क्षणांच्या त्या साक्षीदाराचा जड अंत:करणाने निरोप घेतला. वाड्यातून बाहेर पाडताना नजर सगळीकडे भिरत भिरत होती. कुणाला काय विचारावे ते समजत नव्हते. इतक्या दिवसात मी तिचा ठावठिकाणा का माहिती करून घेतला नाही म्हणून मी स्वत:वरच चिडलो होतो. निघताना काळे काकूंना नमस्कार करावा म्हणून घरात गेलो. त्यांना नमस्कार केल्याशिवाय माझा तिथून पाय निघणार नव्हता. गेले दहा दिवस त्याच माझ्या जेवणा-खाण्याचे पाहत होत्या. मी वाकून नमस्कार केला. काकूंनी दही साखरेचा चमचा पुढे केला. दहीसाखर हाताच्या तळव्यावर घेताना एक विचार मनात आला, काकूंना स्वप्नाबद्दल विचारून पाहावं. त्यांना कदाचित स्वप्नाचा काही ठावठिकाणा माहिती असेलच. पण कसे आणि काय विचारावे ते सुचे ना. मी थोडा घुटमळलो.

" का रे? काय झालं? काही हवंय का?

"काकू, एक विचारू? ती स्वप्ना....."

" अगं बाई, तेही कळलं की काय तुला?" काकूंच्या चेहर्‍यावरचा तजेला मावळला आहे हे माझ्या लक्षात आलं.

" काय कळलं मला? काय आहे ते..... पण मला तर ती......." पण काकूंचं माझ्याकडे लक्ष नव्हतं. कुठे तरी तंद्रीत हरवल्या सारख्या त्या बोलत होत्या.

" फार गुणाची नि लाघवी होती रे ती पोर. खोचे मास्तरांची मुलगी ती. मास्तर बदली होऊन इथं आले तेव्हा जागेसाठी सरळ इथे आले. माणूस अगदी सज्जन आणि सरळ होता. वाड्याच्या मागे बारवेजवळ एक सहा खणाची जागा जरा जरा सुस्थितीत होती. नानांनी किरकोळ डागडुजी करून ती त्यांना वापरायला दिली. इतके दिवस मोकळ्याच पडलेल्या वास्तूत आता निदान सांजवात तरी लागेल म्हणून मलाही बरं वाटले. स्वप्ना मास्तरांची थोरली मुलगी. तशी आणखीही एक होती पण अजून ती परकरातही आलेली नव्हती. स्वप्नाला कुणी स्वप्ना म्हणत नसे. मास्तर आणि कावेरी वहिनी, तिची आई, तिला तायडी म्हणत. आणि मग सगळ्यांसाठी ती तायडीच झाली. तायडी नक्षत्रासारखी देखणी होती. मॅट्रिक झाली होती. तेव्हा मुलींना फार शिकवीत नसत. एखादं वर्ष जाऊ देत, छानसा नवरा पाहून तायडीचं लग्न करून देऊ, असं मास्तर म्हणत. तसा एक योग
आलाही. पण तो काळयोग ठरला. तेव्हा गावांत वीज खूप लांबून यायची. घरातले दिवे तर अगदी मिण मिण पेटायचे. पुडे मग गावासाठी स्वतंत्र सब्‌स्टेशन तयार करण्याचं काम बोर्डानं काढलं. त्यासाठी काही माणसं जिल्ह्याच्या सर्कलमधून गावात आली. त्यात तो होता. माजगांवकर त्याचं नाव. नानांनी पुढच्या चौकालगतची एक खोली त्याला भाड्याने दिली. सडाफटिंग माणूस. आला तसा गेला. पण गेला तो इस्कोट करून गेला. इथे आला तसा त्याची न्‌ तायडीचे ओळख झाली आणि ती जवळिकीढे गेलेत कधी बदलली हे तिचे तिलाही समजले नाही. रोज तो कामावरून आला की एक तर त्याच्या खोलीत नाही तर बारवेच्या खाली पायर्‍यांवर तासन्‌ तास बोलत बसत. तसा त्याने तिला एक दोनदा बाहेर फिरायला नेण्याचाही प्रयत्न केला होता. पण तायडी मास्तरांच्या धाकाने तयार झाली नाही. तायडी त्याच्यात पुरती अडकली होती. अगदी बावरी राधा झाली होती. कावेरी वहिनींनादेखील एम मन वाटायचं, मुलगा चांगला धडधाकट आहे, शिकला सवरलेला आहे, नोकरीही चांगली, बोर्डाची, म्हणजे सरकारी आहे. तायडीला पटला असेल आणि मास्तर परवानगी देतील तर... काय हरकत आहे?....! पण ती वेळ आलीच नाही. एक दिवस तो अचानक नाहीसा झाला. आम्ही सगळेच चाट पडलो. तायडीचे अवस्था तर वणव्यात हरिण सापडावा तशी झाली होती. तिची रया मला बघवे ना. मी नानांना बोर्डाच्या हपीसात चौकशी करा म्हणाले. पण तिथे तर डोंगरच कोसळला अंगावर. खरा कहर तर पुढेच झाला. खोचे मास्तरांच्या साजुक घराला कुणा काळ्याची दृष्टच लागली जणू. रोज मास्तरांची आरडा ओरड आणि स्वप्नाच्या दबक्या आवाजातले किंचाळणे. आळीतही कुजबूज सुरू झाली. घडू नये ते घडले होते. तो मेला तायडीला मास्तरांनी गांव दोडण्याचा निर्णय घेतला. आम्हालाही सामानाची बांधाबांध करून घराची चावे द्यायला इकडे आले तेव्हाच ते जाताहेत हे कळलं. बिचारे कुठे गेले पुन्हा त्यांचं काही कानी पडलं नाही.त्या हळव्या पोरीने हा आघात कसा झेलला असेल ते एक देवालाच ठाऊक. पुढे कधीतरी मास्तर गावात येऊन गेले असं उडत उडत समजलं. पण मास्तर इकडे काही आले नाहीत. खरं तर यायला हवं त्यांनी. जाऊ देत त्याचं काही वाटलं नाही. पण स्वप्नाही एकदोनदा वाड्याच्या मागे बारवेकडे दिसली होती म्हणे."

काकूंच्या शेवटच्या वाक्याने कानात प्राण एकवटले. माझ्या हाताने नकळतच जिथे कॅमेरा ठेवला होता ती जागा चाचपली. ’मी काढीन शोधून तिला..मी काढीन शोधून माझ्या सर्वस्वाला, माझ्या स्वप्नाला’ मनात एकच कल्लोळ उसळला.

" काकू, निघतो मी. गाडीची वेळ होत आली."

"अरे, हो रे. खरंच की. मनात एक वाफ दबून राहिली होती. तू विषय काढलास. भानच हरपलं माझं. बरंय! ये तू आता. घरी पोहोचलास की पत्र टाक." काकूंनी मला निरोप दिला.

तालुक्याचे सोपस्कार आटोपून मी परतीच्या प्रवासाला निघालो. प्रवासात मनात स्वप्नाशिवाय दुसरं काही नव्हतंच. लगेचच स्वप्नाचा शोध घ्यावा, मगच घरी जावं, असं अनेकदा मानांत आलं. पण ते शक्य नव्हतं वाड्याचा विक्रीतली एक बर्‍यापैकी मोठी रक्कम रोखीने घेतली होती. ती बॅगेत तळाशी ठेवली होती. ती लगोलग घरी आईच्या स्वाधीन करणे गरजेचे आणि महत्त्वाचे होते.

गाडी स्टेशनांत पोहोचली तसा मी आधी तडक माझ्या मित्राच्या फोटो स्टुडिओत गेलो. कमेर्‍यातला रोल त्याच्या स्वाधीन केला आणि त्यावर लगेच प्रक्रिया करून छायाचित्रांच्या प्रतीही लगेचच काढ असे म्हणालो. तिथून घरी आलो. गावाकडे काय काय घडले ते आईला शक्य तितके सविस्तर, फक्त स्वप्ना वगळून, सांगितले आणि पुन्हा फोटो स्टुडिओ कडे निघालो. माझी उडालेली धांदल आईच्या नजरेतून सुटली नव्हती. पण त्या क्षणी ती मला काही विचारणार नव्हती. तसा तिचा स्वभावच होता. माझ्या उडालेल्या धांदलीचे कारण तिने मला नंतरच विचारायला हवे होते. पण ती छायाचित्रे पाहिल्या शिवाय मला काहीही बोलता येणार नव्हते.

मित्राने माझ्या हाती दिलेली छायाचित्रांची चळत मी पुन्हा पुन्हा चाळली. माझ्या चर्येवरची उत्कंठा मावळून एक संभ्रमाची छटा पसरते आहे हे माझ्या मित्राच्या नजरेतून सुटले नाही.

" का रे? काही चुकलं आहे का?"
" नाही, नाही, तसं काही नाही. पण तू सगळे प्रिन्टस्‌ काढलेस ना?"
" भलेऽऽ! म्हणजे काय? अरे प्रिन्टस्‌ मोजून पाहा ना. या वन-ट्वेन्टीच्या रोलमध्ये बाराच प्रिन्टस्‌ निघणार ना? "
" हो, हो, आहेत, आहेत. बरं चल येतो मी." मी तिथून काढता पाय घेतला नि घरी आलो. गठ्ठ्यातल्या शेवटाच्या दोन प्रिन्टस्‌ माझ्या रोजनिशीच्या मागच्या कप्प्यात ठेवून दिल्या.

करंबेळकरांकडे फोन झाला. आईने मला तसं आतूनच ओरडून सांगितले. ते छायाचित्र माझ्या हातातच होते. आई कधी मागे येऊन उभी राहिली ते तंद्रीत समजलंच नाही.
" कसला रे फोटो? बघू. "
त्या जुनाट वाड्याच्या मागची बारव. बरवेच्या पायर्‍या जिथे सुरू होतात त्याच्या जरा पुढे वरती ताशीव दगडांची डौलदार कमान. कमानीच्या आतील भिंतीवरून लटकणार्‍या हिरव्याकंच रानवेली. कमानी खाली भिंतीला अलगद टेकून..... .

" आपल्या वाड्याचा का रे फोटो? काय डौलदार कमान आहे नाही? पण, कमानी खाली कुणी उभं राहिलं असतं ना, तर खूप छान दिसलं असतं."

कमानी खाली कुणीतरी होतं, ते आईला......तिलाच काय कुणालाही दिसणार नव्हतं. पण मला ती आताही दिसत होती. ती तिथेच होती.

स्वप्ना !