बोरिबंदर यायला तीनच स्टेशनच राहिली, तसा, लिमयेचा आवाज कानावर येऊन आदळला, " लिखित्या ऊठ रे. डाऊनच्या लोंढ्यात मरायचंय का? च्यायला! लिखित्या, लेका झोप कशी रे लागते एवढ्या गर्दीत."
खरंच आज झोप अगदी अनावर झालेली होती. मुंबईतील महानगरपालिकेतील चांगली नौकरी आणि भरभक्कम पगार केवळ या दोनच दोन जमेच्या बाबी वगळता सध्याचे बाकी सारे जीवन जीवघेण्या धकाधकीचे होते. चांगल्या नौकरीचा प्रश्न मुंबईने सोडवला होता तरी निवासाचा प्रश्न खर्डी सारख्या दूरवरच्या गांवात येऊन सुटला होता. प्रवासातच रोज जाऊन येऊन किमान तीन तास जात होते. विश्रांतीही जेमतेमच होत होती. त्यातून वाचनाचे व्यसन लागलेले. काल संध्याकाळी सिड्नी शेल्डन या लेखकाचे ' टेल मी युअर ड्रीम्स ' हे पुस्तक हाताशी लागले आणि त्यात इतका गढून गेलो की रात्र किती उलटून गेली ते समजलंच नाही. पण घड्याळाच्या लावून ठेवलेल्या गजराने त्याचे काम चोख बजावले. डोळ्यावरची झोप अगदी आनावर होत होती तरी पुढच्या कामावर जाण्याच्या तयारीच्या सगळ्या क्रिया प्रतिक्षिप्तपणे झाल्याच.
या क्षणी, आत्ताही स्टेशनात गाडी थांबली कधी, गाडीतून उतरणार्या माणसांच्या लोंढ्याने मला स्टेशनाबाहेर फेकले कधी, मी टॅक्सीत बसलो कधी आणि मुंबई महापालिकेतील या अतिक्रमण विभागातील माझ्या टेबलाशी येऊन बसलो कधी; कांही म्हणता कांही मेळ लागत नव्हता. नाही म्हणायला, लिफ्टमधून येतांना, एस्टॅब्लिशमेन्ट मधली एक पोरगी माझ्या झोपाळलेल्या चर्येकडे सहेतुकपणे पाहात, " हंऽऽ तिकडे बघा !" असं कांही तरी शेजारच्या इसमाच्या कानापाशी कुजबुजली आणि तोही महाभाग आवाजाच्या त्याच पट्टीत तिला," एन्क्रोचमेन्टला आहे तोऽऽ. तिथे काऽऽय .......! (इथे तो उजव्या हाताचा अंगठा तर्जनीवर घासून दाखवीत होता) गेला असेल रात्री कुठे साईट इन्स्पेकशनला". अशी, तोंडाकडे तोच अंगठा नेत, भिवया उंचावत, मौलिक माहिती देत होता. त्यावर ती फिस्कारून हसलेली आणि... " वॉऽऽव् लक्की गाय् !"असं म्हणाल्याचं मला चांगलंच आठवत होतं.
" साहब, हमरी फाईलका क्या हुआ?" या आवाजासरशी मी धाडकन् जागा झालो.
या गर्जनेचा उगम मझ्या टेबलासमोर, डोळ्यावर काळा चष्मा आणि काळ्याच पण भरभक्कम देहयष्टीच्या विरोधाभासात हस्तिदंती रंगाच्या सफारी सूटमधला नरपुंगव उभा ठाकलेला होता. बटाटा हाईट्स या नावाच्या नव्याने बांधलेल्या इमारतीचा तो बांधकाम कंत्राटदार होता. इमारतीचा आणखी कांही भाग तो बांधू पाहात होता आणि ते बांधकाम अनधिकृत असणार आहे अशी हरकत घेणारी याचिका त्या इमारतीत राहाण्यार्या एका पावशे नांवाच्या इसमाने दाखल केली होती. कंत्राटदाराला तो दावा अमान्य होता आणि त्या प्रकरणाची शहानिशा करण्याचे काम माझ्याकडे होते. हे सगळे मला तात्काळ आठवले.
" हां, वो सब देखना पडेगा. साईट व्हिजिट करनी पडेगी. मेझरमेन्ट लेने पडेंगे. तुम्हारा बांधकाम प्लॅनके मुताबिक है के नही वो सब देखना पडेगा. " मी वेळकाढूपणाचा प्रस्ताव मांडला.
" चलिये ना साहब. हम गाडी लाया हूँ. चलके देख लेते है. बाकी सब वहीं जमा लेंगे "
शेवटच्या वाक्यावर त्याने त्याचा एक डोळा बारीक केला होता. ते मात्र मला आवडले नाही. त्याचे ते वाक्य पलिकडच्या टेबलावरील पोंक्षाच्या कानावर तर गेले नाही ना? मी चापापून पोंक्षाकडे पाहिले. तर तो गालातल्या गालात हंसत होता. इतकेच नव्हे तर तो मला ' जा, जा! ' अशा अर्थाच्या खुणाही करत होता. मला कसेसेच झाले. मला हे सारे नवीन होते. मी या खात्यात नुकताच बदलून आलो होतो. उमेदीची दोन वर्षं एस्टॅब्लिशमेन्टला काढून झाल्यावर माझी बदली इथे झाली होती. माझ्या आधी हे काम पाहाणारे सद्गृहस्थ अशाच एका भानगडीत निलंबित झालेले होते आणि 'क्लीन शर्ट' म्हणून माझी इथे नेमणूक झाली होती.
" गाडीकी कोई ज़रूरत नही. आप चलिये. मै पहुँच जाऊँगा वहाँ. थोडी देरसे." असं म्हणून मी त्याची बोळवण केली. मात्र ती इमारत मला पाहावीच लागणार होती. शिवाय बटाटा हाईट्स या कांहीशा विचित्र नावाने मनात कुतुहल जागे झाले होते. कांही तांतडीने पाहाण्याजोगे कागद पाहून मी बटाटा हाईट्सची फाईल काढली आणि साईट व्हिजिटची परवानगी घेऊन जाण्यासाठी जीप मागवली.
जीपमधे मी रात्री वाचायला घेतलेल्या कादंबरीचा आणि बटाटा हाईट्स या दोन्ही परस्परभिन्न गोष्टींचा विचार करीत होतो. कादंबरीचे कथानक एका मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर अशा विचित्र विकाराने ग्रासून लागोपाठ पाच खून करणार्या मुलीवर बेतलेले होते. प्रत्येक खुनाच्या वेळी तिचे तात्कालिक व्यक्तिमत्व तिच्या नैसर्गिक व्यक्तिमत्वापेक्षा अगदी निराळे असायचे. जणू एक दुभंग व्यक्तिमत्व! मी विचार करीत होतो, खरंच असं असूं शकेल? एखादा माणूस असे निराळे व्यक्तिमत्व घेऊन जगू शकतो? निदान, कांही काळापुरता कां होईना, असा वावरू शकतो? डोक्यातली कादंबरी मी महत्प्रयासाने बाजूला सारली आणि बटाटा हाईट्सचा विचार करू लागलो. मला तो बटबटीत सफारीवाला आठवला. पण मला त्याच्याशी कांही घेणे देणे नव्हते. ते तसे असायलाही नको होते. कारण कुणा पावशे नावाच्या गृहस्थाने, आमच्या भाषेत भोगवटाधारक, अनधिकृत बांधकामाबाबत हरकतीचा मुद्दा उपस्थित केला होता. मला त्याची आणि त्याचीच भेट घ्यायला पाहिजे असे मी मनाला ठासून बजावले. एवढ्यात ती बटाटा हाईट्स आलीदेखील.
एका सहा मजली सीमेंट कॉन्क्रीटने बांधलेल्या उत्तुंग इमारतीसमोर मी उभा होतो. प्रत्येक मजल्यावर आठ बिर्हाडे असावीत. खालचा मजला आतल्या बाजूने वाहनतळासाठी मोकळी जागा आणि बाहेरच्या बाजूने सलग ओळीने दुकानाचे गाळे. इमारत काटकोनात बांधलेली. म्हणजे चार बिर्हाडांच्या काटकोनात लगतची चार बिर्हाडे. इमारतीची रचना एकूणच थोडी चमत्कारिक वाटणारी. इमारतीच्या खालील उरलेली जागा विरुध्द बाजूला बांधलेल्या तटबंदीवजा भिंतीने बंदिस्त केलेली. कोपर्यात बांधलेले एक गणपतीचे मंदीर. त्याच्यासमोर, बहुदा, सार्वजनिक कार्यक्रमासाठी पन्नासेक माणसे बसू शकतील असा चबुतरा. मी मुबईत गेली दोन वर्षे होतो. अनेक नाविन्यपूर्ण आणि नव्या काळाशी सुसंगत इमारती मी पाहिल्या होत्या. पण नाविन्याचा फारसा लवलेश नसलेली ही इमारत पाहून मी जरा अचंभ्यात पडलो. आणि शिवाय ही इमारत किंवा हा परिसर मी या आधी केंव्हातरी पाहिलेला आहे असं वाटायला लागलं. कांही निराळीच कंपनं मला जाणवायला लागली.
मला पाहाताच मघाचा तो कंत्राटदार सामोरा आला. "आव, आव, साहब" म्हणत तो मला त्याच्या कार्यालयाकडे नेऊ लागला. पण मी साफ नकार दिला आणि त्या पावशेची चौकशी केली. तो आणखी कांही बोलण्याच्या आतच त्या पटांगणात क्रिकेट खेळणार्या मुलांपैकी एकाला पावशे कुठे राहातात म्हणून विचारलं.
" टॉक्क्! कोन्ते पावशे पायजेलेत तुम्हाला? आय मिन्, थर्टीन नंबर की थर्टीफोर?"" पावशेऽऽऽ! म्हणजे तेऽऽऽआपलंऽऽऽ ...!" मी गडबडलो. पण कां कुणास ठाऊक, आणि" थर्टीन! तेरा, तेरा... अण्णा....अण्णा पावशे" असा, जवळ जवळ, ओरडलोच
काय झालं होतं मला? कोण अण्णा पावशे? मी तेरा नंबरच कां सांगितला? एव्हाना ती सगळी क्रिकेटची टीम जमा झाली होती आणि खूक्क् करून हंसायला लागला होती.
" कूऽऽल मॅन! तुमचं कॉय कुंडली दॉखवायचं आहे कॉ ? " पहिले दोन शब्द त्या टीमला उद्देशून पण पुढील सारे मला.
" नाही. अंऽऽ..कुंडली.... तसलं कांही नाही. माझं काम ... आय मिन्, खरं म्हणजे पावश्यांचं काम... सॉरी, मी कॉर्पोरेशन मधून एन्क्रोचमेन्ट्च्या चेकींगसाठी आलो आहे. "
"ओह्! म्हंजे मक्याचे पॉप्स्.. "
मला मक्याची कणसं माहिती होती. मक्याच्या लाह्या, पॉपकॉर्न्स माहिती होते. पण मक्याचे पॉप्स् ??
पण मला फार विचार करू न देता इतकावेळ शांतपणे बाजूला उभा असलेला एक गोरटेला मुलगा पुढे आला नि म्हणाला," चला." मी त्याच्या मागोमाग जाऊ लागलो. मध्येच मी त्याला विचारलं," कां रे, मक्याचे पॉप्स्.....?" " माझे वडील! मकरंद माझं नांव. मकरंद पावशे. तुम्हाला माझ्या बाबांना भेटायचं ना? चला "
तेरा क्रमांकाच्या घराचा दरवाजा उघडला जाताच चिरंजीव मकरंद ऊर्फ मक्याने सदरा पायजमा परिधान केलेल्या एका 'फॉर्टी प्लस' पुरुष व्यक्तीला केवळ " बाबा " अशी हांक मारली आणि अंगठयाने माझ्याकडे निर्देश करीत आतल्या खोलीकडे धूम ठोकली. मी, " अण्णा...," असे म्हणून बोलायला सुरुवात करणार इतक्यात श्रीयुत पावशे उद्गारले.
" गेले ते. सहा वर्षं झाली त्याला. पण आपण....? आण्णांना....ओळखता..? माझे वडील ते..!"" अरेरे, वाईट झालं. सॉरी हं. मला वाटतं खूप चांगले ज्योतिषी होते ते!"
माझ्या आतून कोणी तरी बोललं. तुला माहिती होतं ते? बापरे, काय होत होतं मला? मी तर इथे आयुष्यात पहिल्यांदाच येत होतो. त्या हस्तिदंती रंगाचा सफारीसूट घातलेल्या कंत्राटदाराचे लालबुंद डोळे मला दिसायला लागले. त्याच्या काळ्या चष्म्यातूनही ते मला स्पष्ट दिसत होते. आणि तेरा नंबर? काय आहे हे? घशाला कोरड पडत चालली होती.
" पा..णी! जरा पाणी देता का मला..." मी कसा बसा म्हणालो." हो नक्कीच. अहो, जरा पाणी आणता कां बाहेर" हॉल आणि स्वयंपाकघर यामधील पडद्याच्या रोखाने पावशे म्हणाले. पडद्याच्या मागे एक कुतुहल उभं होतं हे मला मघाशीच जाणवलं होतं. तशी बांगड्यांची किणकिण ऐकायला आली होती.
" पण आपण आपली ओळख सांगितली नाही अजून"" मी लिखिते. कॉर्पोरेशनमधून आलोय. एन्क्रोचमेन्ट डिपार्टमेन्ट.." मी भानावार येत म्हणालो." ओह्! बरं झालं तुम्ही आलात. नाईस टु मीट यू मिस्टर लिखिते. त्याचं काय आहे, इथे पूर्वी एक चाळ होती. फार जुनी. पुढे ती पडायला झाली तेंव्हा तुमच्या कॉर्पोरेशनने ती पाडून टाकली. याच जागेवर ही बिल्डिंग बांधली गेली. बांधकाम होईपर्यंत कांही काळ आम्ही रिहॅब कॅंपात राहिलो. पण जागेवरचा क्लेम ठेऊन होतो. आता हा बिल्डर..." " रामदुलारे तिवारी..." मला हे नाव कां घ्यावसं वाटलं? माझ्या कपाळाची शीर कां ठणकते आहे. असं वाटायला लागलं.
" नाही. तो मेला कधीचाच. त्याचा खापर पणतू. कालीप्रसाद.... कालीप्रसाद तिवारी. तो तुम्हाला खाली भेटलाही असेलच."
हस्तिदंती सफारीसूट. काळा चष्मा. लाल डोळे... मी पाण्याचा सगळाच्या सगळा तांब्या घशाखाली रिकामा केला. पण सांवरण्याचा प्रयत्न केला.
" बरं मग?"" त्याने सगळा घोळ केला. एक तर, तुम्ही पाहिलेच असेल, खाली दुकानाचे गाळे काढले आहेत. ते ओरिजिनल प्लॅनधे नव्हते. पण आम्ही कोणी विशेष अशी हरकत घेतली नाही. कारण तसा कांही त्याचा आम्हाला त्रास झाला नाही. उलट आमच्या एका मेंबरला थोडा फायदा झाला. त्याच्या मुलाला तिथे मेडिकल स्टोअर्स काढता आले..... "समेळकाका?" मुकुंद गणेश समेळ... न्यू गजकर्ण औषधालय.....अरे देवा! मला कां हे माहिती होतं?" वंडरफुल्! यू नो इट. पण अ करेक्शन. समेळकाका नव्हे, त्यांचा मुलगा, जनार्दन. मुकुंद फार्मसी. तुम्ही खाली पाहिली असेलच. " मी पुढे कांही बोलणार इतक्यात शेजारून कुठूनतरी कानाचे पडदे फाटून जातील इतक्या कर्कश्श आवाजात कांही तरी संगीतमय गोंगाट कानावर आला. मी चमकून पावश्यांकडे पाहिले तर त्यांचाही चेहरा त्रासिक झालेला. "काय शिंची कटकट आहे.." म्हणत पावशे झटकन् खिडकी लावायला धावले. दाराचा पडदाही हलल्यासारखा वाटला.
" कां...हो. काय झालं?" हे मी विचारायचं कांही कारण आहे कां असा विचार मनांत येण्यापूर्वीच मीबोलून बसलो.
" कांही नाही हो. हा दिन्या कय ते डीजे कि फीजे होणाराय म्हणे. त्याची कसलीशी प्रॅक्टीस घरातच करीत बसतो. सहा हजाराची म्यूझिक सिस्टीम आणून घरात बसवलीय. सूर्यापोटी शनैश्वर म्हणतात ना तसली गत आहे. सगळ्या बिल्डिंगला त्रास. ते जाऊ देत." पावशे ट्रान्स्मधे गेल्यागत बोलले." हा दिन्या कोण? आय मीन् शेजारी कां?"" दिनेश हट्टंगडी..! ते जाऊ देत. आपण कामाचं बोलू."
दिनेश हट्टंगडी? म्हणजे मंगेश हट्टंगडींचा...... ते अजून तबला वाजवतात? आणि वरदाबाई.....?त्याही अजून गातात....?कपाळाचा ठणका वाढला.
"हां...तर मी म्हणत होतो की जन्याला मेडिकल स्टोअर्स साठी फायदा झाला.म्हणून आम्ही कांही ऑब्जेक्शन रेज केलं नाही पण आता कहरच झालाय. तुम्ही खाली गणपतीचं मंदीर पाहिलं असेलच. ती जागा आमच्या सोसायटीची आहे. प्लॅन आणि एफेसाय प्रमाणे तो एरिया पार्किंग आणि सोशल परपजसाठी ओपन ठेवला आहे. तसं कन्व्हेयनस् डीडदेखील झालं आहे. पण या कालीप्रसादने कांहीतरी मखलाशी करून, तुमच्याच लोकांना पैसे चारून, सो सॉरी टु से, पण तसं झालंय खरं... तिथे त्याच्या मालकीचं बांधकाम करायचा घाट घातला आहे. तिथे तो दारुचा गुत्ता, आय मीन्, बार काढणार आहे असंही समजतंय. म्हणून मी, आय मीन्, आम्ही सगळ्यांनी हरकत घेतली आहे. इथे ही कामं आणि काळजी करणारा मी एकटाच आहे. सांगायला लाज वाटतेय मला, पण, आमच्यात एकी नाही हो."
" पण मग बाबा कांहीच म्हणत नाहीत?"
" कोण बाबा?"
" बर्वे! ते तर गांधीवादी विचारसरणीचे......." कपाळाची शीर! ठणका!!
" भले! तुम्हाला ते कसे माहित? अहो ते तर कधीच गेले. मी कॉलेजमधे होतो तेंव्हाच. कसला गांधीवादी! भंपक माणूस. त्यांची मुलेही जवळ राहिली नाही त्यांच्या."
हो, एक तर गेला मेक्सिकोला. कायमचाच. आणि दुसरा अलास्काला..... आई गं! पुन्हा ठणका!!
" बरं मग, आता काय करायचं?"
" ते तुम्हीच तर सांगायचं आहे. आपण असं करू, तुम्ही आलाच आहात तर, खाली गणपतीच्या कट्ट्यावर एक मीटिंग घेऊ. मी सगळ्यांना बोलावतो. तसे सगळेच घरी असतीलच असे नाहीच. आणि असूनही येतीलच अशी शाश्वतीही नाही. पण जे येतील ते येतील. निदान तुमच्या साक्षीने याला कांही तरी चालना तर मिळेल."
मला काय म्हणावे आणि काय करावे तेच समजेना. त्यांच्या 'अहो' ने कांदा पोह्याच्या बशा आणून समोरच्या टी-पॉयवर ठेवल्या. " घ्या. आलोच मी." म्हणून पावशे कपडे बदलायला आंत गेले.
मीटिंगला कोण कोण येणार होते? ग्रहगौरव श्री.अण्णा पावशे? महापंडित श्री. बाबूकाका खरे? कुशाभाऊ अक्षीकर? मंगेश हट्टंगडी? सौ. वरदाबाई हट्टंगडी? सोकाजी दादाजी नानाजी त्रिलोकेकर? बाबलीबाय त्रिलोकेकर? प्रा. नागूतात्या आढ्ये? प्रा. कल्पलता फुलझेले? रघूनाना सोमण? आचार्य बाबा बर्वे? ? ? मी ओळखतो कां या सार्यांना?... आणि कां ओळखतो? ....ही नावे मला कशी माहिती झाली? ....ही सगळी मंडळी आज हयात असतील?
कसं शक्य आहे? ती तर कधीचीच गेली असतील!. मीटिंगला कदाचित् आता त्यांचे वारस येतील. कोण असतील ते? त्यांची नांवे काय असतील? डोक्यावर कोणी तरी मणा मणाचे घण घालीत होते. मेंदूच्या चिंधड्या होऊन तो बाहेत पडेल की काय, असं वाटायला लागलं.
पुन्हा सिड्नी शेल्डन डोक्यात थैमान घालू लागला. ती पाच खून करणारी मुलगी. मनोरुग्ण होती ती. त्या मनोविकार तज्ज्ञाने तिच्या विकाराचे केलेले विश्लेषण!
'हा एक मनोविकार आहे. याला दुभंग व्यक्तिमत्वाच्या पुढची पायरी म्हणता येईल. बहुविध वक्तिमत्व दुष्प्रभाव (मल्टिपल पर्सनॅलिटी डिस्ऑर्डर) किंवा विलग्न प्रतिमा दुष्प्रभाव (डिसोशिएटीव्ह आयडेंटी डिस्ऑर्डर). या विकाराचे मूळ सर्वसाधारणपणे लहानपणी मनावर झालेल्या एखाद्या आघातात किंवा पौगंडावस्थेत झालेला असाच एखादा मानसिक आघात किंवा तारुण्यातील अत्यंत गूढ अशा स्वप्नरंजनातील संपृक्तता, यात असते. अशा अवस्थेतील माणूस किंवा असा विकार झालेला माणूस कधी कधी वास्तवाच्या अगदी विपरीत व्यक्तिमत्व धारण करून वावरतो. तर कधी, कधीही न पाहिलेल्या व्यक्तींचा आभासी वावर त्याच्या भोवताली असतो. दीर्घकाळ चालणारी संमोहन उपचार पद्धति यावर मात करू शकते. त्वरित परिणामासाठी मात्र विजेचे झटके हाच एक पर्याय ठरू शकतो.'
मीही असाच मनोरुग्ण..?
कांदे पोह्याच्या दोन बशांमधील दोन चमचे हवेत तरंगू लागले. माझ्या दोन्ही कानशिलाला ते चिकटले आणि हजारो वोल्टस् विजेचा प्रवाह माझ्या मेंदूच्या ठिकर्या ठिकर्या उडवू लागला. मी उठून उभा राहिलो आणि पळत सुटलो. जिन्याच्या किती पायर्या उतरलो मी? चाळीस? चारशे? चार हजार? पळता पळता कशाला तरी धडकलो. नव्हे कुणाला तरी धडकलो.
" साला लिखित्या तू ? वंडर फुल्! साला तू हल्ली बॅंकेमंदी ब्रॅन्चला दिसत नाय. काय बदली जाला की काय?"
सोकाजी त्रिलोकेकर...?
" नाही म..म..मी.. कॉर्पोरेशन....""करेक्ट. ते हरिराव लिखित्या, सांडगे बिल्डिंग.....यम्माय् राईट्ट. ते तर कवाच ऑफ झाला. बट् अ नाईस सोल हां. आय स्टिल रिमेम्बर..."
मी सोकाजीला ढकलून तसाच पुढे पळत सुटलो, ते दमछाक होऊन छातीत कळ येई पर्यंत. पाय पुढे चालेनात तेंव्हा श्वास एकवटून उभा राहिलो. वर स्वच्छ आकाश दिसत होतं.मागे बटाटा हाईटस्. वाचलो! तो मनोविकाराचा आघात नव्हता तर. मग काय असेल? मागे वळून बघण्याची हिंमत होत नव्हती. कांही तरी होतं तिथे.
पावशे, खरे, अक्षीकर, समेळ, हट्टंगडी, सोकाजी, नागूतात्या, कल्पलता... सगळे मीटिंगला येणार होते? कसे येणार. ते तर जिवंत नव्हते. कदाचित् असतीलही. की त्यांचे........?
आता इथून धावायला पाहिजे. पण कसे धावणार. समोर एक काळा कुत्रा वाट अडवून उभा होता. लाल जीभ बाहेर काढून लहाकत, लाल लाल डोळे माझ्यावर रोखून! त्याने हस्तिदंती रंगाचा सफारीसूटही अंगावर चढवला होता. पण त्याच्यावरून उडी मारून पळून जाणे मला जमणार होते. शाळेत असतांना मला लांब उडीत नेहमी बक्षीसे मिळायची. लांब उडी? की उंच उडी?... मी उडी मारलीच. तोही झेपावला. त्याचा जबडा वासला, माझ्या विजारीचे टोक त्याने दातात धरले आणि खस्सकन् ओढून तो आता भुंकूही लागला.
" उठा आता. बस्स् झालं ते पसरणं. माणसाने मेलं झोपावं तरी किती !. दहा वाजायला आलेत. कामावर जायचंय की नाही? हज्जार वेळा सांगितलं त्या इंग्रजी कादंबर्या वाचत जाग्रण करत जाऊ नका म्हणून. इतकं रात्र रात्र जागून वाचण्यासारखं असतं तरी काय मेलं त्यात कोण जाणे. आणि हे काय? बटाटाट्याची चाळ? पु.ल. देशपांडे? म्हणजे तो शेल्डन संपवून तुम्ही हे घेतलंत रात्री वाचायला?
कम्माल आहे गंऽऽ बाई तुमची!
कुत्रा बायकोच्या............ बायको कुत्र्याच्या..............अयाऽऽऽऽऽई..... ....... बायको बायकोच्याच आवाजात ओरडत होती.
Thursday, January 27, 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment