Thursday, March 22, 2007

कळावे लोभ असावा..

अगदी भक्त पुंडलिकापर्यंत,
जाण्याची गरज नाही
खूप अलिकडच्य काळांतही
वडिलांची बूज राखली जाई
कोट टोपी अन् बार काड्यांची छत्री
यांचाही आदर वाटत होता
गावाकडचा 'म्हातारा', शहरातले 'बाबा'
वेदवाक्यासमान त्यांचा शब्द वाटत होता
श्रीकाराखालील निमंत्रण पत्रिकेत
'कुलस्वामिनी कृपेंकरून' इत्यादि नंतर
'वडिलांचे विनंतीस मान देऊन.......'
बाकी नांवे छापण्याची कुलीनता होती
पुढें निमंत्रणे मोअर प्रॅक्टिकल झाली
'मिस्टर अँड मिसेस इन्व्हाईट कॉर्डियली'
आटोअशीरपणाने जिव्हाळा बेतला
नीड टु नो पॉलिसीचा बोलबाला झाला
आता तोही एक इतिहास झाला.
'नितु वेडस् चिंपू' ; एस्सेमेस आला
कुठे ? .......... कधी ?.........
कॉलबॅक तुम्ही करायचं आहे,
त्यांच्या मोबाईलला इनकमिंग फ्री आहे
कुठून कुठे आलो; पहायचीही सवड नाही
मात्र......
कार्य सिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहेत तरीही

---अरुण वडुलेकर

कसं सांगू .....!

कसं सांगू .....!
तुला पटणारही नाही.
साक्ष तुझ्या-माझ्या गुपिताची,
तो निशिगंध....
अबोल झालाय !

तुला आठवतं.........?
त्या अनुरागी क्षणांवरती
त्याच्याही गंधाची
पखरण होतीच,
त्या कैफाचा स्पर्षवारा,
त्यालाही हवासा वाटला.

ताटातुटीच्या क्षणी........!
'पुन्हा येते' म्हणालीस,
आली नाहीस.

तुझ्या प्रतीक्षेत तो मात्र,
कोमेजून गेलाय......!

माझं कांही नाही.....!
पण निदान त्याच्यासाठीं तरी,
तुला पुन्हा यायलाच हवं......!!

Wednesday, March 21, 2007

पाथेय (दख्खनराणी प्रति)

शोषणाच्या वेदनेची ओल ज्यांनी जाणिली अन्‌ तिमिर डोही एक पणती लाविली, त्यांना सलाम !
तो वसा जाणुनी ज्यांनी राउळे मांडिली, अन्‌ मार्गदर्शी दीप स्तंभी मांडिले, त्यांना सलाम !
त्या चिऱ्यांवर नांव अपुले कोरिले, अन्‌ बावटे अपुलेचि मिरवुन नाचले, त्यांना सलाम
मूलमंत्रांच्या ऋचा कर्मकाण्डी गाडिल्या, अन्‌ वल्गनांचे घोष ज्यांनी कंठाळले, त्यांना सलाम !
शोषितांच्या प्रेषितांचे ढोंग ज्यांनी वठविले, अन्‌ तृप्त उदरी तोषुनी सुस्तावले, त्यांना सलाम !
खोगिरांची भरती जी, मातली मस्तावली, अन्‌ तुडविले देवटांके बुद्ध्याचि, त्यांनाही सलाम !
तें तिथें घडले, कां न ठावे, ना जणिले परि, अन्‌ लाविली चूड अपुल्याचि सदना, त्यांना तर सलामच सलाम !
ठिणगीने त्या जळली राणी दख्खनची अन्‌ मख्ख बसले सह्यकडे धास्तावलेले, त्यांनाही सलाम !

कवि- अरुण वडुलेकर

Tuesday, March 20, 2007

आस

एकदा येऊन जा, घेऊन जा साऱ्या व्यथा
आर्त झालेल्या जिवाच्या संपल्या साऱ्या कथा
जाणिवा ज्या मूर्त होत्या
स्पंदने जी छंद होती
आज त्या संवेदनांच्या दग्ध झाल्या पाकळ्या
एकदा येऊन जा, घेऊन जा साऱ्या व्यथा... ॥ १ ॥
मृदु स्वरांनी गायिलेले
गीत अनुरागी क्षणांचे
त्या स्वराच्या छिन्न झाल्या तरलशा साऱ्या तऱ्हा
एकदा येऊन जा, घेऊन जा साऱ्या व्यथा... ॥ २ ॥
जीवनाची आस सरली
ज्योतही ती क्षीण झाली
स्नेह ना मी मागतो परि, फुंकुनी जा हा दिवा
एकदा येऊन जा, घेऊन जा साऱ्या व्यथा... ॥ ३ ॥

-- अरुण वडुलेकर

Tuesday, March 6, 2007

ज्योतिषशास्त्र - कांही उत्तर्रं

ज्योतिष हे अनुभवसिद्ध शास्त्र असले तरी तो एक वादाच्या विषय असल्यामुळे त्यावर विश्वास ठेवणारे, त्याचे अभ्यासक तथा व्यासंगी त्यावर जाहीर चर्चा करण्याच्या भरीस पडत नाहीत. या शास्त्रावर विश्वास ठेवणारे व त्याचा समाधानकारक अनुभव घेणारे अनुभव घेणारे केवळ भारतांतच नव्हे तर संपूर्ण जगांत फार मोठ्या संख्येने आहेतच. मनोगतवरील एक जिज्ञासू के. सौरभ यांनी त्यांच्या ’ ज्योतिषशास्त्र - कांही प्रश्न’ या लेखांत कांही प्रश्न उपस्थित केले आहेत, त्यांना यथाशक्ति उत्तरे देण्याचा प्रयत्न करीत आहे.
त्या आधी एक सांगावेसे वाटतें कीं, ज्योतिषशास्त्र केवळ पुस्तकावरून अभ्यासण्यापेक्षा या विषयाचे शिक्षण देणाऱ्या संस्थेच्या माध्यमांतून सूत्रबद्ध अध्ययन करणें अधिक हितावह ठरेल. पुस्तकांतून ग्रहांबद्धल माहिती, त्यांचे शुभाशुभत्व, परस्पर शत्रु-मित्रत्व आणि निरनिराळ्या भावांतील कारकत्व इत्यादि माहिती मिळू शकते पण समग्र फलिताच्या दृष्टीने ती अपुरी पडतें. किंबहुना कांहीवेळा संदेह निर्माण होऊ शकतात. त्यामुळे या शास्त्राचे पायाभूत असें सिद्धांत, संहिता व होरा या तीनही स्कंधांचे व्यासंगपूर्ण अध्ययन केले तर शास्त्राबद्धल शंका उरणार नाही.
आता उपस्थित केल्या गेलेल्या शंका व त्यावरील माझी यथाशक्ति उत्तरे. :
प्र. १) नवमांश, भावचलित व निरयन भावचलित कुंडली म्हण्जे काय ?
उत्तर : सहसा जन्मलग्न कुंडली व राशीकुंडली वरून भूत-भविष्याचा वेध घेतला जातो. यासाठीं शास्त्राचे प्राथमिक ज्ञान पुरेसें आहे पण घेतलेला वेध अगदी ढोबळमानाने असतो. त्या नंतर अधिक अचुकता येण्यासाठीं लग्नकुंडलीतील ग्रहांशांची विशिष्ट प्रकारें विभागणी करून सूक्ष्म भावपरीक्षण करतां येते. त्यायोगें विविध वर्गकुंडली सिद्ध होतात. एक प्रकारें मूळ लग्न कुंडली हें एकप्रकारचें पृथक्करण केले जाते. लग्नअंश तसेंच ग्रहांशाचे किमान निरनिराळे सहा विभाग करून सहा निरनिराळ्या कुंड्ल्या केल्या जातात त्याला षड्‌वर्गसाधन असें म्हणतात. त्यापैकी नवमांश कुंडली हा एक वर्ग आहे. यांत लग्नांश व ग्रहांशाचे नऊ समान भाग करून त्यातील एक नवमांश भाग विचारांत घेतला जातो.
उदाहरणार्थ, जसें वैद्यकीय चिकित्सांर्गत रक्त तपासणीत रक्तातील अनेक घटकांचे परिक्षण करता येते. मात्र जशी व्याधी झाली असेल त्या व्याधीला कारणीभूत असणा़ऱ्या नेमक्या घटकाचे अधिक सूक्ष्म पृथक्करण करून नेमक्या निर्णयाप्रत जाता येते.
नवमांश कुंडली अशाच प्राकारें ’ कलत्र’ म्हणजे वैवाहिक सहचर/साहचर्य यासंबंधी अधिक विस्तृत बोध देते.
भावचलित कुंडली : लग्न कुंडली जशी अचुक जन्मवेळेवर अवलंबून असते तशी भावचलित कुंडली जन्मवेळेपूर्वी जन्मवेळेनंतरच्या अचुक माध्यान्ह वेळेवर अवलंबून असते. माध्यान्ही सूर्य ख-मध्यावर असतो आणि त्याअनुरोधाने कुंडलीतील दशमभावाचे अचुक अंश मिळतात त्यावरून सर्वच भावांचे मध्य व आरंभ निश्चित होतात. त्या अनुरोधाने ज्या कुंडलीत ग्रह आपापल्या अंशाप्रमाणे स्थित होतात त्या कुंडलीला भावचलित कुंडली म्हणतात. या प्रक्रियेत कांही वेळा एखादा ग्रह लग्नकुंडलीत ज्या भावांत असतो, भावकुंडलीत तो मूळ भावाच्या मागील अथवा पुढील भावांत जाऊ शकतो. म्हणजे एखादा ग्रह लगन कुंडलीत जर प्रथम भावांत असेल तर भावचलितात तो द्वितीय अथवा द्वादश भावांत जाऊ शकतो आणि मूळ भावाबरोबरच बदललेल्या भावाचाही फलिताच्या दृष्टीने विचार करता येतो. अर्थातच, फलिताची अचुकता वाढू शकते.
सायन व निरयन भावचलित : ज्योतिष शास्त्रात सायन - अयनांशा सह व निरयन - अयनांश वगळून अशा ज्योतिष करण्याच्या दोन पद्धती आहेत. त्यानुसार केलेल्या भावचलिताला त्या त्या पद्धतीचे नाव दिले जाते. सायन पद्धती तांत्रिकदृष्ट्या अचुक आहे, परंतु निरयन पद्धती फलितासाठी अधिक उपयुक्त ठरते.
२) शंखचूड कालसर्पयोग म्हणजे काय ?
उत्तर : कालसर्पयोग हाही एक विवादास्पद वि्षय आहे. यासाठीं राहू-केतूच्या अक्षात येणाऱ्या ग्रहांचा विचार केला जातो. परंतु हे दोन्ही ग्रह नसून क्रांतिमार्गावरचे पातबिंदू असल्याने त्याचा फलितासाठीं करूं नये असा एक प्रवाह आहे. तथापि नवम्‌ स्थानांत राहू व तृतीय स्थानांत केतू असल्यास शंखचूड कालसर्प योग मानण्याचा प्रघात आहे. ज्याच्या परिणामी धर्माचिरुद्ध आचरण, कठोर वर्तन, सदैव चिंता, उच्च रक्तदाब, संदेकास्पद वर्तन असें दोष मानले जातात.
३) गुरु हा शुभग्रह आहे असे म्हणतात. जर पत्रिकेत गुरु निर्बली वा अशुभ ग्रह संबंधित व सध्या गुरुची महादशा चालू असेल तर जातकाला गुरुच्या संदर्भात शुभ फले मिळतील की अशुभ ?
उत्तर : गुरु शुभग्रह आहे. तो कधीही अशुभ फले देत नाही. मात्र अशुभ संबंधात असेल तर भावगत फलात, मग ती शुभ असोत की अशुभ, गौणत्व आणतो. महादशा संदर्भातहाच नियम लागू होतो. कोणतीही महादशा संपूर्णपणे चांगली अथवा वाईट असत नाही. तिचा बरे वाईटपणा महादशेतील आंतरदशेवरही अवलंबून असतो.