Wednesday, April 18, 2007

वाळूचे वादळ, एक असेंही..

वाळूचे वादळ, एक असेंही..
अरुण वडुलेकर रवि, १८/०२/२००७ - ११:०६. » कथा | अनुभव
मनोगतवर जयश्री अंबासकर यांचा ' वाळूची वादळे ' हा लेख वाचला आणि मीही असांच एकदा वाळुच्या वादळांत सांपडलो होतो त्या स्मृती जाग्या झाल्या. ती चित्तरकथा देण्याचा प्रयत्न करीत आहे.
त्यावेळी मी मध्यपूर्वेतील दोहा-कतार या देशांत नोकरी साठी गेलेलो होतो. आवासांमधील हवा थंड करणाऱ्या संयंत्रांची उभारणी करणे, ती कार्यान्वित करणे व तत्पश्चात त्यांची वेळोवेळी देखभाल होत राहील अशी व्यवस्था लावणे ही माझी कार्यकक्षा होती.
तो १९८१ सालांतील मार्च महिना असावा. मी मुख्य शहराबाहेरील दूरच्या लहानशा गावातील एका शेखच्या निवासांतील संयंत्राची पाहाणी करून परतत होतो. त्या वास्तूल निवास म्हणायचे पण जणू कांही राजवाडाच होता तो. संयंत्रतांत कांही दोष नव्हताच पण शेख तसा चिकित्सकच होता. त्यच्या शंका कुशंकांना तोंड देता देता संध्याकाळ होत आलेली. परत निघालो तेंव्हा आकाशांत बऱ्यापैकी प्रकाश होता. मला आमच्या आस्थापनेकडून दिली गेलेली मोटार गाडी चालवत सुमारें ११० कि.मी. चा प्रवास करून माझा निवास गाठायचा होता.
परतीचा रस्ता प्रधस्त, रुंद व चांगला होता. पण एकाकी आणि निर्मनुष्य होता. संध्याकाळ असल्याने वाटेने रहदारी असण्याची शक्यता नव्हतीच. मागे किंवा पुढे एकही वाहन दिसण्याची शक्यता फार विरळ होती. पण मनांत त्याची काळजी नव्हती. कारण कधीं एकदां घरी जाऊन पडतो असें झाले होते.
अशांतच, साधारण तीसेक कि.मी. चा प्रवास झाला असेल नसेल तोंच वाळूच्या वादळाला सुरुवात झाली. सहसा अशा वादळाची पूर्वसूचना सकाळी तेथील स्थानिक आकाशवाणीवर दिली जते. पण मी ती ऐकली नव्हती. वाळूही अशी की धड जाढी नाहीं आणि अगदी पीठही नहीं. साधारण बारीक रव्यासारख्या वाळुचे लोट समोरून येऊन पुढील कांचेवर आदळून पसार होऊ लागले. सुरुवातीचे कांही क्षण अचंभ्यात गेले. मग कांही क्षण मौजही वाटून गेली. जणू मी वळिवाची सर अंगावर घेत होतो. पण पुढच्या क्षणी सारा आसमंत त्या धुराळ्याने भरून गेला. रस्ताच काय पण आजूबाजूचे सारे दिसेनासे झाले. धुक्यांत हरवावं तसं झालं होतं. प्रतिक्षिप्त क्रीयेने गाडी बंद केली गेली. भय केवळ मनांतच नाही तर सर्वांगावर पसरू लागलं. गाडीच्या सर्वांगावर धूळ-वाळूचा थर दाट होऊ लागला होता. खिडकेची कांच खाली करून बाहेर पाहाण्याच प्रयत्न केला. तो एक मूर्खपणाच झाला. जराशी कांच खाली होतांच वाळूचा एक जोरदार फवारा आंत घुसला आणि नाकातोंडावरुन झरपटून गेला. झटकन कांच पुन्हा बंद केली. अशा वेळी वायपर्स वापरतात की नाही ? कोणस ठाऊक ! कांही सुचण्यच्या पलिकेडे मी गेलेलो. वायपर्स चालू केले तर कांचेवर वाळू पाण्याचे सारवण होऊन राडाच झाला. वादळ थांबे पर्यंत स्वस्थ बसणे क्रमप्राप्त होते.
आणि मग स्वस्थ बसण्यातली अस्वस्थता दाटूं लागली. हे वादळ कधी थांबणार ? की थांबणाराच नाही ?? नाही थांबलं तर काय होईल ? मी गाडीसकट वाळूत गाडला जाईन की काय ? गाडीचा एसी चालू असला तरी हवेचा वास बदलल्याचे जाणवत होते. प्राणवायू कमी होतोय की काय ? मी गुदमरून मरणार? मग एका एकी मायदेशातील माझी पत्नी, मुलं, घर, माझी वाट पाहात असलेली बहिण, सारं सारं आठवायला लागलं. रडू यावं, धाय मोकलून रडावं असं वाटत होतं पण रडू फुटत नव्हतं. एकदा वाटलं गाडीचा दरवाजा उघडून बाहेर पडावं.गाडीत गुदमरून मरण्यापेक्षां बाहेर मरावं. मृत्यु निदान लवकर तरी येईल.
असा शून्यमनस्क किती वेळ बसून राहिलो तें कळलंच नाही. वादळाची गाज कमी झालीशी वाटली तसा दरवाजा हंळूच उघडून बाहेर आलो. वादळ शमलं होतं. तरी वारा जोराचा झोंजावत होताच. दाट अंधारून आलेलं होतं. पुढच्या कांचेवरील वाळुचा कसाबसा साफ करून गाडी सुरूं करूं गेलो तर काय ! धक्काच बासला. गाडी सुरूं झालीच नाहीं; होणारही नव्हती. कारण मी इंजीन बंद करायला विसरलो होतो, शिवाय एसी आणि हेडलाईटस चालूच राहिले होते. बॅटरी साफ उतरली होती. काय करणार ! मोठी पंचाईत झाली होती. कुणाची मदत मिळण्याची सुतराम शक्यता नव्हती. आपत्कालीन इशारा (hazzard signal) चालू करून ठेवला आणि बाहेर येऊन उभा राहिलो.
अचानक दूरवर आकाशांत एक लाल पिवळा दिवा लुकलुकूतांना दिसू लागला आणि पाहतां पाहतां तो माझ्या दिशेने सरकू लागला.तें एक खूप खालून जाणारे हेलिकॉप्टर आहे हें धान्यांत येईतो तें माझ्या डोक्यावरून घोंघावत निघूनही गेले. मी वेड्यासारखा त्याच्या मागे ओरडत हातवारे करत धांवलो. पण उपयोग झाला नाही. पुन्हा तोच अंधार, भयाण पोकळी, गलितगात्र असा मी !
त्यानंतर तासभर गेला असेल नसेल, अशांतच एक विलक्षण घटना घडली. पुन्हा दूरवर लाल निळे ठिपके चमकू लागले. यावेळी ते खूपसें खाली क्षितिजालगत होते. लांबून येणारे एखादे वाहन असावें असें वाटले. कीं तो एक भास होता ? या विचारांची तंद्री मोडली ती डोळ्यांवर आदळणाऱ्या प्रकाश झोतांनी.
तो प्रकाश अगदी जवळ येऊन ठेपलेल्या मोटरीच्या दिव्यांचाच होता इतकेंच नव्हे तर त्या मोटारीवरही एक दिवा होता जो लाल निळ्या प्राकाशाचे झोत फिरवत होता. हर्षातिरेकाने मी एक आरोळीच ठोकली. ती गाडी पोलीसांची (अरबी भाषेत पोलीस = शुरता) होती. ती कां आली होती तें समजलं आणि तेथील शासनव्यवस्थेला मनोमन सलाम ठोकला.
मघाशीचं हेलिकॉप्टर अशा वादळानंतर आपद्ग्रस्तांचा शोध घेण्याच्या कामगिरीवर होतं आणि त्याने दिलेलेल्या माहितीनुसार हे दोन पोलीस अधिकारी माझी सोडवणूक करण्यासांठी आलेले होते.
कसं कुणास ठाऊक आता मला रडूं फुटलं होतं.मी रडत रडत, मला येत असलेल्या मोडक्या तोडक्या अरबी भाषेंत " शुकरंद रफिक " (धन्यवाद मित्रा) असं एक सारखं म्हणत होतो. त्यांना माझी भाषा येत नव्हती आणि मला त्यांची येत नव्हती. पण तरी तेंव्हा जो संवाद झाला तो शब्दांच्या पलिकडचा होता. माझी गाडी तिथेंच सोडून दिली.(ती दुसऱ्या दिवशी कंपनीच्या तंत्रज्ञाने आणली)
मी त्यांच्यासोबतीने सुखरूप परत आलो. काळ आला होता पण वेळ आली नव्हती हेंच खरे.

Tuesday, April 17, 2007

आखाती मुशाफिरी

’वाळूचे वादळ असेही एक’ या लेखाला मिळालेला प्रतिसाद पाहून मध्यपूर्वेतील दोहा-कतार या देशातील माझे आणखी कांही अनुभव लिहिण्याला हुरुप आला.
-----------------------------------------------------------------------
राक्षसांशी मैत्री-
दोहा-कतार हा देश ब्रिटीशांच्या जोखडातून नुकताच स्वतंत्र झाला होता. स्वातंत्र्यापूर्वी ब्रिटीशांच्या जोखडाखालील हा देश खूपसा मागास होता. किंबहुना ब्रिटीशांनी तो मागासच कसा राहील याचीच काळजी घेतली होती. तेच त्यांच्या मतलबाचे होते. थोडयाफार फरकाने भारताच्या बाबतीत असेच घडले होते. भूगर्भातल्या तेलाने देशाला महामोर संपत्ती मिळवून दिली होती. आता गरज होती ती साधनांची, पायाभूत सुविधांची. यांत स्वकीयांचा (नेटीव्ह) उपयोग तसा नगण्य होता. याचे कारण मागासलेपण तर होतेच पण वेगाने सुरु झालेल्या संपत्तीच्या ओघाने आणि पैसा फेकला की जगात कांहीही विकत घेता हे समजल्या मुळे लोक आळसावले होते. चैन, ऎशोआराम यालाच चटावले होते. मग पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी अन्य देशातून तंत्र, तंत्रद्न्य, मनुष्यबळ आयात करणे क्रमप्राप्तच होते. उच्च तंत्रासाठी युरोपीय देश आणि तंत्रद्न्य, कुशल कामगार, मनुष्यबळ या साठी भारत, पाकिस्तान, बांगला देश, अफगाणीस्तान वगैरे आशियाई देश हा तरणोपाय झाला. भारत त्यातले त्यात प्रगत देश म्हणून जरा अधिक महत्व मिळाले. भारतातून केवळ भारवाहू, केवळ कष्टाची कामें करणारे फार कमी गेले. गेले ते कुशल कारागीर. पण मग कष्टाची कामें करणारे मजूर लागणारच. त्या कामासाठी निवड झाली ती धिप्पाड, काटक, अफगाणी पठाणांची, ज्यांची बौद्धिक क्षमता, पातळी अप्रबुद्धच असायची. विनोदाने आपण ’मल्लभेजा’ म्हणतो तसे. या लोकांकडून कामे करून घ्यायची म्हणजे फार अवघड. वृत्तीने अत्यंत रासवट, भडक माथ्याचे, अरेबिक आणि पुश्तु शिवाय भाषा माहिती नाही. त्यातही अरेबिक पेक्षा पुश्तुचाच प्रभाव अधिक. बोलायला लागले की चार सहा अरेबिक शब्दांनंतर पुश्तु सुरू व्हायचे. आधी अरेबिक समजायचीच मारामार त्यात पुश्तु म्हणजे ’कानडीने केला मराठी भ्रतार’ याहून भयंकर. माझे अरेबिक म्हणजे ’व-हाड निघालय लंडनला’ मधल्या बबन्याच्या इंग्रजी सारखं. त्यामुळे अशा पठाणांशी संबंध कधीच येऊ नये अशी मी देवाजवळ प्रार्थना करीत असे. पण देवालाही एखादा ’मिस्ड् कॉल’ गेला असावा आणि एका सुप्रभाती ते संकट दत्त म्हणून् पुढे उभं येऊन ठाकलंच.
आमची कंपनी म्हणजे वर उल्लेख केला त्याप्रमाणे पायाभूत सुविधा उभारणीच्या प्रकल्पातील बांधकामापासून ते वीज-पाणी-वातानुकूलित करणारी संयंत्रे इत्यादि बहुविध सेवा पुरविणारी म्हणजे अगदी इमारतीचा पाया खणण्यापासून ते अगदी न्हाणीघरातील शेवटचा नळ बसवून देण्यापर्यंत सेवा परविणारे अवाढव्य आस्थापन होते. त्यात अनेक निरनिराळे विभाग होते. आपत्कालीन परिस्थीतीत कर्मचा-यांची तातपुरती बदलीही होत् असे. असेंच एकदा मला माझे विहित काम सोडून
एका दूरच्या कार्यस्थळावर वीज-वाहिनी (केबल) जमीनेखाली टाकण्याचे काम करणा-या अफगाणी मजूरांच्या जथ्थ्यावर देखरेख करण्याची, त्यांच्याकडून् काम करून घेण्याची कामगिरी सोपवली गेली. त्या कामाचा प्राधिकारी (इनचार्ज) अचानक दुसरीकडे आणि मी त्याच्या जागी अशी योजना झाली.
या नवीन कामगिरीचा भार (चार्ज) मला देणारा प्राधिकारी पाकिस्तानी होता. भरभक्कम शरीरयष्टीच्या आणि अरेबिक, पुश्तु सकट इंग्लीश, फ्रेंच इत्यादि भाषा लीलया बोलू शकणा-या या माणसाने माज्या डाळ-भात्या शरीरप्रकृतीकडे अतीव करुणार्द्र नजरेने पाहात, आस्थापनेच्या अशा बिनडोक निर्णयाबद्धल केवळ ’अफसोस’ या एकाच पण अत्यंत परिणामकार शब्दात नापसंती व्यक्त करीत मला कार्यभार दिला आणि याच्या कांही मौलिक सूचनाही दिल्या. त्याही विलक्षण होत्या. तो म्हणाला,
" हरून, (इथे माझ्या अरुण या नावाचा असा अपभ्रंश झालेला होता) त्या माणसांना माणूस म्हणशील तर खुदाही कदाचित नाराज हॊईल. अगदी राक्षस आहेत ते. तुला नवल वाटेल पण जुन्या इंग्रजी सिनेमात गुलामांना जसें हंटरने मार मारून कामाला लावलेले दाखवलेले असायचे तसें करावे लागते. तू तिथे गेलास की माझ्या टेबलावर तुला एक वेताची काठी दिसेल. ती तुला हातात घेऊनच फिरावे लागेल. तुझ्या हातात ती काठी नसली तर ते कदाचित संधी साधताच तुला मारायलाही कमी करणार नाहीत. परमेश्वर तुझं रक्षण माझ्या मित्रा !" असं म्हणून तो माझा नवा मित्र (!) माझ्या उरांत धडकी भरून गेला. त्या रात्री मी माझ्या पत्नीला जे पत्र लिहिले त्यात हे सारे लिहिले पण सकाळी पत्र फाडून टाकले आणि कामाला निघालो.
कार्यस्थळावर पोहोचलो तर तिथे आमच्या विभागाचा ’मुदीर’ (मॅनेजर) माझ्या आधी हजर झालेला. अदमासे चाळीसेक पठाणांचा जथ्थाही जवळच उभा होता. मुदीर मला कामाचा तपशील इंग्रजीतून् समजाऊन सांगत होता त्यावेळी हे पठाण आमचे संभाषण कुतुहलाने ऐकत होते, आपसात काहीं कुजबुजतही होते हे माझ्या ध्यानात् आले. मुदीरचा वेश, तोकडी तुमान-टीशर्ट असा कांहीसा अमेरिकन वळणाचा होता, भाषेचा लहेज़ाही तशाच वळणाचा होता.
मुदीर त्याचे काम आटोपून ताड्कन् गेला आणि मी ’सीदन्ती मम गात्राणि मुखं च परिशुच्यति’ अशा अवस्थेत त्या आर्यावर्ती महाजनांना सामोरा गेलो. मी कांही शब्द उच्चारायचा क्षणाचाही अवधी न देता त्यापैकी एकान मला पुश्तु भाषेत एक भले मोठे वाक्य ऐकवले. तो माझा परिचय करून घेण्याला उत्सुक असावा, कदाचित तो माझ्या देशाबद्धल कांही विचारीत मला वाटले. कारण त्याच्या बोलण्यात एकदां ताजमहाल असा शब्द आला होता. भारताबाहेरील ताजमहालाबाबतचे कुतुहल मला माहिती होते. जरा संभ्रमित अवस्थेत मी ’ हैवा !’ (होय) असें म्हणून् गेलो मात्र, सगळे पठाण गडबडाटी हसायला लागले. कांहींना हसूं इतके आवरेनासें झाले की ते हात वर करून नाचू लागले. एक नक्की समजलं की त्यांनी माझी मस्त खिल्ली उडवली होती. भांबावून मख्ख उभे राहण्यापलिकडे मी कांही करू शकत नव्हतो. इतक्यात एका उंच माणसाने आपला उजवा हात उंच केला त्यासरशी बटण बंद केल्या नंतर विजेचा सिवा बंद व्हावा तसा तो हास्यकल्लोळ थांबला आनि तो इसम माझ्या रोखाने पुढे सरकला. माझ्या पुढ्यांत उभा ठाकून त्याने सवाल ठोकला,
"अन्ता अमरीकी ?" प्रश्न मला समजला आणि
"लॅ, अना हिन्दी ! " उत्तर निघून गेलं.
कां कोणास ठाऊक त्या म्होरक्याच्या चेह-यावर मघाशी कांहीसा तिरस्कार दिसलासा वाटल होता तो निवळल्या सारखा वाटला. किंचितसे स्मित मुद्रेवर उमलवीत त्याने
"अस्सलाम-व-आलेकुम !" म्हणत हस्तालोंदनासाठी हात पुढे केला. ती तेथील सर्वसामान्य प्रथा आहे हे मला माहिती होता आणि
"व-आलेकुम अस्सलाम" म्हणत मी त्याच हात हातात घेतला. त्यावेळी त्या स्पर्षाचा अर्थ मला त्या वेळी समजला नव्हता. तो नंतर कळाला

क्रमश:

त्यावेळी त्या स्पर्षाचा अर्थ मला समजला नव्हता. तो नंतर कळाला.
----------------------------------------------------------------------
त्यानंतर तो माणूस चक्क मला समजेल अशा भाषेत बोलू लागला तेंव्हा मला आश्चर्याचा धक्काच बसला.
" मुआफ करना रफिक. पठानको अमरीकी बिल्कूल नापसंद. हरामी हमारा मुलुक बरबाद किया. तुम हिन्दी, या हबीबी ! हमारा दोस्त! इंद्रा (इंदिरा गांधी) हमारा दोस्त! मा फिकर." (काळजी करू नको)
जिवात जीव आला. पठाण मोडकं तोडकं कां होईना पण मला समजेल असं उर्दू बोलू शकत होता. त्यांचा अमेरिकेवर राग होता हेही लक्षात आलं. तो स्वाभाविक असावा. कारण आंतराष्ट्रीय राजकारण थोडेफार सामान्यपणे मला महिती होते. महासत्ता बनण्याच्या हव्यासापायी अमेरिकेने इराण. इराक, अफगाणीस्तान अशा अनेक मुस्लिमी देशांत हस्तक्षेप केला होता. त्या कारवाईमुळे तेथील जनतेला नाहक भीषण परिस्थीतीला सामोरे जावे लागले होते. कायमची युद्धसदृष परिस्थिती, अतिरेकी तालिबानींना आधी दिलेले प्रोत्साहन आणि नंतर त्यांचीच झालेली होरपळ हे मी वर्तमानपत्रातून वाचले होते. मी संभाषण वाढवायचं ठरवलं.
" मेरा नाम हरून. इधरका रब्बानी साब दूसरा कामपे गया. अब हम काम देखेगा. तुम हमारी मदद करेगा." नकळत मी त्याचीच भाषा बोलू लागलो.
"लाज़ीम,लाज़ीम रफिक" (अवश्य,अवश्य मित्रा) त्याने मला दिलासा दिला आणि नंतर बाकी पठाणांना संबोधून पुश्तु भाषेत कांहीतरी ओरडला. त्या सरशी तो जथ्था कामाच्या दिशेने सरकू लागला. पण तरीही बरेचसे पठाण मंद गतीने सरकत होते. मागे वळून वळून पाहात होते. आपसात कुजबुजत होते. जमीनीत चर खोदणारी चारचाकी ट्रॅक्टरसारखी यंत्रे सुरु झाली होती. भला मोठा केबलचा रीळ एका यंत्रावर ठेवलेला होता कांही पठाण ते यंत्र चालु करत होते. त्यावर स्वार होत होते. जवळच कार्यस्थळावरचे चाकावरचे कार्यालय होते.(मोबाईल पोर्टा कॅबीन) तिथे जाऊन मला रेडिओ फोनने मुख्यालयाला रिपोर्ट करावयाचा होता. मी त्या दिशेने वळणार इतक्यात असलेला प्यून माझाच दिशेने पळर्त आला आणि रेडिओ वाजत असल्याचे ओरडून सांगू लागला. मी धावतच केबीन गाठली आणि काम सुरु झाल्याची खबर देउ लागलो. ’कांही अडचण तर नाही ना?’ या पुन्हा पुन्हा विचारला गेलेल्या प्रश्नाला माझे ’नाही’ हे उत्तर मुदीरचे समाधान झालेसे वाटले नाही. पण मग ’सध्या तरी कांही समस्या नाही’ असे म्हणालो तेंव्हा रेडिओ बंद झाला. प्यूनने एव्हाना थंड पाणी आणि कॉफीचा कप समोर ठेवलेला होता.
कॉफी संपवून कामाच्या आखणी-आलेखावर(प्रोग्रॅम चार्टवर) नजर टाकू लागलो. तेथील सारी कामे फार सूत्रबद्ध असतात, आलेखाप्रमाणे आमलात आणावीच लागतात. इथे तर काम चार दिवसांनी मागे पडलेले दिसत होते. तो बाजूला सारून मी कामाच्या ठिकाणावर जावे म्हणून केबीनच्या बाहेर पडलो तर मघाचा तो पठाण म्होरक्या समोर हजर आणि तिकडे मंडळी काम सोडून निवांत गप्पा छाटत बसलेली तर कांही शिवाशिवासारखा खेळ खेळण्यात गढलेली. त्या म्होरक्याला मी कांही विचारणार इतक्यात तो तीरासारखा कॅबीन मधे शिरला, टेबलवरील ती वेताची छडी घेऊन त्या कामचुकार कामगारांवर धावत गेला आणि एकेकावर छडीचे वार करू लागला. मी सर्द होऊन पाहातच राहिलो. कांही पठाणांनी आपसात झोंबाझोंबी सुरु केली. मात्र कांही मिनिटातच, तो म्होरक्या पठाण मेंढपाळाने मेंढरं वळावीत असा आरडाओरडा करीत पळापळ करीत पठाण वळित होता आणि काम सुरु झालेलं होतं. सकाळपासून जे कांही पहिलं होतं, अनुभवलं होतं त्याने डोकं गरगरायला लागलं होतं.

क्रमश: -
आजवरचे संस्कार मनाला फटकारीत होते. मी उद्याही असाच वागणार होतो का?
------------------------------------
दुसऱ्या दिवशी कामाची जुपी झाली तेंव्हा कांही पठाण आपसूक कामाला लागले.कांही मात्र अजूनही घोळका करून आपसात बोलत होते. नुरुलही त्यांच्यातच होता. मी नुरुलला हांक मारली. ती काठी माझ्या हातातच होती.आज माझा आवाज जरा करडा झलेला आहे हे माझा ध्यानात आलं. पण मला त्याचा विचार करावासा वाटला नाही. केवळ काम व्यवस्थित झालेले मला पाहायचे होते.
नुरुल समोर येऊन उभा राहिला. मी गरजलो, " हो क्या हो रहा है नुरुल ? तामिली क्यूं हो नही रही ? " नुरुल अधोवदनाने म्हणाला,
" पठान कलकी फसात अफसोस कर रहा है साब." मी म्हणालो,
" कोई ज़रूरी नही! फसातकी वज़ह काम मुश्तमाम (बिघडले) हो गया. उसका अफसोस करो. जाव, सबको बोलो कामकी फिकर करो. रेहमत-उल्लाही रहीम !" (जग दयाळू देवाची दया आहे).
नुरुल त्या घोळक्यापर्यंत पोहोचण्यापूर्वीच घोळका कामाच्या ठिकाणाकडे सरकू लागला होता. त्यांना समजले होते की नाही देव जाणे, पण त्यांनी माझे बोलणे बोलणे ऐकले होते. त्याचा मतलबही समजला असावा असें मला वाटले. निदान शेवटचे शब्द तरी समजले असावेत.

टळटळीत उन्हात मी कामाची देखरेख करू लागलो. डोक्यावर फेल्ट हॅट, कमरेला ती काठी तलवारी सारखी खोचलेली. त्या अवतारांत माझा फोटो काढला गेला असता तर करमणूकीला एक विषय झाला असता. मी, केबीन मधे न जाता कामाची पाहाणीच करीत राहण्याचे ठरविलेले होते.
यंत्राच्या साहाय्याने जमीनीत चर खोदायचा, चराच्या तळाशी सीमेंटच्या विटांची ओळ मांडायची, त्यावर केबल ओढून घ्यायची, तिच्यावर आणखी एक विटांचा थर द्यायचा आणि बुलडोझरने वर माती (वाळूच) लोटायची. लोटलेल्या मातीवरून रोलर फिरला की झाले काम. ही सारे एका क्रमाने चालायचची. खोदकाम करणारे यंत्र पुढे चालायचे, त्या मागून केबलचा रीळ असलेली गाडी, तिच्यामागून तळाशी विटा मांडणारे मजूर, मांडलेल्या विटांवर गुरुत्वाकर्षणाने पडत जाणारी केबल, त्यावर दुसरा विटांची ओळ मांडणारे मजूर, त्यानंतर माती ढकलणारा बुलडोझर आणि सरते शेवटी माती दाबणारा रोलर. या क्रमात जराही खंड पडला तरी सारे काम ठप्प व्हायचे. कामचुकार पठाण ही सांखळी खंडित करण्याचा प्रयत्न करीत आणि सारे काम ठप्प झाले की आराम, मौज करीत.
जेवणाच्या सुटीला एक तास रहिला होता इतक्यात केबल सोडणारी/ओढणारी गाडी बंद झाली. चालवणारा इसम मोठ्या मोठ्याने ओरडा करत खाली उतरला. मातीत गडाबडा लोळू लागला. मी त्याच्या पर्यंत पोहोचेपर्यंत गदारोळ झालेला. जो तो पुश्तु भाषेत आरडत होता. गडाबडा लोळणारा मजूर पोटदुखीने विव्हळत होता असे समजले. मी त्याला माझ्या केबीनमधें नेण्याचा हुकूम सोडला. इतक्यात नुरूल माझ्या कानाजवळ " जूठा तमाशा करता है हरामी" असें कांहीसे पुटपुटला. मी साईटवरच्या ट्रक ड्रावव्हरकडे माझा गाडीची चावी फेंकत त्या पोटदुख्या पठाणाला इस्पितळांत घेऊन जायला सांगितेल. आणि ’ चला कामाला लागा परत ’ अशा अर्थाने जोरात ओरडू लागलो. अचानक चेहरा पार उन्हाने करपलेला, आडदांड असा पठाण माझ्यासमोर उभा ठाकला. हातवारे करत तावा तावाने कांहीतरी सांगू लागला. मी चमकून नुरुलकडे पाहिले. नुरुल पुढे येऊन सांगू लागला, त्या पोट दुखी झालेल्या मोईनचा हा भाऊ आहे आणि त्याला इस्पितळात पाठवल्यामुळे तो संतापला आहे. इस्पितळात गेलेल्या माणसाचे नांव मोईन आहे इतके समजले, पण याला कां राग आला ते नाही समजले. पण माझ्या दृष्टीने योग्य वाटले ते मी केले यात मला तरी शंका नव्हती. मला तो वाद नकोच होता. मला काम पूर्ववत चालू कसे होईल याची काळजी होती. पण या गोंधळात जेवणाची सुटी झाली आणि सारा जथ्था ’ हैया हो ’ अशा गर्जना देत ट्रक मधे बसून जेवणासाठी लेबरकँपवर गेला. माझी त्यांनी टर उडवली हे नक्कीच. मोईनची पोटदुखी खोटी होती, काम टाळण्याचा बहाणा होता हे समजलं होतं. मी खजील झलो होतो. मुख्यालयाला हा सारा प्रकार कळवावा आणि काम पुन्हा सुरू होई पर्यंत विसावा घ्यावा म्हणून केबीनकडे वळलो आणि या राक्षसांची कशी जिरवता येईल याचा विचार करू लागलो.

केबिनमध्ये पोहोचतो न पोहोचतो तोंचा रेडिओ फोन घणघणला. फोन रब्बानीचाच होता. कामाची प्रगती विचारत होता. त्याचे बरोबर होते, खरा प्राधिकारी तोच होता. माझी नेमणूक तशी तात्पुरतीच होती. मी काम व्यवस्थित चालले आहे असे सांगितले. कारण त्याच्या विचारण्यात कांही खोच असावी असें वाटून गेले. त्याला लेबरकॅंपवरून कांही खबर लागली असण्याची शक्यता होती. पण त्याचे बोलणे इतर विषयाकडे वळले तसा मी सुस्कारा सोडला. त्या राक्षसांची कशी जिरवता येईल याचा विचार आता मागे पडला. कांहीही करून काम सुरळीत चालणे महत्वाचे होते.
तीन वाजतां कामगारांची गाडी येऊन दाखल झाली तसा मी त्यांना सामोरा गेलो. ते आपापसात बोलत उभेच होते. मी काम सुरू करण्याचा इशारा दिला त्यासरशी तो मोईनचा भाऊ माझ्या पुढ्यात येऊन गरजला,
" क्या काम करेगा ? मकिना क्या तेरा बाप चलाएगा ?"
(म्हणजे यालाही उर्दू येत होते) त्यासरशी नुरूल त्याच्यावर धांवला. बाकी पठाणांमधे हंशा पिकला होता. मी नुरूलला हातानेच शांत रहाण्याचा इशारा केला. शांतपणे त्या पठाणाच्या पुढ्यात जाऊन त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणालो,
" मकिना तेरा बाप चलाएगा! बर्रा (चालता हो)! जाव अपना काम शुरू करो" असें म्हणुन मी त्या यंत्राच्या दिशेने सरकलो. आता मी कुणाकडे पाहातही नव्हतो. सरळ त्या यंत्रावर चढलो, चालकाच्या जागेवर बसलो आणि यंत्र चालू केले. मगच वर पाहिले. भयचकित झालेले पठाण लगबगीने कामाला लागत होते. तो पर्यंत मी त्या यंत्राच्या आवश्यक त्या कळा दाबून ते मला नीट चालावता येते की नाही याची खातरजमा करून घेतली. त्या सायंकाळी अस्ताचलाला जाणाऱ्या सूर्याने तोपर्यंत बिनबोभाट काम झालेले पाहिले.
काम संपवून लेबरकँपवर जाण्यासाठी गाडीवर चढण्यापूर्वी तो उग्र पठाण पुन्हा माझ्यासमोर ठाकला आणि म्हणाला,
"याद रक्खो, तुम पठानका बच्चाका चालीन किया. कल देखेगा. तुम क्या साबूत रहेगा और क्या काम करेगा. खुदा हाफीज़ !"
पण मी इतका थकलो होतो की तो नक्की काय म्हणाला त्याचे आकलन होण्या पलिकडे गेलो होतो.

ते मला उद्या कळणार होते. ' चालीन ' म्हणजे काय तेंही समजणार होते.

क्रमश:
--------------------------------------------
तो पठाण जे कांही काल म्हणाला होता त्यात एक ’ साबूत ’ असा शब्द होता त्याचा अर्थ मात्र सकाळी माझ्या चांगलाच लक्षात आला. साबूत म्हणजे शाबूत असें असावे. आज मी खरोखरच शाबूत नव्हतो. काल दिवसभर भर उन्हांत धावपळ केली त्याचा जबरदस्त शीण आलेला होता. अंगात थोडी कणकण तर होतीच पण माझे दोन्ही खांदे, दंड,बाहू आणि मान-पाठ कमालीची ठणकत होती. ते अवजड वाहन चालविण्याचा सराव असण्याचे कांही कारण नव्हते त्यामुळे पहिल्यांदाच जोर-बैठका काढणाऱ्याची जशी व्हावी तशी अवस्था झाली होती. चेराही उन्हाने किंचित रापला होत हे आरसा सांगत होता. मी न्याहरी बरोबर दोन वेदना शामक गोळ्या घेतल्या अन् कामावर गेलो. पांच मिनिटे उशीरच झाला होता.

पठाणांचा जथ्था माझ्या स्वागताला उभाच होता. तो कालचा पठाण सामोरा आलाच." कैफ हालुक मुदीर ?" चेह-यावर एक प्रकारचे छ्द्मी हास्य ठेवीत त्याने विचारले." झैन ! अल हमदुल्लिलाह " मी कोणताही कडवटपणा न ठेवता म्हणालो."वल्लाह ! अस्सलाम-व-आलेकुम !" तो. त्याचा संस्कार जागा झाला असावा.

" व-आलेकुम अस्सलाम. लेकिन तुम अपना नाम नही बोला !" या माझ्या वाक्यासरशी
" हम कादर खान ! " तो उत्तरला. त्याच्या चेहऱ्यावर एक दिलखुलास हास्य पसरलेले दिसले. कालच्यापेक्षा आजचा दिवस कमी कटकटीचा असावा याची ती नांदी आहे की काय असे मला वाटून गेले. मी संभाषण पुढे चालू ठेवले.
'' कादरखान, कल हमने पाठानका बच्चाको चालीन किया ऐसा तुम बोला. वो चालीन का मतलब ?''
''चालीन का मतलब.....मतलब....'' तोही घुटमळलाच. मग मलाच सुचलं;
''चॅलेंज ??''
''वल्लाह ! दुरुस्त. एकदम दुरुस्त.'' त्याच्या या उत्तरासरशी कांही पठाण एकाएकी
फेर धरून नाचू लागले. मला एक शब्दही न कळणाऱ्या भाषेत गाऊ लागले.
एका एकी हे काय चालले आहे? मी हबकूनच गेलो.
हा काय प्रकार आहे, मी नुरूलला विचारले. तो हसत सांगू लागला, कादरखान मला धडा शिकवण्याचा चंग बांधून आला होता. सुरुवातच तो मारामारीने करणार होता. पण देव दयेने ती वेळ आली नव्हती. सुरुवात छान संवादाने झाली होती आणि कादरखान निवळला होता. राक्षसातील माणूस जागा झाला होता. मारामारी झाली तर ती कांही जणांना नको होती. ती झालेलीही नव्हती. त्यामुळे तो गट आता सुखावला होता. अशा वेळी आनंदाने गाण्याची, नाचण्याची त्यांची ती प्रथा होती.

मी अनेक प्रकारच्या माणसांत वावरलो. अनेक चित्रविचित्र अनुभव घेत गेलो. त्यांत ही आणखी एक भर. या माणसांना मी गुलामा सारखे वागवावे असा मला सल्ला देण्यात आला होता. तसेंच वागावे लागते की काय अशी परिस्थितीही समोर आली. पण कुठे तरी आंत, माणसाला माणूस म्हणूनच वागवले पाहिजे अशी शिकवण होती. म्हणून मला माणसांबद्धल कणव होती. किंवा मला या पठाणांची दहशत वाटत होती. म्हणून मी सामाचा मार्ग चालू पाहात होतो. एक मात्र निश्चित होते. ते म्हणजे माझ्यावर सोपविलेले काम मला व्यवस्थित झालेले पहायचे होते. मला दिलेले काम मी नीट करू शकलो नाही असे यापूर्वी कधी झालेले नव्हते आणि आताही तसें व्हायला नको होते.

साईटवर कामाची सुरुवात झाली होती. केबलच्या यंत्रावर स्वत: कादरखान बसला होता.
याचे मला आश्चर्य वाटले नाही. मी तिथे येण्याच्या आधी फार पूर्वीपासून काम चालू होते. कादरखानच काय पण आणखीही चार सहा जणांना ती सगळीच्या सगळी यंत्रे चालवता येत असणारच.
’अथा तो ब्रह्मजिद्न्यासा’ हे काय फक्त हिन्दुस्थानीच म्हणू शकतात काय?
प्रत्येक काम मला आलेच पाहिजे हा अट्टाहास करणारा मी काय एकटाच असूं शकतो काय?

मी केबीनमधे जाऊन किती काम झाले, किती बाकी आहे याची उजळणी करून घेतली आणि सरळ कादरखान जवळ जाऊन बसलो. आजवर कोणी अधिकारी असा काम करणाऱ्याजवळ बसला नसावा. तो आधी थोडा संकोचला पण नंतर सैलावला. मग
'' यल्ला! यल्ला !! रफिक. यल्ला, जल्दी, जल्दी !'' असे इतर कामगारांवर ओरडून
कामाला चेव आणू लागला. माझ्याशी गप्पा मारू लागला. मी मोईनची कांहीच खबरबात घेतलेली नव्हती. पण त्याने घेतलेली होती. सांगू लागला तो त्याचा सावत्र भाऊ होता. त्याने काल नाटक केले होते. पण त्याला खरेंच पोटदुखीचा त्रास होता. दवाखान्यात जाण्याची परवानगी अनेकदां मागितली होती पण दिली गेलेली नव्हती. पठाण माणूस म्हणून वागवले जात नव्हते आणि म्हणून ते माणसांसारखे वागत नव्हते. हे दुष्टचक्र संपणार की नाही, हा त्याचा प्रश्न होता.

हे असे सुखेनेव चालले काम साधारण चाललेले काम पुन्हा अचानक थांबले तेंव्हा
जेवण्याच्या सुटीला जेमतेम एक तासच उरला होता. कालही काम याच वेळी बंद झाले होते. हा काय प्रकार आहे. यंत्र बंद करून मी आणि कादर खाली उतरून पहातो तो,
दूरवर, बुलडोझरपाशी पठाणांच्या दोन गटांत तुंबळ मारामारी लागलेली. एकाने दुसऱ्याची कांही खोडी काढली होती आणि मस्करीची कुस्करी झाली होती. प्रकरण नुसतेच हातघाई वर आलेले नव्हते तर दोन चार जण चांगले रक्तबंबाळ झाले होते.
मला आता मात्र वैताग आला. उद्वेगाने मी केबीनकडे कूच केले आणि हे असें याच वेळेला कां होते याच विचार करू लागलो.

कदाचित या वेळेला ऊन इतके तापते त्या मुळे माणसे प्रक्षोभक होत असावीत. कामाची वेळ थोडी बदलता येइल कां? सकाळी सहा वाजता काम सुरु केले तर कांही फायदा होईल का? मी कामाचा आंखणी-आलेख आणि झालेले काम पडताळून पाहिले. कामाच्या वेगात थोडी सुधारणा होती पण एकुणात काम मागेच होते. मी मुख्यालयाशी बोललो. पण कामाच्या वेळेत बदल करण्याची परवानगी मिळाली नाही.

दरम्यान कामगार जेवणाची सुटी संपवून परत कामावर आलेले होते. मी नुरुलखानला, त्याच्या जागी आणि कादरखानच्या जागी दुसरी माणसे लावून, आणखी दोन शहाणी माणसे घेऊन केबीनमध्ये येण्यास सांगितले. थोड्याच वेळात खरोखर चार डोकी केबीनमध्ये हजर झाली. जणू मी एक लहानशी बैठक घेत होतो.

सगळ्यात आधी मी त्यांचे काम छान चालले आहे, मला कांही तक्रार नाही असे
सांगून एकूण कामाची व्याप्ती, झालेले काम आणि राहिलेले काम याची माहिती दिली. उरलेले काम किती दिवसांत पूर्ण व्हायला पाहिजे हेही विषद केले आणि काय करता येईल या बाबत त्यांचेपाशी कांही सूचना असतील तर त्या द्याव्यात अशी विनंती केली. हा सारा प्रकार त्यांना नवीन होता. योजना प्रक्रियेत त्यांच्या सारख्या मजूरांनाही सहभागी करण्यात येत आहे याचे त्यांना नवल वाटत होते आणि कौतुकही.
कांही मिनिटे त्यांनी खालच्या आवाजात पुश्तुमधे कांही चर्चा केली ती मला समजली नाही. मात्र सरते शेवटी कादरखान म्हणाला,
"इन्शा अल्लाह, एक तरकीब हो सकती है. लेकीन हम सोचेगा. कबिलाके साथ बात करेगा. कल बताएगा. झैन ?''
मी म्हणालो
"झैन !" चालेल.
नियोजन प्रक्रियेत कामगार प्रतिनीधींना सहभागी करून घेण्याचा हा माझा मार्ग मला पुरोगामी वाटला तरी त्याचे परिणाम काय होतील याचा तो पर्यंत तरी मी नीट विचार केलेला नव्हता.

आता कादरखान उद्या काय ’तरकीब’ सुचवतो ते पहायचे होते.

ते मला उद्या कळणार होते.
------------------------------------------------------------------------
कुणाचाही सल्ला, कुणाचीही परवानगी न घेता मी एक नवा प्रयोग करूं पहात होतो. यशस्वी झालो तर प्रशंसा होईलच याची शाश्वती नव्हती. नव्हे तशी शक्यताही क्षीणच होती. मात्र अपयशी ठरलो तर मात्र धडगत नव्ह्ती. कदाचित परत मायदेशी धाडला जाण्याचीच शक्यता अधिक. कारण प्रस्थापित कार्यप्रणाली बदलण्याचे धाडस ज्यांनी पूर्वी केले त्यांची गत काय झाली होती हे मला माहित होते. पण वांडपणा करण्याची खोड जन्मजात होती त्याला मी तरी काय करणार.

त्यानंतरच्या सकाळी मी कामावर दाखल झालो तेंव्हा ही अशी चलबिचल, काहूर मनांत घेऊनच. कादरखान मनात काहीं तरकीब घेऊन आला होता हे मला त्याच्या उजळलेल्या चर्येवरून दिसत होते. पण मात्र चर्चेसाठींसुद्धा एक मिनिटही वाया घालवण्याची माझी तयारी नव्हती. सर्वांना मी आधी कामाला लागण्याचा आदेश दिला. कादरखान तेवढ्यातही मला कांही सांगू पहात होता. पण मी त्याला ’शुई सबर’ (जरा थांब) असा इशारा दिला. सगळ्या जथ्थ्यामधे ती चर्चा झालीही असावी. कारण उत्सुकतेची अस्फुट रेषा मला जवळ जवळ प्रत्येकाच्या चेह-यावर दिसत होती. मी पण मी कामाचाच 'यल्गार' केला आणि सारे बिनबोभाट कामाला लागलेही. आज मी या टोकापासून त्या टोकापर्यंत पळापळ करून कामावर देखरेख करणे पसंत केले. आज कुणी कालच्यासारखी गडबड करू धजावला तर त्याला वेळीच खीळ घालण्याचा माझा अंतस्थ हेतू होता. ठीक अकरा वाजतां (बरोबर जेवणाच्या एक तास आधी)मी काम बंद करण्याचा इशारा दिला. सारा जथ्था अचंभ्यात आणि मी, तोपर्यंत एकही मिनिट वाया न घालवता, जितके काम व्हायला हवे होते ते झालेले आहे या समाधानात!

कांही कामगार इकडे तिकडे पांगले. मात्र कादरखान, नुरुलखान आणि आणखी साताठ जण घोळका करून, दबक्या आवाजात चर्चा करीत उभे. त्यांना केबीनकडे येण्याचा इशारा देऊन मीही केबीन कडे वळालो. कालचे चार आणि आज अधिक दोघेजण असे सहाजण केबीनमधे आले. सर्व प्रथम मी शीत्कपाटातून एक पाण्याची बाटली काढून त्यांच्या रोखाने भिरकावली आणि दुसरी घेऊन मी खुर्चीत बसलो. माझी आणि सगळ्यांचे पाणी पिऊन झाल्यावर,
'' हां, बोलो खान '' म्हणत मी सुरुवात केली.
'' साब, धूपका बहोत तकलीफ. एक तरकीब ये के सुबह येक घंटा जल्दी छूटेगा. जो (जैसे) आज छूटा.. और शामको येक घंटा जियादा काम कुबूल.''
म्हणजे उन्हाचा त्रास होतो हा माझा अंदाज बरोबर होता.
'' लेकिन खान, ये नामुमकीन. मुदीर नही मानेगा. मकतब (मुख्यालय) नही मनेगा.''
'' तो फिर येक बाकल कम करो '' बाकल म्हणजे (ब्लॉक) सीमेंटच्या विटा.
'' मतलब? हम समझा नही !''
'' साब, जमीं कुल्लुश सखत. नीचे बाकल लाज़मी नही''

जमीन कडक असल्याने केबल खालील विटांची गरज नाही. असं त्याला म्हणायचं होतं. बरोबर आहे. ते काम कमी झालं तर वेळ वाचणार होता आणि एकूण कामाची गती वाढण्यासारखी होती. पण हा निर्णय मी कसा घेणार ? कामाची प्रमाणें (स्पेसीफिकेशन्स) बदलणे माझ्या अधिकारांत येत नव्हते. मी म्हणालो,
'' खान, येभी नामुमकीन. तुमको मालूम, ये सब गोरा (ब्रिटिश डिझायनर) मख्ररूर किया. हम के करेगा.''
'' साब ये सब पहले नही होता. रब्बानी चालु किया. ''
'' लेकिन ये सब यूं नही हो सकता. कागज़, फतुरा देखना होगा. हम दरख्हास्त करेगा. लेकिन तबतक तुम्हारा पहला तरकीब हो सकता.''
'' तो करो. हम तैयार. '' 'तो करो' म्हणण्याची त्याची लकब माजेशीर होती.
'' लेकिन मुदीरके साथ बात करना लाज़मीं है.''
'' तो करो.''
ते सगळे जेवणासाठी लेबरकॅंपकडे रवाना झाले. विटांचा तळाचा एक थर गाळणे हा उपाय मंजूर होण्या सारखा नव्हताच. कामाच्या वेळा बदलणे याचा विचार करणे शक्य होते. पण मुख्यालयाच्या गळी ही गोष्ट उतरवायची तर समक्ष जाणे गरजेचे होते. फोनवर बोलणे औधत्त्याचे मानले जाण्याची शक्यताच अधिक. मी मुख्यालयाला फोन करून अडचणीची त्रोटक कल्पना दिली आणि भेटीची वेळ मागितली. ते लगेच या म्हणाले. एव्हाना दोन वाजले होते. तीन वाजतां पठाण परत कामावर येणार आणि मी जागेवर नाही हे पाहून मौज मस्तीच करणार. कारण मी तीनच्या आंत परत येणे शक्यच नव्हते.
क्षणभर विचार केला, गाडी काढली आणि सरळ लेबरकँप गाठला. मी तिथे पोहचलो तों पठाण गाडीत (ट्रक) चढतच होते. मला पाहिल्याबरोबर जे खाली होते त्यांनी माझ्याभोवती कोंडाळे केले. हा बाबा असा इथे कसा उपटला याचे नवल प्रत्येकाच्या चेह-यावर दिसत होते. कादरखान गाडीजवळ आलाच. मी मुख्यालयाशी बोलून परत येत आहे तोपर्यंत काम चालूच राहिले पाहिजे; ती जबाबदारी त्याची. असे बजाऊन मी मुख्यालयाकडे मोहरा वळवला. मुख्यालयात सर्वप्रथम मी साईट सोडून आलो त्याबद्धल खरडपट्टी झाली.

माझ्या आखातातील वास्तव्यात मी एक गोष्ट प्रकर्षाने पाहिली होती. अधिकारी सहसा ब्रिटिश असत आणि आम्हां भारतीयांना झापायची, तासायची एकही संधी ते सोडीत नसत. मग कर्तृत्वाच्या नावाने ते स्वत: शून्य कां असेनात. हे देश एकेकाळी त्यांच्या वसाहतीत, त्यांच्या अधिपत्त्याखाली होते. पुढे इतका अवाढव्य व्याप सांभाळणे अशक्य झाले आणि भारतापाठोपाठ बहुतेक वसाहतीत स्वतंत्र्याचे वारे वाहू लागले. त्यामुळे या देशांना स्वायत्तता द्यावीच लागली. तरी पराभवाचा तो सल प्रत्येक गोरा मनांत ठेऊन असे. भारतीयांनी प्रत्येक क्षेत्रात आपले प्रभुत्व दाखवले होत. सिद्ध केले होते म्हणून ते जरा वचकून होते. पण एखादा कमकुवत दुवा दिसला की ते ’ब्लडी इंडियन, ब्लडी निग्गर्स’ म्हणून हेटाळणी करण्यात भूषण मानीत.

मुख्यालयातील चर्चा असफलच झाली. स्पेसीफिकेशनमधे तळाचा विटांचा थर पूर्वी नव्हता पण रब्बानीने, केबलला मातीत खाली झोळ (सॅग) अशी भलतीच भीती घालून ती सुधारणा आमलांत आणून शेखी मिरवलेली होती. हे तो स्टीव्ह मेकॅन्झी नावाचा गोरा मान्य करत होता पण मला पूर्ववत बदल करूं द्यायला तयार नव्हता. कामाच्या वेळेत बदल करण्याची मुभाही नाकारण्यात आली.उलट काम वेळेत पूर्ण झाले नाही तर गंभीर परिणाम होतील अशी धमकी दिली गेली. निराश मनाने मी साईटवर परतलो. वाटेत साईटवर तरी काय उजेड (!) पडला असेल या चिंतेत होतो.

साईटवर पोहोचतो आणि पाहातो तो काय !

क्रमशः
साईटवर पोहोचलो आणि पाहातो तो काय !
-------------------------------------
तसा काम संपायला अजून अर्धा तास बाकी होता. कामगार कामाच्या जागेवर होते. सकाळच्या मानाने काम बरेच पुढे सरकलेलेही दिसत होते. पण जेथपर्यंत काम सरकलेले होते त्या टोकापाशी कामगारांचा घोळका एकत्र जमा झालेला होता. काय असावे म्हणून मी माझी गाडी तशीच पुढे त्या ठिकाणा पाशी नेली आणि खाली उतरलो. खोदलेलेल्या चराच्या टोकाला खोदणी यंत्र स्तब्ध उभे. त्याच्या अलिकडे चराच्या दोन्ही तीरावर पठाणांचा घोळका विभागून उभा आणि त्यांची आपसांत काही तरी चर्चा चाललेली. मी पुढे झालो त्यासरशी कांही पठाण मला वाट करून देत बाजूला सरकले. खोदलेल्या चराच्या तळाकडें निर्देश करत त्यानी जें कांही दाखविले ते भयचकित करणारे होते. तिथे एक तुटलेला आणि विस्कळित अवस्थेतला मानवी हाडांचा सांपळा विखरून पडलेला होता. हाडांवरचे मांस जवळ जवळ झडून गेलेले. खोदकामाच्या यंत्राच्या फाळाला लागून ते अवशेष जरासे वर आलेले.ज्यांची संभावना एरवी राक्षस म्हणून व्हायची ते सारे पठाण म्लान मुद्रेने उभे.

मी आधी सगळ्यांना जरा दूर् एका जागी व्हायला सांगितले. एकजण काय़ झाले ते मला विषद करण्यासाठी जरासा पुढे सरकला. मी त्याला हाताच्या इशा़ऱ्यानेच थांबवले. सूर्य मावळतीला अजून बराच वर होता. सेनापती सैन्याच्या तुकडीला सुचना देण्यासाठी जसा संमुख होतो तसा मी त्यांच्या समोर सूचना वजा भाषण देण्यासाठी उभा राहिलो.

" दोस्तो, एक अज़ीबो-गरीब हकीकत सामने आयी है. कोई तूफान परश्त इन्सानकी ज़मीनमें गढी हुई लाश या लाशके हिस्से हम देख रहे है. ऐसे रेगिस्तानमें ऐसा हादसा कोई नयी बात नही है. जो हालात, इन्शाल्ला, सामने आये है, उसको वाज़िब अंजाम दें ये हमारा फर्ज़ ....." माझे बोलणे मध्येच तोडत एक पठाण ओरडला,

" लेकिन हम क्युं मुरदाफरोशी करे ? क्या पता कौनसी कौमका है बदनसीब. क्या अंजाम देगा इसको. और ये काम हमारा नही. तुम शुरताको (पोलीस) खबर करो. "

मी भानावर आलो. देवाशपथ, त्या पठाणानाने मला एका नव्या संकटातून वाचवले होते. मी भलअत्याच् उत्साहात त्या अवशेषांचे दफन किंवा अन्य कांही वासलात लावण्याच्या विचारात होतो. कायदेशीर बाबीचा मला विसर कसा पडला याचे माझे मलाच आश्चर्य वाटू लागले. तो पर्यंत सुटीची वेळही झाली होती. पठाण आपसुक त्यांना नेणा-या गाडीकडे परतले आणि मी माझ्या केबीनकडे. मात्र कादरखान आणि नुरुलखानला मी मागे ठेऊन धेतले. पोलिसांना खबर करण्यासाठी मी रेडिओ फोन सुरु करणार इतक्यात कादरखानने भिवया उंचावत पृच्छा केली,

" शुरताको फुन करेगा ?" मी प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहिले.
".........."
" लॅ. मकतबको (मुख्यालयाला) इतिल्ला करो "

अरे, किती खरं होतं ते. कां मी इतका भांबावलो होतो ? की अशा मूलभूत चुका होताहेत हे ध्यानातच आलं नव्हतं? किती खरं होतं कादरखानचं बोलणं. मी कोण पोलिसाना खबर देणारा ? ती जबाबदारी माझी नक्कीच नव्हती. ही साईट, ही जागा कंपनीच्या अखत्यारीतली होती. या जागेच्या आवारात अशी कांही घटना झाली तर कायदेशीर बाबींची पूर्तता करणे ही कंपनीची जबाबदारी होती. माझी नव्हे. किती योग्य सल्ला दिला होता त्याने. आणि आम्ही या लोकांना अडाणी समजत होतो. सारासार विचार करण्याची पात्रता आणि सुयोग्य निर्णय घेण्याची क्षमता काय केवळ पुस्तकी शिक्षणानेच येते कां! कादरखानचा सल्ला मला मनोमन पटला. मी मुख्यालयाला फोन लावला. आज जुम्मेरात (गुरुवार), उद्या शुक्रवारची साप्ताहिक सुटी, त्यातून आता संध्याकाळ म्हणजे मुख्यालयात कुणी असेल की नाही शंकाच होती. तरीही अगदी योग्य माणूस फोनवर मिळाला. तो म्हणजे कंपनीचे सर्व विधी-व्यवहार (लीगल मॅटर्स) सांभाळणारा अधिकारी, हुसैनी! हुसैनी पूर्वी पोलिसातच होता. त्याला झालेली घटना सांगितली. तो म्हणाला निश्चिंतपणे घरी जा मी उद्या पहातो काय ते. माझा जीव भांड्यात पडला. कादरखान जर तेंव्हा तिथे नसता तर मी भलतीच बिलामत अंगावर घेतली असती हे नक्की.
माझे आणि हुसैनीचे झालेले बोलणे मी कादरखानला सांगितले तेंव्हा त्याच्याही चेह-यावर समाधान दिसले. हा एक विषय मार्गी लागला तसा त्याने मुख्यालयात काय झाले याची विचारणा केलीच. मी जे झाले ते सांगताच तो म्हणाला,
" मा फिकर. कुच सोचेगा. परसो बताएगा "
" क्या करेगा खान? काम तो होना दूर यहाँ मुसीबतेंही खडी हो रही है"
" तो क्या मायूस बैठेगा? खान कुच ना कुच करेगा. चलो बेत रो (घरी चला)"

एव्हाना चांगलं अंधारून आलेलं होतं. मी दोन्ही खान माझ्या गाडीत घेऊन शहराकडे निघलो. त्यांना कामगार-तळावर (लेबर कॅंप) सोडून घरी जाणार होतो. पण त्यांना सोडल्यावर खान जाऊ देई ना. थोडा पहुणचार घ्या. निदान सरबत तरी घ्या म्हणून हटून बसला. म्हणाला,

"वै (अहो) पठानका मेहमान लाखिदमत (पाहुणचार न घेता) जा नहीं सकता. जाएगा तो बिरादरी हमपर थूकेगा "

मी थक्क झालो. आणि आम्ही यांना जंगली, राक्षस समजत होतो. त्यांनाही संस्कृती असू शकते आणि तिचा त्यांना अभिमानही असूं शकतो याचा आम्ही कधी विचारही केला नव्हता. माणसाला माणूस म्हणूनच वागवले पाहिजे अशी शिकवण होती, म्हणून मला माणसांबद्धल कणव होती की मला या पठाणांची दहशत वाटत होती. म्हणून मी सामाचा मार्ग चालू पाहात होतो. ही माणसे अडाणी आहेत हे दिसत होतेच. अफगाणीस्तानातील युद्धांमुळे, तालीबानी चळवळीची सुरुवात असली तरी, त्यांनी केलेली नासधूस, जनतेची झालेली ससेहोलपट मी टीव्हीवर, डॉक्युमेंटरीतून पाहिली होती. मुळात हा समाज मूलतत्ववादी, कर्मठ असला तरी ही माणसे बदलत्या, पुढारलेल्या जगाबरोबर कां चालत नाहीत? त्यांनाच इच्छा नाही की सत्तेवरील राजवट अशा सुधारणा घडूच देत नाही? या माणसांना असे रासवट वागण्यातच मौज वाटते की काय? ही खरीच राक्षसें आहेत कां? या माझ्या चिंतनाला इथे छेद जात होता. मी सरबत घेण्याचे मान्य केले तेंव्हा त्यांना झालेला आनंद पाहिला तो मी कधीच विसरू शकणार नव्हतो.
सरबत घेऊन झाले तर खान जेवून जा म्हणून आग्रह करू लागला. त्याला मात्र मी शक्य तितक्या नम्रपणे नकार दिला. खरी भीती निराळीच होती. मी शाकाहारी माणूस. ते मांसाहारा शिवाय दुसरं काही खात नाही असं ऐकलेलं. पण खानानं माझ्या मनांतली ती भीतीही हेरली असावी.म्हणाला,
" कोई बात नहीं हुजूर. कलकी दावत कुबूल करो. साग-खबूस (भाजी-भाकरी) खिलाएगा. कल जुम्मा. शामको तुम्हारा इंतजार रहेगा."

तिथून सुटका झाली याचंच हायसं वाटून घेत मी गाडी सुरूं केली. खरंच मी उद्या त्यांच्याकडे जेवायला जाणार होतो कां?

क्रमशः
तिथून सुटका झाली याचंच हायसं वाटून घेत मी गाडी सुरूं केली. खरंच मी उद्या त्यांच्याकडे जेवायला जाणार होतो कां?--------------------------------------------------------

शुक्रवार उजाडला.

जाग आली तेंव्हा सकाळचे आठ वाजत आले होते.पण खिडकी बाहेर, माध्यान्ही असांवे तसें लख्ख ऊन पडलेले. सुटीच दिवस म्हणायचा पण दैनिक कामांप्रमाणे साप्ताहिक कामे करावी लागत ती वाट पाहात होती. आस्थापनेकडून निवासा साठीं दोघांत मिळून एक अशी सदनिका दिली गेली होती. प्रत्येकी एक स्वतंत्र स्वयंपूर्ण शयनखोली, अभ्यागत कक्ष आणि भटारखाना मात्र सामाईक. माझा सहनिवासी एक केरळी होता. माझे त्याच्याशी कधी पटलें नाही. जरा सणकीच होती वल्ली. सुटीच्या दिवशी भल्या सकाळी स्वारी त्याच्या इतर ज्ञातीबांधवांकडे निघून जायची, ती रात्री उशीराच परतायची. त्यामुळे घरी मी एकटाच. साप्ताहिक कामें म्हणजे निर्वातक-झाडूने घर साफ करणे, आठवडाभ्रर मळवलेले कपडे धुलईयंत्रातून खंगाळून काढणे मग न्याहरी आणि त्यानंतर निवांत अंघोळ. पण आज झडझडून कामाला लागावे असें वाटत नव्हते.

पठाणांचे सेनापतित्व स्वीकरल्यापासून झालेल्या शारिरीक आणि मानसिक श्रमाने गळाठा आल्यासारखे झाले होते. पण दूरध्वनीची घंटा घणघणली तसा पांघरूण भिरकावत उठावेच लागले. कोण तडमडला आता, म्हणत फोन घेतला तर दोनच शब्द ऐकायला आलेले. " येऊ कां? " लहान पणी आजीकडून भुताच्या गोष्टी ऐकतांना त्यातले एखादे भूत असेंच विचारायचे. त्यावेळी आजी खर्जातला असा कांही आवाज काढायची की काळजाचा एक ठोका चुकलाच म्हणून समजा. हा आवाजही तसाच होता. पण टरकी बिरकी वाटण्यातला नव्हता. उलट आज तरी वैतागायला लावणारा होता. " ये " म्हणण्याखेरीज गत्यंतर नव्हते. तो आवाज वश्या डोंगर-याचा होता.

लौकिकात या आसामीला वसंत गडकरी असें नामाभिमान होते. तो एकटाच येणार नव्हता सगळी ’परदेशस्थ सडेफटिंग युनियन’ माझ्याकडे धुडगूस घालायला येणार होती. वश्या त्या युनियनचा आद्य प्रवर्तक होता. त्याचं काय झालं की मी नवीनच जेंव्हा या देशांत आलो तेंव्हा फार हुरहुरल्यासारखं (होमसिक) झालं होतं. जागा, वातावरण, माणसे सगळंच नवीन. मुलांची, पत्नीची, घराची आठवण सतत मनांत जागती असायची. कुठून ही परदेशी येण्याचे अवदसा आठवली असं वाटत रहायचं. एकतरी मराठी माणूस बोलाचालायला मिळावा असं वाटायला लागलं. मी जरा तशी चौकशी केली तर एका केरळ्याने एका नॅशनल हॉटेल नावाच्या जागेचा पत्ता दिला.

परदेशस्थ भारतीयांचे एकमेकांची भेंट घेण्याची ते एक मेलनस्थळ (त्या केरळ्याच्या शब्दांत ’रान्देवू’) होते. एका शुक्रवारी मी अधिरतेने तिथे गेलो तर, एका रस्त्याला दोन फांटे फुटून इंग्रजी वाय आकारात झालेल्या रस्त्यांच्या बेचकीत एक टपरीवजा हॉटेल आणि त्याच्या बाहेर अनेक माणसें घोलक्या घोळक्याने गप्पा छाटीत उभी असलेली. मी जत्रेत चुकलेल्या माणसासारखा उगीचच इकडून तिकडे भटकू लागलो. इतक्यात, " काय मुंबईकर कधी आल्ले कतारले ?’ असा एक घणाघाती वैदर्भीय आवाज कानावर आदळला. आवाजाचा उगम, सदरा-तुमानीत बळेंच कोंबून बसवलेली असावी अशी एक देहयष्टी होती. मी मुंबईकर आहे हे या सदगृहस्थाला कसे कळाले असावे हा प्रश्न मला पडला पण भांबावण्या पलिकडे माझी दुसरी कोणतीही अवस्था होणे शक्य नव्हते. आणि मग ’ या इकडे ’ म्हणत त्या इसमाने माझा हातच धरला आणि एका घोळक्याकडे घेऊन गेला.

जवळपास माझ्याच वयाचे सहा सात तरूण गप्पा मारीत उभे होते. आम्ही जवळ जातांच एकाने विचारले, " काय गडकरी, पाहुणे कोण ?" " जांवय शोधायले आल्ले. पोट्टीये थ्यांची लग्नाची, करतोस ?" आणि त्यापाठोपाठ एक हास्यक्ल्लोळ. (इथे मला पुलंच्या रावसाहेबांसारखं ’हांग अस्सं’ असं ओरडावसं वाटलं) आपली नाडी, गण, गोत्र, प्रवर इथे बरोबर जुळणार याची खात्री झाली. पण मग विनोदाचा तास संपला आणि रितसर ओळखीचा कार्यक्रम झाला. पुढें अनेकदा नॅशनलपाशी गांठीभेटी आणि मग माझे निवासस्थान शुक्रवारी सहसा रिकामे असतें म्हणून ’अड्डा’ इथे जमायला लागला. त्यांतही त्यांनी सामग्री आणायची आणि पाकसिद्धी मी करायची असा कबुलिनामा होता. कारण त्यातले त्यांत सुगरणीचा स्वयंपाक मीच करू शकत होतो.

त्या जमावात नागपूरचा हा वश्या-वसंत गडकरी (त्याच्या आकारमानामुळे त्याला ’डोंग-या’ ही संज्ञा लाभलेली होती) होता, सोलापूरचा किशा-किशोर करपे होता, कुडाळचा पेशवा-माधव महाबळ होता, मुंबईचा श-या-शरद गांगल आणि कोण कोण होते. आता सगळी नांवे आठवतही नाहीत. पण त्या मित्र मंडळीनी मला जें कांही दिलं त्या आधारावरच मी तो तीन वर्षांचा वनवास सुखेनेव भोगला हे मात्र नक्की. एक एक करत अड्ड्याचा कोरम पूर्ण झाला. मी किती दमलो आहे ते न सांगताही कळत होते. भटारखानाचा ताबा वश्याने घेतला. वडाभात करतो म्हणाला. किशोर कोशिंबीरीच्या पाठीमागे लागला. आणि मग सगळेजण कांही ना कांही करू लागले. शरदने तर माझे कपडेसुद्धा धुतले. या सा-या करामातींच्या पार्श्वभूमीवर माझ्या गेल्या कांही दिवसांतल्या अनुभवाचं कथाकथन. अगदी थेट पठाणांच्या दावतनाम्यापर्यंत. त्यात मधून मधून त्यांची टिप्पणी चालूच. किशा तर एकदा उसळून कडाडला, " तुलाच लेका नसती कुलंगडी गळ्यात बांधून घ्यायची हौस. ही हिरोगिरी करायची काय गरज होती ? चार पाट्या टाकायच्या आणि गप पडायचं. नाही तरी तो रब्बानी का फब्बानी, काय वेगळं करीत होता !" पेशवा म्हणाला " ते जेवायला बिवायला मुळीच जायचं नाही हां, सांगून ठेवतो."शरदने तर माझ्या त्या हाडाच्या सापळ्याला मूठ माती देण्याच्या कल्पनेची कल्पनेची यथेच्च टिंगल केली. म्हणाला. " च्यामारी, या भोटमामाला (हे माझं टोपणनांव) आपण एवढं ग्रेट मानतो पण हे येडं असा कधी कधी बावळटपणा काय करतं रे. बरं झालं त्या पठाणाने याची शेंडी उपट्लीन तें !" " पेशव्या, तू काय सांगतं बे याले जेवाले जाऊ नको म्हणून? तुला काय वाटते, हा जाणार नाही? हा भोटमामा काय सांगतो बे, थे पठाण याच्या वास्ती भाकरी गिकरी करतीन म्हणून.मी सांगतो, लिहून ठेवा बाप्पाहो, हा तिथे हड्डी गिड्डी चघळाले मिळन म्हणून चाल्लाहे, लाळ गाळीत. याचा काय भरोसा नै भौ!" इति वसंतराव गडकरी.

तेंव्हा पठाणांच्या वसतीवर जेवायला जाण्याचा माझा विचार बहुमताने धिक्कारला गेला.मी माणुसकीची, विश्वबंधुत्वाची भलामण निकराने केली. पण एकही हरीचा लाल माझ्या बाजूने उभा राहीना. संध्याकाळचे चार वाजायला आले तसें हें चित्रविचित्र पक्षी आपापल्या कोटरी परतण्यास सिद्ध झाले. मात्र मी गनीमी काव्याने पठाणास फितुर होईन या आशंकेने, मशारनिल्हे वसंत गडकरी आमचे अंगरक्षक म्हणुन नेमले गेले. त्या भोजनाला जाण्या पूर्वी मला एक काम करावयाचे होते. त्याची वाच्यता मी अद्याप केलेली नव्हती. ती केली असती तर या माझ्या मित्रमंडळींनी मला खाटेला बांधूनच ठेवले असते. ते काम म्हणजे सरकारी रुग्णालयात जाऊन आजारी मोईनखानचा समाचार घेणे. त्यालाही वसंतरावांनी कडाडून विरोध केलाच. पण अखेर तयार झाला.

कतारमधे त्यापूर्वी खाजगी वैद्यकांना वैद्यकी करण्याची मुभा होती. पण तिथे राजेशाही होती आणि राजेशाहीचा एवंगुण विशेष लहरीपणा याला अपवाद नव्हता. आले राजाजीच्या मना तेथें कुणाचे चालेना, असा खाक्या तिथेही होताच. कोणत्याही गोष्टीला मज्जाव करावयचा झाला, तर एक फतवा काढला की झाले! एके काळी भारतीयांना वाहन चालवण्य़ाचा परवाना, त्यांचा भारतीय वाहन चालवण्याचा परवाना ग्राह्य मानून लगोलग दिला जात असें. पण असाच एक फतवा निघाला आणि भारतीयांना तेथील शासकीय संस्थेतून एक महिना वाहन चालविण्याचे शिक्षण घेणे अनिवार्य केले गेले. खाजगी वैद्यक असेंच एका फतव्यानिशी बरखास्त केले गेले. इतकेच नव्हे तर भारतीय भिषग्वर्यांना केवळ अठ्ठेचाळीस तासांची मुद्त देऊन हद्दपार करण्यात आले. त्यामुळे शासकीय रुग्णालयाला पर्याय नव्हता.

मोईनखान ज्या रुग्णालयात दाखल केला होता तेथील अवस्था शासकीय रुग्णालयात जशी असावी तशीच होती. ब्रिटीशांच्या प्रभावाने बाहेरील जग झकपक झाले होते. कारण ते मूळ, प्रथमश्रेणी देशवासियांच्या उपभोगासाठी होते. त्यांचे एवढेसें दुखले खुपले तर सरळ विमानांत बसून भारत गांठणे त्यांना शक्य होते. मुंबईला पंचतारांकित रुग्णालयात मोठ्या मिजाशीने उपचार घेणारे अरब आम्ही पहात होतोच. द्वितीय, तृतीय श्रेणी आणि विशेषत: अनिवासी परदेशियांसाठी अशी शासकीय रुग्णालये निर्माण केली गेली हेंच पुरेसे होते. येमेन, युगांडा, झिम्ब्वाब्वे, आर्मेनिया, अशा देशांतुन आयात केलेले सुमार अकलेचे नीम-हकीम असे वैद्य (डॉक्टर्स) आणि अत्यंत अल्प वेतनावर काम करावयास तयार झालेले केरळी, फिलिपिनी परिचारक आणि परिचारिका. तेथे बरें होऊन घरी सुखरूप गेलेल्या रुग्णांपेक्षा, एखाद्या सांसर्गिक रोगाचा शिक्का मारून हद्दपार (डी-पोर्ट) केले गेलेल्या रुग्णांचेच दाखले अधिक. काविळीचा किंवा पीतज्वराचा शिक्का बसला तर मग विचारायलाच नको. आपल्याकडे कुष्ठरोग्याच्या वाटेला येणारी निर्भत्सना कितीतरी सौम्य वाटवी अशी निर्भत्सना तशा रुग्णांच्या वाट्याला येई. पन मोईनखानला उपचार देणारा वैद्य गोव्याचा होता. डेरिक अलेमाव त्याचे नांव होते. फतव्या नंतर या गृहस्थाने नाईलाजाने सरकारी नौकरीचा पर्याय स्वीकारला होता.

मोईनखानला घरीच घेऊन जा असा त्याने आग्रह धरला.नाही तर तोही हद्दपार केला गेला असता. नाईलाजाने मी तो मान्य केला. वसंताला आधी हें सारे अजिबात आवडले नव्हते. मी अजूनही कांही तरी अगोचरपणा करतो आहे अशीच त्याची धारणा होती. पण मोइनखानची असहाय्य अवस्था पाहून तोही द्रवला. खानाला घेउन मी वसंतासह वर्तमान पठाण वसाहतीवर दाखल झालो तेंव्हा मोईनखानला माझ्यासोबत पाहून त्यांनी जो जल्लोष केला तो पाहून वसंता सर्दच झाला. त्या आसंमंतातून शिजू घातलेल्या खाद्यपदार्थाचा दरवळ येत होता. पठाणी सहभोजनासाठी आता वसंताही मजबरोबर थांबणार होता.क्रमश:


पठाणी सहभोजनासाठी आता वसंताही मजबरोबर थांबणार होता.
------------------------------------------------------------------

पठाणांच्या वस्तीवर पोहोचलो तेंव्हा अंधारून यायला सुरुवात झाली होती. एका
मोठ्या भूखंडावर चहूबाजूंनी सुमारे बारा फूट उंचीची वीटकामाची तटबंदी, मधोमध
एक भलामोठा दिंडी दरवाजा आणि आंत अत्यंत ओबडधोबड अशा बराकी. अशी
एकूण त्या वसाहतीची रचना. भारतांतील कोणत्याही शहरांतील कारावासाची आठवण व्हावी अशी. माणसांच्या जेमतेम मूलभूत गरजा पुऱ्या व्हाव्यात इतपतच केली गेलेली सोय. काल इथे आलो होतो तेंव्हा दिंडीदरवाजा खुला होता. आज मात्र बंद होता. अर्थात गाडी आज बाहेरच ठेवावी लागली. दिंडीतून वाकून मी आंत दाखल झालो तसा वश्या बाहेर घुटमळतच राहिला. त्याच्या चेहर-यावर
संदेह अगदी स्पष्ट दिसत होता. आत घोळक्या घोळक्याने वावरणारे पठाण तो निरखीत होता. मी त्याने आंत यावे म्हणून खुणावले तर तो मलाच बाहेर ये म्हणाला. जावेच लागले.
" कांही खरं नैये बे भोट्या. तुले काय सांगाव आता. पार्टी काय्ची खातं बे, भ++ ! तुलेच फाडून खातीन ते. पैन लाव."
वश्या पोटतिडकीने बोलला यात शंकाच नव्हती. कारण ’भ’काराने सुरु होणारी संबोधने आपसुकपणे त्याच्या तोंडून बाहेर पडणे आणि ’पैन लाव’हे त्याचे शब्द त्याच्या निरागस मनस्विततेचे लक्षण होते. एखाद्या विधानाला हे ’पैन लाव’ (म्हणजे पैज लाव) हे शब्द जोडले की अगदी ठामपणा येणारच अशी त्याची समजूत होती.
" कांही तरी काय बोलतो आहेस. अरे असं कांही होणार नाही. मी त्यांना चांगलं ओळखतो तसं काहींही करणार नाहीत आणि कांही झालंच तर तूं आहेसच की." मी त्याला दिलासा दिला. तेंव्हा स्वारी आंत दाखल झाली.
" मरहब्बा या हबीबी " म्हणत कादरखानाने पुढे होत आमचे हात हातांत घेत स्वागत केले. त्यांच्या रिवाजाप्रमाणे त्याने मला आलिंगनही दिले. एरवी मळकट दिसणारे पठाण स्वच्छ आणि स्वच्छ कपड्यात दिसत होते. सगळ्याच पठाणांना ही दावतची कल्पना पसंत पडलेली नसावी.
तशी वसती बरीच मोठी होती पण आमच्या साईटवर दिसणारे सगळेच तिथे दिसत नव्हते. तरी साईटवर दिअसणारे दहा अकरा चेहरे होतेच. त्यांत नुरुलखान, मोईन खान होता. बाकी खानांचीही ओळख करून देण्यात आली. सर्वांनी हस्तांदोलनाने स्वागत केले.

या कामगारांच्या निवासासाठी एक भली मोठी खोली, प्रत्येक खोलीत सहा दुमजली खाटा (बंकर बेड), म्हणजे बारा असामी एका खोलीत.खोलीला एक वातशीतक आणि वसाहतीच्या मागे सामाईक स्वच्छतालये. अशी सोय केलेली असें. त्यापैकी एका खोलीतील सामानाची थोडे हलवाहलव करून
दावतीसाठी जमीनीवर एक भली मोठी चटई अंथरलेली. सगळे कडेने बसले. कादरखान आणि नुरुलखान बाहेरून खाद्यपदार्थांची भांडी आणून मधल्या जागेत मांडू लागले. मुसलमानात साळे एकाच थाळीत जेवतात असें मी ऐकले होते आणि आपण भारतीय तर वेगळी थाळी घेऊन जेवतो. आता कसें काय होणार या विवंचनेत वश्या तर असणारच होता पण मीही तशी वेळ आली
तर कसें तोंड द्यायचे याचा विचार करू लागलो. पण जेंव्हा पदार्थांच्या हंड्या मधें मांडून झाल्यावर प्रत्येकासमोर एकेके थाळी मांडली आणि दोन दोन कटोरे आले तेंव्हा जीव भांड्यात पडला. केलेले सगळे पदार्थ एकाच वेळी पण भरपूर वाढले गेले आणि सगळे जेवायला बसले. जेवणाची सुरुवात जरा दाटसर सूप असावे अशा पदार्थाने झाली.त्याला शोरबा म्हणतात असें समजले. गांवी आई निरनिराळ्या डाळींच्या भरड्याचे (कळण्याचे) कढण करीत असें तसा तो प्रकार होता. पण फार चविष्ट
होता. दोन प्रकारच्या भाज्या, एक कोशिंबिरीसारखा प्रकार त्यात सफरचंदाचे तुकडे आणि सुक्यामेव्याचेही तुकडे होते. लुबनानी खबूस म्हणजे लांबट आकाराची मैद्याची खरपूस भाजलेली आपल्या नानसारखी जाड रोटी. ती इथे बेकरीत तयार मिळे. तिचे दोन तुकडे करून लोण्यावर (बटर) जराशी शेकलेली. आणि तुपावर परतून पाकात घोळवलेले खजुराचे काप असा एक गोड पदार्थ. असा एकूण बेत होता. भाज्या मात्र जरा तिखटच आणि तेलच तेल असलेल्या. वश्या मात्र सुरुवातीला जरा धास्तावलेला. मी खातोय की नाही हे पहातच जेवत होता. भाजीची एकेके तुकडा बोटाने दाबून पाही. जेवतांना कांही हलके फुलक्या गप्पा चाललेल्या. मात्र एक गोष्ट मला आवडलेली. गप्पा मोडक्या तोडक्या होईना उर्दूतून चाललेल्या. कांहींना बोलता येत नसले तरी दाद देत होते. त्याअर्थी त्यांना बोलणे समजत होते. तेथील चालीरीती, हुकुमतीची राजवटीचे कांही एककल्ली विनोदी मासले. अनिवासी परदेशियांना, मग तें मुस्लिमी देशंतुन आलेले असले तरी, मिळणारी दुय्य्म दर्जाची वागणूक असें कांही बाही विषय होते. इतका वेळ वश्या गप्पच होता. शेवटी कादरखान म्हणाला
" शाजी, ये मेहमानको बुत क्युं बनाके रक्खाए. इस्को बोलनेकी जुबान हय के नही. के तारीफ है तुम्हारे दोस्त की "
खरच एक चूक झालेली होती. खरं म्हणजे ज्याची त्याने स्वत:च ओळख करून द्यायची हा इथला प्रघात. वश्या आधीच भांबवलेला त्याला हे सुचणार नव्ह्तंच. आणि सुचलंच तो काय म्हणणार होता !
" ही तरकारी कायची केल्ली हो भौ. थे आलु गिलु घातले वाट्टे. लेकिन थे अदरक गिदरकचा ज़ायका काई येऊन नही राह्यला बाप्प्पा. अन थे सांभारचाही काही ठिकाना लागला नाही. काऊन हो भौ ?"
आता वश्याची ही रसवंती ऐकल्यानंतर त्या पठाणाची काय अवस्था झाली असती ते एक अल्लाच जाणे. कारण वश्याला फक्त दोनच भाषा येतात असा माझा समझ होता. एक इंग्रजी आणि ही असली मराठी. त्याचं इंग्रजीही फक्त शेक्स्पिअरलाच समजलं असतं. ’ मला माहित नाही ’
या वाक्याचं भाषांतरही तो ’ आय डझ्नॉट नो ’ असं करीत असे. मात्र त्या नंतर वश्या उर्दूतून असा कांही ’पेश’ आला की, तें अमीर खुश्रो, मीर, गालिब बिलिब नागपूरला धंतोलीत याच्या शेजारीच राहत होते आणि रोज पान खायला वश्याच्या घरी येत होते.

" बंदेको वसंत केहते है. वसंतका मतलब है बहार. आपने जो खातिरदारी पेश की वो काबिले तारीफ है. ता कयामत हम आपके शुक्रगुज़ार रहेंगे " वगैरे वगैरे.
वश्याची ही रसवंती माझ्या तर पार डोकयावरून गेली. पण पुढे आश्चर्य असें की त्या बैठकीचा वश्याने ताबाच घेतला. त्याच्या भौगोलिक सामन्यज्ञानाचे अद्भुत दर्शन आम्हा सर्वांनाच घडले. त्याला कज़गिस्तान, अफगाणिस्तान,तुर्कमेनिस्तान, इराण, इराक, या देशांबद्धल बरीच माहिती होती. हे पठाण बहुतांशी पाकिस्तानच्या सरहदी लगतच्या गांवतून आलेले होते हे त्याला माहिती होते. तुर्कमेनिस्तानामधून वहात अफगणिस्तानमधें येणा-या मर्गब, अमन्दर्या सारख्या नद्यांची त्याला माहिती होती. त्याला अबेस्तादा सरोवर, हिंदुकुश पर्वताच्या रांगा, सिन्काई हिल्स जवळील ज़बुक, मध्य अफगाणिस्तान मधील गज़नी, तिच्या उत्तरेकडील काबूल,कंदाहार सारखी शहरे, ख्वाजा मोहम्मद नांवाचे धर्मस्थळ, असं आणि यापेक्षा कितीतरी अधिक माहिती होती. बापरे. मी तर थक्कच झालो. पठाणांचे तर विचारायलाच नको. या तिनशे पौंडाच्या ऐवजाला त्यांनी डोक्यावर घेउन नाचायचेच बाकी ठेवले होते.
अखेर हात तसेंच खरकटे ठेऊन रंगलेल्या गप्पांना आवर घातला गेला तेंव्हा रात्रीचे अकरा वाजले होते. इतक्या उशीरा रस्त्याने घरी जाणे सोपे नव्हते. गस्त घालणारे पोलीस किती ’प्रेमळ’पणें वागतात याची कल्पना होती. वश्याला त्याच्या ठिकाणावर सोडून आलो ते मनोमन त्याची तारीफ करतच.
या मस्त रंगलेल्या मेजवानीची कुणकुण दुसऱ्या दिवशी मुख्यालयाला लागेल आणि तो गुन्हा समजला जाऊन मला चौकशीसाठी बोलवलं जाईल असं स्वप्नही त्या रात्री मला पडलं नाही. मस्त झोप लागली. वास्तवाला तोंड देण्यासाठी दुसऱ्या दिवशीच्या सकाळ पर्यंत.

क्रमश:

वास्तवाला तोंड देण्यासाठी दुस-या दिवशीची सकाळ उजाडे पर्यंत.
-------------------------------------------------------

दुसरे दिवशी नेहमीप्रमाणे कार्यस्थळावर पोहोचलो. माझ्या पठोपाठ कामगारांची गाडी येऊन ठेपली. आज कामगार बिनबोभाट कामाला लागलेले. काल हुस्नीने त्याचे काम चोख केलेले होते. त्याने काय केले ते समजलेले नव्हते. पण परवा ज्या ठिकाणी तो हाडांचा सापळा होता ती जागा स्वच्छ झालेली होती. पठाण त्या जागी जाऊन पाहून आले आणि फारशी चर्चा न करता कामाला लागले. मी एकदा पाहणी करावी म्हणून कामाच्या जागेवरून चक्कर मारीत होतो. तोंच प्यून, मुख्यालयाचा फोन आला आहे म्हणून सांगत आला. मी झालेल्या कामाचा धांवता आढावा घेतला आणि फोन घेण्यासाठी केबीनवर गेलो. आस्थापनेचे जनरल मॅनेजर मि. बरनार्ड मार्स्टर्न यांचा होता. त्यांनी मला ताबडतोब मुख्यालयात बोलावले होते. इतक्या वरिष्ठ दर्जाच्या अधिका़-याने मला कां बोलावले असावे याचा अंदाज लागेना. मनांत जरा धडकीच भरली. कारण ज्या असामीचे एरवी
दर्शनही दुर्लभ असायचे त्याने चक्क भेटीला बोलावले होते. मी पळतच साईटवर गेलो आणि कादरखानला ती हकीकत सांगितली आणि मी परतेपर्यंत काम व्यवस्थित चालू राहील असे पहा असे बजावले. कादरखान ती जबाबदारी नीट पार पाडू शकेल आणि बाकी कामगारही त्याचे ऐकतील असा विश्वास एव्हाना वाटायला लागला होता. साहेब कदाचित कामासंबंधी कांही विचारतील म्हणून
एका कागदावर कांही नोंदी करुन कागद बरोबर घेतला आणि निघालो.

मुख्यालयात मार्स्टर्न साहेबांच्या कक्षापर्यंत पोहोचलो तर त्यांच्या स्वीय सहायिकेने सांगितले की साहेब मजकूर माझी वाट पहातच आहेत. तिने ज्या चर्येने सांगितले ती पाहून मी आधीच एक ग्लास पाणी पिऊन घेतले आणि साहेबांच्या कक्षात गेलो साहेबांच्या कक्षाच्या दरवाजावर टक टक केले. साहेबाने परवानगी दिल्यावर आंत गेलो आणि त्याच्यासमोर उभा राहिलो. साहेब सुमारे अर्धातास बोलला. तो बहुदा आयरिश असावा. त्याचे इंग्रजीचे उच्चार समजणे महा कठिण. त्याने
उच्चारलेल्या एका शब्दाचा उच्चार समजाऊन घेऊन त्याचा अर्थ लागेपर्यंत हा पाठ्ठ्या चार वाक्ये पुढे गेलेला असायचा.

गोष्ट अशी होती की मी काल लेबर कॅंपवर पठाणांनी दिलेल्या मेजवानीला गेलो ही गोष्ट षट्कर्णी झालेली होती आणि ती जेंव्हा साहेबमजकूरांपर्यंत गेली तेंव्हा ते आवडलेले नव्हते. मुळातच वर्णभेदाचा अंगिकार आणि पुरस्कार करणाऱ्या या गोऱ्यांना माझें बहुजनांत मिसळणे मान्य होणारे नव्हते. समाज श्रेणींतील भेदाभेद कटाक्षाने जपणाऱ्या ही पाश्चिमात्य संस्कृतीत माणुसकीचा लवलेशही नसणे स्वाभाविक होते. हें मला ज्ञात नव्हते असें नाही. पण त्या विचारसरणीला
इतक्या क्षुल्लक पातळीवर आणून ठेवले जाईल असें मला कधी वाटले नाही. उलट हुकुमशाही प्रवृत्तीच्या या माणसांना माझे माणुसकीला धरून वागणे द्रोहाचे वाटणेच शक्य होते. त्यात साम्यवादाची भीती शोधू पाहणारी भीरुता नक्कीच होती. अगदी साध्या भाषेंत सांगायचे तर पायातली वहाण पायातच ठेवली पाहिजे या तत्वज्ञानाची भलामण त्यांच्या पथ्थ्यावर होती.

मार्स्टर्न साहेबांच्या बौद्धिकाचा सरळ अर्थ असा होता की, मी पठाणच काय पण इतर कोणाचीही वागतांना पायरी सोडून वागू नये. कामगारांना मी कामगारासारखेंच वागवले पाहिजे. त्यांना त्यांच्या लायकीपेक्षा अधिक मान आणि सवलती देउ नये. हा खटला एकतर्फी होता. त्यात मला माझी बाजू माझी बाजू मांडण्याची मुभा असण्याचा प्रश्नच नव्हता. तूर्तास तोंडी समज दिली गेली. तिचे उल्लंघन म्हणजे गंभीर परिणाम! कदाचित्‌ निरोपाचा नारळ. मी खिन्न मनाने कार्यस्थळावर परतलो.

कार्यस्थळावर आल्यावर मात्र खिन्नता कुठच्या कुठे पळून गेली. पठाण अत्यंत जोमाने काम करीत होते. कामाचा मागील अनुशेष जवळ जवळ भरून निघाला होता. कालच्या मेजवानीचा हा परिणाम असावा वाटून गेले. ते एक कारण होतेच पण आणखीही एक कारण होते. ते म्हणजे जिथे
तो अस्थिपंजर सांपडला होता तेथपासून पुढे जमीन भुसभुशीत लागलेली होती. पण पठाणांची तर्कमिमांसा निराळीच होती. कादरखान म्हणाला,

" अच्छा हुवा जो उस मरहूमकी साया निकाल बाहर हो गई. वो सखत
जमीन उस सायाका अंज़ाम. अब सारा काम मुकम्मल होगा. "

ही भुताखेताची भीती हास्यास्पद नक्कीच होती. पण ती तशीच राहू देणे हिताचे होते. त्या भीतीनें कां होईना. काम भराभर होत होते.

जेवणाच्या सुटीला थोडा अवधी बाकी होता. एवढ्यात कादरखान माझ्या जवळ आला. विचारू लागला,
" क्या हुवा मक्‌तब में ? "

मुख्यालयात झालेला प्रकार खरा खरा सांगून टाकावा असें एकदा वाटले. पण मी एक लोणकढी ठेऊन दिली.

" हमारा काम इन्शाल्ला, बाअंदाज अच्छा चल रह है खान! मुदीरको बहुत खुशी है. ये काम जल्दी जल्दी तमाम करो. आगे दूसरा काम करना है. हुकूमतका ज़दीद (मोठें) कलोनी (निवासी आवास संकुल) बनानेका काम मिला है. हमारा कारवॉं उधर जाना होगा. सुकून मिलेगा."

खान खुश झाला. उड्या मारीतच जेवायला पळाला.

गोरे कांही म्हणोत पण माझ्या पद्धतीने मी कामगारांशी जवळीक साधत होतो. त्याचे खूप चांगले परिणाम दिसून येत होते. साहेबांचा धर्म निराळा होता. त्यांचे तंत्र निराळे होते. माझ धर्म निराळा होता. विदुरा घरी उष्टें वेंचणारा श्री कृष्ण माझा आदर्श होता.

सहनाववतु सह नौ भुनक्तौ सहवीर्यं करवावहै ।
तेजस्वीना वधितवमस्तु मा विद्‌विशावहै ॥

हा माझा मंत्र होता.

क्र्मशः
माझा धर्म निराळा होता. विदुरा घरी उष्टें वेंचणारा
श्री कृष्ण माझा आदर्श होता.
--------------------------------------------

त्यानंतर लागोपाठ तीन दिवस काम सुखेनेव चालले. जमीन भुसभुशीत लागली होती ही एक जमेची बाजू होती. शिवाय कांही अपवाद सोडले तर बहुतेक पठाण सरळ वागत होते. मध्येच कधी तरी दोन पठाणांमध्ये एखादी ठिणगी उडे, मग बाचा बाची ही आलीच. पण कादरखान ती समस्या परस्पर हाताळत असें. एक कादरखानच काय पण बाकी बहुतेक पठाण समजदारीने आणि सामंजस्याने वागत होते. त्यांच्यातील जे वाद कादरखानाला हाताळता येत नाहीत असें त्याला वाटले, त्यांचा निवाडा करणे माझ्यापर्यंत पोहोचले.

प्रक्षोभक झालेले कामगार माझ्याकडे आले की मी त्यांना केबीनमधें पाचारण करी. कांही बोलणे सुरूं करण्याआधी त्यांना एक पेलाभर थंड पाणी दिले की प्रक्षोभाची धार जरा बोथट होते हे माझ्या लक्षांत आले होते. मग त्यानंतर त्यांचा आवेश आपसुकच जरा मंदावलेला असायचा. त्यांच्या समस्याही तशा वैयक्तिक आणि बऱ्याचदा अगदी पोरकट असायच्या. त्यांचे त्यांच्या गावाकडची किंवा कौटुंबिक भांडणे हेही एक कारण असायचे. कारण बरीचशी मंडळी एकाच गांवातून आलेली असायची. तसेंच ते एकमेकांचे नातेवाईकही असायचे. जसें आपल्या कोकणातून एखादा चाकरीसाठीं म्हमईला गेला की तो संधी मिळतांच आणखी चारदोन गांववाल्यांना म्हमईत कुठे ना कुठे तरी चिकटवून देण्याच्या प्रयत्नांत असतोच. तसाच प्रकार या पठाणांच्या बाबतीत घडलेला दिसायचा. त्यांत एक सासरा-जांवईही होते. सासऱ्याने कबूल करूनही (मेहेर) हुंडा दिलेला नाही म्हणून इथें हें असले कष्टाचे काम करायला आलो हा जांवयाचा दावा. तर या नालायक जांवयाला देण्याचा पैसा कमवण्यासाठीं घरदार सोडून वाळवंटात आलो हे सासऱ्याचे गाऱ्हाणे. हे दोघे तर नेहेमी भांडायचे. कधी कधी तर मामला मुद्यावरून गुद्यावरही यायचा. बरं या दोघांचेही समर्थक त्याच घोळक्यात असणार आणि मग त्यांचेही शक्तिप्रदर्शन. मी आपला कधी दादा पुता करून तर कधी हद्दपारीची शिफारस करण्याचा धांक दाखऊन ती भांडणे मिटवीत असें.

माझें हें उपद्‌व्याप मी एकदा आमच्या सडेफटिंग युनियनच्या सदस्यांना सांगितले तर मी ’घरचे खाऊन लष्करच्या भाकरी भाजणे तात्काळ बंद करावे’ हा ठराव सर्वानुमते पास झाला. डोंगऱ्या तर ’ आ बैल मुझे मार ’ नांवाचा चित्रपट काढणार होता आणि त्या चित्रपटाचा नायक अर्थात्‌ मीच असणार होतो. या त्याच्या विनोदामागे एक तिरकसपणही होता हे जाणवत होते. हें असें करण्यात मी एक प्रकारें आत्मप्रौढी, शेखी मिरवत आहे असा त्याचा आरोप होता.
पण तसें कांही मी बुद्‌ध्याच करीत नव्हतो. कामगारांत मित्रत्वाच्या नात्याने मिळून मिसळून वागण्याची माझी जुनी संवय होती. मी लहानपणा पासूनच कांहीसा मवाळ होतो. जरा हळवा आणि भाबडाही असेन कदाचित. मात्र माणसे जोडूनच कांही साध्य करतां येतें या विचारावर माझा भरवसा होता. आमचा पेशवा मात्र म्हणाला, " जें कांही करायचे असेल तर कर पण सेन्स ऑफ प्रपोर्शन सोडू नकोस आणि सर्वांत महत्वाचे म्हणजे स्वत:चा ’पोपट’ होऊ देऊ नकोस". या माधव महाबळला आम्ही दिलेली पेशवा ही उपाधी तो अशी सार्थ करीत असे.

असाच एकदा पठाणांचा एक वाद मिटवीत होतो इतक्यात एक मोटार आल्याची चाहूल लागली. पठाणांना कामाकडे पिटाळून मी सामोरा झालो. एक अलिशान अमेरिकन मोटार जवळ येऊन थांबली आणि संपूर्ण अरबी वेशातली काळा चष्मा लावलेली एक असामी गाडीतून बाहेर पडली. मोटारीला स्वतंत्र चालक होता हे माझ्या ध्यानात आले. म्हणजे ती व्यक्ती कोणीतरी उच्च दर्जाची अधिकारी होती हे नक्की. कारण सहसा मोठमोठे अधिकारीही इथें आपली मोटार स्वत:च चालवीत. मी पुढें होत अभिवादन केले. माझ्याशी हस्तांदोलन करीत त्या व्यक्तीने अस्खलित आङ्ग्ल भाषेत आपला परिचय दिला. आमच्या आस्थापनेचा तो ’अल्‌ मुदीर’ म्हणजे जनरल मॅनेजर होता. क्षणभर हा महाभाग इथें कां अवतरला असेल याचे मनांत आश्चर्य वाटले आणि थोडी भीतिही. हे साहेब कामाची पाहणी करण्यासाठीं आलेले होतेच पण मी कामगारांशी फालतू जवळीक करीत आहे अशी तक्रार त्याच्या पर्यंत पोहोचली होती. मेजवानीची खबरही त्याला मिळाली होती. आणि त्याची चौकशी करण्यासाठीं दस्तुरखुद्द जातीने आले होते. त्यांनी आधी मी तिथें येण्यापूर्वीच्या आणि माझ्या अखत्यारीत झालेल्या कामाचा आढावा घेतला. त्या तूलनेत माझे काम समाधानकारक असल्याचे पाहून तो बराच निवळला. माझ्याबद्धल त्या गोऱ्या अधिकाऱ्याने जी तक्रार केली होती तिच्यातील फोलपणा त्याच्या लक्षांत आला असावा. कारण त्यानंतर तो प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणीही गेला आणि पठाणांशीही बोलला. काय बोलला हे मात्र मला समजले नाही कारण तें संभाषण अरबी भाषेंत झालें. अखेर जातांना मला शुभेच्छा देऊन गेला तेंवढे मात्र मला समजले.

तो गेल्यानंतर कादरखान माझ्याजवळ आला. त्याचा चेहऱ्यावर आनंद दिसत होता. मी त्याला कारण विचारले तर म्हणाला,

" मुदीर बोला, तुमारा काम बिल्कूल मुश्‌तमाम. खराब काम किया तुम. तुम पठानको मारा पीटा. तुमको मुदीर इंडिया वापस भेजेगा. "

असं म्हणून दोन्ही हात वर करून आकाशाकडे पहात ओरडला " रहेम या खुदा, रहेम !" आणि गडगडून हंसायला लागला.

त्याच्या पहिल्या दोन वाक्यांनी मी चक्रावलो होतो पण त्याचा पुढचा तमाशा माझ्या लक्षांत आला. त्याच्या पोटांत एक जोरदार ठोसा लगावीत मी पण ओरडलो,

" बर्रा, वै शैतान बर्रा !" (चालतो हो, राक्षसा चालता हो!)

सगळे पठाण हात उंचावीत मला कांहीतरी सांगू इच्छित होते. काय तें मला कांही समजत नव्हते. मात्र ते आनंदात असावेत असें दिसले. मीही आनंदात होतो पण थकवाही जाणवत होता. आता कामाचा वेगही वाढला होता. या वेगाने झाले तर काम, फार फार तर चार दिवसांत पूर्ण होणार होते. किती दिवस झालें मी हें काम सुरू करून? कांही समजत नव्हते.

जणू हा एक कबड्डीचा डाव चालला होता. त्यांत मी कधी हरत होतो तर कधी जिंकत होतो. मात्र हा खेळ संपू नये असं आता वाटत होतं.

क्रमश:मात्र हा खेळ संपू नये असं आता वाटत होतं.
--------------------------------------

मुदीरचे किंवा आमच्या शेखचे दर्शन घडणे हेंच पठाणांसाठीं मोठे अप्रूप होते. आणि इथें तर मुदीर चक्क पठाणांशी गप्पा मारून गेला होता त्यामुळे तर आनंदाला पारावार नव्हता. मुदीर पठाणांशी काय बोलला तें मला मोईनखानाकडून कळले. पठाणांनी मला दावत दिली हे मुदीरला आवडले होते. तो त्यांना म्हणाला होता,

"मेहमाननवा़ज़ी हा प्रत्येक सच्च्या मुसलमानांचाच काय पण साऱ्या जगाचा आद्य धर्म आहे. फक्त तुमचा हेतू स्वच्छ असला पहिजे. एक माणूस म्हणून तुमचा नवा साहेब कसा आहे तें तुमचे तुम्हीच ठरवा. तो माणूस असेल तर तुम्ही माणूस बना. नाही तर तुम्ही राक्षस तर आहातच. तुम्ही केलेले कामही उत्तम आहे. हे काम लवकर संपवा. मी तुम्हा सर्वांना खास बक्षीश देणार आहे."

हे सारे मोईनखानने सांगितले. तें ऐकून माझ्या मनांत मुदीरबद्धल आदर निर्माण झाला. आखातातील आतापर्यंतच्या मुशाफिरीत मी पाहिलेला तो पहिला सहृदय माणूस होता. शिवाय त्याला कामगारांचे मानसशास्त्र चांगलेच अवगत असावे. कामगारांना प्रोत्साहित (motivate) करण्याची त्याची हातोटी मला फार आवडली. त्याने बक्षीश देण्याचे कबूल केले त्याचे मात्र मला नवल वाटले नाही. मुदीर किंवा शेख खुश झाला तर कांही ना कांही बक्षीस नक्की देत असें. इथें तशी पद्धत होती. देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी आणि आजही इथे सरंजामशाही होतीच. देशाला राजा होता आणि संस्थानिकही होते. बक्षीसे देणे हे राजेशाही औदार्याचे आणि मिजाशीचे लक्षण होते. बक्षीस सहसा रोख रकमेंतच असायचे. ते सामुदायिक असेल तर सहसा त्याचा विनियोग जल्लोषी मेजवानीसाठीं केला जाई.

मोईनखान आताशा तो माझ्याशी बोलण्याचा बराच प्रयत्न करीत असे. त्याची प्रकृती आता बरी होती. जी कांही औषधयोजना त्याला सरकारी दवाखान्यातून मिळाली होती त्यामुळे त्याला बरें वाटत होते. खरें तर यांत मी कांहीच केले नव्हते पण तो उगीचच माझे आभार मानीत असे. या पठाणांना वैद्यकीय उपचार मिळण्याची सोय असूनही ती त्यांना दिली जात नव्हती. इथें कष्ट करण्यासाठी येणारा प्रत्येक माणूस तंदुरुस्त असायलाच पाहिजे हे तत्व बरोबर होते. पण वेळ कांही सांगून येत नाही. त्याला योग्य तो उपचार मिळायला पाहिजे असें मला वाटें. पण त्याचा काय उपयोग होता. इथें कामासाठीं येणाऱ्या सर्वच माणसांना कमीअधिक प्रमाणांत गुलामासारखेंच वागवले जात होते. सगळेंच कांही मुदीर सारखे नव्हते. हाती आलेल्या अधिकाराचा उपयोग इतरांना छळण्यासाठी वापरण्याची हौसच अधिक दिसून येते आणि या विकृतीला बळी न पडणारा विरळाच.

वीज वाहिनी जमीनीतून टाकण्याचे काम जसजसें संपत आले तसतसा कामाचा जोश वाढत गेला. कांही अडचण आली तरच मी कामाच्या ठिकाणी असावे. एरवी मी केबीनमधें निवांत वसावे, आराम करावा असा आता पठाणांचा आग्रह असें. पण माझा बहुतेक वेळ त्यांच्या वरोवरच जात असें. कारण कांही काम न करता बसून राहण्याची संवय नव्हती. तो माझा स्वभाव नव्हता. काम जसें एक दिवसावर येऊन ठेपले तसे कामगारांची गडबड वाढली आणि वातावरणच बदलले. ज्या गांवासाठी ती वीजवाहिनी टाकली जात होती तें गांवही जवळ आल्याने कांही गांवकरीही आता कुतुहलाने कामाच्या ठिकाणी घोळक्याने फिरकत. त्यांत पोरेटोरेच अधिक. आपल्याकडेंही असेंच चित्र अनेकदा दिसते. खेडेगांवात अगदी पोस्टमन जरी बटवड्यासाठी गांवात आला तर चिल्ली पिल्ली त्याच्या सायकलच्या मागे पळणारच आणि शहरांतही एखादी जरा वेगळी विदेशी असामी दिसली की भल्याभल्यांनाही आपले काम विसरून त्यांच्याकडे पाहाण्याचा मोह आवरत नाही. माणसाच्या नाविन्याच्या या नैसर्गिक कुतुहलाचे मला नेहमीच नवल वाटत आले.

अशाच एका संध्याकाळी. कांही कामागार राहिलेले काम उरकण्याच्या मागे आणि कांही शेवटी न लागणाऱ्या साहित्याची आवरासावर करण्यात मग्न. सगळ्यांनाच कधी एकदा हे उघड्यावरचे उन्हातान्हातले काम संपवतो असें झाले होते. कारण त्यानंतरचे काम इतके जिकिरीचे असणार नव्हते. तसें कुणालाच कांही माहिती नव्हते. पण पण यापुढील वीजवाहिन्या आरोहित्राला (transformer) जोडणे, गांवात त्या आधीच विस्तारलेल्या कमी दाबाच्या वाहिन्या आरोहित्राला जोडणे अशी कांमे सुरु होणार होती. श्रम त्या मानाने कमी होणार होते. शिवाय कामांत विविधता असणार होती. कामातील विविधताही मनोरंजक असते आणि श्रमांचा ताण जाणवत नाही. सगळेच पठाण त्यासाठी लागणार होते असें नव्हते. पण कोण कुठे जाईल याची उत्सुकता होती. अशा रितीने सारे कांहींना काहीं व्यवधानात होते. एवढ्यात कामाच्या शेवटच्या टोकाशी कांही तरी अघटित घडले असावा असा कोलाहल झाला. सगळे हातातले काम टाकून तिकडे धावले. मीही कामाच्या गस्तीसाठी मिळालेली जीप तिकडे पिटाळली.

शेवटच्या टप्प्यातली धांदल, बघ्यांची झालेली गर्दी. त्यातून अति उत्साही कार्टी चरावरून इकडून तिकडे उड्या मारण्याचा खेळ खेळू लागली. त्यांना हांकारताना पठाणांची दमछाक झालेली. अशातच एक कार्टं चरांत पडलं. त्याला वाचवण्यासाठी उडी मारण्याच्या भरांत एक पठाण माती ढकलणाऱ्या यंत्राच्या चाकाखाली आला. चाक कसले ते! चाक म्हणायचे पण रणगाड्याला असतो तसा तो कांटेरी चाकावर फिरणारा पोलादी पट्टाच असतो. आणि त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाने ते यंत्र तात्काळ थांबवण्याचा जो प्रयत्न केला त्यांत ते एकाबाजूने चरांत घसरले. बघे घाबरून पळाले. मात्र काम ठप्प झाले.

कांही क्षण कोलाहलात गेल्यावर कोलाहल थांबला आणि शांतता पसरली. जो तो एकमेकाकडे पहात होता, यदृच्छयेने झालेल्या अपघाताचा विचार करू लागला. माती-ढकल्या (बुलडोजर)चा एक भाग घसरून चरांत टाकलेल्या वीज वाहिनीवर पडला होता. वीज वाहिनीवर विटांची रांग होती म्हणून तिला सध्यातरी कांही इजा पोहोचलेली नव्हती. तो पुन्हा चालू करून बळाने वर काढता येणे शक्य होते पण विटा चक्काचूर होऊन वीज वाहिनीला चांगलीच इजा पोहोचणार होती. आता ते धूड उचलून सरळ करणे भाग होते. त्यासाठी क्रेन लागणार होती. क्रेन खूप दूरच्या एका दुसऱ्या साईटवर होती. तिला निरोप देऊन ती येई पर्यंत कदाचित्‌ दीड-दोन दिवस लागणार होते. साऱ्यांचा हिरमोड झाला होता. क्रेन येईपर्यंत बाकी आवरासांवर करून घ्यावे म्हणून कामगार बेसकॅंपवर पिटाळले आणि मीही फोन करून अपघाताची खबर मुख्यालयाला द्यावी म्हणून केबीनकडें वळालो.

मी केबीनामधे जातांच आधी दोन पेले पाणी घटाघटा प्यालो आणि खुर्चीत बसलो. खरं म्हणजे मी अगदी चिडून गेलो होतो. अडचणी माझी पाठ सोडीत नव्हत्या. आता हे क्रेन मागवण्याचे प्रकरण म्हणजे वैताग होता. काय झालें, कसें झालें याचा जाब जबाब देणे, चौकशी झालीच तर तिलाही तोंड देणे. या सगळ्या तपशीलाची नोंद करणे. अहवाल तयार करणे. मला ही असली कारकुनी करण्याचा मनस्वी कंटाळा. पण ’ज्याचा कंटाळा त्याचाच वानवळा’ या म्हणीचा प्रत्यय येणार होता. मुख्यालयाला खबर देण्यासाठी फोन लावणार इतक्यात एक आडदांड पठाण केबीनमधे घुसला आणि अरबी भाषेंत तावाने कांही तरी सांगू लागला. मी आधीच इतका वैतागलेला, त्यात हा माझ्या वैतागात भर टाकायलाच जणू आलेला. मी त्याला हाकलून देण्याच्या विचारात असतांनाच पाठोपाठ कादरखान अवतरला आणि सांगू लागला,

" शाबजी ये महंमदखान! कुच तर्कीब ले के आया है. "

हा आता आणखी काय दगडाची तरकीब सांगणार होता कुणास ठाऊक! पण म्हटले, सांग बाबा ! त्याच्या तरकीबीने क्रेनचा द्राविडी प्राणायाम वाचणार असेल तर तो मला हवाच होता. मग त्या दोघांचा अरवी भाषेत एक लडिवाळ संवाद झाला आणि कादरखान मला ती तरकीब सांगू लागला. ती अशी होती की, केबल ओढणारे यंत्र सुटे करून घ्यायचे. साईटवरच्या भांडारात एक भली मोठी पोलादी दोरी (sling) होती ती या यंत्राच्या आणि अपघातग्रस्त यंत्राच्या मधे बांधायची आणि या यंत्राने ते यंत्र (बुलडोजर) ओढून धरायचे. ते पुरेसे वरती उचलले गेले की निर्माण होणाऱ्या सांपटीत विटांचा केबलवर संरक्षक थर टाकायचा आणि नंतर ती पोलादी दोरी काढून घ्यायची. केबलवर विटांचा संरक्षक थर दिला तर बुलडोजर चालू करून बाहेर काढून घेता येणार होता. मी जरासा विचार केला, कल्पना चांगली आहे, पण जरा धाडसाची आहे. केबल ड्रम उतरवणे आणि पुन्हा वर चढवणे कष्टाचे होते. पण केबल कमी झालेली असल्याने त्याचे वजनही कमी झालेले असणार हा युक्तिवाद बरोबर होता. ते कष्टाचे काम पठाण विनातक्रार करतील असा भरवसा कादरखानाने दिला. मी त्या योजनेला मान्यता दिली. ही सारी मोहीम कादरखानाने राबवावी, मी इतका थकलो आहे की मी तिथे येणारही नाही या माझ्या म्हणण्यालाही कादरखानाने मान डोलवून मान्यता दिली.

त्यानुसार जमवाजमव करून कादरखानाने मोहीम फत्ते केली तेंव्हा झालेल्या जल्लोषाच्या आवजाने मी त्या जागेवर गेलो. त्या महंमदखानाने खरोखर मला एका फार मोठ्या त्रासातून वाचवले होते. त्याने अभिमानाने हस्तालोंदनासाठी हात पुढे केला तर मी त्याला मिठीच मारली. पठाण जल्लोष करीत माझ्याभोवती नाचत होते. कळत नकळत मीही त्यांच्या समवेत नाचत होतो. पठाण ’बक्शीश, बक्शीश !’ ओरडत बक्षीस मागू लागले, त्यासरशी मी खिशातून माझा बटवा काढून त्यांत होत्या नव्हत्या तितक्या नोटा काढून महंमदखानाकडे भिरकावल्या.

राम राम हो मनोगतवाले,

आशे काय पाहून राह्यले माह्याकडे बाप्पाहो तुमी? काय पेहचान नै लागून राह्यली माह्यी तुम्हाले?
नाचीज़को वसंत गडकरी......! छोडो बाश्शाहो ! थे भोट्या ऐकंन तं माह्या कानाखाली जाय काढाले धावंन.
एक तं याले उर्दू काई हजम होत नाही आन्‌ कोनी बोल्लं तं याहीचा भेजा सरकते.

पण कांही म्हना देवाहो, याहिचा भेजा म्हंजे बिलकुल मसाला पट्टी. तब्बेतीनं ज़ायका घ्यावी अशी. सुपारी गिकारी, चुना गिना एकदम्‌ कायदेसे. हा पैदा होनेके वखत, देवाने याच्या वासते भेजा तयार केला, तं हा भिडू, देवाले भेजाचा सेप्सिकेशन (specification)विचारून राहला. आता देव काय देतो, थे गलत राह्यते कां बाप्पा ? पन भोट्या काई सीधी बात मानंन तं त्याहिचे पितर नाही उद्धरणार ? देवाले आला गुस्सा. त्याहिनं याचा भेजा फ्राय केला आन्‌ टाकला याच्या गाडग्यात. आन्‌ मंग काय होते? हे अस्ले ऐबी नमूने पैदा होतेत. नै तं काय होते!

बाप्पाहो, तुमी तं खाली माह्यी बातच सुनून राहिले. काई विचारून तं नैच राह्यले. का आता मी कोन अन्‌ थे भोट्या कोन. थे भोट्या? याने मतलब? दुबईत याहीने काय झमझमा केला थे सांगून नै राह्यला का तुम्हाले?

दुबई?

काय सांगावं राजेहो, तुम्हाले! पोट्टा कोठे गेला तं दुबईत गेला, असंच सांगावं लागते इंडियातले मान्सान्‌ले.
थे बहरीन गिहरीन, सौदी गैदी, कांही समजतं का आपल्या मानसान्‌ले? एक पोट्टा ’रास-अल्‌-खयमा’ ले गेला. तं त्याहिची माय पडोशान्‌ले सांगे, का, माहा पोट्टा ’रस्सा खीमा’ गेला. काय समजतीन पडोसी बापडे? थे समजले कां पोट्टा हररोज खीमा रस्सा खाऊन ऐश करून राह्यला. आन्‌ मायले तं खायाले आलूची तरकारी मुश्किल झाली.


माले एक सांगा बाप्पाहो तुम्ही, तुमचा पोट्टा का पोट्टी अमेरिकेत गेली, तं काय सांगता तुम्ही ? अमेरिकेला गेली अशेच ना? नेमका कोठे गेला हे सांगता का ? थो सदाशिवपेठ्या पेशवा सांगे का त्याहिची चुलती स्टेट्‌स मधे राह्यते. आता ही माय इश्टेट्मधे राह्यते का मकानीत राह्यते, मालूम करून काय करू मी! अरे, पन थी राह्यते कोण्या देशात? बरं याले तसं इचारलो तं माह्याकडे असा पाहे कां गयात कवड्याची माळ आन्‌ डोक्याले पिसांची टोपी पहेनून राह्यलो मी!

तं काय बोलून राह्यलो मी तुम्हाले?

हां, तं या भोट्याले परवा फोन केला तं सांगे का, तुम्हाले दुबईतला झमझमा सांगून राह्यला. नाही कां ?
लेकिन सच बोले तो, या भोट्याले रायटिंगचा भल्ला कंटाळा. याले शायेत मास्तरनं ’मी पाहिलेली मुंबई’ असा निबंध ल्येहे म्हून सांगितलं तं या गैब्य्यानं भुसावळ पासून बोरीबंदर पोत्तो स्सग्‌ळ्या ठेसनांची सिरिफ नांवं लिहून काढली आन्‌ मास्तरांची कानाखाली खाल्ली. आन्‌ हा भोट्या, हकीकती लिहून राहिला ? हां आता आदमी बुढाप्यात काई पागलपना करते खरा. पण रायटिंग स्टोरीज ? या भोट्याले हिफाज़तीनं घ्या बाप्पाहो.

पण या भोट्याले फोका मारायची भल्ली आदत. आदमी एकदम सोला आना! पण त्याहिच्या जबानीचा लगाम जरा ढिल्ला राहून गेला. साला राईसपलेट खाऊन येईन. लेकिन तरफदारी अश्शी पेश करीन का जसा कांही हा ताजले नही तो शेरेटनले ब्यांकेट खाऊन आला. या भोट्याले मी भोट्या का म्हन्‌तं मालूम? स्सांगतो. ऐका.

बचपनीत या भोट्याले याच्या मायनं एक रोज़ बझारमधून पावशेर घी आणायला सांगलं. आता हा कां शिद्धा घी आणीन ? याले पंचाईतीच फार. सुटला याले त्याले पुसत, बेहतरीन घी कोठे भेटेल म्हणून. आन्‌ कोणीतरी याचा केला मामा. याले खबर देल्ली का नंदू हलवाया कडे भेटेन बेहतरीन घी. आता नंदू हलवाई होता दोन कोस दूर. भोट्यानं केला टांगा. झेऊन आला बेहतरीन घी. सहा रुपैयाचा घी, आन्‌ नऊ रुपैये देल्ले टांगेवाल्याले! आता याले भोटमामा म्हणावं नै तं काय अकबर बाश्शा म्हणावं. आन्‌ ही ष्टोरी भोट्यानं मला तं सांगितलीच पण त्याच्या पोट्या पाट्ट्याले बी मालूम पडली. बेशरमीकी हद हो गयी और जनाब उसके झंडे लेहरा रहे है.

आता तुम्हीच सांगा जनाबे अलि, थ्या पठानाने काय तर्कीब गिर्कीब सुचवली आन्‌ फत्ते भी केली. तं काय तुम्ही जेबातल्या नोटा गिटा उधळान्‌ कां. पण भोट्याले हे सांगावं कोणी ? तुम्ही तरी सांगा त्याले बाप्पाहो. थ्या टायमाले जवानीत काय दिल्लगी केली ती केली, आता बुढाप्यात भी अशी दिल्लगी हा करीन तं पोट्ट्यांचे पोट्टे पाट्टे मजाक करतीन याचा.

बाप्पाहो, भोट्या आदमी सोला आने है. तुम्ही छू म्हट्ले कां छाती फोडून धावन्‌ असा ईमानी आहे. बेट्यानं बहोत पापड बेले जिंदगीभर. आता थे भुनून खाऊ घालून राह्यला तुम्हाले. काय गलती गिलती केली तं माफ राजे. थ्या वक्ती भोट्या नसता भेटला तर हा डोंगऱ्या (नाचीज़की डोंगऱ्या नामसे भी पेहचान है) तुम्हाला भेटला नसता. या एकदा नागपूरले. संत्री गिंत्री खाऊ. कन्हानचे पाणी पिऊ.

राम राम !
आखाती मुशाफिरी (१२)
अरुण वडुलेकर मंगळ, ०६/०३/२००७ - १५:३७. » कथा | अनुभव
मी खिशातून माझा बटवा काढून त्यांत होत्या नव्हत्या तितक्या नोटा काढून महंमदखानाकडे भिरकावल्या.
___________________________________________________________
वीजवाहिनी टाकण्याचे काम जसे अखेरच्या टप्प्यांत आले तशी पठाणांची कामाची लगलबग वाढूं लागली. काहीं पठाण उरलेले काम संपवण्याच्या मागे लागले तर कांहीनी आवरासावरीला सुरुवात केली. मी या कामावर तसा बराच उशीरा दाखल झालो असलो तरी पठाण या कामाच्या सुरुवातीपासून होते. त्यामुळे आवरासावर कशी करावयाची हें माझ्यापेक्षा त्यांना अधिक चांगले ठाउक होते. खरं म्हणजे या कामावरची माझी नेमणूक अगदी अंशकालीन असावयाला हवी होती. पण माझ्या देखरेखी खाली काम जरा सुरळीत चालली आहे म्हणतांच त्यात बदल झाला नाही आणि मीही असा कांही रमत गेलो की मलाही बदल व्हावासा वाटला नाही.

कामाची मोहीम ज्या गांवासाठी सुरू होती तें जसजसे जवळ येत चालले तसतशी कांही गांवकऱ्यांची तुरळक वर्दळही सुरू झाली. एकतर येथील स्थानिक लोकांना काम नसायचे. फार पूर्वी हे अरब बहुतेक भटके असायचे. कांही फिरस्तीचा व्यापार उदीम करायचे तर कांहीची गुजराण चांचेगिरीवर चालायची. सोळाव्या शतकाच्या आरंभास औद्योगिक क्रांती झाली आणि उद्योगासाठी, दळणवळणाच्या साधनांसाठी इंधनाची गरज निर्माण झाली. ते भूगर्भात तेलाच्या स्वरूपात मिळू शकते हे समजल्यावर तशा भूगर्भीय भूखंडांचा शोध घेतला गेला. सुरुवातीस तसें भूखंड दक्षिण अमेरिकेत सांपडले. पण त्यातून निघणार तेल, ते काढण्यासाठीं झालेल्या खर्चाच्या मानाने परवडण्यासारखें नव्हते. मग तेलाचा शोध सुरू झाला आणि वालुकामय तसेंच आखाती देश हे सोन्याची लंका ठरले. सर्वप्रथम ब्रिटिश, त्यांच्या पाठोपाठ फ्रेंच, त्यानंतर अमेरिकन असा तेलासाठी ओघ सुरूं झाला. त्यांनी तेलाच्या विहिरी जमिनीत खोदल्या तशा त्याहीपेक्षा फार मोठ्या प्रमाणांत किनाऱ्यालगतच्या सागरी पट्ट्यात खोदल्या. स्वत: मलई खाल्ली आणि ताकाची फुळकावणी या अशिक्षित मागास स्वकीयाच्या पदरांत पडली. पण ती फुळकावणीही या बुभुक्षितांना इतकी सकस आणि चविष्ट वाटू लागली की यांना उपजीविकेसाठीही श्रम करण्याची गरज उरली नाही. कालांतराने हे देश स्वायत्त झालें तें केवळ राजकीय नकाशावर. भौगोलिक आणि सामाजिक रेषा जराही इकडच्या तिकडे झाल्या नाही. सगळा देशच प्रकल्पग्रस्त आणि सारे स्वकीय समाज शासनाकडून मिळणाऱ्या मोबदल्यावर पोसलेला. देशांवर सत्ता तशी तेथील शेखांची. पण ती नामधारी.
हिन्दुस्थानांत इंग्रजांनी व्यापाराच्या मिषाने प्रवेश केला आणि देशांतील राजसत्ता हळूहळू बळकावण्याचा प्रयत्न केला. पण आखाती देशांत त्यांनाच काय पण अन्यही गोऱ्यांना,प्रत्यक्ष राजसत्ता स्थापन करण्यात फारसे स्वारस्य नव्हते. अरबांना ऐशोआरामांत चैनीत आकंठ बुडवून ठेवले की मग ही मंडळी स्वत:च्या तुंबड्या भरायला मोकळी होती. या गांवातील परिस्थिती यापेक्षा कांही वेगळी नव्हती. गांवात, लाक्षणिक अर्थाने म्हणावेत असें बारा बलुतेदार होते पण ते अरबी नव्हेत. इतर देशातील. तेथील राजवट नस्‌लखोर (जातिवंत) अरबांना उदर निर्वाहासाठी तर तनखे पुरवीत होतीच इतरही सण समारंभांना भरघोस धन पुरवीत असे. अरबांने शादी केली, द्या दोन लाख डॉलर्स. त्याला मुलगा झाला, द्या पांच लाख डॉलर्स. राजाच्या-शेखच्या नातवाचा विवाह झाला, द्या माणशी हजार डॉलर्स. असली खैरात झाल्यावर काम कोण हरीचा लाल करील! आणि मग असें रिकामटेकडे संधी मिळेल तसें आमच्या कामाबद्धल कुतुहल दाखवीत कांही बाही प्रश्न विचारून भंडाऊन सोडीत. त्यांना तोंड देणे म्हणजे एक कठिण काम असे. त्यातले बहुतेक वात्रट असत मात्र कांही सज्जनही असत.


पठाणांनी दिलेल्या दावतीची खबर जेंव्हा मुख्यालयाला लागली होती त्यावेळी या पठाणाच्या घोळक्यात मुख्यालयाने एखादा हेर किंवा खबरी पेरून ठेवला असावा मला एक संशय आला होता. पण, माझा स्वभाव मुळातच थोडा भित्रा. अर्थात्‌ अशा शंका मला नेहमीच येत आणि सहसा त्याची जाहीर टवाळी होत असें. त्यामुळे अशी शंका आली की लगेच ती अंगावर पडलेल्या पालीसारखी झटकून टाकायची मी स्वत:ला संवय लावून घेतली. पण हातातील काम संपवून त्या पुढील काम दुसऱ्या विभागाला सोंपविण्याची कार्यवाही सुरु असतांना मला अचानक मुख्यालयातून बोलावणे आले. तेंव्हा मात्र मनातली संशयाची सांवली गडद झाली. कारण मुखालायाकडून भेटीच्या कारणाचा स्पष्ट निर्देश मिळालेला होता आणि तो म्हणजे कालचा बुलडोजरचा अपघात. वास्तविक मी माहिती देई पर्यंत घडला प्रकार मुख्यालयापर्यंत पोहोचण्याची सर्वसामान्य शक्यता नव्हती. पण ती पोहोचली होतीच.

काल साय़ंकाळी परममित्र वसंत गडकरी आणि माधव महाबळ सहजच म्हणून माझ्या निवासावर आले होते आणि गप्पांच्या ओघात साईटवर झालेला महंमद खानाचा पराक्रम मी फुशारकीने सांगितला होता. अपेक्षेप्रमाणे वसंतराव भडकले होते आणि माधवरावांनी त्यांचे ’ गोष्टी सांगेन युक्तिच्या चार ’ हे ब्रीद सांभाळीत आमचे कान उपटले होतेच.

" भोट्या, हे फजूलचे झमेले कायले गयात घेतं बे? मरेना जाईना थो बुल्डोजर. थे म्हमद्या का कोन काय, थे तुले काय बी सांगतं, आन्‌ तू बेट्या बैलावाणी गयातली घंटी वाजवीत राह्यतं. तू कोन बे, त्याहिले ऐसी हिकमत कराले देनेवाला?आन्‌ मोठा बाश्शा झाला बे तू. पैशांची खैरात करून राह्यला. पैशे का तुह्या बापाचेहे रे? थे वैह्‌नीले आन्‌ पोट्ट्यान्‌ले काय जबाब देशीन बे?" .......अशी वश्याने तासली.

आणि नंतर माधवरावांची मियॉंकी तोडी, " चिरंजीव, याला म्हणतांत अव्यापारेषेषु व्यापार. त्या पठाणांच्या बाबतीत आपण नेमस्त रहावें हें उत्तम. आपला मैत्रभाव, माणुसकी हें ठीक आहे. पण अतिपरिचयात्‌ अवज्ञा होतें." आता या तीन वाक्यांत उच्चारित, अनुच्चारित, अध्याहृत असे सगळ्याप्रकारचे अनुस्वार घालून तें वाक्य पुन्हा मोठ्ठ्याने म्हणून पाहावे म्हणजे माधवरावांचे व्यक्तिमत्व (प्रोफाईल)

तर झाल्या प्रकाराचे पडसाद काय नि कसें उमटतील अशा विचारातच मी मुख्यालयात पोहोचलो. माझ्यावरील अभियान मुदीर साहेबांच्या कक्षांत सुरू झाले. बर्नार्ड साहेबांनी माझ्यावरील आरोप पत्र वाचून दाखवले. त्याला त्यांनी जवळ जवळ एक तास घेतला. त्या साठ मिनिटांच्या भाषणातून मला फक्त साठ सेकंदाचे भाष्य समजले. बर्नार्ड साहेबांचे आरोपपत्र वाचन चालू असतां मुदीरसाहेब त्यांना एकटक निरखीत होते. त्यांच्या चर्येवरून त्यांना हा फार्स फारसा आवडलेला नाही हे दिसत होते. पण ज्या शासनप्रणित कंपनीकडून ही कामाची कंत्राटे मिळाली होती, त्या कंपनीचा मुख्य साहेब एक ब्रिटिश होता आणि या बर्नार्ड साहेबांचा तिथे चांगला प्रभाव होता. त्यामुळेच तर ही कंत्राटे मिळालेली होती. तेंव्हा त्यांचे ऐकून घेणे मलाच काय पण मुदीरलाही भाग होते. ज्या खटल्याचा निकाल, खटला उभा राहण्याच्या आधीच लागलेला होता, तो लागला. उद्या मला तुरुंगात पाठवले जाणार होते.

क्रमशः
उद्या मला तुरुंगात पाठवले जाणार होते.
--------------------------------------

मार्स्टर्न साहेबांनी चौकशीचा जो कांही फार्स केला त्याचे मला कांही नवल वाटले नाही. तो माणूस तसा कोणालाच आवडत नसे. दिवसभर वातानुकूलित कक्षांत खुर्ची उबवत बसणे आणि कोणत्याही कामांत विनाकारण लक्ष घालून चमत्कारिक निर्णय देऊन चालत्या गाडीला खीळ घालणे हे त्याचे उपद्‌व्याप. खरं पाहता मुदीर म्हणजे सर्वेसर्वा असतो. कंपनीचा मालक-शेख कधीही कामकाजांत अथवा निर्णय प्रक्रियेत लक्ष घालीत नसें. एकतर तो आणि त्याचा ज़नानखाना कांही सणावारापुरतेंच कतारमध्यें वास्तव्याला असत. एरवी इंग्लंड फ्रान्स अशा देशांत मौजमजा करीत कालक्रमणा करीत असें. सर्व प्रकारची मुखत्यारी (power of attorney) मुदीरला दिलेली असें. मुदीर जर मनांत आणतां तर या मार्स्टर्न साहेबालाही इंग्लंडला परत पाठवू शकला असता. पण तसें करणे तर दूरच, मुदीर मार्स्टर्न साहेबाला, त्याच्या मनमानीला किंचितसाही विरोध करू शकत नव्ह्ता. कारण मार्स्टर्न शेखच्या खास मर्जीतला माणूस होता. आणि ती मर्जीही अशा करतां कीं मार्स्टर्नची बायको इंग्लंडला एक यशस्वी पर्यटन व्यवस्थापक (travel task master) म्हणून व्यवसाय करीत होती आणि शेखच्या सर्व पर्यटनांची व्यवस्था ती बघत असे. पण तें कांहीं कां असेना, मुदीरचे तटस्थ वागणे मला आवडले नाही. कदाचित्‌ हा मामला त्याच्या दृष्टीने फार किरकोळ असेल. म्हणून तो कांही बोलला नसावा अशी मी मनाची समजूत करून घेतली. शेवटी ’याला आता तुरुंगात जाऊ देत’ असें मुदीर म्हणाला तेंव्हा त्याच्या चेहऱ्यावर एक मिस्कील स्मित मात्र नक्की होते.

उद्यापासून मला स्थानिक करागृहावर जावे लागणार होते. ज्या पद्धतीने ही बदली झाली होती ती उद्‌वेगजनक होती. गेले तेरा चौदा दिवस त्या पठाणाच्या सहवासांत काढलेले होते. आत्ता कुठें त्यांच्याशी मैत्री होऊ लागली होती. मी सदा माणसांच्या काळपात रमणारा माणूस होतो. पठाणांच्या सहवासात मी रमलो होतो. शिवाय त्या कार्यस्थळावर मी एकटा राजा होतो. एक मुदीरचा अपवाद सोडला तर बाकी कुणीही तिथे येऊन कामांत ढवळाढवळ केली नव्हती. नाही तर एरवी शहरालगत काम असले कीं कोणी ना कोणी येऊन फालतू चौकशी करणारच. आम्हा भारतीयांची संभावना, मग तो इंजीनियर कां असेना, चतुर्थ श्रेणी कामगारासारखी केली जायची. त्यामुळे मुख्यालयातून आलेला प्रत्येकजण जमेल तितकी टर्रेबाजी करण्याची संधी सोडीत नसें आणि आम्हाला मात्र नम्रपणे उत्तरे द्यावी लागत. ’ समर्थाचिये घरचे श्वान, त्यास सर्वही देती मान’ ही उक्ती मनांत ठेवावी लागे.

हे नव्याने जें काम मला दिले जाणार होते त्यात अशा आगंतुकांचाच काय पण कोणाचाच त्रास होणार नव्हता. कारण तेथील स्थानिक कारागृहांतील सध्याची वातानुकूल करणारी यंत्रणा काढून टाकून नवी यंत्रणा बसविण्याचे काम करावयाचे होते. हे काम आम्हाला (कंपनीला) मिळावे म्हणून मुदीर हरतऱ्हेने प्रयत्न करीत होता हे मला माहिती होते. या कामासाठी कॅरियर, मित्सुबिशी अशां सारख्या मातब्बर कंपन्यांनी निविदा दिलेल्या होत्या. पण तें काम आम्हालाच मिळाले होते याचा मलाही आनंद वाटत होता. कारागृहाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने काम करतांना अनेक बंधनात राहून काम करावे लागणार होते. तसें हें काम बऱ्यापैकी मोठे होते त्यामुळे निदान चार आठवडे तरी हा कारावास मला भोगावा लागणार होता. कारावासांत फारसे कैदी नसणार हे मी ऐकले होते पण कारागृहातील अधिक्षक, कर्मचारी यांच्या कथा मी ऐकून होतो. आरक्षी (पोलीस), जेलर, सैनिक वगैरे पदांसाठी सहसा येमेन, सूदान, इथिओपिया अशा देशातून आयात केलेल्या कृष्ण्वर्णीयांची भरती केलेली असें. या लोकांचे एकूणच रंग, रूप, देहयष्टी दहशत वाटावी अशी असें. त्यांच्या तावडीत जो सांपडला तो त्यांच्या लहरीपणाची आणि क्रौर्याची शिकार झालाच म्हणून समजा. अर्थात मला त्याचा त्रास होण्याची शक्यता नव्हती कारण आमच्या कंपनीचा शेख राजघराण्याशी संबंधित होता. त्यामुळे आम्हाला सार्वत्रिक वागणुक जरा आदरयुक्त मिळे. आम्हा सर्वांच्या मोटारीवर कंपनीचे नांव ठळकपणे रंगवलेले असें. त्यामुळे वाहतुक शाखेचे आरक्षी देखील आम्हाला विनाकारण अडवीत नसत. पण तरीही या नव्या राक्षसांसमवेत उद्यापासून काम करावयाचे होते. याचे थोडे दडपण मनावर आले होते. हे असें विचार घोळवीत माझी मोटार निवासापर्यंत कशी आली मला कळलेही नाही.

घरी येऊन जरा विसावतो न विसावतो तोच दूरध्वनी घणघणला. खरं म्हणजे मी आता इतका थकून गेलो होतो की आता अंघोळ आणि जेवण करून मी झोपी जाणार होतो. अगदी अनिच्छेने मी रिसीव्हर उचलला. क्षणभर माझ्याच कानावर माझा विश्वास बसेना. फोनवरचा आवाज मुदीरचा होता. माझी नजर सहजच घड्याळाकडें गेली. संध्याकाळचे आठ वाजत होते. इतक्या उशीरा नेहमीचा शिरस्ता मोडून मुदीर सारख्या आसामीने मला फोन करावा हे आक्रीत होते.

मुदीरने उद्या सकाळी सहा वाजतां मुखालयांत बैठक आयोजीत केली होती आणि तो मला प्रत्यक्ष बैठकी पूर्वी मी त्याला त्याच्या दालनांत भेटणार होतो. शेखच्या आणि मुदीरच्या दालनांची ख्याती आम्ही किंवदंतीच्या स्वरूपात अनेकांच्या तोंडून ऐकली होती. त्या दालनांचे स्थापत्य विशारदांनी चितारालेली आरेखनांच्या प्रती (architectural drawings) मी वतानुकूल अघियंता या नात्याने मी पहिलेली होती त्यामुळे मला दालनांच्या भूमितीची थोडी माहिती होती. एकट्या मुदीरचे दालन सुमारें सोळा हजार चौरस फुटांचे होते. दोन अभ्यागत कक्ष, दोन मजलिस (conference room) एक त्याचे स्वत:चे शिवाय त्याच्या सचीवांसाठी एक वेगळे कार्यालय. असें प्रशस्त आणि अत्यंत सुसज्ज असा मुदीरचा महाल होता. अशा काऱ्यालात मला उद्या जायला मिळणार ही कल्पनाच इतकी सुखद होती की कांही वेळेपूर्वीची उद्‌विग्नता कुठच्या कुठे पळून गेली. प्रत्यक्ष मुदीरची भेंट आणि तीही त्याच्या दालनांत! या अलभ्य लाभाच्या योगायोगाचे मला नवल वाटले.

आता हें सारं आक्रित माझ्या वीतभर पोटांत मावणे शक्य नव्हते. हे आता सडेफटिंग युनियनच्या कानावर न घालणे दंडनीय अपराध झाला असता. आणि दंड म्हणजे या महाभागांना एखाद्या मोठ्या उपाहारगृहात नेऊन जेवण द्यावे लागले असते. निवासी फोन केवळ पेशव्यांकडे होता. त्यांना फोन लावला तर समजलें की स.फ.यू. माझ्याच फोनची वाट होती. किशाच्या कंपनीतला कोणीतरी सुटीवर भारतांत जाऊन परत आला होता आणि सोलापूरहून किशाच्या घरून बेसनाचे लाडू, शंकरपाळे आणि चिवडा घेज़ुन आला होता. अशा गावाकडून येणाऱ्या खाऊच्या गाठोड्या जो आनंद देत असत तो अवर्णनीय असें. हा अनुभव घ्यायला परदेशीच जायला हवें. सगळा अनुत्साह मी कोपऱ्यात भिरकावून बेसनाचे लाडू खायला निघालो. तुकाराम महाराजांच्या ’शेवटचा दीस गोड व्हावा’ या अभंगात थोडा बदल करून मी म्हणत होतो ’दिसाचा शेवट तरी गोड व्हावा’.

क्रमश:
उद्या मला तुरुंगात पाठवले जाणार होते.
----------------------------------

रात्री किशाकडे लाडूचिवड्याचा फराळ तर झालाच पण मग जेवण्याचा आग्रहही झालाच. मग गप्पा आणि रमत गमत चाललेले जेवण यांत रात्रीचे दोन कधी वाजले तें समजलंच नाही. आता घरी कशाला जातोस, झोप इथेच असा आग्रह झाला नसता तरच नवल होते. पण माझ्या डोळ्यासमोर मुदीरचा मिस्किल चेहरा आला. उद्या सकाळी सहा वाजता त्याला भेटायचे होते. सहा म्हणजे अगदी सहा. इथे, मला एक अनुभव आला. व्यापार-उदीमावर आणि शासनावरही अद्याप ब्रिटीशांचा जबरदस्त प्रभाव असल्यामुळें वक्तशीरपणावर कटाक्ष असायचा. अगदी सुरुवातीच्या काळांत मला एकदां डेनिस हर्ले नांवाच्या ब्रिटीश अधिकाऱ्याची सकाळी नऊ वाजतां भेंट घ्यावयाची होती आणि मी जरा उशीराने, म्हणजे साडेनऊ वाजतां पोहचलो तर स्वारी दुसरीकडे निघून गेलेली होती. तेंव्हापासून मी वक्तशीर पणा कसोशीने पाळू लागलो. मला घरी जाऊन थोडी विश्रांती घ्यायला हवी होती. तरच उद्या सकाळी मी मुदीरच्या भेटीसाठी ताजा तवाना असणार होतो. मी निवासावर आलो आणि तात्काळ झोपी गेलो.

सकाळी सहाच्या आधी ठीक दहा मिनिटे आधी मी मुदीरच्या कक्षापाशी पोहोचलो. नेहमीचे कार्यालयीन कामकाज सात वाजतां सुरु होत असे. मी एक तास आधी आलो असल्याने मुदीरची स्वीय सहायिका तिच्या जागेवर भेटणार नव्हतीच. काय करावें, सरळ मुदीरच्या कक्षात जावें की न जावें या विचारात असतांनाच पाठीवर एक दणदणीत थाप पडली.दचकून वळून पाहातों तो मुदीर! मला या माणसाची मोठी मजा वाटली. आतिशय कर्तव्यकठोर, कडक, रुक्ष अशी याची प्रतिमा रंगवली गेलेली होती. आणि इथे हा कांही निराळाच दिसत होता. आम्ही दोघे त्याच्या स्वीय कक्षांत जातांच सर्वप्रथम या माणसाने कार्यालयाच्या कोपऱ्यातील छोटेखानी अन्नपूर्णा (cafeteria) मधील कॉफी यंत्र सुरु करून दोन प्याले कॉफी करून आणली आणि मग कॉफीचे घुटके घेत घेत संभाषणाला सुरुवात झाली. आधी तो त्याच्या स्वत: बद्धल आणि मग कारागृहाच्या कामाबद्ध्ल बोलला.

तो आर्मेनियन होता. पण बरीच वर्षे इंग्लंडमधे होता. तेथूनच त्याने व्यवसाय-व्यवस्थापनाची पदवी मिळवली होती. अरेबिक, पर्शियन आणि आङ्ग्ल वाङ्ग्मयाचा व्यासंगी वाचक होता. भारताबद्धल, भारतीय संस्कृती बद्धल कुतुहल होते. त्यामुळेच तो माझ्याशी ममत्वाने वागत होता. त्यांच्या प्रमाणे मी रोज नमाज़ (प्रार्थना) पढतो की नाही आणि पढत असेन तर कसा याबद्धल त्याला जिज्ञासा होती. त्याच्या निवासावर तो एकदा मला नेणार होता आणि मी त्याला हिन्दी (हिन्दू) नमाज़ पढून दाखवणार होतो.

कारावासातील वातशीतक यंत्रांचे काम वस्तुत: एका जपानी उद्योग समूहाकडे जाणार होते. मुदीरने मोठ्या युक्तीने मिळविले होते. त्यामुळें ते व्यवस्थितपणे पार पडणे हा त्याचा प्रतिष्ठेचा मुद्दा होता. वीजवाहिनी टाकण्याच्या कामांतील माझा सहभाग आणि माझी कामाची पद्धत त्याला आवडलेली होती. मी कार्य-व्यवस्थापनाचे (works management) विधिवत्‌ शिक्षण घेतले असावे असा त्याचा समज होता. म्हणूनच ही नवी जबाबदारी मी नीट पार पाडेन असा त्याला विश्वास वाटत होता. पण तसें कांहीही नव्हते उलट मी भोळा, भित्रा (timid) आहे अशी माझी ख्याती होती. डोंगऱ्याने तर मला ’भोटमामा’ अशी उपाधी दिलेली होती. त्या कृष्णवर्णीय कारागृह अधिक्षकांचे सहकार्य मिळवून तें काम पार पाडणे अवघड होते. पण मी जर पठाणांना कामासाठी हवे तसें वळवू शकलो तसा या अर्ध-यवनांनांकडून (half mohomadian) देखील सहकार्य मिळवू शकेन असें त्याला वाटत होते. मुदीर मला शक्य ते सहकार्य़ करणार होता. पण ते काळे होते आणि हा त्यांच्या दृष्टीने गोरा होता. म्हणजे त्या वर्णद्वेषाला तोंड देत देत मी काम करणार होतो. मीच तें काम यशस्वीपणे हाताळू शकेन असें त्याला ठामपणे वाटत होते. मी ते काम तडीस नेले तर मला एक रोख रकमेची खास बक्षीसी मिळणार होती. मुदीर माझी जी स्तुती करीत होता ती मनापासून होती की स्वार्थापोटी होती कुणास ठाऊक. मला मात्र त्या भल्या रामप्रहरांत घाम फुटायला लागला होता. मी मुदीरच्या मोटारीत बसून कारागृहाकडे निघालो तेंव्हा बळी जाणाऱ्या बोकडाला जसें खाऊपिऊ घालून वर सजवतात तसा मी एक बोकड आहे असें मला वाटायला लागले.

कारागृहापर्यंत पोहोचेपर्यंत भांबावलेल्या मन:स्थितीतच होतो. राहून राहून एकच विचार मेंदू पिंजून काढीत होता तो म्हणजे ही असली ससेहोलपट माझ्याच वाट्याला कां यावी. माझे बाकी मित्र त्यामानाने बऱ्यापैकी स्वस्थतेची नौकरी करीत होते. बाकीचे इथें आले तसें छोट्या नाजुक मोटारी चालवीत होते. माझ्या वाट्याला पहिले वाहन आले होते, ते म्हणजे लॅन्डरोव्हर नांवाची युद्धांत वापरली जाते तशी मोटार. ती मी पहिल्यांदा पाहिली तेंव्हा मला माझ्या लहानपणी हनुमान जयंतीला गांवाबाहेरच्या एका मोठ्ठ्या पटांगणांत रेड्यांच्या टक्करी होत, त्या आठवल्या. त्यातला धष्ट पुष्ट माजवलेला आणि मद्य पाजून टक्करीसाठीं चेव आणवलेला, नाक आकाशाकडे करून फुरफुरणारा रेडा आणि ही लॅन्डरोव्हर ही दोन्हीही ब्रह्मदेवाने एकाच मुशीतून काढल्या असाव्यात. ती लॅन्डरोव्हर काय आणि आता हे कारागृहाचे काम काय, माणसांना भेदरवून टाकणाऱ्या यच्चयावत्‌ गोष्टी माझ्यासाठींच जन्माला आलेल्या असाव्यात.

’भित्यापाठीं ब्रह्म राक्षस’ ही म्हण सार्थ व्हावी अशी घटना कारागृहाच्या तोंडाशीच घडली. आम्ही दोघी एका महाकाय बंद दरवाजापाशी पुरतें पोहोचण्यापूर्वीच,

" हेय्‌ ! व्हाऽट्‌ड्या ठिंक यूऽआ‌ऽऽ डूऽईंऽग हिय्‌आऽऽऽऽऽ?"

असा एक ध्वनिस्फोट कानावर येऊन आदळला. आवाजाचा उगम, एक सुमारें सव्वासहा फुटी, गडद काळपट निळ्या गणवेशांत अगदी फिट्ट बसवलेली काळी कभिन्न देहाकृती होती. तो तेथील सर्वप्रमुख अधिक्षक होता आणि आम्हाला पाचारण करण्यासाठीं स्वत: जातीने बाहेर आला होता. या माणसाचे नांव ’इदी जमील थुंबाना’ होते. खरं म्हणजे, जमील या शब्दाचा अर्थ ’सुंदर, सौंदर्य’ असा होतो पण इथें याच्या शेजारी उभा केला असता तर आपला धर्मेंन्द्र अगदी मदनाचा पुतळा दिसला असतां. त्याचे डोळे, नाक, गाल, ओठ जितके जाड होते तसा त्याचा आवाज आणि स्वरही तितकाच जाड होता. मुदीरची आणि त्याची थोडावेळ अरबी भाषेंत बातचीत झाली. मग त्याची नि माझी रीतसर ओळख झाली. मग त्याच्या कार्यालयांतील इतर लोकांची ओळखदेख झाली. मी, तसेंच उद्यापासून माझ्या देखरेखीखाली काम करण्यासाठीं मला देण्यात येणारे चार कर्मचारी यांच्यासाठीं आवश्यक ती कागदपत्रें, ओळख पत्र इत्यादि देण्यात आले. एव्हाना सकाळचे नऊ वाजत आले होते. आमच्या परतीच्या प्रवासांत मी सहज म्हणून तो कागद पत्रांचा लिफाफा उघडून, उद्यापासून मला सहाय्य करणाऱ्या चारही कर्मचाऱ्यांची नांवे वाचू लागलो तर आश्चर्याचा सुखद धक्का बसला.
ती चारही नांवे मराठी होती. सावंत, सुर्वे, कांबळी आणि महाडिक. म्हणजे चक्क कोकणी ’गांवकर’! मी हळूंच मुदीरकडें पाहिले. मुदीरच्या चेहऱ्यावर तेंच मिश्किल हसूं होतें. या माणसाच्या व्यवस्थापन कौशल्याला मी मनोमन सलाम ठोकला.

मुख्यालयांत येईपर्यंत जेवणाची सुटी होत आली होती. आतां दुपारच्या वेळांत उद्याच्या कामाची आंखणी करावी. साधने, सामुग्री यांची पहाणी करवी असा विचार करीत असतांनाच मुदीर म्हणाला " जा आतां घरी जाऊन मस्त झोप. विश्रांती घे. उद्यापासून तूं गजाआड असणार आहेस." असं म्हणून तो गडगडूम हसला. आता मात्र मला या माणसाच्या स्वभावाची बऱ्यापैकी कल्पना आली.



ती चारही नांवे मराठी होती.
----------------------------------------
मुदीर जरी मला घरी जाऊन आराम कर म्हणाला होता तरी मी कारागृहाच्या कामाचे आरेखन, नकाशे, त्या कामासाठीं निवडली गेलेली संयंत्रे, त्यांच्या माहिती-पुस्तिका पाहावीत या उद्देशाने कार्यालयातच कांही वेळ बसणे पसंत केले. सध्या कारागृहात कॅरियर कंपनीची संयंत्रे बसविलेली होती. ती कारागृहाच्या मध्यवर्ती कार्यालयाला थंड हवा पुरवीत होती. कालांतराने आणखी कांही कक्ष विस्तारित केले गेले होते. त्यातील खोल्यांना गवाक्ष-वातशीतक (window airconditioners) बसवले गेले होते. त्यांची संख्या सुमारे चाळीस होती. त्यातील कांही नादुरुस्त होते. त्यांची दुरुस्ती करण्यापेक्षा तो विस्तारित प्रभाग मध्यवर्ती वातशीतक घटांना (central airconditioning plant) जोडून द्यावयाचा होता. अर्थात्‌च नवीन वात-वाहिकांची ( air circulating ducts) उभारणी करावयाची होती आणि सध्याची संयंत्रे काढून त्या ऐवजी मोठी अधिक क्षमतेची संयंत्रे बसवावयाची होती. या साऱ्या योजनेची आरेखने मी नीट पाहून घेतली. ही योजना ज्याने आंखली होती त्या विल्यम्‌स क्लार्क या अभियंत्याला मी भेटलो. जी चार माणसें माझ्या बरोबर हे काम करणार होती त्यांनाही मी मुख्यालयांत बोलावून घेतले.

गजानन सावंत, केशव सुर्वे, महादू कांबळी आणि वामन महाडिक अशी ती मंडळी होती. गजानन सावंत, केशव सुर्वे हे दोघे चांगले अनुभवी होते. मुंबईला त्यांनी व्होल्टास मधे काम केलेले होते. महादू कांबळी आणि वामन महाडिक हे दोघे मात्र नवीन होते. त्यांना अनुभव फारसा नव्हता. त्यांनी नौकरी मिळवितांना, कामाच्या प्रत्यक्ष अनुभवाची जी प्रमाणपत्रें सादर केली त्यावरील व्यावसायिकाचे नांव माझ्या परिचयाचे नव्हते. पण मुंबईतील सर्वच तत्सम व्यावसायिक मला माहिती असण्याची शक्यता नव्हती म्हणून मी त्याचा फारसा विचार केला नाही. त्या सर्वांना मी सकाळी दुसऱ्या दिवशी साडेसहा वाजता तयार राहावयास सांगितले. त्यांना त्यांच्या कामगार तळावरून (labour camp) मी कामाच्या ठिकाणी घेउन जाणार होतो. त्यासाठीं मला एक छोटी मालवाहू मोटार (pickup van) देण्यात आली.

दुसरें दिवशी सकाळी मी कामगार तळावरून ही फौज घेउन कारागृहाकडें कूच केले. मुदीर परस्पर तेथें आला होता. तो आज आमची सर्वांची तेथें व्यवस्था लावून देणार होता. ओळखपत्रें, कार्य-अनुज्ञा (work permit) तेथील मुख अधिक्षकाकडें सुपुर्त करणे इत्यादि सोपस्कार पार पडे पर्य़ंत हे चार जण कांवऱ्या बावऱ्या नजरेने तो परिसर न्याहाळीत होती. त्यांना विधिवत्‌ आंत दाखल करण्यापूर्वी नियमाप्रमाणें त्यांनी आपली झडती देणे गरजेचे होते. या कामासाठीं तेथील दोन आरक्षी त्यांना आंत घेऊन गेले, मी व मुदीर इदी जमीलशी बोलत बसलो. इदी जमीलला इथें सगळे केवळ इदी नांवाने संबोधित होते.

इथें हा इदीच केवळ इंग्रजी बोलू शकत होता. बाकी सारे अरेबिक भाषिक. या कामगारांना तपासणी कक्षांत जाउन कांहीं मिनिटेंच झाली असतील नसतील इतक्यात आंतून मोठमोठ्याने बोलण्याचा आवाज येऊ लागला. आधी इदी तिकडें धावला आणि त्याच्या पाठोपाठ आम्ही दोघें. ही कोकणी जनता आणि तें कृष्णवर्णीय आरक्षी यांच्यामधें तुंबळ भांडण सुरू झाले होते. आम्ही आंत गेल्यावर आधी सगळ्यांना शांत व्हायला सांगितले. मी त्या चारही जणांना जरा बाजूला घेतले आणि काय झालें तें विचारू लागलो.

महादू आणि वामन फारच प्रक्षुब्ध झालेले होते आणि संतापाने थरथरत होते. मी विचारले, "काय झाले?" महादू पुढें झाला. सांगू लागला,

" हा काम माका नाही जमायचा. मेले कपडे काढा म्हणालें.मिया सांगान ठेंवतंय. मेल्यांची नजर कांही ठीक नाहीं असां. हांऽ! "

" गप्प रहा " मी ओरडलो आणि कपाळावर हात मारून घेतला. काय सांगावं आता यांना. अरे बाबांनो हा तुरुंग आहे आणि सुरक्षिततेच्या नियमाप्रमाणे आंत जातांना झडती द्यावीच लागते. हे मी त्यांना सांगत होतो इतक्यात इदी आमच्या जवळ आला आणि कडाडला,

" चालते व्हा तुम्ही सगळे इथून. या मूर्ख माणसाच्या खिशात कांही तरी आहे. कदाचित्‌ बॉम्ब! नाही, मी तुम्हाला काम करायची परवानगी देऊ शकत नाही."

एव्हाना बाकी आरक्षी आणि मुदीर यांच्यात अरेबिकमधें चर्चा चालू होती. नंतर मुदीर माझ्या पाशी येऊन ओरडू लागला. त्याच्या चेहऱ्यावरच्या मिश्किल भावाने आता क्रुद्ध स्वरूप धारण केले होते. तो गरजला,

" काय तमाशा आहे हा? हा माणूस झडती कां घेऊन देत नाही? काय आहे याच्या खिशात? आणि ते मला कांही माहीत नाही. या कामाची सुरुवात अशी झालेली मला खपणार नाही. ही माणसें बऱ्या बोलाने काम करत असतील तर ठीक आहे. नाही तर मी या माणसांना इथल्या इथें याच तुरुंगात डांबण्याची व्यवस्था करतो.
आणि, अरे देवा, मी कां ही डोकेफोड करतो आहे. तें मला कांही माहिती नाही. काम झाले पाहिजे म्हणजे झालेंच पाहिजे. काय करायचे तें तुझं तू ठरव. मी चाललो."

असं म्हणून मुदीर निघून गेला आणि आता काय करावें या विचारात पडलो. विचार केला, प्रश्न झडतीचा आहे. काढूं काहिंतरी मार्ग. मी इदीला म्हणलो,

" घ्या तुम्ही झडती. माझ्या देखत घ्या. यांच्या खिशात बॉम्ब सांपडला तर तुम्ही याला गोळ्या घाला. मी कांहीही म्हणणार नाहीं. मग तर ठीक आहे ना?"

इदीने माझ्या प्रस्तावाला मान्यता दिली आणि झडती सत्र सुरूं झाले. महादू कांबळीला मी मुद्दाम मागे ठेवले आणि बाकी तिघांची तपासणी सुरु झाली. धातूशोधक यंत्राच्या (metal detector) तपासणीतून ते तिघे निरपवाद पार पडले मग अंगझडतीही वरवर झाली. आता पाळी आली महादू कांबळीची. तो धातुशोधकापाशी जातांक्षणी ते यंत्र धोक्याचा इशारा देउ लागले. महादूचा चेहरा आक्रसला. तो आरक्षींना अंगाला हात लावू देणार नाही हे माझ्या लक्षांत येताच मीच पुढें होऊन महादूच्या खिशाला हात घातला आणि तो ’बॉम्ब’ बाहेर काढून टेबलावर ठेवला. तंबाखूची डबी होती ती.

क्रमश:
निवेदन: मध्यंतरी प्रकृतिअस्वास्थ्यामुळे आखाती मुशाफिरीचे क्रमश: सादरीकरण खंडित झाले होते. ती मालिका पुन्हा सुरूं करीत आहे.
---
सिंहावलोकन: मी दोहा-कतारच्या कारागृहांत वातानुकूलिक यंत्रे बसविण्यासाठीं चार कामगार घेउन गेलो. महादू नांवाच्या एका कामगाराने अंगझडती घेणार्‍या अधिकार्‍याशी तंटा केला. महादू आरक्षींना अंगाला हात लावू देणार नाही हे माझ्या लक्षांत येताच मीच पुढें होऊन महादूच्या खिशाला हात घातला आणि तो ’बॉम्ब’
(संशयास्पद वस्तू) बाहेर काढून टेबलावर ठेवला. तंबाखूची डबी होती ती!
---
या नवीन कामाची सुरुवातच अशी झालेली पाहून मी तर धास्तावून गेलो. सावंत, सुर्वे, कांबळी, महाडिक ही सगळी माणसें मराठी, मीही मराठीच; एक चांगला संघ (team) तयार होईल, काम सुरळीत होईल असा माझा समज होता. पण ते चुकीचा ठरतो की काय अशी शंका वाटायला लागली. पण एवढ्या लहानशा प्रसंगाने डगमगून जायचे नाही असे मी मनाला बजावले आणि पुढे सरकलो. त्याचवेळी मी माझ्या वागणुकीचे धोरण बदलण्याचे ठरवले. मराठी माणूस तसा गप्पिष्ट असतोच आणि इथे तर मंडळी कोकणातली. मग तर विचारायलाच नको. पठाण निदान मी सांगेल ते निमुटपणे ऐकत तरी होते. कारण त्यांच्यात चिकित्सक वृत्ती नसावी आणि असली तरी तिच्यापेक्षा आज्ञाधारक वृत्ती अधिक होती. मराठी माणसे कामापेक्षा गप्पांत अधिक रमतात. यांत कांही शंका असण्याचे कारण नव्हते.

कामाची सुरुवात कशी करावी याचा मी मनात थोडा विचार केला आणि सध्याच्या कामाचे स्वरूप तसेंच नव्याने करावयाच्या कामाची रूपरेषा समजाऊन सांगण्यासाठी या चारही सहकाऱ्याना मी सर्व्हिस शाफ्ट कडे घेऊन गेलो. साधारणत: रुग्णालये, न्यायालये,कारागृह, अशा इमारतींना, जेथे अनाहूत-अभ्यागतांना (stray-visitors) प्रवेश निषिद्ध असतो त्या ठिकाणी मूळ इमारती बाहेरून एक विस्तारित मार्गिका (service gallery extension) काढलेली असते. या मार्गिकेतून नळ-पाणी, वीज वाहिनी, वात वाहिका यांची योजना केलेली असते. म्हणजे जर विजेचा दिवा अथवा विजेवर चालणारे एखादे उपकरण कार्मिक कक्षात असेल तर त्याची कळ (switch) या बाहेरील मार्गिकेत असतो. त्यायोगे मूळ कक्षातील माणसांच्या संपर्काशिवाय त्यांना दिलेल्या सुविधांची देखभाल करता येते. त्यामुळे कारागृहातील कैदी अथवा अन्य कोणी आम्हाला दिसणे शक्य नव्हते.

मी त्या मार्गिकेतून ही चार डोकी घेऊन जात होतो आणि जाता जाता कामाचे स्वरूप समजाऊन सांगत होतो. प्रत्यक्ष जागा मीही प्रथमच पाहात होतो. त्या आधी मी केवळ आरेखनेच पाहिली होती. सावंत आणि सुर्वे नीट लक्ष देऊन ऐकत होते. कारण कारागृहाचे काम जरी ते प्रथमच पहात होते तरी भारतात अनेक मोठ्या इमारतीमधील वातानुकूलित कामाचा त्यांना अनुभव होता. महाडिक आणि कांबळी यांना कामाचा अनुभव आहे असे कगदोपत्री जरी दाखवले गेले होते तरी त्यांच्या वयावरून आणि त्यांच्या हालचालीवरून ते कांहींसे नवखेच दिसत होते.

जिथे वात वाहिका (air ducts) आणि इतर उपकरणे बसवावयाची होती तो परिसर पाहून झाला तसे आम्ही वात-शीतक घटाकडे(ACU= air-cooling units) वळालो. तिथे सध्या एक कॅरियर कंपनीचे 100 TR क्षमतेचा एक वात-शीतक घट बसविलेला होता. तिथे आम्ही पोहोचलो मात्र महादू आणि वामन हे आमचे आघाडीचे बिनीचे शिलेदार पुढे सरसावले. महादूच्या चेहऱ्यावर एक खास कोकणी कुतुहल आणि वामन अजूनही जत्रेत हारवल्यासारखा. तेथील एका लहाम मालमोटातीच्या आकाराच्या संयंत्राला एक प्रदक्षिणा घालून झाल्यावर वामनने सर्वात आधी तोंड उघडले,

" हे काय आहे हो साहेब?"

हे एक हवा थंड करणारे मशीन आहे. यात थंड झालेली हवा याला जोडलेल्या डक्टमधून आतल्या विभागात नेली जाते आणि तेथील निरनिराळ्या खोल्यांत पसरविली जाते, अशी माहिती मी देऊ लागलो इतक्यात महादूने एक बॉम्ब टाकला,

" पण मग याचा काऽय कराचा? आणि हवा कुठूनशी येणार याऽत? "

यावर आ वासून पाहाण्यापलिकडे आणखी कांही करणे मला सुचले नाही. महादू-वामन या दोघांनी कामाच्या अनुभवाची जी प्रशस्तिपत्रके सादर केली होती त्यात, त्यांनी अशी वातानुकूलित सेवा पुरविणार्‍या ’हाजी-मुसा पत्रावाला’ नावांच्या सुप्रसिद्ध समूहात कुशल कारागीर म्हणून काम केल्याचा उल्लेख होता. अर्थात्‌ ती प्रशस्तिपत्रके नकली होती यात आता शंका राहिली नाही. या दोघांना जर या कामाची कांहीच माहिती नसेल तर मला गंभीर समस्येला तोंड द्यावे लागणार होते. इतका वेळ कांहींच न बोललेल्या सावंत आणि सुर्वे या दुकलीकडे मी प्रश्नार्थक नजरेने पाहू लागलो. सुर्वे पुढे झाला. खरा प्रकार काय आहे ते सांगू लागला.

आखातात नौकरी मिळवून देण्याचा धंदा करणार्‍या एका एजंटामार्फत ही चौकडी आलेली होती. पासपोर्ट, व्हिसा, इत्यादि आवश्यक कागदपत्रांची व्यवस्था तर त्याने केलेली होतीच पण शिवाय अनुभवाचे दाखलेही त्यानेच उपलब्ध करून दिलेले होते. अर्थात्‌च ते नकली होते. अजून कामाला सुरुवातही झालेली नव्हती आणि त्यात ही समस्या. पण काहीही करून हे काम वेळेवर सुरू होऊन वेळेवर संपणे महत्वाचे होते. कारण निर्धारित कालावधीत हे काम पूर्ण झाले नाही तर पुढे दंड (penalty) सुरु होणार होती आणि तो दिवसागणिक वाढणार होता. मी वरकरणी शांत रहात संपूर्णत: बंद असलेली गवाक्ष वात शीतके काढून घेण्याच्या कामाला सगळ्यांना लावले. सावंत आणि सुर्वे यांना या कामाचा अनुभव होता म्हणून त्यांनी कामाचा पुढाकार घ्यावा आणि कांबळी, महाडिक यांनी त्याना मदत करावी अशी योजना केली आणि झाल्या प्रकारची मुदीरला कल्पना द्यावी म्हणून फोन करण्यासाठी इदीच्या कक्षाकडे वळालो.

इदी आणि आणखी एक कृष्णवर्णीय आरक्षी टेबलावर बुद्धीबळाचा पट मांडून बसले होते. आता इथून फोन करावा तर मुदीरशी इंग्रजीत बोलावे लागणार आणि इदीचे इंग्रजी तसे चांगले असल्याने इदीला माझी समस्या समजणार ही एक नवी समस्या निर्माण झाली. इतक्यात फोनची घंटी वाजली. इदीने समोरच्या पटावरील नजर जराही न ढळवता फोन घेतला आणि कांही न बोलता फोनचा रिसीव्हर माझ्यासमोर धरला. फोन मुदीरचा होता. या योगायोगाचे मनात आश्चर्य करीत मी फोन घेतला. मुदीर कामाची प्रगती विचारीत होता. काय सांगणार होतो मी! जमेल तितक्या सावधानतेने मी बोलत होतो. पण मुदीरला त्यातून कांही वास लागला असावा. तो स्वत:च इकडे येतो म्हणाला.

मुदीर कांही वेळात आलाच. मी झाला प्रकर सांगितला आणि मला दुसरे कामगार द्यावेत अशी विनंती केली. पण ते शक्य नव्हते. कारण नवीन कामगारांसाठी थेट मंत्रालयातून नव्याने परवानगी मिळणे दुरापास्त होते. अखेर याच कामगारांकडून काम करून घ्यावे लागणार होते. मात्र मला एक गोरा मदतनीस देण्याचे कबूल करून मुदीर परत गेला.

मी परत कामाच्या ठिकाणी गेलो तर तिथे आता आणखी नवाच प्रकार घडलेला. करगृहाचे दोन आरक्षी आणि आमचे कामगार यात पुन्हा एक भांडण लागलेले. जुनी यंत्रे काढण्यापूर्वी नवी यंत्रे दाखवा अणि मगच जुन्या यंत्रांना हात लावा असा कांहीसा वेडगळ हट्‍ट घेउन ते आरक्षी पुन्हा महादूशी भांडत होते. त्यात त्यापैकी एकाने फुरफुरणार्‍या महादूला जरा मागे हटावण्याचा प्रयत्न केला काय अन्‌ महादू जो चवताळून उठला तो एकदम त्या धिप्पाड, काळ्याकभिन्न नरपुंगवाशी झोंबाझोंबीच खेळू लागला. मी ती कशी बशी सोडविली आणि त्या दोघां आरक्षींना तेथून जाण्याची विनंती केली.
ते जाताच मी महादूला फैलावर घ्यायला सुरुवात केली. मी म्हणालो,

’ हे पहा कांबळी, तुम्ही इथे फक्त काम करण्यासाठी आलेले आहात. तुम्ही अजून नवीन आहात म्हणून तुम्हाला कांही माहिती नाही. एक लक्षांत ठेवा. तुम्ही इथल्या विमानतळावर उतरल्या उतरल्या तुमचा पासपोर्ट कंपनीकडे जमा झालेला आहे. तो तुमचा किमान दोन वर्षाच करार संपेपर्यंत तुम्हाला परत मिळणार नाही. आणि त्याच्याशिवाय तुम्ही परत भारतात जाऊही शकणार नाही. एकतर बर्‍या बोलाने मुकाट जे जमेल ते काम करा नाही तर दोन वर्षे पूर्ण होईतो याच जेलमधे सडत पडा. काय करायचे ते तुमचे तुम्ही ठरवा. आजचा सगळा दिवस तुम्ही खराब केला आहे. उद्यापासून हा असला तमाशा मला चालणार नाही."

हे ऐकताच महादू हमसा हमशी रडूंच लागला आणि बडबडू लागला, " कपालच फुटला माजा सायबा. मला परत घरी जांव द्या. हा काम काय मला जमाचा नाय. तो एजंट बोलला का तुला डावरची नौकरी देतो. ऐश करशीन. कसचा डायवर आन्‌ कसची ऐश. तुमी तर आता मला जेलात घालायला निघाले."

" अरे, मी तुला काम कर म्हणालो. काम करशील तर काम शिकशील ना. आणि काही तरी शिकून काम करशील तर कोण तुला जेलात घालील. बघ बाबा. तु मराठी म्हणून मी जमेल तेवढी मदत करीन. बाकी मग तू जाणे अन्‌ तुझं नशीब जाणे." मीही जरा वैतागूनच बोललो.

केशव सुर्वे पुढे झाला. म्हणाला, " जाऊ द्या साहेब. माणूस नवीन नवीन असाच बावचळतो. उद्या पासून नीट काम करील तो. मी काळजी घेईन त्याची."

केशवने महादूलाच काय पण मलाही धीर दिला असेच मला वाटले. आता उद्या पासून एक गोराही आमच्यात सामील होणार होता. आता पर्यंत तरी ही झाकली मूठ सव्वा लाखाची होते असें म्हणावे अशी परिस्थिती होती. उद्यापासून मला तीन निरनिराळ्या रंगाची माकडे संभाळायची होती. तीन काळी. चार लाल मातीतली आणि एक थेम्सच्या कांठावरचा गोरा हुप्प्या.

क्रमश:
उद्यापासून मला तीन निरनिराळ्या रंगाची माकडे संभाळायची होती.
तीन काळी. चार लाल मातीतली आणि एक थेम्सच्या कांठावरचा गोरा हुप्प्या.
----------------------------------------------------------------

नव्याने येणार्‍या गोर्‍या माणसाबद्धल मी गोरा हुप्प्या असे म्हणालो होतो ते विनोदाने म्हणालो होतो हे जरी खरे असले तरी त्या मागे अनुभवाची एक कटुताही होतीच. या देशाला ब्रिटिशांनी जरी स्वायत्तता बहाल केली असली तरी नवनिर्माणाच्या प्रक्रियेत आपले वर्चस्व ठेऊनच. बहुतेक सर्वच क्षेत्रात गोर्‍यांचा वरचष्मा जोपासलेला होताच. स्वदेशात एका तेलाखेरीज अन्य कांही उत्पादन होणे अशक्यप्राय होते आणि त्या मुळे बर्‍याचशा बाबतीत आखाती देश गोर्‍यांवर अवलंबून होते आणि ज्या गोष्टी स्वदेशांत उत्पन्न होत नव्हत्या त्या गोर पुरवीत होते. नव्हे, घ्यायला अरबांना भाग पाडीत होते. वरच्या श्रेणीचे तंत्रज्ञान आणि तंत्रज्ञ गोरेच पुरवीत होते आणि तेही अगदी दादागिरीने. बरे हे गोरे तंत्रज्ञही फार कांही वकूबाचे असत असे नाही. अगदी सुमार दर्जाची गोरी माणसे तिकडून इकडे पाठवली जात आणि केवळ गोरे आहेत म्हणून दादागिरीने वागत. आशियाई लोकांना तर ते अगदी कस्पटासमान वागणुक देत.

स्टुअर्ट मार्शल नावाचा हा नवीन गोरा मला मदतनीस म्हणून पाठवला गेला होता तरी तो माझा वरिष्ठ असल्यासारखाच वागणार हा माझा अंदाज खोटा ठरणार नव्हता. आल्या आल्याच त्याने त्याच्यासाठी वेगळ्या कक्षाची (cabin) मागणी केली. कारागृहातील काळ्या अधिकार्‍यांनीही तत्परतेने तशी सोय करण्याची, त्याच्या तुष्टिकरणाची लगबग चालू केली. स्टुअर्टने सर्वप्रथम माझ्याकडून प्रकल्पाचे कागदपत्र, नकाशे मागून घेतले आणि ते सारे घेऊन त्याला दिलेल्या कक्षात जाऊन बसला. वर म्हणाला, ’मी हे सर्व कागद पत्र पाहून मगच कामाबाबत सूचना देईन. तो पर्यंत तुम्ही कांही करू नका, स्वस्थ बसा.’

खरं म्हणजे या गृहस्थाची माझ्याशी अजून औपचारिक ओळखही झालेली नाही आणि हा असा इतका उद्धटपणे बोलतो आहे याचा मला राग आला होता. पण मला त्याच्याशी वाद घालायचा नव्हता. त्यापेक्षा कामाचे बोलावे म्हणून मी म्हणालो,

" असें कसें करता येईल? आधीच खूपसा वेळ वाया गेलेला आहे. कामाची सगळी योजना मी अभ्यासली आहे आणि काम सुरूही झालेले आहे. माझ्याकडे मनुष्यबळ थोडे कमी आहे. म्हणून तुला पाचारण करण्यात आले आहे. कागदपत्र नंतर पाहता येती. किंबहुना ती पाहण्याची गरजही नाही. तू सरळ कामाच्या ठिकाणी आलास तर ते जास्त चांगले होईल. तू वातवाहिकेच्या (ducts) कामात तरबेज आहेस असे मला सांगण्यात आले आहे. तेंव्हा तू तुझे काम सुरु केलेस तर ते अधिक बरें होईल. त्यासाठी मी तुला दोन माणसे देतो."

त्यावर साहेब मजकुरांचा चेहरा लालीलाल तर झालाच पण वर ते कडाडले, " तू कोणा समोर हा बकवास करतो आहेस याची तुला जाणीव आहे का? मी सांगेन तेंच आणि तेवढेच तुला करावे लागेल नाही तर चालता हो येथून."

हे असें कांही होणार याचा मुदीरला अंदाज असावा. कारण स्टुअर्टची ही बडबड चालू असतांनाच मुदीर कधी येऊन ठेपला हे कळलेच नाही. आमच्या त्या संभाषणाकडे त्याचे लक्षही नाही असें दाखवत मुदीर म्हणाला,

" तुला आता एक चांगला मदतनीस मिळाला. चला आता काम सुरळीत पडेल अशी मी आशा कारायला हरकत नाही. हो ना हरून ?"

" हा माझा मदतनीस आहे? अरे देवा, मला तर हा सर्वात मोठा, अगदी तुमच्यापेक्षाही फार मोठा अधिकारी आहे असें वाटते आहे. निदान त्याच्या वागण्यावरून तरी तसेच दिसते. " मी जरा छद्मीपणानेच म्हणालो.

" जे झाले ते विसरून जा माझ्या मित्रा. खरं म्हणजे चूक माझीच आहे. मीच आधी ओळख करून द्यायला हवी होती. पण मला जरा उशीर झाला. जाऊ दे आता. हा स्टुअर्ट मार्शल. हा वातवाहिकेचे काम चांगल्याप्रकारें जाणतो. मध्यवर्ती वातानुकूलनाच्या (central air conditioning) कामात तुला हा मदत करील. आणि स्टुअर्ट, हा हरून. या कार्यभागचा प्राधिकारी (site in-charge)"

मुदीरने बाजू सांवरत औपचारिक ओळख करून दिली. त्याने शेवटच्या शब्दावर विशेष जोर दिला होता, हे माझ्या लक्षांत आले. यावर स्टुअर्टने त्याच्या उद्धटपणाबद्धल माझी माफी मागावी असे म्हणावे असे मला वाटले. पण तेवढ्यात स्टुअर्टने हस्तांदोलनासाठी हात पुढे केला. एवढेच नव्हे तर त्याने माझी माफीही मागीतली.
मग तो विषय तेथेच संपला.

मी गजानन सावंत आणि वामन महाडीक या जोडीला स्टुअर्टकडे दिले. गजानन अनुभवी होताच शिवाय त्याला इंग्रजी बोलले थोडे समजत होते. वामनला अनुभव नव्हता पण तो थोडा शांत स्वभावाचा होता. खरं म्हणजे वामन आणि गजानन चे जोडी छान जमली होती. पण ती जोडी तोडायची नाही तर मग महादूला स्टुअर्टकडे द्यावे लागले असते, आणि महादूने स्टुअर्ट बरोबर कोकणातले दशावतारी खेळ्ये केले असते. म्हणून सुर्वे-महादू ही जोडी घेऊन मी गवाक्ष-वातशीतक (window air-conditioners) बदलण्याचे काम सुरू केले. अर्थात्‌च स्टुअर्टने वातवाहिकेचे काम स्वतंत्रपणे सांभाळावे ही अपेक्षा होती.

सुर्वे-महादू या जोडीला नीट कामाला लाऊन मी स्टुअर्टच्या कामाकडे गेलो. कामाच्या जागेवर स्टुअर्टचा पत्ताच नाही आणि सावंत- वामन छान गप्पा छाटत उभे. मी स्टुअर्टकडे गेलो आणि प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहात राहिलो. मेजावार वातवाहिकेचे नकाशे पसरलेले आणि स्टुअर्ट साहेब, शिकावू ज्योतिषाने आयुष्यात प्रथमच कुंडली पहावी अशा मुद्रेत. माझ्याकडे लक्ष जाताच तो म्हणाला,

" कोणत्या मूर्खाने ही आराखने केली आहेत? मला तर कांहीही कळत नाही. यावरून काम करायचे म्हणजे कठीणच आहे. आपण ही आरेखने फेकून देऊ आणि मी माझ्या पद्धतीने वातवाहिका लावतो. ते अधिक चांगले ठरेल. काय वाटतं तुला, हरून!"

मला आता आणखी एक महादू सांभाळावा लागणार या विचाराने हसूं आले. फरक इतकाच तो महादू काळा आणि हा गोरा. मी हसूं ओठातच ठेवत म्हणालो,

" कल्पना छान आहे. पण ती अंमलात आणणे आता जरा अवघड आहे. कारण या कामाची आरेखने आणी योजना तुझ्याच ब्रिटनमधील एका मान्यवर संस्थेने केलेली आहे. ती स्थानिक मंत्रालयाने मंजूर केलेली आहे. आता तुझ्या म्हणण्याप्रमाणे कांही बदल करायचा तर या सार्‍या गोष्टींचे पुनर्विलोकन करावे लागेल आणि त्याला किमान एखादे वर्ष लागेलच. तो पर्यंत मी भारतात गेलेला असेन आणि तू परत इंग्लंडला."

मी तिरकसपणे बोलतो आहे हे न समजण्याइतका तो दुधखुळा नव्हता.
पण अखेर त्याने मेजावरचे सगळे नकाशे, कागद आवरून ठेवले आणि म्हणाला, "ठीक आहे. नवीन डक्ट्‍स आल्या असतील तर त्या लावायला घेऊ. चल दाखव मला त्या कुठे आहेत त्या. "

मला मोठी गंमत वाटायला लागली या माणसाची. याला खरोखरच कामाचा अनुभव आहे की नाही याचीच शंका यायला लागली. खरं म्हणजे जुन्या डक्ट्‍स आधी काढून घेतल्याशिवाय नवीन डक्ट्‍स लावता येणार नव्हत्या. नवीन डक्ट्‍सचे नकाशे जुनी डक्ट्‍ काढल्यावरच नक्की करावे लागणार होते. डक्ट्‍सचा पसारा तसा बराच मोठा होणार होता. त्यामुळे जुन्या डक्ट्‍स काढून बाहेर पाठविल्यानंतरच नवीन डक्ट्‍स आत आणता येणार होत्या. हे सारे काम आता त्यालाच करायचे होते. अर्थात्‌ त्या साठी मी त्याला गजानन सांवंत आणि वामन महाडीक ही दोन माणसे दिलेली होती. ही सारी योजना मी त्याला समजावून सांगितल्यावर त्याचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता.

एव्हाना आम्ही बोलत बोलत कामाच्या जागेपर्यंत आलो होतो. गजानन आणि वामन तिथे उभे होतेच. स्टुअर्टशी त्यांची ओळख मी करून दिली आणि त्यांना स्टुअर्टच्या स्वधीन करून मी सुर्वे-महादूकडे वळालो. सुर्वे खरोखरच कामात तरबेज होता. त्याला ज्या कामाचा अनुभव नव्हता अशीही कामे तो तारतम्याने करीत असे. जुने गवाक्ष-वातशीतक आता जवळ जवळ सगळे काढून झाले होते. मी ही कामाची प्रगती मुदीरला सांगावी म्हणून इदीच्या कार्यालयाकडे जाऊ लागलो तर वामन माझ्याच दिशेने पळत येतांना दिसला. मला पाहतच तो धापा टाकीत थांबला.

" काय झाले रे ?" मी विचारले.
" साहेब, तो गोरा पडला."
" ते कसं काय?"
" साहेब मी महादूला घेऊन स्लिपा (डक्ट्‍सच्या जोडण्या) काढीत होतो तर गोरा आमच्या पाठोपाठ लॅडरवर (शिडी) चढला आणि वाकून कांही तरी पहायला गेला तर झोक जाऊन पडला."

मी देखील धावत तिथे पोहोचलो तर स्टुअर्ट साहेब जमीनदोस्त झाले होते.

क्रमश:

मी देखील धावत तिथे पोहोचलो तर स्टुअर्ट साहेब जमीनदोस्त झाले होते.
------------------------------------------------------------------------
स्टुअर्ट साहेब धडपडले खरे पण थोडक्यात बचावले. खांद्याला आणि डाव्या हाताच्या कोपराला मुका मार बसला एवढेच. पण या अपघाताचा बाकी इतर वाढाचार झाला तो मात्र तापदायक ठरला. इदी आणि त्याच्या अन्य सहकार्‍यांनी आमचे काम तात्काळ बंद केले. आता सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झाला. असा अपघात होऊ शकतो असे आम्ही (कंपनीने) गृहित धरले होते किंवा नाही? तसे घडण्याची शक्यता गृहित धरली असेल तर खबरदारीचे काय उपाय योजले होते? जी माणसे काम करीत होती त्यांना विमा उतरवला होता की नाही..? एक ना दोन अनेक प्रश्नांना वाचा फुटली. मुदीर नुकताच मुख्यालयात पोहोचला होता त्याला तातडीने पुन्हा परत कारागृहाकडे धांव घ्यावी लागली त्यामुळे तो संतापला. कारागृहाच्या आरक्षींनी तर वेगळीच शंका उपस्थित केली ती म्हणजे हा अपघात होता की घातपात? त्यांनी त्यांच्या पद्धतीने निराळी चौकशी सुरू केली. चौकशीला सगळेच कामगार एका वेगळ्या खोलीत नेले गेले. तिथे काय चालले आहे ते पहावे म्हणून मी तिकडे गेलो तर महादूच्या अंगात संचार झालेला. पोलीसच ते. पोलीस भारतातला काय आणि आखातातला काय. सगळे पोलीस सारखेच. त्यांना दंडुका परजायची फक्त संधी मिळायला हवी. आणि त्यातल्या एका काळुबाचा महादूवर दात होताच. दोघांनाही एकमेकांची भाषा समजत नव्हती. पण समजत नव्हती ती शब्दांची भाषा. बाकी दोघांचाही आवेश इतका जबरदस्त की, ’ शब्दावाचुन कळले सारे शब्दांच्या पलिकडले’ या मराठी गीताचा अर्थ नव्याने समजावा. मला पाहतांच महादू कडाडला,

" इच्या मारी. हा मेला आमच्यावर डाउट खातो का वामन्यान्‌ त्या गोर्‍याला पारला. याला सांगा, कोकण्याच्या नादाला लागू नुको. कोकण्यान्‌ धरला ना! तर पार कोंबडा करून टाकीन याचा. "

पण तेवढ्‍यात इदी स्टुअर्टला घेऊन तिथे आला. स्टुअर्टने, तो त्याच्या स्वत:च्या चुकीमुळे पडला, त्यात कोणाचाही दोष नाही अशी जबानी दिली आणि एक काळा कोंबडा पाहण्याची आमची संधी गेली.

स्टुअर्टला दवाखान्यात पाठवण्याची सूचना त्याने स्वत:च फेटाळली आणि काम पूर्ववत्‌ चालू ठेवायला तयार झाला. इतका तो खजील झाला होता. मुदीरनेही इदी आणि इतरांची समजूत काढली आणि काम पुन्हा सुरु होईल अशी परिस्थिती निर्माण झाली. मी मात्र कामाचे किती तास वाया गेले याचा हिशोब करीत बसलो.

कामाला पुन्हा सुरुवात करण्यापुर्वी सुर्वेने एक सुचवले ते असे की गवाक्ष-शीतक काढण्याचे काम जवळ जवळ संपत आले आहे. तेंव्हा सगळेच डक्ट काढण्याचे काम करतील. मी गोर्‍याला घेऊन नवीन संयंत्रे बसविण्याच्या कामाची आंखणी करावी कारण नवीन संयंत्रे संध्याकाळपर्यंत येउन ठेपणार होती. मी सुर्वेकडे पहातच राहिलो. हा माणूस मितभाषी होता. फारसा बोलत नसे. पण याची नजर चौफेर होती आणि हा एकटाच माणूस असा होता की ज्याला तेथील कामाचे स्वरूप बर्‍यापैकी लक्षांत आलेले होते. संयंत्रे कधी येतील हे त्याला माहिती होतेच पण माझ्या नकळत त्याने त्याच्या परीने कामाची योजनाही आंखली होती. मला एकदम हायसे वाटले. त्याच बरोबर मी त्या क्षणी किती थकलेलो आहे आणि मला अशाच आधाराची गरज आहे याची जाणीव झाली. मी पुढे होऊन त्याच्या खांद्यांवर माझी दोन्ही हात ठेवले आणि क्षणभर त्याच्याकडे टक लाऊन पाहिले. त्याच्या योजनेला शब्दांनी संमती देण्याची गरज नव्हती. माग सुर्वेनेच बाकी तिघांचा ताबा घेतला आणि मी स्टुअर्टला घेऊन इदीच्या कक्षाकडे वळालो.

मी, स्टुअर्ट आणि इदी असे तिघे कांही वेळ बोलत बसलो. मध्येच इदी उठला आणि बाजूच्या कपाटाच्या खालच्या कप्प्यातून एक बाटली काढून घेऊन आला. ती बाटली कशाची होती हे एखादे शेंबडे पोरही सांगू शकले असते. मी जरा चक्रावलोच. येथील धर्मसंस्थेच्या नियमांप्रमाणे मद्यपान निषिद्ध होते. अरबांना मद्यपान करण्याची मुभा नव्हतीच. ब्रिटिशांना तसेंच अन्य परदेशियांना कांही सवलतीचे परवाने दिले जात पण ते वैयक्तिक आणि घरगुती वापरासाठी. सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणे हा तर गंभीर गुन्हा होता. माझ्या उडालेल्या गोंधळाकडे बुद्ध्याच दुर्लक्ष करीत इदी बोलू लागला, जणू तो स्वत:शीच बोलत होता,

" मला वाटतं आता या अशा प्रसंगी याची खरी जरुरी आहे. नाही कां मित्रांनो? बिचार्‍या स्टुअर्टला तर नक्कीच याची गरज असणार. आणि हो, हरून, तू आता माझ्याकडे असें भुतासारखे बघणे बंद कर. अरे, एरवी इथें आम्ही भुतासारखे जगतो. इथे फारसे कैदीही नाहीत, की ज्याने आम्हाला थोडातरी विरंगुळा मिळावा. तूच सांग कसा वेळ घालवणार मी."

मी कांही म्हणेपर्यंत त्याने कपाटातून तीन ग्लास काढले आणि त्यात त्या बाटलीतले द्रव ओतलेसुद्धा. सुर्वेने माझी मन:स्थिती जरा ठिकाणावर आणली होती तिला इदीने हरताळ फासला. ती दोघे काय करतील ते करूं दे. आपल्याला काय त्याचे. असा विचार करून मी तेथून काढता पाय घ्यावा म्हणून निघालो तो पुन्हा इदी समोर आला. खुणेनेच मी त्यांच्यात सामील व्हावे म्हणून सांगू लागला. पण माझा स्पष्ट शब्दातला नकार ऐकून म्हणाला, ’ ठीक आहे. जशी तुझी मर्जी."

आमचे संभाषण कान देऊन ऐकणारा स्टुअर्ट मात्र ताडकन्‌ तिथुन उठला आणि माझ्या मागोमाग येऊ लागला. मी त्याला म्हणालो,

" तुला काय करायचे असेल ते तू करू शकतोस. नाहीतरी तुला मार लागलेला आहे. तु आराम केलास तरी चालेल. " मी स्टुअर्टला म्हणालो.
पण त्याने माझ्या मागोमाग येण्याचे पसंत केले. त्यालाही इदीची ती कल्पना आवडणे शक्य नव्हतेच. कारण गोरे कसेही असले तरी त्यांच्या मनात वर्णभेद जन्मजात रुजलेला असतो हे एक कारण आणि जनमानसातल्या आपल्या प्रतिमेला ते फार जपतात. तो इतका वेळ कांही न बोलता इदीची गंमत तर पहात होताच पण त्याही पेक्षा तो माझी प्रतिक्रिया पहात होता. तसें त्याने नंतर एकदा बोलण्याच्या ओघात कबूलही केले.
आम्ही दोघे बोलत बोलत कामाच्या ठिकाणी जात होतो इतक्यात इदीचा एक माणूस मागून धावत आला. माझ्यासाठीं मुदीरचा फोन आला होता. आम्ही दोघांनी आमचा मोर्चा पुन्हा इदीच्या केबीनकडे वळवला. नवीन संयंत्रे घेऊन येणारे कंटेनर निघाले आहेत आणि ते थोड्याच वेळात कारागृहावर पोहोचतील असा त्याने निरोप दिला.
या कामाची जी योजना (schedule) तयार केली गेलेली होती त्यानुसार ती संयंत्रे फार लवकर येत होती आणि अर्थात्‌च ती उतरवून घेण्याची व्यवस्था केली गेलेली नव्हती. बरें मुदीरला ही अडचण सांगता येणार नव्हती. सांगून तो तरी काय करणार होता. मी काळजीत पडलेला पाहून स्टुअर्टने कारण विचारलेच. फोनवर काय बोलणे झाले याची मी त्याला कल्पना दिली. तो कुत्सितपणे हसला. म्हणाला,

" सारा मूर्खपणा आहे हा. आम्हाला (ब्रिटीश) तुम्ही सगळे नांवे ठेवता. पण आमच्याकडून आमची शिस्त तुम्ही कणभरही घेतली नाही. चला. पाहु आता काय होईल तें. "

आम्ही, ज्या ठिकाणी संयंत्रे बसवावयाची होती त्या ठिकाणाकडे वळलो. कंपनीच्या बांधकाम विभागाने संयंत्रासाठी जोते (plinth) बांधून ठेवलेले होते. त्यावर संयंत्र उतरऊन घेता येणार होते. आम्ही पुढील कामाची चर्चा करीत होतो तों ती माल वाहू मोटार येऊन ठेपली देखील. अमेरिकन क्लायमेट कंपनी कडून आलेल्या यंत्राला कसे उतरवून हे एक संकट आता पुढे उभे राहिले होते. कारण ते इतके अवजड होते की त्या साठी क्रेन आणावी लागली असती आणि सगळ्यात मोठे संकट म्हणजे कारागृहाच्या आवारातून मशीन हाऊस पर्यंत क्रेन येऊ शकत नव्हती. मी माझा उद्वेग लपवू शकलो नाही. पण स्टुअर्टने एकदा यंत्राची चारी बाजूने पाहणी केली आणि म्हणाला,

" कांही काळजी करू नकोस. आता नाही तरी संध्याकाळ होत आलेली आहे. या कंटेनर बाळाला आजची रात्र इथेंच झोपू दे. मी उद्या जादू करीन आणि हे यंत्र आपोआप जोत्याववर जाऊन बसेल."

काळी जादू (black magic) असा एक जादूचा प्रकार असतो हे मी ऐकून होतो. आता स्टुअर्ट कोणती ’गोरी जादू’ करतो तें पहायचे होते.

क्रमश:


काळी जादू (black magic) असा एक जादूचा प्रकार असतो हे मी ऐकून होतो. आता स्टुअर्ट कोणती ’गोरी जादू’ करतो तें पहायचे होते.

क्रमश:
--------------------------------------------------------------------

स्टुअर्ट आज काय शक्कल वापरून संयंत्र करागृहाच्या आवारात आणतो हे पहायची उत्कंठा जशी सगळ्यांना होते तशी ती मलाही होती. पण ’प्रतिकूल तेंच घडेल’ या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या वाक्याचा अनुभव मला अनेकवेळा आलेला होता. मी नेहमी नकारात्मक विचार करणारा, निराशावादी (specimistic) आहे अशी माझ्यावर अनेकदा टीकाही होत आली. त्यामुळे या माझ्या स्वभावाप्रमाणे स्टुअर्टची तथाकथित जादू चाललीच नाही तर काय करायचे हा विचार मनात घोळवीत मी बाकी चौकडीला कामाला लावले आणि कंटेनरजवळ जाऊन उभा राहिलो. कंटेनरचा चालक तिकडे इदी आणि कंपनीशी निवांत गप्पा मारीत बसला होता. जरा वेळाने इदी माझ्या दिशेने येतांना दिसला. स्वारी बसक्या आवाजांत कांही तरी, बहुदा स्वाहिली भाषेत, गात होती आणि हातवारेंही करीत होती. जवळ येतांच त्याने संभाषण सुरू केले,
"हेय्‌ हरून, शुभप्रभात!"
" शुभप्रभात इदी! कसा आहेस तू?"
" मी छान आहे. तू कसा आहेस? पण जरा थांब. खूप छान आहेस असं म्हणू नकोस. तुझासाठी माझ्याकडें दोन बातम्या आहेत. एक चांगली आणि एक वाईट. कोणती आधी सांगू?"
" तू मला कांहीही सांगू शकतोस. ठीक आहे. आधी वाईट सांग."
" तुझा स्टुअर्ट पळाला"
" म्हणजे?" यावर इदी खांदे उडवत हसूं लागला.
" पळाला म्हणजे इंग्लंडला गेला"
" अरे, असा कसा पळू शकतो तो? काल तर तो इथे आपल्या बरोबर होता."
" काय अशक्य आहे या गोर्‍यांना. यांना जायला-यायला आपल्या सारखा परतीचा परवाना (exit visa) थोडाच लागतो. विमानात बसले की चालले मायदेशाला"
" बरं ते मरो. आता चांगली बातमी सांग."
" चांगली बातमी म्हणजे, तू एक मठ्ठ माणूस आहेस."
" हां, ही चांगली बातमी आहे खरी. पण त्याने काय फरक पडणार आहे?"
" तूं मठ्ठ अशाकरिता आहेस की कंटेनरमधे काय आहे हे तू नीट पाहिले नाहीस, त्या मूर्ख स्टुअर्टने नीट पाहिले नाही आणि सगळ्यात मोठा मूर्ख म्हणजे तो कंटेनरचा चालक, त्याने आणलेले ते यंत्र या कारागृहासठी नाहीच. तें दुसर्‍याच कोणासाठी आलेले आहे. मी त्याच्या जवळील चलान पाहिले तेंव्हा मला कळले."

आता हंसावे का रडावे हा प्रश्नही इदीने उरूं दिला नव्हता. तो मोठमोठ्याने हसत आणि गात होता. मी खजील झालो. मला त्या यंत्राच्या आकारावरून तरी समजायला हवे होते की एवढे मोठे यंत्र या कामासाठी कसें असेल. माझ्या बाबळटपणाची कमालच झाली होती.

स्टुअर्टने मात्र जादूच केली होती. रंगमंचावरून जादुगार जसा सगळ्यांदेखत गायब होतो तसा तो गायब झाला होता. हे गोरे ब्रिटिश आणि आम्ही भारतीय किंवा अन्य आशियाई लोक यांच्यात किती भेदभाव केला जात होता. यावरून कांही महिन्यांपूर्वीचा एक प्रसंग आठवला. सुभाष यादव नावाच्या एका भारतीय मजूराची आई त्याच्या गांवी अचानक मृत्यू पावली, तर त्याने रडून, भेकून, गयावया करून सुद्धा त्याला स्वदेशी जाण्याची परवानगी दिली गेली नव्हती. भारतांत परत जाऊ द्यावे म्हणून तो येथील भारतीय वकिलातीच्याही पायी पडला. पण तेथेंही त्याला वाटाण्याच्या आक्षताच लावल्या गेल्या. ’तूं आता परत गेल्याने तुझी आई परत येणार आहे कां?’ असले निर्दयी प्रश्न विचारले गेले होते. शेवटी नाईलाजाने तो त्याच्या नौकरीच्या कराराची मुदत संपेपर्य़ंत विषण्ण मनाने येथेच राहिला. स्टुअर्ट मात्र दुखण्याचा बहाणा करून मायदेशी आरामात जाऊ शकला होता. ती घटना आज पुन्हा आठवून मी बेचैन झालो.

स्टुअर्ट मला काडीइतकीही मदत न करता परत गेला होता. मी खिन्न मनाने कामाच्या ठिकाणी आलो. सुर्वे खरोखर कामाचा माणूस होता. त्याने बाकी इतर तीन जणांच्या मदतीने खूपच चांगला संघ (team) बांधला होता. जुन्या डक्ट्‍स काढण्याचे काम त्याने चांगल्या प्रकारे मार्गी लावले होते. ते पाहून मला जर हायसे वाटले. मी झालेल्या कामाची पहाणी करीत होतो आणि पुढील कामाची मनांत आंखणी करीत होतो, इतक्यात महादू डोळे बारीक करून माझ्याकडे पहात आहे असें मला जाणवले. बहुदा त्याला कांही तरी बोलायचे असेल असें वाटून मी त्याला हातानेच ’काय’ म्हणून विचारले. चेहर्‍यावर एक प्रसन्न हसूं पसरवीत तो म्हणाला. म्हणाला कसला, त्याने विचारलेच,

" साहेब, तो गोरा कोठे गेला? आज आला नाय्‌!" मला हसूं आले. मी म्हणालो,
’ मला काय माहित. तूंच सांग ना. काय केलेस तू त्याचे?"

महादू चक्रावला. माझा प्रश्न त्याच्या डोक्यावरून गेला हे त्याच्या बावचळलेल्या चेहर्‍यावरून दिसत होतेच. बाकी तिघेंही आ वसून माझ्याकडे पहात होते. मी हसूं दाबण्याचा प्रयत्न करीत म्हणालो,

" तू त्याचा कोंबडा केलास ना! कुठे आहे तो कोंबडा?" महादू लाजून हसांयला लागला.

" काय सायेब. मजाक करता काय गरीबाची. सांगा ना. कुठे गेला गोरा."

" अरे, कुठे गेला ते मलाही माहिती नाही, आणि गेला तर गेला. तू आहेस ना? तू काय गोर्‍यापेक्षा कमी आहेस काय? काम नीट कर. "
" पण काय हो सायेब. एक विचारूं कां?" ही नांदी कशाची आहे हे माझ्या लक्षांत यायला वेळ लागला नाही. मी जर त्याला त्याच्या प्रश्नाचे उत्तर दिले असते तर महादू सारा दिवस माझ्याशी गजाली करीत बसला असता. मी म्हणालो,

" कांबळी, तें गोर्‍याचा जांव द्या आता. कामाचा बगा आता. नाय तर तो काळा (इदी) माजा कोंबडा करील." आणि महादेवराव कांबळी कामाला लागले.

काम सुरळीत चाललेले पाहून मी इदीच्या कक्षाकडे गेलो. इदी रेडिओ लाऊन कसली तरी अगम्य गाणी ऐकत बसला होता. मला जरा गंमत सुचली. म्हणालो,

" इदी, माझ्या प्रिय मित्रा. तुझा देश फार अगत्यशील आहे असें मी ऐकले होते. पाहुण्यांना कांही कॉफी वगैरे विचारण्याची पद्धत आहे की नाही?"
" कॉफी काय मागतोस मित्रा. मी तर तुला काल त्याहीपेक्षा छान कांही देत होतो तर तूच चेहरा वांकडा केलास."
" मग आजही क्षमाकर मला. तूं पुन्हा तसाच पाहुणचार करणार असशील तर मी चाललो माझा कामाला."

पुढे होत इदीने माझा हात हातात घेतला मला एक हलकेसे आलिंगन दिले आणि कॉफी मशीन कडे वळाला.

क्रमश:

पुढे होत इदीने माझा हात हातात घेतला मला एक हलकेसे आलिंगन दिले आणि कॉफी मशीन कडे वळाला.
-----------------------------------------------------------------------
इदीने कॉफी अंमळ कडकच केली होती. पण मला ती आवडली. इकडे आखातात येण्यापूर्वी भारतांत ज्या प्रकारची कॉफी, म्हणजे दूध-साखर घातलेली, प्यायलो होतो तशी ते इथे कधी मिळाली नाही. इकडची कॉफी म्हटली की दूध-साखर नसलेली गडद तपकिरी रंगाची आणि कडक कॉफी असायची. दूध तर इथे मिळतच नसे. त्याऐवजी दुधाच्या भुकटी सारखी पांढरी भुकटी कॉफीसाठी वपरायची. तिला कॉफी-क्रीम म्हणायचे.साखर मात्र ऐच्छिक. सुरुवातीला मला अशी काळी कॉफी अजिबात आवडत नसें पण कालांतराच्ने तिची चांगलीच संवय झाली.

कॉफीचे घुटके घेत घेत आम्ही बोलत बसलो. इदीच जास्त बोलत होता. भारत देश, ताजमहल, भारतातील लोक, त्याचं समाजजीवन, आपल्याकडील विवाह विधी, अशा अनेक बाबतीत त्याला उत्कंठा होती. त्याने प्रश्न विचारावा आणि मी जेवढ्यास तेवढे उत्तर द्यावे असें कांही वेळ चालले. इतक्यात फोनची घंटी घणघणली. फोन इदीने घेतला. कोणाशी तरी तो अरेबिक भाषेंत सुमारे दहा मिनिटें बोलून त्याने फोन ठेवला आणि माझ्या कडे पाहात म्हणाला,

" अभिनंदन मित्रा! एक चांगली खबर आहे तुझ्यासाठी."
" काय आहे ती?"
" स्टुअर्टच्या बदल्यात तुला एक नवा मदतनीस मिळतो आहे."
" कोण आहे तो?"
" कुणी बारट्रम नावांचा गोरा येतो आहे."

आता आणखी एक गोरा! ऐकून माझ्या पोटात गोळा उठला. स्टुअर्टचा अनुभव जमेस धरतां मी या नव्या गोर्‍या बाबत साशंक झालो नसतो तरच नवल. खरं म्हणजे केशव सुर्वेने कामाचा जम चांगला बसवला होता. त्याच्या अनुभवाचा तो पुरेपूर वापर करीत होता आणि काम चांगले चालले होते. डक्ट्‍स काढण्याचे काम एक दोन दिवसात पूर्ण येणार होते. तो पर्यंत संयंत्र (Packaged AC unit) येणार होते. त्याची योग्य अशी उभारणी झाली की त्याच्या तोंडापासून नव्या डक्ट्‍स बसवायला घ्यायच्या अशी माझी योजना होती. आता हा नवा गोरा आणखी काय दिवे पाजळतो तें पहायचे. या गोर्‍यांबद्धल माझ्या मनांतला आकस अनाठायी नव्हता. आज पर्यंत जितके गोरे मला या आखातातल्या नौकरीत भेटले होते त्यांनी मला या ना त्या प्रकारे कांहीना कांही अडचणीतच आणले होते.

तासाभरांतच माझा नवा मदतनीस हजर झाला असल्याची खबर लागताच मी आणि इदी नव्या पाहुण्याच्या स्वागतासाठी सामोरे झालो. कारागृहाच्या प्रवेशाचे सारे सोपस्कार पार पाडून समोर ठाकलेल्या त्या गोर्‍या माणसाला पाहून मला तर हंसायलाच आलं. मनावर शिष्ठाचाराचे संस्कार झालेले असल्याने मी उघडपणे हंसू शकलो नाही. इदीला मात्र हंसू आवरणे शक्य झाले नाही. तसा तो लगबगीने आंतल्या खोलीकडे वळाला. याला कारणच तसें होते. हा नव्याने आलेला आङ्ग्ल नरपुंगव इतका महाकाय होता की जाड्या-रड्याच्या चित्रपटातील जाड्या याच्यापुढे काटकुळा वाटावा. मी माझी ओळखकरून देण्यासाठी पुढे झालो.

" मी हरून. भारतातून आलो. सध्या या कामाचा प्रधिकारी म्हणून काम पाहतोय."

" मी सॅम्युएल बार्ट्रम. तसा मी ब्रिटिश आहे. पण या कामासाठी लागणारी संयंत्रे ज्या ’अमेरिकन क्लायमेट कंट्रोल कंपनी’ कडून मागवली गेली आहेत, त्या कंपनीतून मी आलो आहे. पण क्षणभर थांब हं. त्या कंपनीतून मी आलो आहे असं मी म्हणालो त्यानं तुझा गैरसमज होण्याची शक्यता आहे. मी त्या कंपनीतून मी आलो आहे म्हणजे मी ती कंपनी सॊडून आलो आहे. नौकरीला होतो मी त्या कंपनीत. ती कंपनी संयंत्रे खूप चांगली बनवते. पण खरं सांगू. चोर आहेत ते हलकट. जपानी संयंत्रांची नक्कल करतात. विश्वास ठेव माझ्यावर. चोर आहेत ते हलकट. स्वत: म्हणुन कांही करण्य़ाची लायकीच नाही त्या मठ्ठांची. पण तू काळजी करूं नकोस. मला त्या संयंत्रांची नस न्‌ नस माहिती आहे. एखादी सायकल (bicycle) चालवावी अशी ती यंत्रे मी चालवू शकतो. तुला आता काळजी करण्याचे कारणच नाही. चल दाखव मला तू काय केले आहेस ते."

बॅटीसाहेबांची ही परिचयाची नांदी ऐकून मी सर्दच झालो. (कांही वर्षांनी भारतांत आल्यावर शोले नांवाचा हिन्दी चित्रपट पाहिला. त्यातील बसंती टांगेवालीचे संवाद ऐकतांना मला या बॅटीचीच आठवण झाली होती). बॅटीसाहेबांनाही स्टुअर्टप्रमाणे स्वतंत्र केबीन वगैरे पाहिजे असेल म्हणूण मी त्यांना स्टुअर्टच्या रिकाम्या केबीनकडे घेऊन गेलो आणि त्यांनी ती घ्यावी. तसेंच आणखी कांही लागणार असेल तर तसें सांगावे असें म्हणालो तर स्वारी म्हणाली,

" छे, छे! अरे, केबीन कशासाठी? मी काय इथे केबीनमध्ये बसून आराम करायला आलो असं वाटलं की काय तुला? नाही, नाही माझ्या मित्रा, काम! मी इथे काम करायला आलो आहे. आणि बसण्याची तर गोष्टच काढू नकोस. मला सामावून घेणारी खुर्ची तरी तुझ्याकडे आहे कां? हाऽ हाऽ हाऽ..."

असे म्हणत बॅटी गडगडाटी हसला. हसतांना स्प्रिंग लावलेला बाहुला हलत रहावा तसे त्याचे शरीर हलत होते. मी त्याला कामाच्या ठिकाणाकडे घेऊन जाऊ लागलो तेंव्हा आणखी एक विलक्षण गोष्ट माझ्या ध्यानांत आली. बॅटी जरी महाकाय असला तरी त्याच्या हालचाली कमालीच्या गतिमान होत्या. तो इतका भरभर चालत होता की, त्याच्या बरोबरीने राहण्यासाठी मला जवळ जवळ पळावे लागत होते. चालता चालता मी त्याला कामाचे स्वरूप, आत्तापर्यंत झालेले काम इत्यादि समजाऊन सांगत होतो. डक्ट्‍स काढण्याचे काम जिथे चालू होते तिथपर्यंत आम्ही येउन पोहोचलो. सुर्वे आणि सावंत एक भला मोठा डक्ट्‍चा भाग (transition piece) सोडवून काढण्याच्या प्रयत्नात होते. सुमारे दहा फूट लांबीचा तो भाग एका बाजूने मोकळा झालेला होता. ते टोक महादू आणि वामनने धरून ठेवले होते आणि सुर्वे-सावंत ही जोडी दुसर्‍या टोकाचा जोड सोडवीत होते. मध्यभागी घडीची शिडी (ladder) उभी करून ठेवली होती. जेणे करून पुढील जोड सुटा झाला की डक्ट्‍ शिडीवर टेकवता आला असता. तेथून तो नंतर सावकाश खाली उतरवता आला असता. बॅटी कमरेवर दोन्ही हात ठेवून शांतपणे हे सारे पाहू लागला. यावेळी मात्र त्याच्या तोंडाची टकळी बंद होती. पुढचा जोड सुटा होताच डक्ट्‍ खाली सरकून शिडीवर आदळणार इतक्यात बॅटी खारीच्या चपळाईने शिडीवर चढला आणि खाली सरकणार्‍या डक्टला खाली मान घालून त्याच्या मानेचा आणि पाठीचा आधार देता झाला. पुढच्याच क्षणी त्याने डाव्या हाताचा आधार डक्टला दिला आणि उजव्या हाताने शिडीची कड पकडत तो खाली उतरु लागला. तो पर्यंत माझी चारही माणसे आपापल्या शिड्यांवरून झर्रकन्‌ खाली आली आणि बॅटीच्या मदतीला धावली. सगळ्यांनी मिळून तो डक्टचा भाग नीट जमीनीवर ठेवला. हा सगळा अचंभित करणारा प्रकार इतक्या झर्रकन्‌ घडला की एक बॅटी वगळता बाकी आम्हा पांचही जणांना भानावर यायला कांही सेकंद जावे लागले. आम्ही भानावर आलो तेंव्हा बॅटी आमच्याकडे मिस्किल नजरेने पहात होता आणि हंसत होता. आमच्या चौकडीला तर हा बजरंगबली कुठून आणि कसा अवतरला याचेच कोडें पडले होते.

त्या नंतर बॅटी मला माझ्या आणि माझ्या माणसाच्या कामाच्या पद्धतीबद्धल विचारीत गेला आणि मधून मधून आमच्या कामाच्या पद्धतीतील त्रुटी दाखवत गेला. इतक्या उंचीवर काम करणार्‍या कामगारांच्या सुरक्षिततेचा आम्ही नीटसा विचार केलेला नव्हता. त्याना आवश्यक अशी शिरस्त्राणे (helmets), सुरक्षा पट्टे (safety belsts), जड वस्तू उतरवण्यासाठी लागणारे दोर (slings) उपलब्ध करून दिलेली नव्हती. आमचा सारा भर मानवी ताकद आणि मानवी कौशल्य यावरच होता. अशा आणखीही कांही त्रुटी बॅटीने दाखवून दिल्या. कांही वेळापूर्वी या माणसाला मी मनांतल्या मनांत हंसत होतो. पण आता हा माणूस मला खरोखर उपयोगी पडू शकेल असे वाटायला लागले. मी पुढें होत बॅटीचा हात हातात घेत त्याचे आभार मानले. उत्तरादाखल तो माझ्या दंडावर थोपटत म्हणाला,

" आभार कसले मानतोस माझे. आणि आभार मानायचेच असतील तर ’त्याचे’ मान, की ’त्याने’ तुझ्यासाठी माझ्यासारख्या एका लहान माणसाला बनवले. " इथे बॅटी, ’त्याने’, ’त्याचे’ म्हणतांना हाताच्या अंगठ्याने आकाशाकडे निर्देश करीत होता.

या ’लहान’ माणसाने मला पहिल्याच भेटीत जिंकलं होतं. गोर्‍यांबद्धलचा माझा पूर्वग्रह आता मला तपासून पहावा लागणार होता.

क्रमश:आखाती मुशाफिरी (२१)
या ’लहान’ माणसाने मला पहिल्याच भेटीतच जिंकलं होतं.
गोर्‍यांबद्धलचा माझा पूर्वग्रह आता मला तपासून पहावा लागणार होता.
--------------------------------------------------------------------

त्यादिवशी दुपारी चार वाजेपर्यंत बॅटी कामाच्या जागेवरून जराही इकडे तिकडे हलला नाही. एरवी सतत बडबड करणारा हा माणूस कमीत कमी पण मोजक्या शब्दांत कामाच्या सूचना देऊन काम करवून घेत होता. सावंत आणि सुर्वे या दोघांनाही बॅटीची कामाची पद्धत अत्मसात कारायला वेळ लागला नाही. कांबळी आणि महाडिक भारावल्यागत मदनिसाचे काम करत होते. संध्याकाळ व्हायला आली तसा बॅटीला पाहून गायब झालेला इदीही आता तिथे हजर झाला होता. स्वत: शिडीवर चढून झपाट्याने कामात मदत करणारा बॅटी पाहून इदी हरखून गेला. माझ्या कानाशी इदी हळूच कुजबुजला.

" हे माकड (चिंपांझी) या पूर्वीच आलं असतं तर किती बरं झालं असतं नाही?"

खरं म्हणजी इदी हे इतकं हळू बोलला होता की बॅटीच्या कानावर ते जाऊ नये.पण बॅटीचे कान भलतेच तिखट असावेत. तो झर्रकन खाली उतरला आणि आमच्या समोर येऊन उभा राहिला. आता हा काय बोलतो या भीतिने मी जरा भांबावलोच. पण सांवरून मी बॅटीची इदीशी ओळख करून दिली. इदीशी बॅटी हस्तांदोलन करीत म्हणाला,

" हो, माझ्या मित्रा, मला जरा उशीर झाला खरा. मी या आधीच यायला हवं होतं खरं. पण कांही हरकत नाही. अगदीच नसल्यापेक्षा उशीर चांगला. नाही कां मित्रा! पण मला एक सांग मित्रा. तू इथे काय करतोस?"

" खरं सांगायचं तर कांहीच नाही. इथे फारसे कैदीही नाहीत त्यामुळे मलाच काय पण माझ्या इतर सहकार्‍यांनाही म्हणावं तसं काम नाहीए. पण नौकरी म्हटली की नौकरी! काम असो वा नसो वेळ तर घालवावाच लागतो ना!"

" बरं मग, मी तुला कांही काम संगितलं तर तू करशील? क्षमा कर मला. तुला काम सांगण्य़ाचा मला कांही अधिकार नाही पण एक विनंती मात्र करावीशी वाटते. चालेल कां?"

" कां नाही? अवश्य. बोल."

" मला एक दोन मोठाले दोर हवे आहेत. देऊ शकशील तूं?"

" दोर? आणि तेंही कारागृहांत?" म्हणत इदी हंसायला लागला.
" क्षमा कर मित्रा. इथे दोरच काय पण पायजम्याची नाडीही मिळणार नाही. कारण माहितीए? असलं कांही इथे कोणाला सांपडलं तर गळफास घेऊन जीव नाही देणार तो?"

दोर मिळू शकणार नाही इतके समजताच बॅटी पुन्हा शिडीवर चढण्याच्या बेतात होता पण पुन्हा मागे वळाला. मला म्हणाला,

" इथली सुटीची वेळ, मला म्हणायचं आहे, कामाची वेळ काय आहे?"

" तशी सकाळी आठ ते दुपारी चार अशी आहे पण आम्ही त्यानंतरही एखादा तास थांबतो. निदान अंधार होईतो तरी थांबतोच."

"कां? त्याची काय गरज आहे?" मला त्याच्या या प्रश्नाचा थोडा रागच आला. मी म्हणालो,

" कां म्हणजे काय? काम दिलेल्या मुदतीत संपायला नको? उशीर झाला तर विलंब शुल्क (penalty) भरावे लागेल. माहितीए!"

" अरे माझ्या मित्रा, तूं म्हणतोस तें बरोबर असेलही. काम तर वेळेत झालंच पाहिजे पण त्या साठी जादा वेळ खर्चून काम केले पाहिजे हें कांही मला पटत नाही. आणि मला एक सांग, या कामगारांना आपण जादा कामाचे पैसे देत आहोत कां? किंवा देणार आहोत कां? आपण कामाचे नियोजन नीट केले तर जादा वेळ न थांबताही काम वेळेत व्हायला कांही अडचण नसावी."

आता मात्र माझा पारा चढायला लागला. शेवटी हा गोराही त्याच्या मूळ वळणावरच गेला म्हणायचा. हे काम गेले पंधरा दिवस मी सांभाळतो आहे तो काय वेडा म्हणून. हेंच काय पण या आधीही मी अशी अनेक कामे माझ्या पद्धतीने केली आहेत आणि ती व्यवस्थित पारही पडली आहेत. आणि आता आला हा मला अक्कल शिकवायला. असें विचार माझ्या मनांत यायला लागले. मी शक्य तितके संयत रहात म्हणालो,

" तूं म्हणतोस ते बरोबर असेलही. पण आजपर्यंत मी या पद्धतीने काम करत आलो आहे आणि अजून तरी मला कांही अडचण आलेली नाही. हां, आता तुला माझी पद्धत चुकीची वाटत असेल तर तूं ती बदलू शकतोस. माझी कांही हरकत नाही." माझा स्वर कडवट झालेला आहे हे माझ्या लक्षांत आले. पण माझा नाईलाज होता.

" हेय्‌ हरून! तुझा कांहीतरी गैरसमज होतो आहे. मला वाटतं रागावलास तूं. विश्वास ठेव माझ्यावर, मी तुला कांही शिकवायला किंवा त्रास द्यायला आलो नाही. मी अशा कामाचा योजक (task master) म्हणून खूप काम केले आहे आणि अशा अनेक अडचणीतूनच शिकत आलो आहे. मी जे शिकलो त्याचा लाभ इथेही आणि तुला आवडेल तर, तुलाही मिळावा असे मला वाटते. इथे येण्यापूर्वी माझे अब्राहमशी (मुदीरशी) बोलणे झालेले आहे. खरें पाहू जातां तूं एक वातानुकूलित यंत्रांचा कुशल तंत्रज्ञ-अभियंता आहेस आणि केवळ नाईलाजाने तुला हे डक्ट उभारणीचे काम करावे लागत आहे की ज्याचा तुला फारसा अनुभव असण्याची शक्यता नाही, पण तरीही तू दिली गेलेली जबाबदारी खूपच चांगल्या तर्‍हेने पार पाडत आहेस, याची मला कल्पना मला अब्राहमने दिलेली आहे. उद्याच कदाचित या कामासाठी मागवलेले संयंत्र येऊन ठेपेल. ते तुलाच उभे करायचे आहे. तू त्यातला तज्ञ (expert) आहेस. त्या कामात मी दखल देणार नाही. हे आंतले काम मी बघेन, तूं संयंत्राचे काम बघ. काय? चालेल की नाहीं? "

मला राग आलेला आहे हे बॅटीच्या लक्षांत आलेले होते आणि तो माझी समजूत काढीत होता. तो जें म्हणत होता तें अगदी बरोबर होते आणि मला ते पटतही होते. पण कां कुणास ठाऊक मी अस्वस्थ झालो होतो. बहुदा माझा अहंकार दुखावला गेला होता. कारण बॅटीला इथे पाठवण्यापूर्वी, त्याला माझ्याविषयी, कामाविषयी सांगण्यापूर्वी मुदीरने माझ्याशी बोलायला हवे होते. मी या कामाचा खरोखर प्रधिकारी (incharge) होतो कां? तसेंच मी मनातून खजीलही झालो होतो. बॅटी जें कांही बोलला होता तें चुकीचे नव्हतेंच. शिरस्त्राणे आणि दोर इत्यादि तर मूलभूत गोष्टी होत्या. त्या कां मला सुचूं शकल्या नाहीत?

कामाची सुटी करून मी खिन्न मनाने माझ्या निवासाकडें परतलो. जाऊन पोहोचलो तर वश्या डोंगर्‍या माझी वाट पहात फाटकापाशीच उभा होता. त्याला पाहतांच मला फार बरें वाटले. आज खरोखर मला त्याचीच गरज होती. नाही तरी तो फार दिवसांनी भेटत होता. मी चेहरा शक्य तितका सरळ ठेवत विचारले,

" काय गुरु, आज काय गुरुपौर्णिमा आहे की काय? गुरुमाऊली आज स्वत: दर्शन द्यायला आली?"

" कायले चापलुशी करतं बे? दोन हप्ते झाले. कोठे मरून पडला होता तूं? साला, तूं आमची बी कोणाची वास्तपुस्त करून नै राह्यला. तुला काय वाटते, असा सोडून देऊ आमी तुले! मरशीन तं राखेतून वडून काडू आमी तुले. आणि काय बे, तुझा चेहरा कां असा दिसून राह्यला मैताला गेल्या सारखा ?"

" सांगतो माऊली. सगळं सांगतो. आधी आंत तर चला " असं म्हणत मी दार उघडलं आणि वश्याला घरांत घेऊन गेलो.
आखाती मुशाफिरी (२२)
अरुण वडुलेकर सोम, २३/०४/२००७ - ०६:५९. » कथा | अनुभव

" सांगतो माऊली. सगळं सांगतो. आधी आंत तर चला " असं म्हणत मी दार उघडलं आणि वश्याला घरांत घेऊन गेलो.

-----------------------------------------------------------------------------------------------


"हां बोल आता."
घरांत गेल्या गेल्या वश्या म्हणाला. मी वश्याला थोडक्यात सध्याच्या माझ्या कामाची माहिती दिली आणि बॅटी दिवसाच्या शेवटी काय बोलला तें सांगितलं. अर्थात्‌, मात्र मी त्यामुळेच नाराज आहे हे त्याला निराळं सांगावं लागलं नाही.

वश्या माझं सांत्वन आणि प्रबोधन करूं लागला. एरवी एक अरभाट वल्ली अशीच वश्याची ओळख होती. पण वश्या एक तत्वज्ञ आणि भगवद्‌गीतेचा गाढा अभ्यासक होता. हे फार कमी लोकांना माहिती होतं. तसा तो फार कांही शिकलेला नव्हता. जेमतेम बारावी पास झालेला हा मुलगा केवळ बांधकाम मजूर म्हणून आखातात आला होता अतिशय चौकस बुद्धी आणि कोणतेही काम प्रामाणिकपणे करण्याची वृती यामुळे गेली आठ वर्षे या देशात निरनिराळ्या नौकर्‍या करत टिकून राहिला होता. या वाटाचालीत अनेक चित्र विचित्र अनुभवातून गेलेला होता. त्यात बर्‍याचदां होरपळलेलाही होता. मात्र हाताला लागेल त्या तत्वज्ञान विषयक पुस्तकाचे वाचन आणि भगवद्‌गीतेचा अभ्यास, चिंतन हा त्याचा प्रत्येक समस्येवरचा तरणोपाय होता.

यद्यदाचरति शेष्ठस्तत्तदेवेतरो जन: ।
स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते ॥

वश्यानं हा श्लोक ऐकवला आणि विचारले,
" काय समजले कां भगवान काय म्हणाले तें?"
" भगवान कोण?" मी बावळटासारखा प्रश्न केला.
" तुझा आज्जा!"
" असं काय करतोस रे. नीट सांग ना. एक तर त्या बॅटीने माझा मूड खराब केला आहे आणि तुला इथे कीर्तन सुचतंय."
" भोटमामा, भगवान म्हणजे श्रीकृष्ण आणि हा श्लोक गीतेतला आहे"
" श्लोक गीतेतला आहे तेवढं कळलं मला. आणि तू गीतेशिवाय बोलणार तरी काय. ते मरूं दे श्लोकाचा अर्थ सांग."
" सांगतो. ऐक. या श्लोकाचा अर्थ असा आहे की, श्रेष्ट पुरुष जे जे आचरण करतात, ते प्रमाण मानून सामान्य जन अनुसरतात. नव्हे ते तसें सामान्य जनांनी अनुसरावे."
" म्हणजे तुला काय म्हणायचंय, तो बॅटी श्रेष्ठ आणि मी सामान्य!"
" बघ चिडलास तूं. तुझा प्रॉब्लेम काय आहे माहितीए? हे तुझे चिडणे. प्रश्न, तो श्रेष्ठ की तू सामान्य हा नाही. तो बॅटी काय सांगतोय तें तुला समजलेले नाही. सब घोडे बारा टक्के या न्यायाने तूं चालतो आहेस. तुझ्या मनांत गोर्‍यांबद्धल आकस आहे तो तू काढून टाक. तुला या आधी भेटलेले गोरे बेमुरव्वत, बद्‌मिजाज असतील म्हणून काय सगळेच तसे असतील असं तुला वाटतंय. चुकीचं आहे तें. आणि काय रे, तूं या बॅटीशी कितीवेळ बोललास रे? तासा दोन तासात एकाद्या माणसाची पुरती पहेचान (ओळख) होते तरी कां."
" अरे पण वश्या, मला एक सांग. मी माझे काम नीट करतो आहे ना? मग हे असे उपटसुंभ माझ्या डोक्यावर कां लादले जाताहेत? आणि तेही मला आधी न सांगता!"
" अच्छा, म्हणजे तुझी ’मी’ ही समस्या आहे तर! कोण समजतोस तू स्वत:ला. खरं म्हणजे तू आहेस एक एसी मेकॅनिक. बरोबर आहे? ते काम तुला नेहमी मिळेलच असें नाही. म्हणून तुला एक दोन वेळा वेगळी कामे दिली. ती तू तुझा भेज्या वापरून चांगली केलीस म्हणून तुला कंपनीने हे काम दिले. पण लक्षांत असूं दे, इथे तू बदली कामगार आहेस. या कामाचा खरा कामगार आला तर तुला त्याची जागा खाली करून द्यावी लागेल की नाही? आणि समजा हा बॅटी तो खरा कामगार असेल तर? " मला निरुत्तर होण्यापलिकडे पर्याय नव्हता. मग वश्याच पुढे बोलू लागला.

"भोटू, तुझा खरा प्रॉब्लेम वेगळाच आहे. कदाचित्‌ तुला स्वत:लाही समजला नसेल."
" तो कसा?"
" सांगतो. तू खरं म्हणजे कंटाळला आहेस."
" म्हणजे?"
" म्हणजे असं की, तूं सध्या जे काम करतो आहेस त्याला तू कंटाळला आहेस. तूं एसी का काय म्हणतात त्या मशीनचा कारागीर आहेस. तुझ्या आवडीचे ते काम तुला सध्या मिळत नाही. त्यामुळे तू वैतागला आहेस. बरोबर? "
" तू म्हणतोस ते खरं आहे. पण या सध्याच्या कामाबरोबरच तेही काम करायला मिळणार आहे. नवीन पॅकेज युनिट अजून आलेले नाही, पण येणार आहे."
" मग झालं तर. तो पर्यंत वाट पहा. सध्या आहे ते काम करीत रहा. नाही तर, तो बॅटी ते काम करणार असेल तर त्याला करू देत. तू नसत्या मानपमानाच्या गुंताव्यात कां स्वत:ला अडकवून घेतो आहेस? तूं इथे हजारो मैल कशासाठी आला आहेस? पैसे कमावण्यासाठीच ना? की उत्कृष्ठ कामासाठी पदकं, शील्ड्‌स मिळवण्यासाठी? तुला जी काम दिलं जातं आहे ते इमाने इतबारे कर आणि गप्प रहा. भगवान्‌ श्रीकृष्णांचा गीतेतील एक संदेश सांगतो..."

" कर्मण्येवाधिकारस्ते....! माहिती आहे मला." मी उगाचच मध्ये बोललो.

" नाही. तो नाही. तो वापरून वापरून फार गुळगुळीत झाला आहे. मी सांगतो आहे तो निराळा आहे."

तस्मादसक्‍त: सततं कार्यं कर समाचर।
असक्‍तो ह्याचरन्‍कर्म परमाप्नोति पूरुष: ॥

" म्हणजे काय? अर्थ सांग."
" सांगतो. सांगावाच लागेल. ऐक - तू आसक्‍तिरहित हो आणि सतत कर्तव्यकर्म करीत राहा. आसक्‍ति म्हणजे हा जो कांही ’मी’ पणा तुला सतावतो आहे तो. तो सोड. कारण आसक्‍तिरहित काम करणारा मनुष्य परमपदाला प्राप्त होत असतो."

वश्या नुसताच तत्वज्ञ नव्हता तर मानसशास्त्रज्ञही असावा असें वाटून गेले. माझ्या मनातल्या उद्‌विग्नतेचे कारण त्याला बरोबर समजले होते. आखातात येऊन दोन वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला होता. हल्ली घरची आठवण सारखी येत होती. सुरुवातीला मनाजोगी कामे मिळाली होती. त्यात मन रमले होते. आता ही असली हडेलहप्पीची कामे करावी लागत होती. कारागृहाच्या कामापैकी, त्यासाठी लागणारी संयंत्रे एकदा आली, ती व्यवस्थित लावून झाली की रजा मागावी आणि निदान कांही काळासाठी तरी भारतात परत यावे असं वाटायला लागलं होतं.

दुसर्‍या दिवशी साईटवर पोहोचलो तर बॅटी अद्याप आलेला नव्हता. आता हा कां आला नाही असा विचार करीत होतो तो इदी समोर येऊन उभा राहिला. मला सकाळच्या शुभेच्छा देउन म्हणाला,

" तुझा दोस्त बॅटी तुझ्या आधीच येऊन गेला."
" म्हणजे, आला आणि गेलाही. हा काय प्रकार आहे तें तूं मला सांगशील काय?"
" तो मुख्यालयात जातो म्हणाला. कांही साहित्त्य आणायचे आहे असें कांहीतरी म्हणत होता."

हा माणूस मला न भेटता कां गेला? कोणत्या अधिकारात गेला? मी येईपर्यंत कां थांबला नाही? असें विचार मनात येऊ लागले पण काल वश्याने दिलेले प्रवचन आठवले. त्याला काय करायचे ते करू देत, आपण आपले काम करावे असा विचार करून मी कामाच्या ठिकाणाकडे निघालो. आमची चौकडी येऊन ठेपलेली होती आणि कामाची सुरुवात होत होती. तेवढ्‍यात बाहेर नवीन संयंत्र आलेले आहे अशी बातमी इदीने दिली. मी सुर्वेला बरोबर घेऊन नवीन संयंत्र बघण्यासाठी बाहेर निघालो. बरोबर इदीही होताच. हे आलेले संयंत्र या आधी अलेल्या संयंत्रापेक्षा किंचित्‌ लहान होते. पण त्याला आत आणून कामाच्या जागी नेऊन कसे बसवावयाचे ही समस्या होतीच. कारागृहाच्या मोठ्या दरवाजातून ते आंत येऊ शकणार होते. पण दरवाजाचा आकार ते संयंत्र जेमतेम आंत ढकलता येईल इतकाच होता. क्रेनचा उपयोग करता येणार नव्हता. मी मनाशी एक योजना आखूं लागलो. फॉर्कलिफ्टचा वापर करून संयंत्र खाली जमीनीवर उतरवून घ्यावे. फॉर्कलिफ्टचाच वापरकरून ते दरवजापर्य़ंत नेऊन ठेवावे आणि फॉर्कलिफ्ट आधी दरवाजातून आंत नेऊन त्याच्याच मदतीने संयंत्र आंत ओढून घ्यावे असा विचार केला. कारण फॉर्कलिफ्टने उचललेल्या अवस्थेत संयंत्र आंत नेणे दरवाजाच्या अपुर्‍या उंचीमुळे शक्य होणार नव्हते. फॉर्कलिफ्ट आणि संयंत्र हलवण्य़ासाठी कांही लाकडाचे ठोकळे, पहारी इत्यादि मुख्यालयला फोन करून मागवून घ्यावे म्हणून फोन करण्यासाठी इदीच्या कार्यालयाकडे मी वळलो इतक्यात एक छोटी मालवाहू मोटार (pick-up van) घेऊन बॅटी हजर झाला. त्याने कांही सेफ्टीबेल्ट्स, दोर्‍या इत्यादि सामान आणलेले होते. आता तोही मला सामील झाला. मी त्याला माझी योजना सांगितली. मला काय काय लागणार होते ते त्याने नीट समजाऊन घेतले आणि मुख्यालयाला फोन झाल्यानंतर स्वत:च जाऊन सारे साहित्त्य आणण्याची तयारी दर्शविली. त्याचे म्हणणे बरोबर होते. साहित्त्य कंपनीच्या भांडारातून आणावे लागणार होते, जे कारागृहाच्या जागेपासून किमान दहा किलोमीटर दूर होते. मी बॅटीला भांडाराकडे पिटाळले आणि मुख्यालयाला फोन करून कामाची आणि लागणार्‍या साहित्त्याची कल्पना दिली.

क्रमश:आखाती मुशाफिरी (२३)
अरुण वडुलेकर बुध, २५/०४/२००७ - ०१:३६. » कथा | अनुभव

मी बॅटीला भांडाराकडे पिटाळले आणि मुख्यालयाला फोन करून कामाची आणि लागणार्‍या साहित्त्याची कल्पना दिली.
-------------------------------------------------------------------------------------------------
बॅटी गेल्यानंतर मी जुन्या डक्ट्‌स काढण्याच्या कामाचा आढावा घेतला. काम पूर्णपणे आटोक्यात होते. उरलेल्या डक्ट्स काढण्याचे काम आज साय़ंकाळपर्यंत पूर्ण होतील आणि नवीन डक्ट्‌सचा संच लावण्याचे काम उद्या सकाळी सुरू करता येईल असा मी विचार करीत होतो. या कामाच्या पूर्वनियोजने प्रमाणे कंपनीच्या कारखान्यात नवीन डक्ट्स तयार झालेल्या आहेत असा निरोपही आलेला होता. माझ्या कामाच्या अंदाजाबाबत सुर्वेचे काय म्हणणे आहे ते जाणून घेण्यासाठी मी त्याला बोलावले,

" काय सुर्वे, कसं काय चाललंय काम? कधी संपतंय हे डक्ट्स काढण्याचं काम?"
" साहेब, काम तसं बरं चाललं आहे. काम संपायला अजून तीन चार दिवस लागतील."
" तीऽन चाऽर दिवस? सुर्वे हे काम आज संपायला हवं. नवीन डक्ट्स तयार झाल्या. त्या उद्या किंवा परवा येऊन पडतील. ए-एच-यू (संयंत्र) पण आला आहे. कसं काय करायचं?"
" साहेब, काय करणार? म्हणायला आपली चार माणसं आहेत पण मी आणि गजाभाऊ (सावंत) दोघेच काम खेचतो आहे. वामन (महाडिक) जरा बरा, निदान सांगेल तेवढा करतो तरी, पण कांबळी (महादू) काय कामाचा नाही साहेब. काय सांगायला जावे तर काय ते उरफाटेंच करून ठेवतो. एक तर जाग्यावर कधी थांबत नाही. कधी तंबाखू खायालाच जाईल तर कधी पाणी पियाला. आन्‌ गेला की तिकडेच टाइम पास करीत राहातो."
" अरे, पण हें तुम्ही मला कधी बोलला नाहीत"
" काय बोलाचा साहेब. आपलेच दात आणि आपलेच ओठ. माझा गांववाला लागतो तो. सांभालून घ्यावा लागतो."
" सांभाळून घ्यावा लागतो म्हणजे काय? कामाची खोटी नाही होत? "
" कामाची खोटी होऊन देणार नाही साहेब. आज तुम्हाला सांगितलां. कां? तर तुम्ही जरा त्याला बोला. माझा काय नाय. मी खेचून घेईन काम. पण तो नवीन साहेब (बॅटी) आला आहे. फार डेंजर माणूस आहे साहेब. सगला काम येतो त्याला. त्याने याचा कोठे रिपोर्ट केला तर नांव तुमचे खराब होईल. साहेब."
" सुर्वे, आलं लक्षांत. मी असं करतो, महादूला माझ्याकडे घेतो. नाही तरी मशीन आलेलं आहेच. आता माझं काम चालू होईलच. त्यात त्याला घेतो. पण तुम्हाला चालेल ना?"
" चालेल साहेब. पण जरा दमानं घ्या साहेब. मीच त्याला इकडे आणला आहे. येत नव्हता. पण म्हटले लायनीला लागेल हा. लागला तर बरंच आहे. हाताखाली घ्याच तुमच्या. काय शिकेल तरी. उपकार होतील साहेब तुमचे. "
" सुर्वे, कमाल आहे तुमची. महादूची तुम्ही तक्रारही करताय आणि तरफदारीही. नवल आहे."
" काय करणार साहेब. साला लागतो माझा !" सुर्वे खाली मान घालून पुटपुटला.

तो काय म्हणाला हे क्षणभर माझ्या ध्यानांत आलेच नाही आणि ध्यानांत आले तेंव्हा मी उडालोच. साला म्हणजे बायकोचा भाऊ! कांही न बोलता सुर्वेला कोपरापासून नमस्कार करावा असं वाटलं, पण पदाच्या जाणिवेने मी तसं करू शकलो नाही. मात्र विषय बदलण्याच्या उद्देशाने मी विचारले,

" सुर्वे,तें जाऊ द्या. तें बघू नंतर. पण हे काम संपायला आणखी तीन चार दिवस लागतील म्हणालात. तें कसं काय? महादूमुळे तर नक्कीच नाही. काय कारण आहे?"
" साहेब, आता एंड पीसेस्‌ (शेवटचे भाग) राहिले आहेत. एक तर साईझला मोठे आहेत आणि एंट्री, त्यामुळे स्लिपा गंजलेल्या आहेत. लवकर निघत नाहीत. वेळ लागतो. एकेक स्लिप अर्धा अर्धा तास खाते."

सुर्वेने सांगितलेली अडचण बरोबर होती. एंट्री म्हणजे मुख्य वातवाहिकेचा (मेन-डक्ट्चा) सुरुवातीचा भाग. या भागावरील तापमान-विरोधक-आवरणाला (thermal insulaation) एकतर तडे जातात किंवा ते नीट झालेले नसते त्यामुळे थंड झालेली हवा संयत्रातून बाहेर पडून या भागातून पुढे जाते त्यावेळी वातावरणातील आर्द्रतेचे धातूच्या डक्ट्च्या बाहेरील पृष्ठ्भागावर सांद्रिभवनामुळे (condensation) पाण्याच्या थरात रुपांतर होते आणि डक्ट बाहेरील बाजूने गंजते. सहाजिकच डक्ट्सचे जोड (slip joints) गंजतात.

एवढ्यात बॅटी तिथे येऊन दाखल झाला. मला शुभप्रभात म्हणत आणि हस्तांदोलन करीत त्याने संयंत्र हलविण्यासाठी लागणार्‍या सामग्रीची जुळवाजुळव झालेली आहे आणि फॉर्कलिफ्ट तासाभरांत हजर होईल अशी खबर दिली. सुर्वेने सांगितलेली अडचण मी बॅटीला सांगितली. बॅटीने डोळे अगदी बारीक करीत मिस्किल चेहर्‍याने एकदा माझ्याकडे पाहिले आणि एकदा सुर्वेकडे पाहिले. तो तसाच कांही काळ आळीपाळीने आम्हा दोघांकडे पहात राहिला. आणि मग एकदम ओरडला,

" सोपं आहे. कापून टाका."

माझ्या आणि सुर्वेच्या डोक्यात एकदम प्रकाश पडला. गंजलेले जोड काढायचे तरी कशाला? सरळ कापून काढायचे. अर्थात्‌ त्यासाठी कापण्याची साधने उपलब्ध करून द्यावी लागणार होती. पण त्या कामाची आता मी काळजी करणार नव्हतो. तें मी बॅटीवरच सोपवणार होतो. बॅटीनेही तें आनंदाने मान्य केले.

फॉर्कलिफ्ट येईपर्यंत बॅटीने व्यवस्था केलेल्या वस्तू पाहाव्यात आणि संयंत्र हलविण्याची रूपरेषा जुळवावी या हेतूने मी बॅटीची परवानगी घेउन बाहेर निघालो.

" तूं संयंत्र कसें हलवणार आहेस तें मलाही बघायचे आहे, बरं कां!. मिरवणूक निघाली की मला बोलवायला विसरू नकोस माझ्या प्रिय मित्रा. " बॅटी मागून ओरडला.
" हो, हो, नक्कीच. नक्की बोलावीन मी तुला." मी देखील ओरडूनच प्रत्युत्तर दिले.
५८
बॅटीने उपलब्ध केलेले सामान मी तपासू लागलो. बाहेर ऊन चांगलेच तपलेले होते पन आज मला उन्हातच काम करायचे आहे याची कल्पना होती म्हणून घरून येतांनाच मी माझी उन्हांत घालायची टोपी आणलेली होती. माझ्या पाठोपाठ हातांत दोन शीतपेयाचे डबे (can) घेउन इदीही मला सामील झाला. इदीचे हें एक बरें होतें. कांहींना कांहीं पाहुणचार त्याचा सतत चालूच असायचा. मी साहित्त्याची पाहाणी करीत होतो त्यावेळी माझी एक चूक माझ्या लक्षात आली. मी वस्तू आणि अवजारे मागवली होती पण काम करण्यासाठी अतिरिक्त माणसें? त्याचा मी विचार केलेलाच नव्हता. मी सुर्वे आणि कंपनीच विचरांत घेतलेली होती. पण त्या माणसांना या कामाचा अनुभव असण्याची शक्यता कमीच होती. इतक्यात मुदीर तेथे येऊन पोहोचला. मी मुदीरची क्षमा मागून माझी अडचण सांगितली. मुदीरच्या चेहर्‍यावर नेहमीचे मिश्किल हसूं विलसले.

" मला याची कल्पना होतीच. तुझे कांहीं मित्र तुला या कामात मदत करण्यासाठीं येणार आहेत. काळजी करू नकोस"

असें म्हणुन मुदीर नवे संयंत्र न्याहाळण्य़ासाठी निघाला आणि इदी मुदीरसाठी शीतपेयाचा डबा आणण्यासाठीं पळाला. एवढ्यात दोन फॉर्कलिफ्ट येतांना दिसले. ते जवळ येतांच त्यावरील माणसे पाहून मी हर्षातिरेकाने ओरडलोच,

" वाह्‌ झक्कास! काय आश्चर्य आहे!’

एका फॉर्कलिफ्टवर नुरूलखान होता आणि दुस्रर्‍यावर कादरखान. कादरखानने फॉर्कलिफ्ट थांबवून बंद करत खाली उडी घेतली आणि माझ्याशी हस्तांदोलन करीत ओरडला,

" मरहब्बा या हबीबी! कैफ हालूक?" ( किती आनंद आहे मित्रा. कसा आहेस तू?)

कादरखान जरी एक कामगार असला तरी आज इथे तो जणूं माझा मित्र बनून आला होता. त्यामुळे त्याने दाखवलेली जवळीक मला खटकली नाही. त्याच्या बरोबर आलेल्या आणखी दोन पठाणंची त्याने ओळख करून दिली. त्यातला एक मुदस्सरखान होता आणि दुसरा इम्तियाजखान. मी कादरखानला माझी योजना समजावून सांगत होतो तेवढ्यात मुदीर आमच्या रोखाने येत असलेला दिसला. सगळे पठाण आदबीने दोन पावले मागे सरकले आणि त्यांनी मुदीरला अभिवादन दिले. मुदीरने हात उंचावुन त्याचा स्वीकार केला आणि गाडीत बसून निघून गेला. मी कादरखानला नवीन संयंत्र दाखवले तर तो गमतीने म्हणाला,

" वय्‌ ये तो बच्चा है । इसको तो पठान जेबमें लेके घूम सकता."
मला हसूं आले. तें पठाणाच्या विनोदालाही होते आणि समाधानाचेही होते.

आमच्या कार्यवाहीला सुरुवात झाली. ती पाहाण्यासाठी मी बॅटीला बोलावून घेतले. एक फॉर्कलिफ्ट कारागृहाच्या दरवाजातून आंत येऊन धांबली आणि दुसर्‍या फॉर्कलिफ्टने संयत्र मालमोटारीतून उतरवून दरवाज्यालगत आणून ठेवले आणि ते मागे सरकून उभे राहिले. संयंत्र सरळ जमीनीवर न उतरवता दोन मोठ्या आणि लांब पाईपावर उतरवून घेतले गेले होते. आंत आलेली फॉर्कलिफ्ट आणि ज्यांत संयंत्र बंदिस्त केले गेले होते त्या खोक्याला मिळून पोलादी दोर (slings) बंधल्या गेले. दोर बांधून होताच नुरुलखानने फॉर्कलिफ्ट चालू करून ते खोके आंत ओढून घेतले. खोके पुरेसे आंत आल्यानंतर बांधलेले दोर सोडवून घेतले आणि फॉर्कलिफ्ट बाजूला नेऊन उभी केली गेली. त्यानंतर ते खोके पाईपावरून पहारींचा उपयोग तरफेसारखा करीत, कटवत कटवत संयंत्रासाठी बांधलेल्या जोत्यापर्यंत नेले गेले. आता सुमारे गुडघाभर उंचीच्या त्या जोत्यावर संयंत्राचे खोके चढवावयाचे होते. जोत्यापासून खोक्यालगत जमीनीवर दोन तगडे पाइप तिरपे ठेवले गेले आणि त्यांना खालून आधारासाठी लाकडी ठोकळे लावले. जोत्याच्या पलिकडल्या बाजूला जमीनीत एक पहार खोचून तिला एक दोर-कप्पी (rope hoist) बांधली आणि तिचा दोर संयंत्राच्या खोक्याला बांधून कप्पीच्या सहाय्याने खोके हळूहळू जोत्यावर ओढून घेतले गेले. या सगळ्या कार्यक्रमाला सुमारे तीन तास लागले. संयंत्र सुखरुप जोत्यावर स्थानापन्न झाले. फॉर्कलिफ्ट, साहित्त्य आणि पठाण परत गेले.

ही सगळी मोहीम पाहून बॅटी विस्मय-चकित झाला. त्याने अवजड वस्तू हलविण्याचा हा असा प्रकार प्रथमच पाहिला होता. पण ही पद्धत कांही नवीन नव्हती. क्रेन नांवाचे यंत्र जन्माला येण्यापूर्वी इजिप्तमधील पिरॅमिडचे अवजड दगड आशाच प्रकारें हलवले गेले होते हा इतिहास मी वाचला होता. तीच युक्ति वापरुन मी या आधीही अशी हलवाहलव केली होती आणि आजही तीच युक्ति कामाला आली.

आता उद्यापासून संयंत्र कार्यान्वित करण्याचे (commissioning) आणि नवीन डक्ट्सचे उभारणीचे काम सुरु होणार होते. संयंत्र कार्यान्वित करण्याच्या कामी मला एक नवीन मदतनीस मिळणार होता.

क्रमश:आखाती मुशाफिरी (२४)
अरुण वडुलेकर गुरु, २६/०४/२००७ - २३:५५. » कथा | अनुभव

आता उद्यापासून संयंत्र कार्यान्वित करण्याचे (commissioning) आणि नवीन डक्ट्सचे उभारणीचे काम सुरु होणार होते. संयंत्र कार्यान्वित करण्याच्या कामी मला एक नवीन मदतनीस मिळणार होता.
---------------------------------------------------------------------
काल संयंत्र हलविण्याच्या कामात माझी जी धावपळ झाली होती त्याचे परिणाम त्यावेळी आज सकाळी जाणवत होते. खांदे,मान, पाठ, आपले निराळे अस्तित्व दाखवीत होते. सकाळी बिछान्यातून अगदी उठवत नव्हते. एकदा वाटले, कार्यालयाला फोन करून आजची सुटी घ्यावी. पण धीर होत नव्हता. लहानपणी माझी आजी म्हणायची, राजाला आणि मोतद्दाराला कधी सुटी घेता येत नाही. राजा तर मी नव्हतो. मोतद्दार मात्र असेन कदाचित्‌. कसाबसा उठलो, सकाळची आन्हिके उरकली आणि तयार झालो. घड्याळाचे कांटे आज फार भर भर चालत होते. उशीर झालाच होता. रोजच्या प्रमाणे जेवणच काय पण न्याहारी करायलाही सवड नव्हती. शीतकपाटात डोकावले. एक केकचा तुकडा शिल्लक होता आणि खोक्यात थोडे दूध. अडीअडचणीला उपयोगी पडावे म्हणून मी एखादा दुधाचा खोका आणून ठेवीत असें. दूध गारच प्यायलो, केकचा तुकडा घशांत कोंबला आणि वर एक वेदनाशामक गोळी ढकलली. घरातुन बाहेर पडतांना टेबलावरचे घड्याळ माझ्याकडॆ डोळे वटारुन पाहात होते.