Thursday, May 28, 2009

फॅमिली

"हे मिस्टर मदन.... मदन शृंगारपुरे. आज पासून आपल्याला जॉईन होताहेत, बिपिनच्या जागेवर......"
समोर बसलेल्या पण त्या क्षणी उठून उभे रहात असलेल्या त्या तरुणाची घाणेकर साहेब ओळख करून देत होते.
"....... आणि मिस्टर शृंगारपुरे, लेट मी इन्ट्रोड्यूस, हे मिस्टर कारखानीस.. आमच्या... आय मिन्‌ आपल्या ड्रॉईंग सेक्शनचे सिनीयर ड्राफ्ट्समन"
" ओह्, वेलकम!" मी हस्तांदोलनासाठीं हात पुढे केला.
" मिस्टर कारखानीस, प्लीज, यांना सेक्शनला घेऊन जा. सर्वांना इन्ट्रोड्यूस करा आणि कॅरी ऑन. वुईल यू प्लीज...."
" येस् शुअर, सर"
" मिस्टर शृंगारपुरे, मिस्टर कारखानीस वुईल बी युअर इमिजिएट सुपिरिअर. होप,यु वुईल एन्जॉय हिज कंपनी. सो, गुड लक"

पुण्याच्या एका नांवाजलेल्या लिमिटेड इंजिनियरिंग कंपनीच्या संशोधन आणि विकास विभागाच्या आरेखन कार्यालयाचा मी वरिष्ठ आरेखक होतो. नुकताच एक बिपिन दास नांवाचा आरेखक नौकरी सोडून गेला होता. त्याची जागा रिकामीच होती. त्या जागेवर या तरुणाची योजना झाली होती. एवढे आणि एवढेच माझ्या लक्षांत आलेले होते. कारण ही नेमणूक तशी अचानक झालेली होती आणि ती कुणाच्या तरी शिफारशीने झालेली असावी असा मनांत एक कयास निर्माण झाला होता. अर्थात् त्यामुळे कांही प्रशनचिन्हंही!

मी त्या तरुणाला माझ्या टेबलापाशी घेऊन येई पर्यंत सेक्शनमध्ये कुतुहलाची अस्पष्टशी कुजबुज सुरू झालेली होती. सर्वांशी त्याची ओळख करून द्यायची होतीच. पण त्या आधी मला त्याची माहिती करून घेणे गरजेचे होते. शृंगापुरेला समोरच्या खुर्चीत बसण्याचा निर्देश करून मी सुरुवात केली.

" हां मिस्टर शृंगारपुरे, बसा."
" सर, प्लीज मला अहोजाहो करूं नका. लहान आहे मी तुमच्या पेक्षा. मला तुम्ही नुसतं मदन म्हटलं तरी चालेल"

मला त्याच्या या बोलण्याचं थोडं हसूं आलं. कारण कपाळावर येऊ पहाणारे केस मागे सारण्याचा प्रयत्न करीत हे जे कांही तो बोलला त्यांत एक लाडिकपणाची छटा होती. मी त्याच्या कडे जरा निरखून पाहिलं. गौर वर्ण, बर्‍यापैकी उंची आणि शरीर यष्टी, अतिशय नीट नेटका पेहेराव, या सार्‍याशी हे त्याचे लाडिकपणे बोलणे कांहीसे विसंगत होते. त्याच्याशी हस्तांदोलन केले तेंव्हाही त्याच्या हाताचा स्पर्श कांही निराळाच वाटला होता. पण त्याच्या व्यक्तिमत्वाविषयी विचार करण्याची सध्या तरी गरज नव्हती. त्याला कार्यालयाची आणि कार्यालयाला त्याची ओळख करून देणे अधिक महत्वाचे होते.

मी त्याची प्राथमिक ओळख करून घेतली. इंजिनियरींगची पदविका प्राप्त केल्या नंतर त्याने मुंबईच्या एका प्रख्यात इंजिनिरिंग कंपनीत कांही वर्षे नौकरी केलेली होती. तिथे उमेदवारी संपताच त्याने लग्न केले. त्यानंतरही तो सहा वर्षे मुंबईतच राहिला होता पण मुंबईची हवा त्याला मानवेनाशी झाली म्हणून त्याने पुणे गांठले होते आणि एका व्यवसाय विनिमय दलाला मार्फत ही नौकरी मिळवली होती. ही सगळी माहिती सांगतांना त्याचं अतिशय मृदू आणि लाडिक बोलणं मात्र जरा विचित्र वाटत होतं. विशेषत: " इथे घरी कोण कोण असतं?" या माझ्या प्रश्नावर त्याने, " मी आणि आमची फॅमिली एवढेंच" हे जे कांही उत्तर दिले ते इतके लाजून की, मला मोठी मौज वाटली. आणि " आमची फॅमिली" म्हणतांना त्याच्या चेहर्‍यावर आणि डोळ्यांत जे भाव होते ते विलक्षण रोमांचकारी होते. जणू त्या क्षणीही पत्नी त्याच्या समोर होती. मला हंसू दाबून ठेवण्याचा कसोशीने प्रयत्न करावा लागला.

मी मदन शृंगारपुरेला त्याची कामाची जागा दाखवली, कामाचं स्वरूप समजावून दिलं आणि सर्वांशी रीतसर ओळख करून दिली. औपचारिक ओळखी नंतर थट्टामस्करीसह होणारी खरी ओळख दुपारच्या जेवणाच्या वेळेला सुरू झाली. मी वयाने आणि अनुभवाने थोडा मोठा होतो म्हणून वरिष्ठ खरा पण तसे सर्वच सहकारी जवळपास सारख्याच वयाचे होते, आणि शिवाय अस्सल पुणेकर होते. कार्यालयीन वेळेनंतर मीही शिंग मोडून मी त्या कळपातलाच एक बनून रहात असें. त्या मुळे अशा अनौपचारिक वे़ळेला त्या उतांतही मी सामिल होत असें. आम्हाला असें एखादे गिर्‍हाईक हवेंच असायचे आणि आता तर ते आयतेंच मिळालेले. मग त्या दिवसा नतंर रोजचेच एक उधाण येऊ लागले. त्याच्या मदन या नांवाची जशी यथेच्च टिंगल झाली आणि लाडिक बोलण्याचीही. बापट तर एकदा म्हणालाही की आपण जर तरुण तुर्क - म्हातारे अर्क हे नाटक जर बसवले तर त्यातल्या ’ कुंदा’ चे पात्र शोधायला नको. मात्र शृंगारपुरे कधी चिडला नाही. सगळी टवाळी तो हंसत हंसत झेलायचा. खरी गंमत वाटायची ती, तो पत्नीचा उल्लेख फॅमिली असा करायचा त्याची.

एकदां तो त्याची फॅमिली इडली सांबर खूप छान करते असें म्हणाला तर कोणीतरी सप्रयोग सिद्ध कर म्हणालं आणि पुढच्याच रविवारी सगळे इडली सांबर खायला त्याच्या घरी जातील आणि अनायसे वहिनींची ओळखही होईल असा बूट निघाला. तेंव्हा मात्र तो थोडा भांबावलेला दिसला. पुढच्या रविवारी त्याची फॅमिली माहेरी जाणार आहे हे सांगतांना त्याचा चेहरा ओशाळवाणा झाला होता. मात्र कां कोणास ठाऊक, ती त्याची केवळ सबब असावी आणि आम्हाला तो त्याच्या घरी नेण्याचे टाळतो आहे अशी त्याच्याच शेजारी बसणार्‍या बापटला शंका आली. ती त्याने खाजगीत बोलूनही दाखवली. पण असतांत अशी कांही माणसे, ज्यांना मर्मबंधातले कोश जपायला अधिक आवडतं. त्यातला हाही एक असेल म्हणून मी बापटची समजूत काढली.

पण दुसर्‍याच दिवशी हा बहाद्दर कामावार येतांना दोन मोठ्या डब्यात इडली सांबर आणि एका छोट्या डब्यात ओल्या खोबर्‍याची उडपी उपाहारगृहांत असतें तशी चटणी, शिवाय स्टीलच्या ताटल्या, चमचे एवढा सगळा जामानिमा घेऊन आला तेंव्हा आम्ही चाटच पडलो. त्याच्या फॅमिलीने इडली सांबर मात्र अप्रतिम चवीचे केले होते. सगळ्यांनी वानवानून त्याचा फडशा पाडला. शृंगारपुरेचा चेहरा कृतकृत्यतेने उजळला होता. त्याच्या फॅमिलीने इतका मोठा उठारेटा केला याचे मला कौतुक वाटले. बापटला मात्र ती चव विश्व या उपाहारगृहातल्या इडलीसांबार सारखीच कशी हा प्रश्न पडला होता.

त्यानंतर शृंगारपुरे मधून अधून कांही ना कांही खाण्याचे पदार्थ आमच्या साठीं घेऊन येत असें. कधी शंकरपाळे तर कधी चकल्या. कधी बेसनाचे लाडू तर कधी खोबर्‍याची बर्फी. साक्षात अन्नपुर्णेने केलेले असावे अशी त्या पदार्थाची चव असायची. तसेंही त्याच्या जिभेवर सतत फॅमिलीचेच गुणगान असायचे. दुसर्‍या कुठल्या विषयावर बोलतांना आम्ही कधी त्याला ऐकला नव्हता. बायकोवर इतके प्रेम करणारा तरुण आम्ही प्रथमच पहात होतो. एकदा त्याने आणलेली बाखरवडी तर ती चितळे मिठाईवाले यांच्याकडून मागवलेली असावी इतकी खुसखुशीत होती. त्याची बायको खरोखरच इतकी सुगरण असेल कां ही शंका आम्हां सर्वांनाही आलीच होती. तरी, खाल्ल्या बाखरवडीला जागायचे म्हणून कोणी तशी कांही टिप्पणी केली नाही. पण बापट तसा गप्प रहाणार्‍यातला नव्हता. त्याने हल्लाबोल केलाच.

" ए खरं सांग मदन्या, ही बाखरवडी चितळेची आही की नाहीं. च्यायला तुझ्या बंडला खूप झाल्या हं"
" नाही हो. देवा शपथ सांगतो. आमच्या फॅमिलीनेच बनवलेली आहे ती" शृंगारपुरेचे डोळे पाण्याने डबडबले.
" चल मग तुझ्या घरी घेऊन चल एकदा आम्हाला सगळ्यांना. वहिनींना आम्ही समक्षच कॉम्प्लीमेन्ट देऊ"
" घरी? घरी कशाला? हो...हो...घरी....घरी.... या ना....जरूर या....फॅमिलीला......." शृंगारपुरे गदगदून रडायच्या बेतात.

ऑफिसमधले वातावरण चमत्कारिक कुंद झाले. तसें मी सगळ्यांना आपापल्या जागेवर पिटाळले आणि शृंगारपुरेच्या पाठीवर हात फिरवत त्याला शांत करू लागलो. पण माझ्याही मनांत एक शंका, एक संभ्रम निर्माण झाला होताच. वास्तविक त्याच्याच काय पण कुणाच्याही खाजगी आयुष्यात डोकावू नये एवढे समजण्या इतके आम्ही सगळेच सभ्य होतो. परिपक्वही असूं कदाचित. पण शृंगारपुरेचे हे असले वागणे कोड्यात टाकणारे होते. विशेशत: त्याच्या फॅमिलीचा विषय निघाला की तो कमालीचा खुले पण लगेचच आपले पंख मिटून घेत असे. सतत तो कांही तरी लपवतो आहे असा भास होत असे. तशा त्याच्या आणखीही कांही गोष्टी कोड्यात टाकणार्‍याच होत्या. कार्यालयीन माहितीत त्याने सिंहगड रोड वरील हिंगणे गांवाचा पत्ता दिलेला होता. मुंबईहून पुण्याच्या हडपसर सारख्या ठिकाणी नौकरी करायला आलेला हा माणूस हिंगण्यासारख्या सोळा सतरा किलोमीटर दूरच्या ठिकाणी कां राहतो? खरं म्हणजे त्या काळात त्याला हडपसरच्या जवळपासही एखादी चांगली निवासी जागा अगदी सहज मिळाली असती. ज्या काळात आम्हाला एक चांगली सायकल विकत घ्यायची म्हणजे दिवाळीच्या बोनसची वाट पहावी लागे त्या काळात हा स्कूटरवर कामाला येत असें. त्याच्या कामांत तो तसा साधारणच पण बरा होता. पण कमालीचा नीटनेटकेपणाच्या संवयीचा. लहानसा कागद लिहायला घेतला त्याला तरी समास पाडल्याशिवाय तो लिहायला सुरुवात करीत नसे. त्याच्या या सगळ्या गोष्टी बाजूला सरून त्याच्या बायको विषयी कुतुहल मात्र आता प्रकर्षाने पुढे आलेले होते. याचा छडा लावायचाच असें माझ्या मनांत आले.

पुढच्याच रविवारच्या सुट्टीत मी ते आमलात आणले. हिंगण्याच्या अलिकडेच विठ्ठलवाडीला माझा एक नातेवाईक रहात असे त्याच्या कडे जायच्या निमित्ताने मी शृंगारपुरेच्या घरी जाऊन धडकलो. मला पहाताच शृंगारपुरे चकितच झाला. नुसताच चकित नव्हे तर पुरता भांबावला. या या म्हणत त्याने मला घरांत घेतले आणि "बसा. मी पाणी आणतो तुमच्यासाठीं" म्हणत स्वयंपाक खोलीत गेला. मी सभोवताली नजर टाकू लागलो. शृंगारपुरेच्या एरवीच्या नीटनेटकेपणाचा मागमूसही तिथे कुठे दिसत नव्हता. दोनच पण जरा मोठ्या खोल्यांची ती जागा होती. दरवाज्या लगतच एक खिडकी आणि खिडकी खाली एक पलंग. पलंगावरची चादर सुरकुतलेली, पांघरुणाची चादर अस्ताव्यस्त पसरलेली. पलंगाच्या उशालगतच्या दांडीवर एक लेडीज नाईट गाऊन लटललेला. पलंगाच्या काटकोनातील भिंतीलगत एक आरशाचे कपाट. कपाटाशेजारी एक टीपॉय, त्यावर विस्कटून पडलेली कांही पुस्तके. छताला लटकणारा पंखाही बराचसा धुळकटलेला. दरवाज्यालगतच्या कोपर्‍यात कांही पादत्राणाचे जोड. एकूणातच एखाद्या कुटुंबवत्सल घराला विसंगत ठरावे असें चित्र. मी कांहीसा विस्मयचकित आणि कांहीसा गोंधळलेला.

" घ्या सर. पाणी घ्या." शृंगारपुरेच्या आवाजाने मी भानावर आलो. गणिताच्या पेपरला निघालेल्या विद्यार्थ्यासारखा त्याचा चेहरा झाला होता.
" शृंगारपुरे... वहिनी..?" मी चेहरा शक्य तितका कोरडा ठेवण्याच्या प्रयत्नात.
" हां! त्याचं काय झालं. फॅमिली जरा गावाला गेलीय."
" कधी? काल ऑफीसमध्ये कांही बोलला नाहीत."
" नाही. बोललो नाही..पण तसं कांही बोलण्या सारखं नव्हतं म्हणून....."
" अच्छा, अच्छा! कांही विशेष?"
" कांही नाही हो. फॅमिली तिच्या एका मैत्रिणीच्या मंगळागौरीला गेली आहे"
" मंगळागौरीला? आत्ता? मार्गशीर्षांत..?
" ओह्‌ ! आय एम सॉरी.एक्स्ट्रीमली सॉरी. डोहाळजेवणाला."
" म्हणजे?"
" अहो, माझं हे असं होतं बघा. फॅमिली नसली ना की मी अगदी गोंधळून जातो. सो मच आय मिस्‌ हर."
"............."
" ती गेलीय नाशिकला. तिच्या एका जीवश्च कंठश्च मैत्रिणीकडे. डोहाळजेवणाला. सर, तुम्ही बसा कोपर्‍यावरून दूध घेऊन येतो. आपण चहा घेऊ"
" छे, छे. चहाचं राहू द्या हो. परत कधी येईन चहाला. मलाही थोडी घाईच आहे. मी निघतो.."
" सर, प्लीज. माझाही चहा व्हायचाच आहे. आत्ता येतो. पटकन्‌ दोन मिनिटात. तोवर हे बघा जरा."

असं म्हणत त्याने कपाटातून एक फोटोचा अल्बम काढला आणि माझ्या हातांत देऊन तो पसार झाला. तो अल्बम त्याच्या लग्नात काढलेल्या फोटोंचा होता. म्हणजे या इसमाला बायको होती तर, या विचाराने मला जरा बरं वाटलं. मी एक एक पान उलटीत फोटो पाहू लागलो. कोणत्याही लग्नातला ठराविक स्वरूपाचा असतो तसा तो अल्बम होता. पहिल्याच पानावर त्याचा आणि त्याच्या बायकोचा जोडीने काढलेला फोटो होता. शृंगारपुरेची बायको मात्र हिन्दी सिनेमातल्या मधुबालानेही हेवा करावी इतकी सुंदर होती. गौर वर्ण, भव्य कपाळ, टपोरे डोळे, चाफेकळी नाक आणि या सगळ्या सौंदर्यावर कडी करणारा डाव्या गालावरचा तीळ. नशीबवान आहे बेटा, मी मनांतल्या मनांत पुटपुटलो. पुढे नित्यनेमाचे फोटो झाल्यावर खास पोझ देउन काढलेले दोघांचे फोटो तर अप्रतिम होते. जवळ जवळ सगळ्याच ठिकाणी अत्यंत भावस्पर्शी डोळ्यांनी त्याची बायको त्याच्याकडे प्रेमार्द्र नजरेने पहात होती. कांही वेळापूर्वी त्याच्या बायकोबद्दल एक अनाकलनीय शंका माझ्या मनांत उद्भवली होती तिची मला लाज वाटली आणि त्याच्या फॅमिलीला भेटण्याची उत्सुकता वाढली.

दुसरे दिवशी मी ऑफीसला गेलो तेंव्हा खाजगीत बापटला ती हकीकत सांगितली. तो तर चाटच पडला. त्याने त्याच्या स्वभावाला अनुसरून ती बातमी हळू हळू सगळ्यांपर्यंत पोहोचवली देखील. त्या दिवसापासून बहुतेक सार्‍यांचीच शृंगारपुरेकडे पहाण्याची नजर जरा बदलली. जो तो त्याच्याशी मैत्री करण्याची अहमहमिका करूं लागला. पालेकर तर त्याचा खास मित्र बनला. कारण पालेकरचे अजून लग्न झालेले पण तो बोहोल्यावार उभा रहायच्या तयारीत होता. शृंगारपुरेला जणू त्याने गाईड बनवले आहे असे वाटावे असे त्यांचे आपसात कुजबुजणे चाललेले असायचे. शृंगारपुरेने त्याला एकदा आपल्या बटाव्यातला बायकोचा फोटो दाखवला तसा तो, ते लावण्य पाहून, अगदी वेडावलाच. आपल्यालाही अशीच बायको मिळावी असे स्वप्न पाहू लागला. मध्येच एकदा पालेकर चार दिवस रजा टाकून मुलगी पहायला गेला तेंव्हा त्याने शृंगारपुरेलाही बरोबर चलण्याची विनंती केली पण ती त्याने, फॅमिली घरी एकटी कशी राहील या सबबीवर, नाकारली.

चार दिवसांची रजा संपवून पालेकर कामावर पुन्हा रुजू झाला त्या वेळी शृंगारपुरे त्याच्या फॅमिलीने आदल्या दिवशी केलेल्या चिरोट्याचा डबा सर्वांना वाटण्यासाठीं उघडत होता. पालेकरला पहाताच त्याने " या पालेकर. अगदी वेळेवर आलांत. आमच्या फॅमिलीने..." शृंगारपुरेने एवढे शब्द उच्चारले असतील नसतील एवढ्यात पालेकर तिरासारखा त्याच्या अंगावर धावला. त्याने तो डबा उधळून दिला आणि शृंगारपुरेची कॉलर पकडून मारण्यासाठीं मूठ उगारली. काय होते आहे ते कुणाच्याच लक्षात येइना. पण एका अनाकलनीय सावधतेने मी वेगांत पुढे धावलो. पालेकरच्या कमरेला हातांचा विळखा घालीत त्याला मागे खेचला आणि ओढत ओढत ऑफिसच्या बाहेर घेऊन गेलो.

बाहेर जिन्याच्या पायरीवर पालेकर ओंजळीत चेहरा झाकून धरीत मटकन बसला. कसल्या तरी संतापाचा उद्रेक त्याला आवरता येत नव्हता. " पालेकर काय झालंय ?" मी त्याच्या खांद्यावर थोपटत विचारले. चेहर्‍यावरचा हात काढीत लालबुंद डोळ्यांनी पालेकर उसळला,

" फ्रॉड आहे साला हा हलकट. कसली फॅमिली अन्‌ कसलं काय. च्यूत्या बनवतो साला आपल्याला. याच्या तर........."

पालेकरने हळूं हळूं शांत होत जे कांही मला सांगितलं ते असं होतं. पालेकर नाशिकला जी मुलगी पहायला गेला होता तिथे पहाण्याच्या कार्यक्रमाच्या वेळी मुलीकडच्या बायकांत एक तरूण स्त्री हुबेहूब शृंगारपुरेच्या बायकोसारखी दिसली होती. शृंगारपुरेच्या बायकोचा फोटो पालेकरनेही पाहिला होता. तिच्या गालावरचा तीळही त्याच्या लक्षांत राहिलेला होता. आधी असेल कुणीतरी, असतात कांही माणसे एका सारखी एक दिसणारी, म्हणून पालेकरने जरा तिकडे दुर्लक्ष केले. पण ती इकडून तिकडे वावरतांना पालेकरने तिच्या गालावरही तसाच तीळ पाहिला आणि तो चक्रावला. मग त्याने सरळच चौकशी केली तेंव्हा..... ती पूर्वाश्रमीची शृंगारपुरेचीच बायको होती. सध्या घटस्फोटित होती. लग्नानंतर तिला एका विदारक सत्त्याला सामोरे जावे लागले होते. लग्नापूर्वी भावी पतीचे गोरेगोमटे रूप पाहून ती हरखली होती. पण तिची भयानक फसगत झालेली होती. तिच्या स्वप्नांचा ढग अभ्रकाचा आहे हे तिला पहिल्या रात्री समजले तेंव्हाच ती उध्वस्त झाली होती. पण कांही औषधोपचाराने सुधारणा होईल या आशेवर दीडदोन वर्षे गेली. पण ती होणारच नव्हती. कारण तो दोष जन्मजात होता आणि हे शृंगारपुरेलाच काय पण त्याच्या मातापित्यांनाही माहिती होता. पण लग्नानंतर कदाचित कांही चमत्कार होईल या आशेवर त्यांनी त्याचे लग्न करून दिले होते. शृंगारपुरेने सुरुवातीस दादापुता करीत दत्तक मूल घेण्याबाबत बायकोअचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. पण तिने घटस्फोटाची मागणी करतांच तिचा छळ चालू केला होता. शृगारपुरेच्या आईवडिलांनीही त्याला त्यातच साथ दिली. पण दुसर्‍याच वर्षी त्यांना कोर्टात आरोपीच्या पिंजर्‍यात उभे रहावे लागले होते. शृंगारपुरेच्या वकिलांनी अटोकाट प्रयत्न करून त्याची फसवणुकीच्या आरोपाखालील सक्तमजुरीची शिक्षा टाळली होती पण घटस्फोट अगदी सहजगत्या मंजूर झाला होता.

सुन्न झालेले डोके जरासे हलके झाले तसे आम्ही दोघेही आपापल्या जागेवर परत आलो तेंव्हा सेक्शनमध्ये सगळे आपापल्या कामांत गर्क होते. निदान तसें दाखवीत होते. एक विचित्र शांतता आसमंतात पसरलेली होती. मी शृंगारपुरेच्या टेबलाकडे पाहिलं. तो तिथे नव्हता. म्हणून टेबलकडे गेलो. टेबलवर चिरोट्याचा डबा होता आणि डब्याखाली त्याचा चार ओळीचा राजिनामा.

Sunday, May 17, 2009

वरीस पाडवा

दुपारचे बाराचे टळटळीत उन डोक्यावर घेत दिना त्या दहा मजली इमारतीच्या गच्चीवर उभा होता. डोळ्यावर हाताचा पालथा पंजा धरून दूरवर चिंचोळ्या होत गेलेल्या कच्च्या सडकेच्या टोकापर्यंत त्याने बुबुळांना कळ लागेपर्यंत नीट न्याहाळले. कंत्राटदार किंवा त्याचा मुकादम येण्याचा मागमूसही नजरेला पडत नव्हता. वीस जिने चढून पिंढरीला आलेला पेटका जरासा अलवार झाला तसा दिना पुन्हा पायर्‍या खाली उतरू लागला.

एका पसरटशा टेकाडावार ती जवळजवळ पूर्णावस्थेला आलेली उघडी बोडकी इमारत उभी होती. गावाच्या बरीचशी बाहेर स्वस्तात मिळालेली जागा पटकावून एका बिल्डरने ही इमारत उभी केली होती. पण भोवतालचा परिसर व्यावहारिक दृष्ट्या पुरेसा गजबजलेला होण्याची वाट पहात इमारतीचे अखेरचे बांधकाम स्थगित केले गेलेले होते. सध्या, त्या बिल्डरने नेमेलेला रखवालदार, दिना थिटे, त्याची घरवाली आणि एक चार वर्षाचा मुलगा कृष्णा एवढेच तीघे इमारतीवर वसतीला होते. बांधकाम स्थगित झाल्यापासून गेले सहा महिने कंत्राटदार कधी तिकडे फिरकला नव्हता. सुरुवातीचे चार महिने दर बुधवारी मुकादम एक चक्कर टाकून जाई. जागेवरच्या उरलेल्या वस्तूंवर एक नजर टाकी. थोडी पहा़णी करी आणि हप्‍त्याचा पगार दिनाच्या हातावर टेकवून आल्या पावली परत जाई. पण गेले दोन महिने तोही पुन्हा फिरकला नव्हता. दिनाची घरवाली, कौशी जवळपासच्या चार सहा घरात धुण्या-भांड्याची कामे करी. तिच्या कमाईवरच कशीबशी गुजराण चालली होती.

टिनाच्या खोपट्यात दिना परतला तेंव्हा कौशी चुलीवरच्या तव्यावरच्या शेवटच्या भाकरीवर पाणी फिरवीत होती. डेर्‍यातून लोटाभर पाणी घेऊन दिना घटाघटा प्यायला लागला तशी कौशी त्याच्याकडे पहात म्हणाली,

" सैपाक झालाया. खाउन घिवा. अन् मंग पानी पिवा"
" व्हय की. वाढ."

उरलेले पाणी घेऊन दिना पुन्हा बाहेर गेला. तोंडावर पाण्याचा हबका मारला आणि आत येऊन भुकेल्या मांजरीगत चुलीसमोरच्या जागेवर बसला. कुठूनसा कृष्णा धावत आला आणि बापाशेजारी उकिडवा बसला. पुढ्यातल्या भाकरीचा तुकडा वाटीतल्या लालजर्द कालवणात बुचकळीत म्हणाला,

" बा, तू गावात कंदी जानार?"
" कां रं? "
" नै, म्हंजी कनै.....तू कडं कवा......"
" ए, गप कि रे. जेव की गुमान." कौशी कां तडकली ते दिनाला समजे ना.
" कां चिरडायलीस? बोलू दे की त्याला."
" काय बोलायचंय! हे कवा आननार अन्‌ ते कवा आननार हेच की."
" आत्ता! पोरानं आनि काय करावं म्हन्तीस?"
" तेच की पोरानं तेच करावं आनि तुमी बी तेच करावं."
" म्हंजी?"
" घरात न्हाई दाना आन्‌ म्हनं हवालदार म्हना."
" कोडं कां बोलायलीस. शिध्धी बोल की."
" काय बोलू? वरीस पाडवा परवाला आलाय. कार्टं, हार कडं कवा आननार म्हून बेजारतंय."
" बरं मग?"
" कर्म माजं! घरातल्या दुरड्या कवाधरनं पालथ्या पडल्यात. सनाला काय करनार? तुमी बसा हितच त्या मुकाडदमाची वाट बगत."
" मंग काय करावं म्हन्तीस?"
" पवरा हिरीत पड्ला तर काय वाट पहात बसान कां तो कवा वर येईल म्हून?"

भाकरीचा शेवटचा कुटका दिना चघळीत होता आणि कौशीकडे कौतुकाने बघत होता. कौशीचं हे असं कोड्यातलं आणि म्हणी उखाण्यांनी सजलेलं बोलणं त्याला फार आवडायचं. तशी ती दहावी पर्यंत शिकलेली होती. दिनाची मजल मात्र चौथीपुढे गेली नव्हती. कौशीचं माहेर तसं बर्‍यापैकी शिक्षित होतं. तिचा बा परभणी जवळच्या एका खेड्यात परंपरेने येसकर आणि चार बुकं शिकला म्हणून ग्रामसेवक होता. दिनाचा तो चुलत मामा लागत होता. दिनाचं गांव हिंगोली जवळचं मंठा आणि बाप गावच्या सावकाराच्या जमिनीचा सरकती होता. दिना बापाचा एकुलता एक मुलगा. लहानपणापासून तालमीचा शौकीन. आणि त्यामुळेच की काय डोक्याने जरा जडच. किल्लारीच्या भूकंपानंतर भोवतालच्या परिसराची एकूणच झालेली वाताहत, लागोपाठ पडत गेलेला दुष्काळ आणि राजकीय मागासलेपण या दुष्टचक्रात जी कांही सार्वत्रिक अवदशा झाली त्यामुळे हजारो माणसे देशोधडीला लागली. गांव सोडून पोटापाण्य़ासाठी शहराकडे धांवली. त्या सुमारास नाशिक पुणे परिसरात शहरविस्तारासाठी नव नवीन बांधकामे सुरु झाली. त्यात मग कारागिरीसाठी ही माणसे सामावत गेली. या सार्‍यांना कारागिरी येत होतीच असें नव्हे. पण पोटातल्या आगीने हातांनाही अक्कल दिली. कुणी गवंडी, कुणी सुतार, कुणी कॉन्‍क्रीट कामाचे सेन्‍टरिंग करणारे, कुणी अन्य कांही कामे शोधून पोट भरू लागले. ज्यांना हेही साधले नाही ती माणसे दिनासारखी रखवालदाराचे काम करू लागली. कौशीला दिनाच्या नांवाचं कुंकू ती पाळण्यात असतांनाच लागलं होतं. ती शहाणी सुरती झाली तशी या येड्या बागड्याचा संसार टुकीनं सांभाळू लागली. आत्ताही हा येडाबागडा ओठातून फुटू पहाणारं हसूं दाबून धरण्याचा प्रयत्न करीत मिष्किलपणे कौशीकडे पहात होता. काळीसांवळी असली तरी कौशी ठसठशीत होती. दिनाच्या जिवाची अस्तुरी होती.

" दात काडाया काय झालं?"
" काय न्हाई. ते पवर्‍याचं काय म्हनालीस?" दिनाचा बतावणी पाहून कौशीही हंसायच्या बेतात होती.
" उटा. चहाटाळपणा बास्‌ झाला. तो मुकाडदम कुटं घावतोय का बगा. न्हाईतर त्या बिल्ड्याचा बंगला गावांतच हाय म्हनं. बगा जाऊन एकदा."

कौशीनं बिल्डरचा बिल्ड्या केलेला पाहून दिनाला पुन्हा हसूं फुटलं. पण आता तिच्या समोर अधिक वेळ काढणं शहाणपणाचं नव्हतं. मळालेले कपडे बदलून स्वच्छ कपड्यात खोपटा बाहेर पडणार तेवढ्यात सुशीनं खाटेखालची पत्र्याची ट्रंक पुढे ओढली आणि खालच्या एका पातळाच्या घडीत दडवलेली एक दहा रुपयाची बारीक घडी घातलेली नोट काढून दिनाच्या हातावर ठेवली. दिनाच्या डोळ्यात पाणी तरारलं. गेले दहा बारा दिवस घरात कसे काढले गेले ते त्याला माहिती होतं. कृष्णानं परवा बिस्किटाच्या पुड्यासाठीं हट्ट करून शेवटी कौशीच्या हाताचा फटका खाल्ला होता. आणि आता गावांत जातांना जवळ असावे म्हणून कौशीने बाजूला टाकलेले दहा रुपये दिनाच्या हाती ठेवले होते. त्या क्षणी कौशीला कवेत घ्यावं असं दिनाला वाटलं पण डोळ्यातलं पाणी लपवीत खालमानेने तो तडक बाहेर पडला.

कच्ची वाट सरून वस्ती सुरू झाली तशी दिनाची नजर दिसलेल्या पहिल्या पानटपरीवर गेली. अजून चार फर्लांग चालायचं आहे, गुटक्याची एक पुडी चघळायला घ्यावी म्हणजे जरा तरतरी येईल म्हणून पाय तिकडे वळाले खरे. पण टपरीवर एका बाजूच्या काचेच्या कपाटांत बिस्किटाचे पुडे लावलेले पाहून दिनाची मान आपसूक खाली गेली आणि तसाच तो तरातरा चालायला लागला ते थेट मुकादमचे घर येईपर्य़ंत. मुकादम त्याची फटफटी फडक्याने पुसत होता. अंगावर ठेवणीतले कपडे होते. दिनाची नजर जरा पुढे गेली तर मुकादमाची बायकोही हातातल्या गोठ पाटल्या सांवरत इरकलीत उभी.जोडी कुठे बाहेर जायच्या तयारीत दिसत होती.

" कोण? दिना! कां रं हितं कशापायी येणं केलंस? आन साईट कुनाला इच्यारून सोडलीस?" मुकादमानं एकदम सरबत्तीच लावली.
" न्हाई जी. साईट कशी सोडंन. पाच सा हप्ते झाले. कुनी काई आल्यालं न्हाई साईटवर. म्हून आलो."
" कुनी काई आलं न्हाई म्हन्‍जे? साईट सध्या बंद ठेवलीया. बुकिंग न्हाई. साहेब बी वैष्णोदेवीला गेलेत. सध्या स्ल्याकच हाय."
" पर आमी काय करावं?"
" म्हंजी?"
" म्हंजी, सा हप्ते झालेत. हाजरी न्हाई मिळाली. लै तारांबळ व्हाय लागलीया. काय पैशे मिळतीन म्हणतांना आलो."
" कां कौशी कामाला जातीया ना?" मुकादम डोळा बारीक करीत म्हणाला. दिनाच्या कपाळाची शीर तडतडायला लागली. तरीही सांवरून म्हणाला,
" तिचं काय पुरतं पडायलं? त्यांत जरा वल्ली सुक्की खायाला मिळतिया यवडंच."
" आन लेका, साईट बंद पडलीया तर साइटरवचा माल हाय की."
" ............."
" काय डोळे वासून पहायलास रे ए शहाजोगा. साइटवरचं परचुटन भंगार, ढप्पे ढुप्पे वोपून किती मिळाले ते कां नाही सांगत?"
" काय बोलताय काय साहेब. कां गरीबाला बालंट लावतांय्‌?"
" तुज्या मायचा गरीब तुज्या! काय पहिलाच साईट वाचमन पहालोयं कां मी."
" मुकादम, मी त्यातला न्हाई. काय गैरसमजूत करून घिऊ नका. आज लैच नड लागलीया. काय उचेल तरी द्या बापा."
" आज तर काई जमायचं न्हाई. साहेब बाहेर गेल्यात. माजं बी पेमेन्‍ट झाल्यालं न्हाई. म्होरल्या बुधवारी साईटवर येतो. तवा काय तरी बगू"

एवढं बोलून मुकादम फटफटीला किक मारून चालता झाला.

दिना फटफटीने सोडलेल्या धुराच्या पुंजक्याकडे पहातच राहिला. दिना पाय ओढीत घराकडे चालायला लागला तेंव्हा रानात गेलेली गुरं परतायला लागली होती. मुकादम असा तिर्‍हाईतासारखा वागेल असं त्याला कधी वाटलं नव्हतं. पाय पुढे चालत होते आणि मन मागे भरकटायला लागलं होतं. आठ वर्षांपूर्वी दिनाच्या गावांतून कामधंद्याच्या शोधात शहराची वाट धरलेल्या गरजू तरुणापैकी एक तरूण म्हणजे जालिंदर कुमावत. तसा जरा हिकमती स्वभावाचा. बाकी तरूण जो मिळेल तो कामधंदा, जमेल ते कसब यांत गर्क झाले. स्थानिक मजूरांपेक्षा कमी पैशात काम करूं लागले म्हणून स्थिरावले. पण तरीही शहरातला असलेला मजुरांचा तुटवडा जालिंदरने बरोबर हेरला आणि अवकळा झालेल्या विदर्भातल्या गांवा गांवाकडे चकरा मारून मजूर पुरविण्याचा धंदा करू लागला. शहरी भाषेत लेबर कॉन्‍ट्रॅक्टर आणि साध्या भाषेत मुकादम झाला. गरज संपली की आपणच आणलेल्या माणसांना वार्‍यावर सोडायचे आणि पुन्हा गांवाकडून गरजू कामगारांची फौज आणायची हे कत्रांटदारीतले कसबही त्याला आपसुकच साधले. मुकादम दिनाचा तसा दुसताच गांवकरी नव्हता तर कौशीच्या दूरचा नातेवाईक लागत होता. त्या नात्याने सुरुवातीला दिनाला भाऊजीही म्हणत असें. आणि त्यामुळेंच बहुदा दिनाला त्याने रखवालदाराची नौकरी दिली होती. साईटवर रहाण्याची मोफत सोय होते आहे आणि कौशीही सतत डोळ्यासमोर राहू शकते या दोन लोभापायी दिनाने रखवालदारी पत्करली होती. पण रखवालदारी पेक्षा गवंडी, सुतार, सेन्टारिंग फिटर असे कांही झालो असतो तर फार बरे झाले असते असे दिनाला वाटायला लागले. या कारागिरांना रोजीही चांगली मिळते, हप्त्याच्या शेवटी रोख मिळते आणि शिवाय बुधवारची सुटीही मिळते. रखवालदारासारखं चोवीस तास बांधून रहायला नको. कारागिरी काय, सहा वर्षं झाली कामाला लागून, बिगारी काम करता करता शिकतांही आले असतें. दिनाचं डोकं विचार करून करून थकलं आणि पाय चालून चालून. दिनाला त्याचंही फारसं कांही वाटलं नाही. कारण मुकादम इतरांच्या बाबतीत असाच वागलेला त्याच्या कानावर आलेलं होतं. पण सगळ्यात जीवघेणी जखम झाली होती ती मुकादमानं घेतलेल्या संशयानं. दिनाला तो वार फार खोलवर लागला. इतके दिवस इमानदारीने काम करूनही ही अशी संभावना व्हावी या विचाराने तो उबगला होता. आणि मग आपण चोर नसतांही चोर ठरवले जाणार असूं तर मग इमानदारी तरी कां करायची, या विचारापाशी दिना पुन्हा पुन्हा येत राहिला.

नुसता ओढून घेतलेला दरवाजा ढकलून दिना घरांत शिरला तर कौशी उभ्या गुडघ्यावर हनुवटी टेकवून त्याची वाट बसलेली. कृष्णा बाजूच्या खाटेवर शांत झोपलेला. कौशी जेवणाची ताटं वाढत होती तोवर हातपाय धुऊन दिना तिच्या समोर येऊन बसला. कांही न बोलता मुकाट जेवला. त्याचा रागरंग पाहून कौशीही गप्पच राहिली. कौशी आवरासावर करीत होती तेंव्हाही तो शून्यात नजर लावूनच बसला होता.

" हं, काय झालं? मुकाडदम भेटला?" अखेर कौशीने त्या शांततेला तडा दिलाच.
" हूं. भेटला."
" काय म्हनाला?"
" काय न्हाई"
" म्हंजी......"
" उंद्याला बंदुबस्त व्हईन"
" म्हंजी......"
" म्हंजी, म्हंजी काय लावलया? उंद्याला बंदुबस्त व्हईन म्हनलं ना!" आपण कां इतके करवादलो हे दिनालाही समजेना.
" अवो पर म्हंजी.......कसा? आन्‌ यवडं चिरडायला काय झालं?"
" आता काय बी इचारू नगंस. लै दमायला झालंय बग. उंद्याला तुला पैसं भेटतीन. डाळ,गूळ, हार, कडं सम्दं काय ते घेऊन यी."

कौशीनं फणकार्‍यानं नाक मुरडलं आणि कृष्णाशेजारी जाऊन पडली. दिना लगेच झोपणार नव्हता. बांधकामाच्या जागेवर एक गस्त घालून येणार होता.
आणि आज तर गस्तीला थोडा जास्तच वेळ लागणार होता. दिना कंदील आणि काठी घेऊन निघाला. आज त्याने चाव्यांचा जुडगाही बरोबर घेतला होता. एक नावापुरती गस्त घालून झाली तसा दिनानं हळूच आवाज न करतां बांधकाम साहित्याच्या गुदामाचं कुलुप उघडलं. एक रिकामी गोणी घेतली आणि शिल्लक राहिलेल्या दरवाज्याच्या बिजागर्‍या, कडी-कोयंडे, नळकामाचे सुटे भाग, आणखीही कांही लोखंडी सामान इत्यादि गोळा करून गोणीत भरायचा सपाटा सुरूं केला. अशा दोन गोण्या भरल्या. त्या त्याने उरापोटावर उचलून दाराच्या बाहेर नेउन ठेवल्या. दाराला पुन्हा कुलुप लावून बाहेर येऊन बसला. हाताच्या बाहीला कपाळावर आलेला घाम पुशीत तो पुढची योजना मनाशी ठरवूं लागला. उद्या पहांटे, अंधारातच तो या दोन गोण्या डोक्यावर घेऊन पुन्हा वस्तीकडे जाणार होता. याकूब भंगारवाला फार कांही लांब रहात नव्हता. पहांटच्या वेळेला याकूबकडे अशा मालाचा राबता असतोच हे दिनाला माहिती होते. दिनाच्या अंदाजाने या मालाचे वजन किमान चाळीस किलो तरी भरणार होते. याकूबने कांटा मारला तरी सात रुपयाच्या भावाने दोन अडीचशे रुपये नक्कीच मिळणार होते. कौशीला काय सांगायचं ते उद्याचं उद्या पाहू. सांगू मुकादमाकडून उचल आणली म्हणून. इतकं सारं मनाशी पक्कं करीत दिना घरापाशी पोहोचला आणि बाहेर अंगणात कौशीनं टाकलेल्या अंथरुणावर झोपी गेला.

दुसरे दिवशी दिनाला जाग आली ती कौशीच्या आवाजाने. दचकून दिनाने नजरेच्या टाप्प्यातल्या इमारतीकडे पाहिलं. त्या दोन गोण्या सकाळच्या कोवळी उन्हं घेत होत्या. दिना दचकून उभाच राहिला.

"काय झालं? कुनाशी बोलत होतीस?"
" अवो ते कुरकळणी काका"
"कोऽऽन?"
" मी कामाला जाती ना त्या बंगल्यात. थितलं मालक"
" बरं मग?"
" इक्तं डोळ फाड फाडून कां बगायलाय म्हन्ते मी. कोन रावन आला न्हाई तुमच्या शितेला पळवायला" कौशी डोळे चमकवीत हंसत होती.
" मस्करी सोड. कोन ते कायले आले व्हते ते बोल."
" सांगते! जरा दमानं घ्या की."
" हां बोल."
" ते काका हैत ना. त्यांच्या घराच्या मांग पान्याच्या मीटराचं चेम्बर हुगडच हाय"
" बरं.मग!"
" त्यांच्यात उंद्या तेंची ल्येक येनार हाय. माघारपनाला."
" बरं. मग!"
" तिची कच्ची बच्ची हैत. उगं खेळता खेळता येखांद पडन बिडन चेंबरात. म्हनतांना ते झाकाय पाहिजे."
" बरं मग!"
" डोच्कं तुमचं! त्याला ढापा लावून देशान कां म्हून इचाराय आले हुते, काका."
" अगं पर ते गवंड्याचं काम हाय."
" घ्याऽऽऽ! कुबेरानं धाडला घोडा आन्‌ रावसाहेबांचा फाटका जोडा"
" ये माजे आये! काय समजंन असं बोल की."
" काय कीर्तन समजायचंय त्यांत. रखवालदारानं गवंड्याची थापी हातात घेतली तर काय पाप लागंन कां?"
" पर मला जमंन कां त्ये?"
" अवो निस्तं ढापं तर बसवायचंय. शिमिट बिमिट सम्दं सामान हाय थितं. तुमी करनार नसान तर मी करीन."
" हॉ! मी करीन म्हनं. ते चूल लिपाय यवढं सोप्पं हाय काय?"
" तुमी चूल लिपा सोप्पी. मी ढापं लिपिते."

कृष्णाचा आवाज आला तशी कौशी घरांत गेली. संभाषण अर्धवट राहिलं. पण दिना मनाशी विचार करू लागला. काय अवघड आहे गवंडी काम. कधी बिगारी म्हणून गवंड्याच्या हाताखाली काम करायची संधी मिळाली असती तर ते कामही शिकायला मिळाले असतेच. आज अनायसे काम करून पहायची वेळ आली आहे तर काय हरकत आहे करून बघायला. दिना तसाच गुदामाकडे. गेला इकडे तिकडे बघत गोण्या गुदामात टाकून दिल्या. तिथेच एका गवंड्याची राहिलेली हत्याराची पिशवी उचलली आणि खोपटाकडे परतला. अंघोळ उरकली आणि कुलकर्ण्यांच्या बंगल्याकडे गेला.

ढाप्याचं काम दिनाला फार कांही अवघड गेलं नाही. आणि मग ते काम चटक्यासरशी झाल्यानं कुलकर्णी काकांच्या शेजारच्या बंगल्याच्या अंगणात चार फरशा बसवायचंही काम दिनाला मिळालं. मध्ये एकदा घरी येऊन भाकरी खाऊन गेला तेवढाच काय तो खंड पडला. पण सायंकाळी दिना घरी परतला तेंव्हा दिडशे रुपयाच्या नोटा दिनाने कौशीच्या हातावर ठेवल्या. कौशीच्या डोळ्यात पाणी तरारलं. काल रात्रीही दिनाच्या नकळत जाऊन दिनाला गोण्या भरतांना गुपचुप पाहूनही कौशीचे डोळे डबडबले होतेच. पण आताच्या पाण्यानं डोळ्याला गारवा लागत होता.

भल्या सकाळी चुलीवर शिजलेल्या डाळीत कौशी गूळ हाटीत होती. त्याचा सुवास दरवळत होता. दिना गुढीची आणि गुढीच्या खाली पाटावर मांडलेल्या गवंडी कामाच्या नवीन अवजारांची पूजा करीत होता. मनांत एक संकल्प जागा झाला होता. जीवनाला एक नवी दिशा मिळाली होती.

Thursday, May 14, 2009

मौन

अगदी ‘कृतान्‍तकटकामलध्वजजरा दिसो लागली’ या टप्प्यापर्यंत येऊन पोहोचलो नसलो तरी, पोस्ट रिटायरमेन्‍ट उपक्रमांचे संकल्प सोडून आणि मोडूनही वयाची साठी उलटून गेली तसा मी त्या वयाला साजेसे कांही उपप्रकार (किंवा थेरं) करू लागलो. म्हणजे ज्येष्ठ नागरीक संघाचा सदस्य होणे, हास्यक्लबाचा सदस्य होणे, योगासनाच्या वर्गाला जाणे, गुरुवारी संध्याकाळी दोन पेढे घेऊन दत्त मंदिरात आरतीला जाणे, सार्वजनिक वाचनालयात जाऊन वर्तमानपत्रे नामक चुरगाळलेली रद्दी वाचणे, इत्यादि इत्यादि. या सर्वांत सातत्य असलेच पाहिजे असा कांही दंडक नसल्याने नव्याचे नऊ दिवस हा माझा मूळ पिंड मी कसोशीने जपला. योगासन वर्गाला मी तिसर्‍याच दिवशी रामराम ठोकला. ती कपालभाती केली की मिसळी बरोबर चार चार पाव हाणावे लागायचे. तरीही प्रभात फेरी, ज्याला जनरली मॉर्निंग वॉक असे म्हणतात, त्याला मात्र मी इमाने इतबारे जाऊ लागलो. याला कारणे दोन. एक तर तिथेही चार मित्र मिळवून एका कट्ट्यावर बसून वयाला साजेशा किंवा न साजेशा टवाळक्या करायाला मिळतात आणि दुसरे म्हणजे मग शेवटी घरी परतण्या आधी टपरीवरचा गरमागरम चहा. (चहाला गरमागरम भजी, वडा किंवा तत्सम कांही पदार्थाचे अनुपान दिले नाही तर मला चहा बाधतो).

परवा सकाळी हा असा मी प्रभात फेरीला निघालो पण मूड कांही जमून आलेला नव्हता कारण दाढ दुखीने आधीची रात्र जागवली होती. तसे शोरूमचे दात सोडले तर मागच्या गोडाऊनमधल्या बहुतेक दाढा जायबंदी झाल्या आहेत. संक्रांतीचा सुमारास नातवंडाना ऊस दाताने फोडून कसा खावा याचे प्रात्यक्षिक करून दाखवण्याचा शूरपणा अंगाशी, खरं म्हणजे दाढेशी बेतला होता. तेंव्हा पासून ती दाढ हलायाला लागली होती. ती काढून टाकावी असा सल्ला समस्त सुहृदांनी आणि हितचिन्‍तकांनी दिला होता. पण दंतवैद्य नामक दैत्याची माझ्या मनात प्रचंड भीति बसलेली होती. त्याला कारणही तसेंच होती. पस्तीस चाळीस वर्षांपुर्वी केवळ अपघाताने तुटलेला दात काढतांना एका दंतवैद्याने मला दिलेल्या मरण यातनांची मनांत दहशत बसलेली होती. पण आता नाईलाज झाला होता. म्हणून मी नित्याच्या प्रभात फेरीनंतर, आमच्या चांडाळ चौकडीपैकी कोणी तरी एखादा चांगला,
कमीत कमी वेदना देणारा दंतवैद्य सुचवावा असा प्रस्ताव मांडला.

" टूथ ट्रबल? ओह्‌ जीझस्‌ क्राईस्ट! " रम्या बागल्या (मूळ नांव रमेश बागूल) फुस्सकला. हा अमेरिकेतल्या जांवयाकडे जाऊन आल्यापासून असाच बोलतो. साधं ‘अरे देवा’ म्हणाला असता तर याचे फोरफादर्स काय नरकात पडले असते कां? रम्या एकदाच अमेरिकेला जाऊन आला तर अंतर्बाह्य इतका कां बदलला याचं मला पडलेलं कोडं आहे. रम्या आता आमच्या बरोबर वडा भजी खात नाही, आणि चहाही घेत नाही. चहा ऐवजी तो काळी कॉफी घेतो. तरी बरं, हाच प्राणी एकेकाळी भजनी मंडळात "हर्रीऽ मुके म्हनाऽ, हर्री मुकेऽऽ म्हनाऽऽ, पुन्न्याची गनऽना कोऽऽन करीऽऽऽऽ!" म्हणत टाळ बडवीत असे. हा याचा इतिहास आहे. काळाच्या ओघात माणूस बदलतो हा निसर्गक्रम असेलही. तो बदल इतका असावा?

"आय् टेल यू वडुल्या (माझ्या आडनावाच्या अनेक अपभ्रंशापैकी हे एक) यु नो, स्टेट मध्ये डेंटिस्ट म्हणजे, ओह् गॉश, दे लिक यू अ फॉर्च्यून."
मला या वाक्याचा कांही अर्थही लागला नाही आणि संदर्भही नाही. इथं मी दाढदुखीने बेजार झालो आहे आणि हा अमेरिका पुराण लावून बसतो आहे. मी विमनस्कपणे इतर दोघांकडे पाहिले तर, त्या दोघांनीही मिसळीच्या रश्श्यात पावाचे तुकडे बुडवून गिळण्याच्या कार्यक्रमात यत्किंचितही खंड न पाडता मी रमेश बागूल साहेब काय सांगतील ते मुकाट ऐकावे अशा अर्थाच्या खुणा केल्या.

" बट् डोन्ट वरी. आय् कॅन गेच्च्यू अ नाईस डेन्‍टो. माझी एक नीस इथल्या डेंटल कॉलेज मध्ये बीडीएस् करतेय. शी कुड बी अ गुड हेल्प टु यू. "

तर इत्यर्थ असा होता की रमेश बागूल साहेबांची कुणी कुमारी प्रीतिबाला बागूल नामे पुतणी शहराबाहेरील दंत महाविद्यालयात दंत वैद्यकशास्त्रातील शल्यचिकित्सा- स्नातक होऊ घातली होती. दंत महाविद्यालयात प्रत्यक्षिकासाठीं कांही दंतरुग्णही लागतात. त्यासाठीं एक शुश्रुषा कक्षही असतो आणि विशेष म्हणजे त्याच दिवशी त्या कन्येची प्रात्यक्षिकासाठी बहिस्थ-रुग्ण-कक्षावर नेमणूक (ओपीडी) होती. तिच्या वशिल्याने म्हणे, माझे दंतोत्पाटन चकटफू होऊ शकले असते. अशी मौलिक भर माझ्या ज्ञानांत पडली. आणि चक्क चकटफू दंतोत्पाटन! या एवढ्या मोठ्या लोभाला बळी मी बळी न पडता तरच नवल झाले असते. शिवाय एका होतकरू दंतचिकित्सकाला किंवा दंतचिकित्सिकेला ज्ञानार्जनात मदत करण्याचे पुण्यही मला मिळणार होते. मी तडक घरी जाऊन स्नानादि आन्हिके उरकून दंतमहाविद्यालयाकडे कोणतीही काचकूच न करता कूच करण्याचा निर्णय घेतला.

मी इप्सित स्थळी पोहोचलो तो तिथे एक गौरवर्णीय कृशांगी मला सन्मुख झाली. " आपण वडुलेकर काका ना?" त्या युवतीचे लावण्य पाहून अंतर्बाह्य दाटून आलेले माझे भांबावलेपण शक्य तितके लपवण्याचा प्रयत्न करीत, मी उद्गारलो "हो". तेवढ्या श्रमानेदेखील माझा घसा कोरडा पडतो आहे असे मला वाटून गेले.

" मी प्रीतिबाला बागूल. काकांचा फोन आला होता. तुम्ही येणार आहात म्हणून." मी रम्याच्या तत्परतेला मनोमन सलाम केला. खरोखरच रम्या अमेरिकेत राहून बदलला होता.

"या!" या तिच्या पुढच्या उद्गारासरशी मी मंत्रचळ्यागत तिच्या मगोमाग जाऊ लागलो. ती मला ज्या कक्षात घेऊन गेली तिथे तो मोहकसा दिसणारा दंतशल्यचिकित्सामंच, वरती दिव्याचा चंबू, चकचकीत फवारके लावलेल्या नळ्या इत्यादि सरंजाम होताच. पण त्या सौंदर्यात भरच पडावी अशा शुभ्र गणवेशातल्या तरतरीत अशा आणखी चार युवती जणू माझीच वाट पहात असाव्या अशा आविर्भावात उपस्थित होत्या. त्या चार ज्यूनिअर्स आहेत आणि कुमारी प्रीतिबाला बागले या सिनियर आहेत आणि त्या दांत काढण्याचे प्रात्यक्षिक माझ्यावर करून दाखवणार आहेत अशी मौलिक माहिती मिळाली.

माझ्या मनातले दंतवैद्याचे चित्र अगदी निराळे होते. दंतवैद्यक हे केवळ पुरुषांचेच क्षेत्र असून दंतवैद्य हा हातात चिमटे, पक्कडी घेऊन दंतरुग्णाच्या दाताचा खातमा करणारा कुणी दैत्यच असतो अशी कांहीशी माझी कल्पना होती. शिवाय तोपर्यंत मी दंतोत्पाटानाच्या इतक्या सुरस आणि चमत्कारिक हकीकती ऐकल्या होत्या की दंतवैद्य नामक राक्षसाने इथे हे मायावी स्त्री रूप धारण केलेले आहे, असे वाटून मी थोडासा घाबरलोही. पण काही लोक मुमुक्षु भिषग्‌ वर्गाला ज्ञानोपासनेसाठी मदत व्हावी या उदात्त हेतूने मरणोपरांत देहदान करतात, तसे आपणही दंतदान करून थोडेसे पुण्य़ कमवयाला काय हरकत आहे असा एके उदात्त हेतू मनात आल्याने मी त्या दंतशल्यचिकित्सिकेने निर्देशित केल्या प्रमाणे दंतशल्यचिकित्सा मंचकावर स्थानापन्न झालो. माझा रक्तदाब तपासणे, मला मधुमेह आहे किंवा नाही याचा कबुलीजबाब घेणे, इत्यादि प्राथमिक सोपस्कार पूर्ण झाल्यावर माझ्या जबड्यामध्ये जबडा बधीर करण्यासाठीं देतात ती टोचणी करण्याचा प्रयत्न सुरू झाला. त्या प्रयत्नात केवल माझा डावा जबडाच नव्हे तर डावा गालही आतून बधीर करण्यात आला. त्या शिकाऊ दंतवैद्यिणींच्या सुमारे तासाभराच्या अथक प्रयत्नानंतर माझी आधीच हल्लख झालेली दाढ काढली गेली. झाऽऽलं एकदाचं! असा सुस्कारा सोडून मी त्या मंचकावरून पायउतार होणार इतक्यात, " काका, एक मिनिट हं! जरा तसेच बसून राहता कां प्लीज. आमचे सर तुम्हाला पहायला येताहेत." या कु. प्रीतिबालाच्या विनवणीला नकार देण्यासारखे कांहीच नव्हते म्हणून तसाच त्या मंचकावर पहुडलो.

ते तिचे सर येईपर्यंत डोळ्यावर येणारी पेंग मी कशीबशी थोपवून ठेवली. सुमारे अर्ध्या तासाने ते तिचे सर आले ते थेट माझा जबड्यात घुसले. म्हणजे येताक्षणीच माझा जबडा उघडून ते निरीक्षण करू लागले आणि निरिक्षणादरम्यान ते मला अगम्य अशा भाषेत कु. प्रीतिबालाला कांही सूचना करीत होते. त्यांचे निरीक्षण आणि सूचना संपल्या आणि ते तात्काळ निघून गेले. मी प्रीतिबालाकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले. तिने दोन गोष्टी स्पष्ट केल्या. पहिली म्हणजे मी माझ्या दातांची जराही काळजी न घेणारा अत्यंत अव्यवस्थित माणूस आहे असे त्यांचे मत आहे. आणि दुसरी म्हणजे, माझ्या तोंडातील उजव्या बाजूच्या खालच्या दंतपंक्तीतील आणखी एक दाढ ताबडतोब काढली पाहिजे. मी जरा घाबरलो. कारण नाही म्हटले तरी डावी बाजू आता जराशी दुखायला लागली होती.

पण मग विचार केला चकटफूच आहे तर घ्या काढून आणखी एक दाढ. म्हणून मी संमती दिली. आणखी एक सलग प्रॅक्टिकल करायला मिळणार म्हणून त्या चार ज्यूनिअर्स आणि एक सिनियर प्रीतिबाला अशा पंचकन्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद ओसंडून वहायला लागला. या प्रॅक्टिकलला वेळ मात्र बराच लागला. सुमारे दीड तास. आधीच तुटून छिन्नविछिन्न झालेल्या त्या दाढेचे गिरमिटाने अक्षरश: तुकडे तुकडे करून तिचा नायनाट करावा लागला.

मी कापसाचा बोळा दाबून धरलेले बधीर झालेले दोन जबडे आणि बधीर झालेले दोन्हीही गाल घेऊन तिथून सहीसलामत (?) दंत महाविद्यालयाच्या बाहेर पडलो तेंव्हा, मला कोणत्याही कारणासाठीं तोंड उघडणे शक्य नाही हे मला घरी जाण्यासाठी रस्त्यावरची रिक्षा थांबवली तेंव्हा समजले. तो मला माझे गंतव्य स्थान विचारीत होता आणि मी माझे तोंड तसूभरही उघडू शकत नव्हतो. अखेर मी खिशातून एक कागदाचे चिटोरे काढून त्यावर गंतव्य स्थानाचे नांव खरडले आणि त्याला दाखवले. त्यावर रिक्षावाल्याने माझ्याकडे करुणार्द्र नजरेने कां बघितले हे मला नंतर समजले.

रिक्षा निघाली आणि कांही अंतर कापल्यानंतर एका चौकाच्या अलिकडे थांबली. रिक्षाचालकाने मागे वळून मला कांही खाणाखुणा करायला सुरुवात केली. मला कांही समजेना. पुढे रहदारी ठप्प झाल्याचे दिसत होते. पण रिक्षाचालक खाणाखुणा करून काय सांगायचा प्रयत्न करतो आहे त्याचा कांही बोध होत नव्हता. अखेर माझ्या डोक्यात प्रकाश पडला. मी ज्या पद्धतीने त्याला कुठे जायचे ते सांगितले होते त्यावरून मी मुका आहे हे त्याला वाटले होतेच, शिवाय मुकी माणसे बहिरी असतात हेही त्याला माहिती असावे. त्यामुळे तो जमेल तशी करपल्लवी करून कांहीतरी सांगण्याचा प्रयत्न करीत होता. अखेर त्याला मीही खुणेने मला ऐकू येतंय् तू बोल, असे सुचवले तेंव्हा त्याने, पुढल्या चौकातून कसलीशी रॅली चाललेली आहे, अर्थातच् रहदारी ठप्प झाली आहे आणि आपल्याला पुन्हा मागे वळून दुसर्‍या मार्गाने जावे लागेल असा वाचिक बोध दिला. त्याप्रमाणे त्याने मला माझ्या घरापाशी सोडले. हे सगळे ठीकच झाले पण रिक्षा प्रवासात मी सध्या बोलू शकत नाही या जाणिवेने मी कमालीचा अस्वस्थ झालो.

सकाळी गडबडीत मी दात काढायला जातो आहे हेही घरात कुणाला सांगितले नव्हते. गडबडीत असं आपलं म्हणायचं पण, दात तर काढायला जातो आहे त्यात काय सांगायचंय असा वयाला साजेसा अहंकारही त्यात होताच. पण आता निदान कांही काळ तरी हे असे, मौनव्रत धारण करावे लागणार
आणि त्यातून काय काय प्रसंग उद्‌भवणार या शंकेने मनात काहूर माजले. पहिला सामना झाला तो नातवाबरोबर.

" तू उशील का केला.चल बाप्पाला ज्याऊ" माझी प्रभातफेरी झाली की आम्ही दोघे देवाला जाणे हा दिनक्रमाचा एक भाग होता.
" ए शहाण्या, किती वाजलेत पाहिलंय कां. बाप्पाला काय जातोस, आबांची जेवायची वेळ झालीय." सूनबाई आतून कडाडल्या. खरंच की. मी घड्याळाकडे पाहिलं. दीड वाजायला आला होता. सूनबाईनी पाण्याचा पेला आणून पुढे ठेवला आणि....
" आज बराच उशीर झाला तुम्हाला. कुठे कांही महत्वाच्या.....अगबाई, आणि चेहरा किती उतरलाय तुमचा. बरं नाही की काय" तिचा स्वर कापरा झाला. डोळ्यातली भीति पाणावायला लागली. पण क्षणभरच. असं मला वाटायला लागलं. कारण, पुढच्याच क्षणी,
" हेही सकाळपासून चारदां म्हणाले, बाबा कां आले नाहीत अजून म्हणून. ते इन्शुरन्सचं काम करायचं होतं ना तुम्हाला. तुमची बरीच वाट पाहिली त्यांनी. शेवटी तेच गेले ते पेपर्स घेऊन " कातर स्वर आता करडा व्हायला लागला होता.

मी मनातल्या मनात जीभ चावली. गृहपाठ करायचा विसरलेल्या विद्यार्थ्यासारखी मी मान खाली घातली. निवृत्तीच्या कालातही मी स्वत:ला थोडसं व्यग्र ठेवलेलं होतं. वीज, टेलेफोन, पाणी वगैरे नैमित्तिक बिले भरणे, इन्शुरन्सची नूतनीकरणे करणे इत्यादि पेन्शनर्स जॉब मी माझ्याकडे घेतले होते. आज आणि आजच कांही इन्शुरन्स संबंधी कांही महत्वाची कागदपत्रे इन्शुरन्स कंपनीत सादर करणे आवश्यक होते. माझ्या दाताच्या भानगडीत मी ते साफ विसरलो होतो. माणसाचे वय वाढलं म्हणजे अंगी सगळा शहाणपणा येतोच असं नाही. किंबहुना कर्तुमकर्तुम असा एक वृथा अहंकार आणि त्यातून निर्माण होणारा फाजील आत्मविश्वास कधी कधी रुपेरी केसांना लाज आणतो. तशीच कांहीशी वेळ मी माझ्यावर आणून ठेवलेली होती.

तूर्तास मौन हे माझं वास्तव होतं. त्याचं खरं कारण सांगायला कांही हरकत नव्हती. पण प्रत्येक माणसाच्या मनांत एक वात्रट मुलगा नेहेमी दडलेला असतो आणि अशावेळी तो हमखास कांहीतरी वात्रटपणा करायला लावतो. तोच वात्रट मुलगा माझ्या डोक्यात कधी घुसला ते कळलंच नाही. सूनबाईने जेवणाचे पान घेतले आहे असे सांगितल्यावर, पोटात कावळे कोकलत असूनही, मी मोठ्या नम्रपणाने (!) जेवायला नकार दिला. सूनबाई संभ्रमात. मग मी एक कोरा कागद घेतला आणि आज सकाळी मी एका साधुपुरुषाच्या सत्संगाला गेलो होतो आणि दोन दिवसांसाठी उपोषण आणि मौन व्रत धारण केले आहे असा फतवा जाहीर केला. मात्र राजगिर्‍याचा लाडू आणि दुध चालेल कां या सूनबाईंच्या पृच्छेला मी तात्काळ होकारार्थी मान हालवली. यावर, एखाद्या तर्‍हेवाईक, भंपक माणसाला पाहून शहाण्या माणसाचा होतो तसा सूनबाईंचा चेहरा झाला. अजून तोंडाची उघडझाप फारशी नीट होत नव्हती त्यामुळे दोन राजगिर्‍याचे लाडू मी दुधात भिजवले आणि चमच्याने खाल्ले. त्यावेळी नातू माझ्याकडे ज्या नजरेने पहात होता ती मला अस्वस्थ करीत होती. अखेर "यंटम्‌" असा मार्मिक शब्द उचारून (मी एव्हाना यंटम् दिसत असणारच) तो आतल्या खोलीत पसार झाला आणि..

इतका वेळ माझ्याबरोबरच मौन पाळलेल्या भ्रमणध्वनीने शंख वाजवला. मी जितक्या उत्सुकतेने तो हातात घेतला तितक्याच हताशपणे त्याच्या कडे बघत राहिलो. आता असे बघत राहणे क्रमप्राप्त होते. कारण मी बोलू शकत नव्हतो. माझ्याशी संपर्क साधू इच्छिणार्‍याचे भ्रमणध्वनीच्या पटलावर आलेले नांव आमच्या एका दाभाडे नांवाच्या परम मित्राचे होते आणि हे दाभाडे खरं म्हणजे वाभाडे काढण्यात पटाईत असें एक वाह्यात प्रकरण होतं. आमच्या अशाच एका ज्येष्ठ नागरीकांच्या संध्याकाळच्या अड्ड्याचे ते आद्य संस्थापक होते. अड्ड्यावरची सगळीच मंडळी तशी ‘पिकल्या पानाचा देठ कां हो हिरवा’ म्हणावी अशी कांहीशी टवाळच होती. पण हे ह.भ.प. दाभाडे बुवा त्यातले शिरोमणी होते. अड्ड्यावर डच् किंवा सोल्जर्स बेसीस वर भजी मागवली तर इतरांची नजर चुकवून चार दोन भजी हळूच पळविण्याच्या कर्तृत्वामुळे त्यांना ही ह.भ.प. पदवी बहाल करण्यात आली होती. मी भ्रमणध्वनीकडे किंकर्तव्यमूढ असा पाहात असतांना पुन्हा सूनबाई माझ्या सहाय्यतेला धावल्या आणि मग आम्ही तूर्तास केलेल्या पराक्रमाची ब्रेकिंग न्यूज त्या आमच्या या परममित्राला देत्या झाल्या. दूरदर्शनच्या ‘आज तक’ किंवा तत्सम गुर्‍हाळ-वाहिन्यांच्या कानी या दाभाड्याचे नांव पडले असते तर त्यांनी लक्ष लक्ष रुपये मानधन देऊन या प्राण्याला नक्कीच साईन केले असते. माझ्या मौनव्रताची बातमी षट्‌कर्णी आणि कर्णोपकर्णी होण्याला आता कांही मिनिटे पुरेशी होती. पुन्हा भ्रमणध्वनी वाजायला लागणार या भयाने मी त्यालाही मूक (सायलेन्ट) केला.

आता मी दिवाणखान्यात भिंतीवरच्या घड्याळाच्या सेकंद काट्याकडे एकटक पहात आरामखुर्चीत एकाकी पहुडलो होतो. विचार करत होतो. कारण त्यापेक्षा अधिक मी कांही करूच शकत नव्हतो. ‘मौनं सर्वार्थ साधनम्‌’ असं कुणीसं म्हटलं आहे हे आठवलं. तो ‘कुणीसा’ जो कोणी असेल त्याने ती उक्ती लिहिण्या किंवा वदण्यापूर्वी स्वत: कधी मौन पाळले असेल कां? मी कोणता ‘सर्वार्थ’ साधणार होतो. एरवी मी ‘वट्टार वट्टार’ करणारा माणूस. मला ही मौनाची कल्पना कां सुचली? माणसाच्या मनांत नेहेमी दोन प्रवाह वहात असतात. एक प्रवाह ताच्यावरील संस्कारित प्रवृत्तींप्रमाणे दृष्य स्वरुपात वागायला लावतो आणि दुसरा प्रवाह अगदी विरुद्ध स्वरूपाने वागण्याची उर्मी निर्माण करीत राहतो. ती उर्मी तो आतल्या आंत साठवीत जातो. मात्र त्याचे ते अदृष्य स्वरूप कधी कधी अभावितपणे प्रकट होते. त्यात त्याच्या स्वाभाविक व्यक्तिमत्वाला छेद जाण्याचाही धोका असतो. माणसाला वेड लागण्याची ती पहिली पायरी असते. हे असलं कांही तरी मी केंव्हातरी वाचलं होतं. मला ते सारं पुन्हा पुन्हा आठवायला लागलं. शब्द हा माझा दुसरा प्राण आहे असं वाटायला लागलं. आणि तो प्राण मी गमावला तर हा प्राणही कदाचित्‌ गमावेन की कांय या भयाने मघाशीच रिकामा झालेला पाण्याचा ग्लास मी पुन्हा पुन्हा ओठांना लावीत होतो. निदान एवढं तरी बरं की, हे मौन दोन दिवसांसाठी आहे असं जाहीर करण्याचा शहाणपणा अभावितपणे मला सुचला होता. पण हे दोन दिवस मी काय करणार होतो. संवाद हे जीवनाचे अविभाज्य अंग आहे. इथे मी बुद्ध्याच शब्दकळा बाजूला सारली होती. ‘शब्देविण संवादु’ कसा साधावा. या विचारांच्या गर्तेतून कसल्याशा आवाजाने बाहेर आलो. इतका वेळ मी घड्याळाकडेच पहात होतो. पण एव्हाना संध्याकाळचे सहा वाजले आहेत हे त्या आवाजाने मला दाखवले. तशीही माझी अड्ड्यावर जाण्याची वेळ झालीच होती

अड्ड्यावरचा कोरम मी तिथे गेल्यावर पूर्णच झाला. आश्चर्य वाटावे अशी लक्षणीय उपस्थिती तर होतीच पण त्याहूनही अश्चर्यकारक अशी नि:शब्दता तिथे पसरलेली होती. एरवी ‘ काय कुणी गचकला बिचकला की काय रे? की दांतखीळ बसावी असं कांही घडलंय?’ असं एन्ट्रीचं वाक्य मी फेकलं असतं. पण आता मौनाचं बेअरिंग सांभाळणं भाग होतं.

" बरं. सांग आता. काय झालं?" शेवटी रवी सराफ शक्य तितका खर्जात सुरु झाला.निर्देश माझाकडेच होता. याचं मला आश्चर्य वाटालं.
" काय, कुठे काय? " मी. मात्र केवळ हाताच्या खुणांनी.
" फार बोलला का तो तुला? च्यायला ही हल्लीची कार्टी समजतात काय स्वत्:ला! " पहिलं वाक्य मला आणि दुसरं बाकी मॉबसाठी, जनरल.
" अर्ण्या, पण तूही साला एक झक्कूच आहेस. होता है यार. ऐसा टकाटकी होताईच है. पण म्हणून हे असलं बोलायचं नाही म्हणजे काय बाबा?"
इति सुभाष कीर्तिकर. मला कांही उलगडा होई ना. पण संभ्रमात मी एकटाच नव्हतो. नाना जोशीने खूणेने माझ्याकडे बघत अगदी मख्ख चेह्र्‍याने काय चाललं आहे असा अर्थाचे अविर्भाव केले. आणि,
" अरे या बाबाचं (म्हणजे मी) आणि चिरंजीवांचं कांही तरी वाजलंन्‌. तर हा डिप्रेशनमध्ये बोलायचाच बंद झाला" हे, गजा कर्वे, त्या दोन्ही कानाने बहिर्‍या नाना जोशीला ऐकू जावं म्हणून एवढ्या मोठ्याने बोंबलला की पलिकडच्या कल्व्हर्टवर बसलेल्या आणखी कांही पेन्शनरांचे कान टावकारले.

मी मुका झालो होतो पण बहिरा झालो नव्ह्तो. हा काय प्रकार आहे हे मला समजेना. माझ्या मौनाची यथेच्च टिंगल होणार याची मला कल्पना होती.
त्याला माझी मानसिक तयारीही होती. पण इथे हे काय चाललं आहे याचा उलगडा होईना. माझं आणि माझ्या मुलाचं कडाक्याचं भांडण झालं आणि म्हणून मी बोलायचा बंद झालो आहे असा कांहीसा जांवईशोध लागलेला दिसतो आहे इतपत उलगडा एव्हाना व्हायला लागला होता.

पण कां? मी विस्मय, संताप, अगतिकता इत्यादि सर्व जाळ डोळ्यात आणायचा प्रयत्न करीत दाभाड्याकडे पाहिलं. कारण दुपारी त्याचाच फोन आला होता. दाभाडे कानांत काडी खुपसून कान खाजवीत बसला होता. दाभाडेनी शांतपणे काडी कानातून काढून डोळ्यासमोर धरली, काडीला मळ लागलेला नाही याची खात्री करून घेतली, माझ्या कडे स्थिर नजरेने पाहिलं आणि म्हणाला,

" हां बोल. " दाभाडे
" बोल काय बोल? काय चाललाय हा तमाशा" मी. शब्द नाही.फक्त खुणा. "शब्देविण संवादु" हा असा होतो आहे हे पाहून मी जरासा उत्तेजित झालो.
" मी काय केलं? तू मौन पाळतो आहेस एवढंच मी गजाला कळवलं. त्यानं ते काय इंटरप्रीट ते त्यालाच ठाऊक" मी कपाळावर हात मारतो.
" ए! साला तूच म्हणालास ना यानं कांहीतरी इन्शुरन्सच्या पेपर्सचं लफडं केलं. म्हणून पोराने बापाला वाजवला म्हणून" गजा तडकला.
" मी असं कुठं म्हणालो. अर्ण्या बोलायचा बंद झाला आहे आणि इन्शुरन्सच्या कामाचा कांही तरी घोळ झाला आहे एवढंच मला समजलं. एवढेच मी बोललो " दाभाडेच्या बोलण्याला साळसूद पणाचा वास येत होता.
" पण तुला इन्शुरन्सच्या पेपराचं काय माहित?" मी.. पुन्हा खाणाखुणा!
" मला मीनल म्हणाली तसं." मी पुन्हा कपाळावर हात मारून घेतला.

सूनबाई दाभाडे काकांशी जरा जास्तच सलगीने बोलल्या होत्या हे खरं होतं. मी ते संभाषण पुसटसे ऐकले होते. पण त्या दोन निरनिराळ्या गोष्टींचा असा अर्थ दाभाडेने स्वत:च आणि बहुदा त्याच्या खवचट वृत्तीला साजेसा असा लावला होता. आणि विशेष म्हणजे तो काल्पनिक साधू, त्याचा मौनव्रताचा सल्ला याचा कुठे उल्लेख दिसत नव्हता. अखेर ती कथा साभिनय करून सर्वांपर्यंत पोहोचविण्याचा पयत्न केला. पण कुणालाही त्यातले एक अक्षरही समजलेले नाही असे दिसायला लागले.

" पण मी म्हणतो अर्ण्याच्या पोराने त्याला काम सांगायला नको होतं, पण याला एवढीशी मदत करता येऊ नये?"
" च्यायला, घोळ करून ठेवला तो ठेवला आणि वर मिजास पहा याची. राजश्री आपल्याशीही बोलायला तयार नाहीत." कीर्तिकर
" अहो तो बोलणार तरी काय? केल्या कर्माची लाज वाटत असेल आणि बसला वर आपणच फुरगटून" गजा कर्वे.
" पण मी म्हणतो. पोराने तरी बापाला कामे कां सांगावीत. त्याची त्याला करता येऊ नयेत?" रवी सराफ
"कां सांगू नयेत? नाही तरी घरीच बसणार ना हा इथे तिथे तोंड खुपशीत. थोडं काम केलं तर काय बिघडलं?" पुन्हा दाभाडे.
" पण एक मात्र आहे हां! आता विसरला असेल हा ते इन्शुरन्सचं पण म्हणून पोरांनी बापाला काय एवढं भोसडायचं?" रवी सराफ
" ते कांही नाही वडुशेठ. मी म्हणतो जागे व्हा आणि एकदाचा काय तो निर्णय घेऊन टाका" रवी सराफ
" काय बोलतोयेस काय तू रव्या. आणि निर्णय? कसला निर्णय घ्यायला सांगतो आहेस तू अर्ण्याला" दाभाडे
" मी कांही सांगत नाहीये. तोच मागे म्हणाला होता गावाकडे जाऊन मस्त स्वतंत्र रहायचं म्हणून" रवी सराफ
" हा एक (म्हणजे मी) शहाणा आणि त्याच्या बोलण्यावर हुरळून जाणारा तू दीड शाहाणा " दाभाडे
" आयला, तू माझावर काय घसरतो आहेस. त्यालाच विचार ना. गावाकडे जाऊन मस्त मजेत राहायची आयडिया कोणाची?" रवी सराफ
" हो ना! माझाही आयडियाच आहे. आयडियाची सर्व्हिस चांगली नाही हो. त्या पेक्षा एअरटेल चांगला आहे म्हणतात." नाना जोशी
" घ्या! आता हे ऐका.आहो जोशीबुवा ते कानाचं मशीन घरी काय पुजायला ठेवलंय कां" गजा नानावर घसरला
" काय रे अर्ण्या, हा काय प्रकार आहे? तू वडुल्याला जाऊन राहाणार आहेस?" दाभाडे
" ए, कुठाय्‌ रे हे वडुलं?" गजा कर्वे
" कुठं कां असेना. तुला काय करायचंय त्याच्याशी." दाभाडे
" च्यायला असं काय म्हणतोस. हा अर्ण्या जाणार असेल तर बरंय ना" गजा
" काय बरंय?"
"म्हणजे असं बघ. हा गावाकडे स्वतंत्र रहाणार. मग आपल्यालाही कधी जाता येईल याच्याकडे चार दिवस मजा करायला" रवी सराफ
" तिथं जाऊन काय मजा करणार?" दाभाडे
" ते तो सांगेल ना. आपण काय, तेंव्हा पाहुणे असणार. तो आपली सग्गळी सोय करेलच ना?" कीर्तिकर डोळे मिचकावीत.

ही चर्चा कुठल्या कुठे चालली होती. मी हे असं कांही बोललो नव्हतो. गप्पाच्या ओघात आमच्या वडुल्याच्या वडिलोपार्जित इस्टेटी विषयी मी बोललो असेनही. पण हे तर्कट कुठून निघालं कुणास ठाऊक. वडुल्याला आमचं असं होतं काय आता. जे होतं ते माझ्याही जन्माच्याची आधी कूळकायद्यात गेलेलं होतं. मला खरं म्हणजे माझ्या मौना बाबत कांही तरी सांगायचं होतं. मी मनातल्या मनात त्याची तयारी करीत होतो. मौनाबाबत गीतेत कांही श्लोक आहेत कां, ते आठवत होतो. महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे अशा महान प्रभृती मौन पाळीत असत. मी त्यांचाशी माझी स्वत:ची मनोमन
तूलना करीत होतो. आणि इथे कांही भलतेच चावळणे चालू होते. मी या चिंतनातून जरासा बाहेर येऊन मित्रमंडळींच्या चर्चेकडे वळालो तर दाभाडेचं वाक्य कानी आलं,

" ते माझ्यावर सोपवा. जायचंय ना याला गावाकडे. याच्या पोराशी मी बोलतो. याची त्याला सांगायची हिंमत होणारच नाही. आईल् डू दॅट. च्यायला, दोस्तासाठी एवढं करायलाच हवं ना!"

माझ्या पायाखालची जमीन सरकली. हा दाभाड्या कांही करू शकतो याची मला पूर्ण कल्पना आहे. आणि अशा आगी लावण्यात तर प्रत्यक्ष नारदमुनींनी याच्यासमोर हार पत्करली असती. हे सारं "लळीत" माझ्या घरापर्यंत येऊन ठेपलं तर घरात काय महाभारत होईल या कल्पनेने मी उडालोच.
आणि मोठ्ठ्याने ओरडलो,

" बास करा रे हा तमाशा. कां जिवावर उठलात माझ्या?"

दाभाडे खो खो करून हंसायला लागला तशी बाकी मंडळीही त्यात सामील झाली. कोपर्‍यावरून रमेश बागूल आपल्या लांब लांब ढांगा टाकीत,गालातल्या गालात हंसत आमच्याच रोखाने येत होता. गजा जोशी, यातले कांहीही समजलेले नसूनही सगळे हसताहेत म्हणून तोही हसत होता. पण तरीही सावधपणे ओरडला " अरे, पण चहा कोण पाजतोय्?"

"मौनी बाबा !!" एकसुरात जल्लोष झाला.