Sunday, May 17, 2009

वरीस पाडवा

दुपारचे बाराचे टळटळीत उन डोक्यावर घेत दिना त्या दहा मजली इमारतीच्या गच्चीवर उभा होता. डोळ्यावर हाताचा पालथा पंजा धरून दूरवर चिंचोळ्या होत गेलेल्या कच्च्या सडकेच्या टोकापर्यंत त्याने बुबुळांना कळ लागेपर्यंत नीट न्याहाळले. कंत्राटदार किंवा त्याचा मुकादम येण्याचा मागमूसही नजरेला पडत नव्हता. वीस जिने चढून पिंढरीला आलेला पेटका जरासा अलवार झाला तसा दिना पुन्हा पायर्‍या खाली उतरू लागला.

एका पसरटशा टेकाडावार ती जवळजवळ पूर्णावस्थेला आलेली उघडी बोडकी इमारत उभी होती. गावाच्या बरीचशी बाहेर स्वस्तात मिळालेली जागा पटकावून एका बिल्डरने ही इमारत उभी केली होती. पण भोवतालचा परिसर व्यावहारिक दृष्ट्या पुरेसा गजबजलेला होण्याची वाट पहात इमारतीचे अखेरचे बांधकाम स्थगित केले गेलेले होते. सध्या, त्या बिल्डरने नेमेलेला रखवालदार, दिना थिटे, त्याची घरवाली आणि एक चार वर्षाचा मुलगा कृष्णा एवढेच तीघे इमारतीवर वसतीला होते. बांधकाम स्थगित झाल्यापासून गेले सहा महिने कंत्राटदार कधी तिकडे फिरकला नव्हता. सुरुवातीचे चार महिने दर बुधवारी मुकादम एक चक्कर टाकून जाई. जागेवरच्या उरलेल्या वस्तूंवर एक नजर टाकी. थोडी पहा़णी करी आणि हप्‍त्याचा पगार दिनाच्या हातावर टेकवून आल्या पावली परत जाई. पण गेले दोन महिने तोही पुन्हा फिरकला नव्हता. दिनाची घरवाली, कौशी जवळपासच्या चार सहा घरात धुण्या-भांड्याची कामे करी. तिच्या कमाईवरच कशीबशी गुजराण चालली होती.

टिनाच्या खोपट्यात दिना परतला तेंव्हा कौशी चुलीवरच्या तव्यावरच्या शेवटच्या भाकरीवर पाणी फिरवीत होती. डेर्‍यातून लोटाभर पाणी घेऊन दिना घटाघटा प्यायला लागला तशी कौशी त्याच्याकडे पहात म्हणाली,

" सैपाक झालाया. खाउन घिवा. अन् मंग पानी पिवा"
" व्हय की. वाढ."

उरलेले पाणी घेऊन दिना पुन्हा बाहेर गेला. तोंडावर पाण्याचा हबका मारला आणि आत येऊन भुकेल्या मांजरीगत चुलीसमोरच्या जागेवर बसला. कुठूनसा कृष्णा धावत आला आणि बापाशेजारी उकिडवा बसला. पुढ्यातल्या भाकरीचा तुकडा वाटीतल्या लालजर्द कालवणात बुचकळीत म्हणाला,

" बा, तू गावात कंदी जानार?"
" कां रं? "
" नै, म्हंजी कनै.....तू कडं कवा......"
" ए, गप कि रे. जेव की गुमान." कौशी कां तडकली ते दिनाला समजे ना.
" कां चिरडायलीस? बोलू दे की त्याला."
" काय बोलायचंय! हे कवा आननार अन्‌ ते कवा आननार हेच की."
" आत्ता! पोरानं आनि काय करावं म्हन्तीस?"
" तेच की पोरानं तेच करावं आनि तुमी बी तेच करावं."
" म्हंजी?"
" घरात न्हाई दाना आन्‌ म्हनं हवालदार म्हना."
" कोडं कां बोलायलीस. शिध्धी बोल की."
" काय बोलू? वरीस पाडवा परवाला आलाय. कार्टं, हार कडं कवा आननार म्हून बेजारतंय."
" बरं मग?"
" कर्म माजं! घरातल्या दुरड्या कवाधरनं पालथ्या पडल्यात. सनाला काय करनार? तुमी बसा हितच त्या मुकाडदमाची वाट बगत."
" मंग काय करावं म्हन्तीस?"
" पवरा हिरीत पड्ला तर काय वाट पहात बसान कां तो कवा वर येईल म्हून?"

भाकरीचा शेवटचा कुटका दिना चघळीत होता आणि कौशीकडे कौतुकाने बघत होता. कौशीचं हे असं कोड्यातलं आणि म्हणी उखाण्यांनी सजलेलं बोलणं त्याला फार आवडायचं. तशी ती दहावी पर्यंत शिकलेली होती. दिनाची मजल मात्र चौथीपुढे गेली नव्हती. कौशीचं माहेर तसं बर्‍यापैकी शिक्षित होतं. तिचा बा परभणी जवळच्या एका खेड्यात परंपरेने येसकर आणि चार बुकं शिकला म्हणून ग्रामसेवक होता. दिनाचा तो चुलत मामा लागत होता. दिनाचं गांव हिंगोली जवळचं मंठा आणि बाप गावच्या सावकाराच्या जमिनीचा सरकती होता. दिना बापाचा एकुलता एक मुलगा. लहानपणापासून तालमीचा शौकीन. आणि त्यामुळेच की काय डोक्याने जरा जडच. किल्लारीच्या भूकंपानंतर भोवतालच्या परिसराची एकूणच झालेली वाताहत, लागोपाठ पडत गेलेला दुष्काळ आणि राजकीय मागासलेपण या दुष्टचक्रात जी कांही सार्वत्रिक अवदशा झाली त्यामुळे हजारो माणसे देशोधडीला लागली. गांव सोडून पोटापाण्य़ासाठी शहराकडे धांवली. त्या सुमारास नाशिक पुणे परिसरात शहरविस्तारासाठी नव नवीन बांधकामे सुरु झाली. त्यात मग कारागिरीसाठी ही माणसे सामावत गेली. या सार्‍यांना कारागिरी येत होतीच असें नव्हे. पण पोटातल्या आगीने हातांनाही अक्कल दिली. कुणी गवंडी, कुणी सुतार, कुणी कॉन्‍क्रीट कामाचे सेन्‍टरिंग करणारे, कुणी अन्य कांही कामे शोधून पोट भरू लागले. ज्यांना हेही साधले नाही ती माणसे दिनासारखी रखवालदाराचे काम करू लागली. कौशीला दिनाच्या नांवाचं कुंकू ती पाळण्यात असतांनाच लागलं होतं. ती शहाणी सुरती झाली तशी या येड्या बागड्याचा संसार टुकीनं सांभाळू लागली. आत्ताही हा येडाबागडा ओठातून फुटू पहाणारं हसूं दाबून धरण्याचा प्रयत्न करीत मिष्किलपणे कौशीकडे पहात होता. काळीसांवळी असली तरी कौशी ठसठशीत होती. दिनाच्या जिवाची अस्तुरी होती.

" दात काडाया काय झालं?"
" काय न्हाई. ते पवर्‍याचं काय म्हनालीस?" दिनाचा बतावणी पाहून कौशीही हंसायच्या बेतात होती.
" उटा. चहाटाळपणा बास्‌ झाला. तो मुकाडदम कुटं घावतोय का बगा. न्हाईतर त्या बिल्ड्याचा बंगला गावांतच हाय म्हनं. बगा जाऊन एकदा."

कौशीनं बिल्डरचा बिल्ड्या केलेला पाहून दिनाला पुन्हा हसूं फुटलं. पण आता तिच्या समोर अधिक वेळ काढणं शहाणपणाचं नव्हतं. मळालेले कपडे बदलून स्वच्छ कपड्यात खोपटा बाहेर पडणार तेवढ्यात सुशीनं खाटेखालची पत्र्याची ट्रंक पुढे ओढली आणि खालच्या एका पातळाच्या घडीत दडवलेली एक दहा रुपयाची बारीक घडी घातलेली नोट काढून दिनाच्या हातावर ठेवली. दिनाच्या डोळ्यात पाणी तरारलं. गेले दहा बारा दिवस घरात कसे काढले गेले ते त्याला माहिती होतं. कृष्णानं परवा बिस्किटाच्या पुड्यासाठीं हट्ट करून शेवटी कौशीच्या हाताचा फटका खाल्ला होता. आणि आता गावांत जातांना जवळ असावे म्हणून कौशीने बाजूला टाकलेले दहा रुपये दिनाच्या हाती ठेवले होते. त्या क्षणी कौशीला कवेत घ्यावं असं दिनाला वाटलं पण डोळ्यातलं पाणी लपवीत खालमानेने तो तडक बाहेर पडला.

कच्ची वाट सरून वस्ती सुरू झाली तशी दिनाची नजर दिसलेल्या पहिल्या पानटपरीवर गेली. अजून चार फर्लांग चालायचं आहे, गुटक्याची एक पुडी चघळायला घ्यावी म्हणजे जरा तरतरी येईल म्हणून पाय तिकडे वळाले खरे. पण टपरीवर एका बाजूच्या काचेच्या कपाटांत बिस्किटाचे पुडे लावलेले पाहून दिनाची मान आपसूक खाली गेली आणि तसाच तो तरातरा चालायला लागला ते थेट मुकादमचे घर येईपर्य़ंत. मुकादम त्याची फटफटी फडक्याने पुसत होता. अंगावर ठेवणीतले कपडे होते. दिनाची नजर जरा पुढे गेली तर मुकादमाची बायकोही हातातल्या गोठ पाटल्या सांवरत इरकलीत उभी.जोडी कुठे बाहेर जायच्या तयारीत दिसत होती.

" कोण? दिना! कां रं हितं कशापायी येणं केलंस? आन साईट कुनाला इच्यारून सोडलीस?" मुकादमानं एकदम सरबत्तीच लावली.
" न्हाई जी. साईट कशी सोडंन. पाच सा हप्ते झाले. कुनी काई आल्यालं न्हाई साईटवर. म्हून आलो."
" कुनी काई आलं न्हाई म्हन्‍जे? साईट सध्या बंद ठेवलीया. बुकिंग न्हाई. साहेब बी वैष्णोदेवीला गेलेत. सध्या स्ल्याकच हाय."
" पर आमी काय करावं?"
" म्हंजी?"
" म्हंजी, सा हप्ते झालेत. हाजरी न्हाई मिळाली. लै तारांबळ व्हाय लागलीया. काय पैशे मिळतीन म्हणतांना आलो."
" कां कौशी कामाला जातीया ना?" मुकादम डोळा बारीक करीत म्हणाला. दिनाच्या कपाळाची शीर तडतडायला लागली. तरीही सांवरून म्हणाला,
" तिचं काय पुरतं पडायलं? त्यांत जरा वल्ली सुक्की खायाला मिळतिया यवडंच."
" आन लेका, साईट बंद पडलीया तर साइटरवचा माल हाय की."
" ............."
" काय डोळे वासून पहायलास रे ए शहाजोगा. साइटवरचं परचुटन भंगार, ढप्पे ढुप्पे वोपून किती मिळाले ते कां नाही सांगत?"
" काय बोलताय काय साहेब. कां गरीबाला बालंट लावतांय्‌?"
" तुज्या मायचा गरीब तुज्या! काय पहिलाच साईट वाचमन पहालोयं कां मी."
" मुकादम, मी त्यातला न्हाई. काय गैरसमजूत करून घिऊ नका. आज लैच नड लागलीया. काय उचेल तरी द्या बापा."
" आज तर काई जमायचं न्हाई. साहेब बाहेर गेल्यात. माजं बी पेमेन्‍ट झाल्यालं न्हाई. म्होरल्या बुधवारी साईटवर येतो. तवा काय तरी बगू"

एवढं बोलून मुकादम फटफटीला किक मारून चालता झाला.

दिना फटफटीने सोडलेल्या धुराच्या पुंजक्याकडे पहातच राहिला. दिना पाय ओढीत घराकडे चालायला लागला तेंव्हा रानात गेलेली गुरं परतायला लागली होती. मुकादम असा तिर्‍हाईतासारखा वागेल असं त्याला कधी वाटलं नव्हतं. पाय पुढे चालत होते आणि मन मागे भरकटायला लागलं होतं. आठ वर्षांपूर्वी दिनाच्या गावांतून कामधंद्याच्या शोधात शहराची वाट धरलेल्या गरजू तरुणापैकी एक तरूण म्हणजे जालिंदर कुमावत. तसा जरा हिकमती स्वभावाचा. बाकी तरूण जो मिळेल तो कामधंदा, जमेल ते कसब यांत गर्क झाले. स्थानिक मजूरांपेक्षा कमी पैशात काम करूं लागले म्हणून स्थिरावले. पण तरीही शहरातला असलेला मजुरांचा तुटवडा जालिंदरने बरोबर हेरला आणि अवकळा झालेल्या विदर्भातल्या गांवा गांवाकडे चकरा मारून मजूर पुरविण्याचा धंदा करू लागला. शहरी भाषेत लेबर कॉन्‍ट्रॅक्टर आणि साध्या भाषेत मुकादम झाला. गरज संपली की आपणच आणलेल्या माणसांना वार्‍यावर सोडायचे आणि पुन्हा गांवाकडून गरजू कामगारांची फौज आणायची हे कत्रांटदारीतले कसबही त्याला आपसुकच साधले. मुकादम दिनाचा तसा दुसताच गांवकरी नव्हता तर कौशीच्या दूरचा नातेवाईक लागत होता. त्या नात्याने सुरुवातीला दिनाला भाऊजीही म्हणत असें. आणि त्यामुळेंच बहुदा दिनाला त्याने रखवालदाराची नौकरी दिली होती. साईटवर रहाण्याची मोफत सोय होते आहे आणि कौशीही सतत डोळ्यासमोर राहू शकते या दोन लोभापायी दिनाने रखवालदारी पत्करली होती. पण रखवालदारी पेक्षा गवंडी, सुतार, सेन्टारिंग फिटर असे कांही झालो असतो तर फार बरे झाले असते असे दिनाला वाटायला लागले. या कारागिरांना रोजीही चांगली मिळते, हप्त्याच्या शेवटी रोख मिळते आणि शिवाय बुधवारची सुटीही मिळते. रखवालदारासारखं चोवीस तास बांधून रहायला नको. कारागिरी काय, सहा वर्षं झाली कामाला लागून, बिगारी काम करता करता शिकतांही आले असतें. दिनाचं डोकं विचार करून करून थकलं आणि पाय चालून चालून. दिनाला त्याचंही फारसं कांही वाटलं नाही. कारण मुकादम इतरांच्या बाबतीत असाच वागलेला त्याच्या कानावर आलेलं होतं. पण सगळ्यात जीवघेणी जखम झाली होती ती मुकादमानं घेतलेल्या संशयानं. दिनाला तो वार फार खोलवर लागला. इतके दिवस इमानदारीने काम करूनही ही अशी संभावना व्हावी या विचाराने तो उबगला होता. आणि मग आपण चोर नसतांही चोर ठरवले जाणार असूं तर मग इमानदारी तरी कां करायची, या विचारापाशी दिना पुन्हा पुन्हा येत राहिला.

नुसता ओढून घेतलेला दरवाजा ढकलून दिना घरांत शिरला तर कौशी उभ्या गुडघ्यावर हनुवटी टेकवून त्याची वाट बसलेली. कृष्णा बाजूच्या खाटेवर शांत झोपलेला. कौशी जेवणाची ताटं वाढत होती तोवर हातपाय धुऊन दिना तिच्या समोर येऊन बसला. कांही न बोलता मुकाट जेवला. त्याचा रागरंग पाहून कौशीही गप्पच राहिली. कौशी आवरासावर करीत होती तेंव्हाही तो शून्यात नजर लावूनच बसला होता.

" हं, काय झालं? मुकाडदम भेटला?" अखेर कौशीने त्या शांततेला तडा दिलाच.
" हूं. भेटला."
" काय म्हनाला?"
" काय न्हाई"
" म्हंजी......"
" उंद्याला बंदुबस्त व्हईन"
" म्हंजी......"
" म्हंजी, म्हंजी काय लावलया? उंद्याला बंदुबस्त व्हईन म्हनलं ना!" आपण कां इतके करवादलो हे दिनालाही समजेना.
" अवो पर म्हंजी.......कसा? आन्‌ यवडं चिरडायला काय झालं?"
" आता काय बी इचारू नगंस. लै दमायला झालंय बग. उंद्याला तुला पैसं भेटतीन. डाळ,गूळ, हार, कडं सम्दं काय ते घेऊन यी."

कौशीनं फणकार्‍यानं नाक मुरडलं आणि कृष्णाशेजारी जाऊन पडली. दिना लगेच झोपणार नव्हता. बांधकामाच्या जागेवर एक गस्त घालून येणार होता.
आणि आज तर गस्तीला थोडा जास्तच वेळ लागणार होता. दिना कंदील आणि काठी घेऊन निघाला. आज त्याने चाव्यांचा जुडगाही बरोबर घेतला होता. एक नावापुरती गस्त घालून झाली तसा दिनानं हळूच आवाज न करतां बांधकाम साहित्याच्या गुदामाचं कुलुप उघडलं. एक रिकामी गोणी घेतली आणि शिल्लक राहिलेल्या दरवाज्याच्या बिजागर्‍या, कडी-कोयंडे, नळकामाचे सुटे भाग, आणखीही कांही लोखंडी सामान इत्यादि गोळा करून गोणीत भरायचा सपाटा सुरूं केला. अशा दोन गोण्या भरल्या. त्या त्याने उरापोटावर उचलून दाराच्या बाहेर नेउन ठेवल्या. दाराला पुन्हा कुलुप लावून बाहेर येऊन बसला. हाताच्या बाहीला कपाळावर आलेला घाम पुशीत तो पुढची योजना मनाशी ठरवूं लागला. उद्या पहांटे, अंधारातच तो या दोन गोण्या डोक्यावर घेऊन पुन्हा वस्तीकडे जाणार होता. याकूब भंगारवाला फार कांही लांब रहात नव्हता. पहांटच्या वेळेला याकूबकडे अशा मालाचा राबता असतोच हे दिनाला माहिती होते. दिनाच्या अंदाजाने या मालाचे वजन किमान चाळीस किलो तरी भरणार होते. याकूबने कांटा मारला तरी सात रुपयाच्या भावाने दोन अडीचशे रुपये नक्कीच मिळणार होते. कौशीला काय सांगायचं ते उद्याचं उद्या पाहू. सांगू मुकादमाकडून उचल आणली म्हणून. इतकं सारं मनाशी पक्कं करीत दिना घरापाशी पोहोचला आणि बाहेर अंगणात कौशीनं टाकलेल्या अंथरुणावर झोपी गेला.

दुसरे दिवशी दिनाला जाग आली ती कौशीच्या आवाजाने. दचकून दिनाने नजरेच्या टाप्प्यातल्या इमारतीकडे पाहिलं. त्या दोन गोण्या सकाळच्या कोवळी उन्हं घेत होत्या. दिना दचकून उभाच राहिला.

"काय झालं? कुनाशी बोलत होतीस?"
" अवो ते कुरकळणी काका"
"कोऽऽन?"
" मी कामाला जाती ना त्या बंगल्यात. थितलं मालक"
" बरं मग?"
" इक्तं डोळ फाड फाडून कां बगायलाय म्हन्ते मी. कोन रावन आला न्हाई तुमच्या शितेला पळवायला" कौशी डोळे चमकवीत हंसत होती.
" मस्करी सोड. कोन ते कायले आले व्हते ते बोल."
" सांगते! जरा दमानं घ्या की."
" हां बोल."
" ते काका हैत ना. त्यांच्या घराच्या मांग पान्याच्या मीटराचं चेम्बर हुगडच हाय"
" बरं.मग!"
" त्यांच्यात उंद्या तेंची ल्येक येनार हाय. माघारपनाला."
" बरं. मग!"
" तिची कच्ची बच्ची हैत. उगं खेळता खेळता येखांद पडन बिडन चेंबरात. म्हनतांना ते झाकाय पाहिजे."
" बरं मग!"
" डोच्कं तुमचं! त्याला ढापा लावून देशान कां म्हून इचाराय आले हुते, काका."
" अगं पर ते गवंड्याचं काम हाय."
" घ्याऽऽऽ! कुबेरानं धाडला घोडा आन्‌ रावसाहेबांचा फाटका जोडा"
" ये माजे आये! काय समजंन असं बोल की."
" काय कीर्तन समजायचंय त्यांत. रखवालदारानं गवंड्याची थापी हातात घेतली तर काय पाप लागंन कां?"
" पर मला जमंन कां त्ये?"
" अवो निस्तं ढापं तर बसवायचंय. शिमिट बिमिट सम्दं सामान हाय थितं. तुमी करनार नसान तर मी करीन."
" हॉ! मी करीन म्हनं. ते चूल लिपाय यवढं सोप्पं हाय काय?"
" तुमी चूल लिपा सोप्पी. मी ढापं लिपिते."

कृष्णाचा आवाज आला तशी कौशी घरांत गेली. संभाषण अर्धवट राहिलं. पण दिना मनाशी विचार करू लागला. काय अवघड आहे गवंडी काम. कधी बिगारी म्हणून गवंड्याच्या हाताखाली काम करायची संधी मिळाली असती तर ते कामही शिकायला मिळाले असतेच. आज अनायसे काम करून पहायची वेळ आली आहे तर काय हरकत आहे करून बघायला. दिना तसाच गुदामाकडे. गेला इकडे तिकडे बघत गोण्या गुदामात टाकून दिल्या. तिथेच एका गवंड्याची राहिलेली हत्याराची पिशवी उचलली आणि खोपटाकडे परतला. अंघोळ उरकली आणि कुलकर्ण्यांच्या बंगल्याकडे गेला.

ढाप्याचं काम दिनाला फार कांही अवघड गेलं नाही. आणि मग ते काम चटक्यासरशी झाल्यानं कुलकर्णी काकांच्या शेजारच्या बंगल्याच्या अंगणात चार फरशा बसवायचंही काम दिनाला मिळालं. मध्ये एकदा घरी येऊन भाकरी खाऊन गेला तेवढाच काय तो खंड पडला. पण सायंकाळी दिना घरी परतला तेंव्हा दिडशे रुपयाच्या नोटा दिनाने कौशीच्या हातावर ठेवल्या. कौशीच्या डोळ्यात पाणी तरारलं. काल रात्रीही दिनाच्या नकळत जाऊन दिनाला गोण्या भरतांना गुपचुप पाहूनही कौशीचे डोळे डबडबले होतेच. पण आताच्या पाण्यानं डोळ्याला गारवा लागत होता.

भल्या सकाळी चुलीवर शिजलेल्या डाळीत कौशी गूळ हाटीत होती. त्याचा सुवास दरवळत होता. दिना गुढीची आणि गुढीच्या खाली पाटावर मांडलेल्या गवंडी कामाच्या नवीन अवजारांची पूजा करीत होता. मनांत एक संकल्प जागा झाला होता. जीवनाला एक नवी दिशा मिळाली होती.

2 comments:

Unknown said...

अत्यंत हृदयस्पर्शी कथा आहे. नेमकं चित्र डोळ्यासमोर उभं केलंत!

-आदित्य चंद्रशेखर
http://aadityawrites.blogspot.com/

भानस said...

अपमान व परिस्थितीच्या चटक्याने सत्याची कास धरून चालणारे मन क्षणभर विचलित झालेले पाहून देवही हलला. लागलीच आशेचा किरण, कष्टमार्गाची संधी दाखवली.:)भावले.

काल रात्रीही दिनाच्या नकळत जाऊन दिनाला गोण्या भरतांना गुपचुप पाहूनही कौशीचे डोळे डबडबले होतेच. पण आताच्या पाण्यानं डोळ्याला गारवा लागत होता. यथार्थ. कथा आवडली.