"हे मिस्टर मदन.... मदन शृंगारपुरे. आज पासून आपल्याला जॉईन होताहेत, बिपिनच्या जागेवर......"
समोर बसलेल्या पण त्या क्षणी उठून उभे रहात असलेल्या त्या तरुणाची घाणेकर साहेब ओळख करून देत होते.
"....... आणि मिस्टर शृंगारपुरे, लेट मी इन्ट्रोड्यूस, हे मिस्टर कारखानीस.. आमच्या... आय मिन् आपल्या ड्रॉईंग सेक्शनचे सिनीयर ड्राफ्ट्समन"
" ओह्, वेलकम!" मी हस्तांदोलनासाठीं हात पुढे केला.
" मिस्टर कारखानीस, प्लीज, यांना सेक्शनला घेऊन जा. सर्वांना इन्ट्रोड्यूस करा आणि कॅरी ऑन. वुईल यू प्लीज...."
" येस् शुअर, सर"
" मिस्टर शृंगारपुरे, मिस्टर कारखानीस वुईल बी युअर इमिजिएट सुपिरिअर. होप,यु वुईल एन्जॉय हिज कंपनी. सो, गुड लक"
पुण्याच्या एका नांवाजलेल्या लिमिटेड इंजिनियरिंग कंपनीच्या संशोधन आणि विकास विभागाच्या आरेखन कार्यालयाचा मी वरिष्ठ आरेखक होतो. नुकताच एक बिपिन दास नांवाचा आरेखक नौकरी सोडून गेला होता. त्याची जागा रिकामीच होती. त्या जागेवर या तरुणाची योजना झाली होती. एवढे आणि एवढेच माझ्या लक्षांत आलेले होते. कारण ही नेमणूक तशी अचानक झालेली होती आणि ती कुणाच्या तरी शिफारशीने झालेली असावी असा मनांत एक कयास निर्माण झाला होता. अर्थात् त्यामुळे कांही प्रशनचिन्हंही!
मी त्या तरुणाला माझ्या टेबलापाशी घेऊन येई पर्यंत सेक्शनमध्ये कुतुहलाची अस्पष्टशी कुजबुज सुरू झालेली होती. सर्वांशी त्याची ओळख करून द्यायची होतीच. पण त्या आधी मला त्याची माहिती करून घेणे गरजेचे होते. शृंगापुरेला समोरच्या खुर्चीत बसण्याचा निर्देश करून मी सुरुवात केली.
" हां मिस्टर शृंगारपुरे, बसा."
" सर, प्लीज मला अहोजाहो करूं नका. लहान आहे मी तुमच्या पेक्षा. मला तुम्ही नुसतं मदन म्हटलं तरी चालेल"
मला त्याच्या या बोलण्याचं थोडं हसूं आलं. कारण कपाळावर येऊ पहाणारे केस मागे सारण्याचा प्रयत्न करीत हे जे कांही तो बोलला त्यांत एक लाडिकपणाची छटा होती. मी त्याच्या कडे जरा निरखून पाहिलं. गौर वर्ण, बर्यापैकी उंची आणि शरीर यष्टी, अतिशय नीट नेटका पेहेराव, या सार्याशी हे त्याचे लाडिकपणे बोलणे कांहीसे विसंगत होते. त्याच्याशी हस्तांदोलन केले तेंव्हाही त्याच्या हाताचा स्पर्श कांही निराळाच वाटला होता. पण त्याच्या व्यक्तिमत्वाविषयी विचार करण्याची सध्या तरी गरज नव्हती. त्याला कार्यालयाची आणि कार्यालयाला त्याची ओळख करून देणे अधिक महत्वाचे होते.
मी त्याची प्राथमिक ओळख करून घेतली. इंजिनियरींगची पदविका प्राप्त केल्या नंतर त्याने मुंबईच्या एका प्रख्यात इंजिनिरिंग कंपनीत कांही वर्षे नौकरी केलेली होती. तिथे उमेदवारी संपताच त्याने लग्न केले. त्यानंतरही तो सहा वर्षे मुंबईतच राहिला होता पण मुंबईची हवा त्याला मानवेनाशी झाली म्हणून त्याने पुणे गांठले होते आणि एका व्यवसाय विनिमय दलाला मार्फत ही नौकरी मिळवली होती. ही सगळी माहिती सांगतांना त्याचं अतिशय मृदू आणि लाडिक बोलणं मात्र जरा विचित्र वाटत होतं. विशेषत: " इथे घरी कोण कोण असतं?" या माझ्या प्रश्नावर त्याने, " मी आणि आमची फॅमिली एवढेंच" हे जे कांही उत्तर दिले ते इतके लाजून की, मला मोठी मौज वाटली. आणि " आमची फॅमिली" म्हणतांना त्याच्या चेहर्यावर आणि डोळ्यांत जे भाव होते ते विलक्षण रोमांचकारी होते. जणू त्या क्षणीही पत्नी त्याच्या समोर होती. मला हंसू दाबून ठेवण्याचा कसोशीने प्रयत्न करावा लागला.
मी मदन शृंगारपुरेला त्याची कामाची जागा दाखवली, कामाचं स्वरूप समजावून दिलं आणि सर्वांशी रीतसर ओळख करून दिली. औपचारिक ओळखी नंतर थट्टामस्करीसह होणारी खरी ओळख दुपारच्या जेवणाच्या वेळेला सुरू झाली. मी वयाने आणि अनुभवाने थोडा मोठा होतो म्हणून वरिष्ठ खरा पण तसे सर्वच सहकारी जवळपास सारख्याच वयाचे होते, आणि शिवाय अस्सल पुणेकर होते. कार्यालयीन वेळेनंतर मीही शिंग मोडून मी त्या कळपातलाच एक बनून रहात असें. त्या मुळे अशा अनौपचारिक वे़ळेला त्या उतांतही मी सामिल होत असें. आम्हाला असें एखादे गिर्हाईक हवेंच असायचे आणि आता तर ते आयतेंच मिळालेले. मग त्या दिवसा नतंर रोजचेच एक उधाण येऊ लागले. त्याच्या मदन या नांवाची जशी यथेच्च टिंगल झाली आणि लाडिक बोलण्याचीही. बापट तर एकदा म्हणालाही की आपण जर तरुण तुर्क - म्हातारे अर्क हे नाटक जर बसवले तर त्यातल्या ’ कुंदा’ चे पात्र शोधायला नको. मात्र शृंगारपुरे कधी चिडला नाही. सगळी टवाळी तो हंसत हंसत झेलायचा. खरी गंमत वाटायची ती, तो पत्नीचा उल्लेख फॅमिली असा करायचा त्याची.
एकदां तो त्याची फॅमिली इडली सांबर खूप छान करते असें म्हणाला तर कोणीतरी सप्रयोग सिद्ध कर म्हणालं आणि पुढच्याच रविवारी सगळे इडली सांबर खायला त्याच्या घरी जातील आणि अनायसे वहिनींची ओळखही होईल असा बूट निघाला. तेंव्हा मात्र तो थोडा भांबावलेला दिसला. पुढच्या रविवारी त्याची फॅमिली माहेरी जाणार आहे हे सांगतांना त्याचा चेहरा ओशाळवाणा झाला होता. मात्र कां कोणास ठाऊक, ती त्याची केवळ सबब असावी आणि आम्हाला तो त्याच्या घरी नेण्याचे टाळतो आहे अशी त्याच्याच शेजारी बसणार्या बापटला शंका आली. ती त्याने खाजगीत बोलूनही दाखवली. पण असतांत अशी कांही माणसे, ज्यांना मर्मबंधातले कोश जपायला अधिक आवडतं. त्यातला हाही एक असेल म्हणून मी बापटची समजूत काढली.
पण दुसर्याच दिवशी हा बहाद्दर कामावार येतांना दोन मोठ्या डब्यात इडली सांबर आणि एका छोट्या डब्यात ओल्या खोबर्याची उडपी उपाहारगृहांत असतें तशी चटणी, शिवाय स्टीलच्या ताटल्या, चमचे एवढा सगळा जामानिमा घेऊन आला तेंव्हा आम्ही चाटच पडलो. त्याच्या फॅमिलीने इडली सांबर मात्र अप्रतिम चवीचे केले होते. सगळ्यांनी वानवानून त्याचा फडशा पाडला. शृंगारपुरेचा चेहरा कृतकृत्यतेने उजळला होता. त्याच्या फॅमिलीने इतका मोठा उठारेटा केला याचे मला कौतुक वाटले. बापटला मात्र ती चव विश्व या उपाहारगृहातल्या इडलीसांबार सारखीच कशी हा प्रश्न पडला होता.
त्यानंतर शृंगारपुरे मधून अधून कांही ना कांही खाण्याचे पदार्थ आमच्या साठीं घेऊन येत असें. कधी शंकरपाळे तर कधी चकल्या. कधी बेसनाचे लाडू तर कधी खोबर्याची बर्फी. साक्षात अन्नपुर्णेने केलेले असावे अशी त्या पदार्थाची चव असायची. तसेंही त्याच्या जिभेवर सतत फॅमिलीचेच गुणगान असायचे. दुसर्या कुठल्या विषयावर बोलतांना आम्ही कधी त्याला ऐकला नव्हता. बायकोवर इतके प्रेम करणारा तरुण आम्ही प्रथमच पहात होतो. एकदा त्याने आणलेली बाखरवडी तर ती चितळे मिठाईवाले यांच्याकडून मागवलेली असावी इतकी खुसखुशीत होती. त्याची बायको खरोखरच इतकी सुगरण असेल कां ही शंका आम्हां सर्वांनाही आलीच होती. तरी, खाल्ल्या बाखरवडीला जागायचे म्हणून कोणी तशी कांही टिप्पणी केली नाही. पण बापट तसा गप्प रहाणार्यातला नव्हता. त्याने हल्लाबोल केलाच.
" ए खरं सांग मदन्या, ही बाखरवडी चितळेची आही की नाहीं. च्यायला तुझ्या बंडला खूप झाल्या हं"
" नाही हो. देवा शपथ सांगतो. आमच्या फॅमिलीनेच बनवलेली आहे ती" शृंगारपुरेचे डोळे पाण्याने डबडबले.
" चल मग तुझ्या घरी घेऊन चल एकदा आम्हाला सगळ्यांना. वहिनींना आम्ही समक्षच कॉम्प्लीमेन्ट देऊ"
" घरी? घरी कशाला? हो...हो...घरी....घरी.... या ना....जरूर या....फॅमिलीला......." शृंगारपुरे गदगदून रडायच्या बेतात.
ऑफिसमधले वातावरण चमत्कारिक कुंद झाले. तसें मी सगळ्यांना आपापल्या जागेवर पिटाळले आणि शृंगारपुरेच्या पाठीवर हात फिरवत त्याला शांत करू लागलो. पण माझ्याही मनांत एक शंका, एक संभ्रम निर्माण झाला होताच. वास्तविक त्याच्याच काय पण कुणाच्याही खाजगी आयुष्यात डोकावू नये एवढे समजण्या इतके आम्ही सगळेच सभ्य होतो. परिपक्वही असूं कदाचित. पण शृंगारपुरेचे हे असले वागणे कोड्यात टाकणारे होते. विशेशत: त्याच्या फॅमिलीचा विषय निघाला की तो कमालीचा खुले पण लगेचच आपले पंख मिटून घेत असे. सतत तो कांही तरी लपवतो आहे असा भास होत असे. तशा त्याच्या आणखीही कांही गोष्टी कोड्यात टाकणार्याच होत्या. कार्यालयीन माहितीत त्याने सिंहगड रोड वरील हिंगणे गांवाचा पत्ता दिलेला होता. मुंबईहून पुण्याच्या हडपसर सारख्या ठिकाणी नौकरी करायला आलेला हा माणूस हिंगण्यासारख्या सोळा सतरा किलोमीटर दूरच्या ठिकाणी कां राहतो? खरं म्हणजे त्या काळात त्याला हडपसरच्या जवळपासही एखादी चांगली निवासी जागा अगदी सहज मिळाली असती. ज्या काळात आम्हाला एक चांगली सायकल विकत घ्यायची म्हणजे दिवाळीच्या बोनसची वाट पहावी लागे त्या काळात हा स्कूटरवर कामाला येत असें. त्याच्या कामांत तो तसा साधारणच पण बरा होता. पण कमालीचा नीटनेटकेपणाच्या संवयीचा. लहानसा कागद लिहायला घेतला त्याला तरी समास पाडल्याशिवाय तो लिहायला सुरुवात करीत नसे. त्याच्या या सगळ्या गोष्टी बाजूला सरून त्याच्या बायको विषयी कुतुहल मात्र आता प्रकर्षाने पुढे आलेले होते. याचा छडा लावायचाच असें माझ्या मनांत आले.
पुढच्याच रविवारच्या सुट्टीत मी ते आमलात आणले. हिंगण्याच्या अलिकडेच विठ्ठलवाडीला माझा एक नातेवाईक रहात असे त्याच्या कडे जायच्या निमित्ताने मी शृंगारपुरेच्या घरी जाऊन धडकलो. मला पहाताच शृंगारपुरे चकितच झाला. नुसताच चकित नव्हे तर पुरता भांबावला. या या म्हणत त्याने मला घरांत घेतले आणि "बसा. मी पाणी आणतो तुमच्यासाठीं" म्हणत स्वयंपाक खोलीत गेला. मी सभोवताली नजर टाकू लागलो. शृंगारपुरेच्या एरवीच्या नीटनेटकेपणाचा मागमूसही तिथे कुठे दिसत नव्हता. दोनच पण जरा मोठ्या खोल्यांची ती जागा होती. दरवाज्या लगतच एक खिडकी आणि खिडकी खाली एक पलंग. पलंगावरची चादर सुरकुतलेली, पांघरुणाची चादर अस्ताव्यस्त पसरलेली. पलंगाच्या उशालगतच्या दांडीवर एक लेडीज नाईट गाऊन लटललेला. पलंगाच्या काटकोनातील भिंतीलगत एक आरशाचे कपाट. कपाटाशेजारी एक टीपॉय, त्यावर विस्कटून पडलेली कांही पुस्तके. छताला लटकणारा पंखाही बराचसा धुळकटलेला. दरवाज्यालगतच्या कोपर्यात कांही पादत्राणाचे जोड. एकूणातच एखाद्या कुटुंबवत्सल घराला विसंगत ठरावे असें चित्र. मी कांहीसा विस्मयचकित आणि कांहीसा गोंधळलेला.
" घ्या सर. पाणी घ्या." शृंगारपुरेच्या आवाजाने मी भानावर आलो. गणिताच्या पेपरला निघालेल्या विद्यार्थ्यासारखा त्याचा चेहरा झाला होता.
" शृंगारपुरे... वहिनी..?" मी चेहरा शक्य तितका कोरडा ठेवण्याच्या प्रयत्नात.
" हां! त्याचं काय झालं. फॅमिली जरा गावाला गेलीय."
" कधी? काल ऑफीसमध्ये कांही बोलला नाहीत."
" नाही. बोललो नाही..पण तसं कांही बोलण्या सारखं नव्हतं म्हणून....."
" अच्छा, अच्छा! कांही विशेष?"
" कांही नाही हो. फॅमिली तिच्या एका मैत्रिणीच्या मंगळागौरीला गेली आहे"
" मंगळागौरीला? आत्ता? मार्गशीर्षांत..?
" ओह् ! आय एम सॉरी.एक्स्ट्रीमली सॉरी. डोहाळजेवणाला."
" म्हणजे?"
" अहो, माझं हे असं होतं बघा. फॅमिली नसली ना की मी अगदी गोंधळून जातो. सो मच आय मिस् हर."
"............."
" ती गेलीय नाशिकला. तिच्या एका जीवश्च कंठश्च मैत्रिणीकडे. डोहाळजेवणाला. सर, तुम्ही बसा कोपर्यावरून दूध घेऊन येतो. आपण चहा घेऊ"
" छे, छे. चहाचं राहू द्या हो. परत कधी येईन चहाला. मलाही थोडी घाईच आहे. मी निघतो.."
" सर, प्लीज. माझाही चहा व्हायचाच आहे. आत्ता येतो. पटकन् दोन मिनिटात. तोवर हे बघा जरा."
असं म्हणत त्याने कपाटातून एक फोटोचा अल्बम काढला आणि माझ्या हातांत देऊन तो पसार झाला. तो अल्बम त्याच्या लग्नात काढलेल्या फोटोंचा होता. म्हणजे या इसमाला बायको होती तर, या विचाराने मला जरा बरं वाटलं. मी एक एक पान उलटीत फोटो पाहू लागलो. कोणत्याही लग्नातला ठराविक स्वरूपाचा असतो तसा तो अल्बम होता. पहिल्याच पानावर त्याचा आणि त्याच्या बायकोचा जोडीने काढलेला फोटो होता. शृंगारपुरेची बायको मात्र हिन्दी सिनेमातल्या मधुबालानेही हेवा करावी इतकी सुंदर होती. गौर वर्ण, भव्य कपाळ, टपोरे डोळे, चाफेकळी नाक आणि या सगळ्या सौंदर्यावर कडी करणारा डाव्या गालावरचा तीळ. नशीबवान आहे बेटा, मी मनांतल्या मनांत पुटपुटलो. पुढे नित्यनेमाचे फोटो झाल्यावर खास पोझ देउन काढलेले दोघांचे फोटो तर अप्रतिम होते. जवळ जवळ सगळ्याच ठिकाणी अत्यंत भावस्पर्शी डोळ्यांनी त्याची बायको त्याच्याकडे प्रेमार्द्र नजरेने पहात होती. कांही वेळापूर्वी त्याच्या बायकोबद्दल एक अनाकलनीय शंका माझ्या मनांत उद्भवली होती तिची मला लाज वाटली आणि त्याच्या फॅमिलीला भेटण्याची उत्सुकता वाढली.
दुसरे दिवशी मी ऑफीसला गेलो तेंव्हा खाजगीत बापटला ती हकीकत सांगितली. तो तर चाटच पडला. त्याने त्याच्या स्वभावाला अनुसरून ती बातमी हळू हळू सगळ्यांपर्यंत पोहोचवली देखील. त्या दिवसापासून बहुतेक सार्यांचीच शृंगारपुरेकडे पहाण्याची नजर जरा बदलली. जो तो त्याच्याशी मैत्री करण्याची अहमहमिका करूं लागला. पालेकर तर त्याचा खास मित्र बनला. कारण पालेकरचे अजून लग्न झालेले पण तो बोहोल्यावार उभा रहायच्या तयारीत होता. शृंगारपुरेला जणू त्याने गाईड बनवले आहे असे वाटावे असे त्यांचे आपसात कुजबुजणे चाललेले असायचे. शृंगारपुरेने त्याला एकदा आपल्या बटाव्यातला बायकोचा फोटो दाखवला तसा तो, ते लावण्य पाहून, अगदी वेडावलाच. आपल्यालाही अशीच बायको मिळावी असे स्वप्न पाहू लागला. मध्येच एकदा पालेकर चार दिवस रजा टाकून मुलगी पहायला गेला तेंव्हा त्याने शृंगारपुरेलाही बरोबर चलण्याची विनंती केली पण ती त्याने, फॅमिली घरी एकटी कशी राहील या सबबीवर, नाकारली.
चार दिवसांची रजा संपवून पालेकर कामावर पुन्हा रुजू झाला त्या वेळी शृंगारपुरे त्याच्या फॅमिलीने आदल्या दिवशी केलेल्या चिरोट्याचा डबा सर्वांना वाटण्यासाठीं उघडत होता. पालेकरला पहाताच त्याने " या पालेकर. अगदी वेळेवर आलांत. आमच्या फॅमिलीने..." शृंगारपुरेने एवढे शब्द उच्चारले असतील नसतील एवढ्यात पालेकर तिरासारखा त्याच्या अंगावर धावला. त्याने तो डबा उधळून दिला आणि शृंगारपुरेची कॉलर पकडून मारण्यासाठीं मूठ उगारली. काय होते आहे ते कुणाच्याच लक्षात येइना. पण एका अनाकलनीय सावधतेने मी वेगांत पुढे धावलो. पालेकरच्या कमरेला हातांचा विळखा घालीत त्याला मागे खेचला आणि ओढत ओढत ऑफिसच्या बाहेर घेऊन गेलो.
बाहेर जिन्याच्या पायरीवर पालेकर ओंजळीत चेहरा झाकून धरीत मटकन बसला. कसल्या तरी संतापाचा उद्रेक त्याला आवरता येत नव्हता. " पालेकर काय झालंय ?" मी त्याच्या खांद्यावर थोपटत विचारले. चेहर्यावरचा हात काढीत लालबुंद डोळ्यांनी पालेकर उसळला,
" फ्रॉड आहे साला हा हलकट. कसली फॅमिली अन् कसलं काय. च्यूत्या बनवतो साला आपल्याला. याच्या तर........."
पालेकरने हळूं हळूं शांत होत जे कांही मला सांगितलं ते असं होतं. पालेकर नाशिकला जी मुलगी पहायला गेला होता तिथे पहाण्याच्या कार्यक्रमाच्या वेळी मुलीकडच्या बायकांत एक तरूण स्त्री हुबेहूब शृंगारपुरेच्या बायकोसारखी दिसली होती. शृंगारपुरेच्या बायकोचा फोटो पालेकरनेही पाहिला होता. तिच्या गालावरचा तीळही त्याच्या लक्षांत राहिलेला होता. आधी असेल कुणीतरी, असतात कांही माणसे एका सारखी एक दिसणारी, म्हणून पालेकरने जरा तिकडे दुर्लक्ष केले. पण ती इकडून तिकडे वावरतांना पालेकरने तिच्या गालावरही तसाच तीळ पाहिला आणि तो चक्रावला. मग त्याने सरळच चौकशी केली तेंव्हा..... ती पूर्वाश्रमीची शृंगारपुरेचीच बायको होती. सध्या घटस्फोटित होती. लग्नानंतर तिला एका विदारक सत्त्याला सामोरे जावे लागले होते. लग्नापूर्वी भावी पतीचे गोरेगोमटे रूप पाहून ती हरखली होती. पण तिची भयानक फसगत झालेली होती. तिच्या स्वप्नांचा ढग अभ्रकाचा आहे हे तिला पहिल्या रात्री समजले तेंव्हाच ती उध्वस्त झाली होती. पण कांही औषधोपचाराने सुधारणा होईल या आशेवर दीडदोन वर्षे गेली. पण ती होणारच नव्हती. कारण तो दोष जन्मजात होता आणि हे शृंगारपुरेलाच काय पण त्याच्या मातापित्यांनाही माहिती होता. पण लग्नानंतर कदाचित कांही चमत्कार होईल या आशेवर त्यांनी त्याचे लग्न करून दिले होते. शृंगारपुरेने सुरुवातीस दादापुता करीत दत्तक मूल घेण्याबाबत बायकोअचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. पण तिने घटस्फोटाची मागणी करतांच तिचा छळ चालू केला होता. शृगारपुरेच्या आईवडिलांनीही त्याला त्यातच साथ दिली. पण दुसर्याच वर्षी त्यांना कोर्टात आरोपीच्या पिंजर्यात उभे रहावे लागले होते. शृंगारपुरेच्या वकिलांनी अटोकाट प्रयत्न करून त्याची फसवणुकीच्या आरोपाखालील सक्तमजुरीची शिक्षा टाळली होती पण घटस्फोट अगदी सहजगत्या मंजूर झाला होता.
सुन्न झालेले डोके जरासे हलके झाले तसे आम्ही दोघेही आपापल्या जागेवर परत आलो तेंव्हा सेक्शनमध्ये सगळे आपापल्या कामांत गर्क होते. निदान तसें दाखवीत होते. एक विचित्र शांतता आसमंतात पसरलेली होती. मी शृंगारपुरेच्या टेबलाकडे पाहिलं. तो तिथे नव्हता. म्हणून टेबलकडे गेलो. टेबलवर चिरोट्याचा डबा होता आणि डब्याखाली त्याचा चार ओळीचा राजिनामा.
Thursday, May 28, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
3 comments:
ह्म्म्म, ही शंका आलीच होती. ह्या अशा माणसांच्या बाबतीत बरेचदा असेच घडते. आईवडील सगळे माहीत असूनही लग्न लावण्याचा प्रयत्न का करतात आणि आपण पुरूषच आहोत हे दाखवण्याच्या भानगडीत एका मुलीचे वाटोळे करून टाकतात.
मला नेहमी वाटते खरा मुद्दा समाज अशा लोकांशी कसा वागतो इथे आहे. जन्मता असणारा हा problem समजून घेतला जात नाहीच उलट सतत टिंगल-टवाळीला तोंड द्यावे लागते. शेवटी परिणीती काहीतरी वाईट घडण्यातच होते.
आवडली.
Ek number jamaliye katha...
छान आहे.
Post a Comment