Tuesday, March 20, 2007

आस

एकदा येऊन जा, घेऊन जा साऱ्या व्यथा
आर्त झालेल्या जिवाच्या संपल्या साऱ्या कथा
जाणिवा ज्या मूर्त होत्या
स्पंदने जी छंद होती
आज त्या संवेदनांच्या दग्ध झाल्या पाकळ्या
एकदा येऊन जा, घेऊन जा साऱ्या व्यथा... ॥ १ ॥
मृदु स्वरांनी गायिलेले
गीत अनुरागी क्षणांचे
त्या स्वराच्या छिन्न झाल्या तरलशा साऱ्या तऱ्हा
एकदा येऊन जा, घेऊन जा साऱ्या व्यथा... ॥ २ ॥
जीवनाची आस सरली
ज्योतही ती क्षीण झाली
स्नेह ना मी मागतो परि, फुंकुनी जा हा दिवा
एकदा येऊन जा, घेऊन जा साऱ्या व्यथा... ॥ ३ ॥

-- अरुण वडुलेकर

3 comments:

प्रमोद देव said...

वा! झकास! कविता अर्थपूर्ण आहे.
पण जीवनाला एव्हढ्यात कंटाळलात?

suresh ranade said...

आपला लेख आवडला. आमच्या www.mymarathi.com या संकेतस्थळांवर आपल्या ब्लॉगचे संदर्भ देत आहे. आपल्या कार्यास शुभेच्छा
डॉ. सु. वि. रानडे

भानस said...

arUNadaadaa, are tuzya kavita hyaa aadhi majhyaa vaachanaat aalyaa navhatya. chaangali aahe. Niraashaawadi aahe.